Wednesday 18 January 2012

वलयांकित पाककला

पूर्वी पाकशास्त्र या क्षेत्राभोवती एक वलय नव्हतं. एकतर आहार शिजवण्याची मक्तेदारी घरांतील बायकांकडे होती किंवा लग्न समारंभात आचारी किंवा खानसामे ही भूमिका पार पाडायचे. मोठ्ठाल्या कढया, घमेली शेगड्यांवर चढवली जायची आणि हे पोट सुटलेले, घामेजलेले कळकट्ट आचारी त्यावर अन्न शिजवायचे. घरातील बायकाही नऊवारी लुगडे नेसून स्वयंपाकघरात कामाला जुंपलेल्या असायच्या. एखादी आलवणातली आत्या किंवा मावशी पाककलेची बाराखडी या नव्या मुली-सुनांकडून गिरवून घ्यायची. सर्वसाधारण बहुतांश घरातील हे चित्र होतं. 
कालप्रवाहाप्रमाणे हळूहळू चित्र बदलत गेलं. घरदार सोडून स्त्री जशी नोकरी करू लागली तशी स्वयंपाकीणबाईंची घराघरात एन्ट्री झाली. एक नवीन व्यवसाय उभारी धरू लागला. पोळी-भाजी करणारी बाई, पूर्ण स्वयंपाक करणारी बाई, वरची चीराचिरीची कामे करणारी बाई, धुणी-भांडी करून घरातील स्त्रीला मदत करणारी बाई म्हणून स्वयंपाकीणीची वर्णी लागू लागली. आज मात्र बायकांसमोर काम करणाऱ्या बाईव्यतिरिक्तही दुसरे पर्याय आहेत. ठिकठिकाणी पोळी भाजी केंद्रे उघडली आहेत. ऑफिसमधून येणाऱ्या बऱ्याच बायका संध्याकाळच्या जेवणाची सोय इथून बघतात. एकट्या राहणाऱ्या अनेक पुरुषांचीही या पोळी-भाजी केंद्रांनी चांगली सोय केली आहे. 
आज 'आचारी ते शेफ' असा कालानुरूप बदल झाला आहे. पाककलेतील सौंदर्याची प्रचीती टी. व्ही.च्या माध्यमातून जगाला आली आहे. 'रांधा वाढा उष्टी काढा' ही मानसिकता हळूहळू हा होईना कात टाकते आहे. आधुनिक उपकरणे हाताशी धरून स्त्रीने स्वयंपाकघराला एक सोफिस्टीकेटेड टच दिला आहे. जुनी तांब्या-पितळेची भांडी जाऊन त्याजागी नॉन-स्टिक भांडी, मायक्रोवेव्ह सेफ भांडी आली आहेत. शहरातील बहुतेक कुटुंबे ही 'न्युक्लीअर' असल्याने आपापल्या आवडीनुसार पदार्थ करण्याचे स्वातंत्य्र स्त्रीला अनुभवता येते आहे.  
सुहास्यवदन संजीव कपूरने पाककलेला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. त्याच्या 'खाना-खजाना' या कार्यक्रमाने पाककलेच्या क्षेत्रात क्रांती आणली आणि ह्या निमित्ताने अनेकांना आपल्या पाककलेचे कसब जगासमोर दाखवायला सुसंधी मिळाली. वेगवेगळ्या पाक-स्पर्धांमध्ये घराघरांतील स्त्रिया हिरीरीने भाग घेऊ लागल्या आहेत. आज निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ पाककलेत निपुण असलेल्या लोकांकडून पाहता येतात, घरबसल्या शिकता येतात. चार भिंतीत बंदिस्त असलेली, स्त्रियांना कोणतीही प्रतिष्ठा बहाल न करणारी पाककला आता लोकप्रिय झाली आहे इतकेच नव्हे तर या माध्यमातून साधारण वाटणाऱ्या स्त्रीला ही कला लोकाभिमुख, समाजाभिमुख करते आहे. वर्षानुवर्षे स्वयंपाकघरात घाम गाळून, राबराबून स्त्रीला दुय्यम स्थान मिळायचे किंवा तिची उपेक्षा व्हायची. कारण मुळातच स्वयंपाक करणे हे स्त्री जन्माच्या पाचवीला पुजलेले होते. 'चूल आणि मुल' या कचाट्यातून स्त्रीची सुटका नव्हती. पण काळ बदलला आणि स्त्रीच्या कर्तुत्वाच्या कक्षा रुंदावल्या. घराच्या जबाबदारी प्रमाणे ऑफिसचीही जबाबदारी स्त्री समर्थपणे सांभाळू लागली. तिच्या  जाणीवा,तिची मुल्ये अधिक व्यापक झाली.  
आज ठिकठिकाणी 'खाद्यमहोत्सव' साजरे केले जातात. आपल्या प्रांताचे वैशिष्ट्य असलेले पदार्थ तयार करून खवैय्यांची माने जिंकता येतात. स्त्रियांप्रमाणे अनेक पुरुषही या क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यास उत्सुक असतात कारण आज या व्यवसायाला एक प्रतिष्ठा लाभलेली आहे. आधुनिक वस्त्र-प्रावरणात, अत्याधुनिक किचनमध्ये पदार्थांचे नव-नवे प्रयोग  करताना एक वेगळाच आनंद होतो. पदार्थांची आकर्षक मांडणी, तयार पदार्थावरचे गार्निशिंग खवैय्यांच्या डोळ्यांनाही तृप्त करून जाते. आपला आहार कसा असावा व कसा असू नये यासंबंधी वेगवेगळे आहारतज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतच असतात.      
जुने ते सोने ही व्याख्या थोडीशी बदलून मी असं  म्हणेन की जुने ते सगळेच सोने नसते. काही जुन्या पद्धती अजूनही टिकून आहेत . पण पारंपारिकतेच्या नावाखाली फक्त जुनाट गोष्टी गोंजारीत राहायच्या आणि नव्या गोष्टींची निंदा करायची यात तरी काय तथ्य आहे? जुन्या चांगल्या चालीरीती,पद्धती जरूर अंगीकाराव्यात पण नव्या सुविधांना, सोयींना कमी लेखू नये. काळाप्रमाणे माणूस बदलला पाहिजे, अधिकाधिक संमृद्ध झाला पाहिजे, त्याच्या जाणीवा विस्तारल्या पाहिजेत, त्याची दृष्टी अधिक व्यापक झाली पाहिजे. वर्षानुवर्षे कवटाळून बसलेल्या किचकट,वेळखाऊ आहारपद्धती बदलून आता सोप्या आणि अल्पावधीत तयार होणाऱ्या पण चांगली पोषणमुल्ये असणाऱ्या आहारपद्धती आपण स्वीकारल्या पाहिजेत.   

'रांधा वाढा आणि उष्टी काढा' हे आजच्या स्त्रीचं स्थान नसून ती स्वत:च्या घरातील 'सु-शेफ' आणि 'आहारतज्ञ' आहे.   



No comments:

Post a Comment