Saturday 14 January 2012

तिळगुळ घ्या कधीतरी गोड बोला ......

गोड बोलल्यावर लगेच डायबेटीस होत नाही तसेच डायबेटीस ऑलरेडी असेल तरी गोड खायला बंदी असते बोलायला नाही हे ठाऊक असूनही माणसे गोड बोलायला कचरतात. कदाचित म्हणूनच तिळगुळ खाल्ल्यावर तरी माणसांनी माफक गोड बोलायला हवे. संक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा होत असतो तेव्हा या कालावधीत तरी गोड बोलून बघायला हरकत नाही. विशेषत: मराठी माणसांनी!

काही माणसे जिभेवर कारले घेऊनच जन्मत असावीत. त्यामुळे सतत कडवट बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच असावा. काडेचिराइताचा काढा प्यायल्यासारखे यांचे सदैव लांबट तोंड बघून कुणा चतुर माणसाला 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' हा सुविचार सुचला असला पाहिजे. पण वास्तविक पाहता संक्रांतीचा सण हा फक्त जानेवारी महिन्यात येतो. एवढा एकच महिना फक्त गोड बोलायचे? गुढीपाडव्याच्या दिवशी आपण 'श्रीखंड खा गोड गोड बोला' किंवा होळीच्या दिवशी आपण 'पुरणपोळी घ्या गोड गोड बोला' असे का नाही म्हणत? आपण आपल्या उण्यापुऱ्या आयुष्यात जितके गोड खातो त्याच्या शतांशाने तरी गोड बोलतो का ? 
काही माणसांना काही गोड बोलण्याची,बघण्याची मुळी allergy च असते. काही चित्रपटांतून बघा सारखं एखाद्याचं चांगलंच झालेलं दाखवतात. तेथील घरात सगळी माणसे जिभेवर साखर ठेऊनच बोलत असतात. प्रेम,प्रेम आणि प्रेम याशिवाय त्यांच्या आयुष्यात काहीच नसतं. कसं काय शक्य आहे? असे प्रसंग पाहताना ही माणसे मर्तिकाला बसल्यासारखी बसतात. इतकं गोड बघताना त्यांना अजीर्ण झाल्यासारखं वाटतं. सुरज बडजात्याने तरी इतकं सगळं आनंदी,गोड का दाखवावं? थोडं तारतम्य बाळगायला नको का? त्यावेळी हे जेवत असतील तर यांना हमखास ठसका लागतो. ही माणसे एकवेळ प्रकृती नीट राहावी म्हणून 'लाफ्टर क्लब' जॉईन करतील पण घरी जरा हसतील, गोड बोलतील तर शपथ! यांना निर्माण करताना परमेश्वर हास्यरस नामक भाव यांच्यात 'फिट' करायला विसरला असावा. 
कुठल्याही गोष्टीचा आनंद घेणे म्हणजे नेमके काय हे यांच्या गावीही नसते. घरात कुणाचा वाढदिवस असेल हसायचे नाही, लग्नाला जायचे पण हसायचे नाही, चांगला कार्यक्रम बघितला हसायचे नाही, दुसऱ्याला शुभेच्छा देतानाही असे बोलायचे की आत्ताच कुणाला पोहोचवून आले आहेत. किती छान आहे तुझा ड्रेस किंवा किती छान गातेस तू किंवा किती छान मार्क मिळवलेस तू असं आणि इतकं गोड बोलतानाही यांच्या जीवावर येतं. मुळातच गोड बोलायचं का हा प्रश्न त्यांना मनोमन सतावत असावा. त्यामुळे फार गोड बोलणारी माणसे ( ही तशी दुर्मिळच असतात) यांच्या 'गुड बुक्स' मध्ये कधीच नसतात. 
कुणाची प्रशंसा करणं म्हणजे गोड बोलावं लागणार या नुसत्या विचारानेच ही माणसे कासावीस होतात. आता राजकारणी लोक बोलतात तसं आणि तेवढं गोड नाही बोललात तरी चालेल कारण त्यांचे मनसुबे निराळे असतात, त्यांची धोरणे निराळी असतात. निवडणुका जवळ येताच त्यांना प्रथम कोणती गोष्ट करावी लागते ती म्हणजे गोड गोड बोलून लोकांना आपलेसे करणे. इतकी वर्षे रखडलेली कामे पटापट हातावेगळी करून लोकांच्या मनात स्वत:चे स्थान बळकट करणे, चेहरा भलताच गोड,प्रसन्न ठेऊन आश्वासने देणे या कसरती त्यांना गोड बोलूनच साद्ध्य कराव्या लागतात. 
गोड खाण्यास हपापलेली माणसे गोड बोलण्यास आसुसलेली नसतात. आपल्या गोड बोलण्याने आपला तसाच दुसऱ्याचाही दिवस चांगला जाईल हा विचार यांना मान्य नसतो. सकाळी ऑफिसला जाताना किंवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर दोन शब्द का होईना गोड बोलावे आणि घरातील वातावरण प्रफुल्लीत,आनंददायी करावे हे यांना पटतच नाही. पण कुणाच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल,कुणाचा पाणउतारा करायचा असेल किंवा कुणाविषयी कुत्सित बोलायचं असेल तर यांचा नंबर पहिला असतो. किंबहुना अशा वेळेस सगळे वांग्मयकार यांना वश झालेले असतात. 
खरे म्हणजे चांगल्या पद्धतीने सरळ,साधे,सोपे बोलणे म्हणजे गोड बोलणे. दुसऱ्याला आवडेल असे बोलणे म्हणजे गोड बोलणे, प्रियजनांना न दुखावता बोलणे म्हणजे गोड बोलणे. आणि असे गोड बोलायला खरंच कोणतेही कष्ट पडत नाहीत फक्त गोड बोलायची इच्छा मात्र हवी. पण गोड बोलण्याची किमान एवढीही पातळी गाठू न शकणाऱ्या लोकांकडे बघून असे म्हणावेसे वाटते की खरेच सर्वात सोपी गोष्ट करणे हीच सर्वात मोठी कठीण गोष्ट आहे. 
तेव्हा कधीच गोड न बोलू पाहणाऱ्या माझ्या बांधवांनो, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तरी कधीतरी गोड बोलून बघा. तुमच्या आणि तुमच्या जवळच्यांचा आनंदाचा पतंग गगनात कसा भरारी मारतो ते !


No comments:

Post a Comment