Friday 30 December 2011

आत्महत्त्या

चोरी,खून,दरोडा या आणि तत्सम अपराधांप्रमाणेच आत्महत्त्या हा ही एक गंभीर अपराध आहे हे कळण्याची समजही नसलेली मुले स्वत:ला फासावर लटकवून मोकळी होतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचा विचार अशावेळी या भाबड्या जीवांच्या मनात डोकावत नाही का? आयुष्याने घातलेलं अवघड कोडं उकलण्याची क्षमता या मुलांच्यात नसते का? जीव देणं म्हणजे नक्की काय या गोष्टीचे आकलन न होताच ही मुले आपलं अस्तित्व या जगातून सहजपणे पुसून टाकण्याचा हा जीवघेणा खटाटोप का करतात? 
अभ्यासात आलेल्या अपयशाने आलेलं प्रचंड नैराश्य हे बहुतांश आत्महत्त्यांमागील कारण असतं. माझ्या घरचे मला काय म्हणतील, मित्र-मैत्रिणी, इतर नातेवाईक काय म्हणतील, माझे शिक्षक काय म्हणतील या भीतीपोटी आत्महत्त्या केल्या जातात. पूर्ण समाजात माझी व माझ्या घरच्यांची छी थू  होईल, सगळेजण माझ्याकडे यापुढे एक अपयशी मूल म्हणून बघतील असा पक्का समज या मुलांच्या मनात रुजलेला असतो. घरातील माणसांच्या, शाळेतील शिक्षकांच्या, यशस्वी मित्र-मैत्रिणींच्या नजरा चुकवायच्या असतील, त्यांची बोलणी ऐकायची नसतील आणि अंगावर माराचे वळ वागवायचे नसतील तर यावर आत्महत्त्या हा एकमेव मार्ग आहे हे या मुलांना पटते आणि आपल्या गळ्याभोवतीचा फास आधी यांच्या मनात तयार होतो.  
आपण एक मूल जन्माला घातलं की त्याच्या भूतलावरील जगण्याचे, वागण्याचे सगळे कॉपिराईट्स आपल्याला मिळाले असे अनेक पालकांना वाटत असते. आपल्याच म्हणण्याप्रमाणे त्याने बसावे,उठावे,हसावे,रडावे ही अपेक्षा बाळगणारे हिटलरचे वंशज घराघरात नांदत असतात. आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचे हक्काचे साधन आपण जन्माला घातलेले असते. आपण डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून काय झालं, आपल्या मुलाला आपण नक्की डॉक्टर करू, इंजिनियर करू,जगप्रसिद्ध गायक-वादक करू, उद्योगपती करू अशी अनेक बीजं पालकांच्या मनात मूळ धरू लागलेली असतात. आपल्या मुलांच्याही काही इच्छा असू शकतील, त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी असू शकतील हा नुसता विचारही पालकांच्या पथ्थ्यावर पडणारा नसतो. रोबोट नावाचे जसे यांत्रिक मानव असतात आणि ते जी कळ दाबली जाते त्याप्रमाणे हालचाल करतात आणि हुकुमाचे पालन करतात तशीच काहीशी अपेक्षा पालकांची मुलांकडून असते. त्याची भाषा,त्याचा मित्रपरिवार,त्याचे कपडेलत्ते,त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पालक नियंत्रित करू पाहतात. अभ्यास नावाचे या मुलांचं बाल्य कुरतडणारे भूत घेऊन स्वत:च त्यांच्या मानगुटीवर बसतात.     
शाळेतील शिक्षकही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत तोंडाला फेस येईपर्यंत धावणारं एक यंत्र समजतात. कसाही अभ्यास करा, रात्रीचा दिवस करा पण असे काही मार्क मिळवा की आपल्या शाळेचं नाव गाजेल असा प्रेमळ संदेश हे मुलांना सतत देत असतात. क्लास नामक एक रक्तशोषक संस्था काही वर्षात निर्माण झाली आहे. भरपूर फी घेऊन ऐशी टक्क्यांच्या वरील विद्यार्थी निवडून त्यांना मार्गदर्शनाच्या नावाखाली पिळून काढायचे, सारखे पेपर सोडवून घेऊन त्यांच्या चिमुकल्या डोक्याचे भजे करायचे आणि मग या विद्यार्थ्यांना भरघोस मार्क मिळाले की त्या जोरावर क्लासची जाहिरात करायची असा यांचा खाक्या असतो. मुलं आपली ब्रेकफास्टचे, लंचचे डबे घेऊन शाळा आणि क्लास अशा वाऱ्या करत असतात. 
पूर्वीच्या काळी जेव्हा हिंदुस्तानावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा अनेक राजकीय कैद्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली जायची. त्यांना घाण्याला जुंपून त्यांच्याकडून मरेस्तोवर कामे करून घेतली जायची. आज अनेक घरात पालक इंग्रजांची आणि मुले कैद्यांची भूमिका बजावत असतात. वीर सावरकरांनी स्वत:च्या सुटकेसाठी ज्याप्रमाणे महासागरात उडी घेतली आणि जीव वाचवला तद्वत या कैदखान्यातून सुटका करण्यासाठी ही निष्पाप मुले स्वत:ला आत्महत्त्येच्या खाईत लोटून देतात आणि जीवाला होणाऱ्या यातनांना पूर्णविराम देतात.  
नाही होऊ शकलं एखादं मूल डॉक्टर,इंजिनियर,एम बी ए  तर काय आकाश कोसळणार आहे? जीवन आनंदाने जगण्याचे यांव्यतिरिक्त काही सन्मान्य मार्ग नाहीत? आपली इभ्रत, प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक पत जपण्यासाठी मुलांचं आयुष्य पणाला लावण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? मुलाने नोकरी ऐवजी एखादा त्याला आवडता  बिझनेस थाटला, तो फॉरेनची वारी न करता भारतातच राहिला तर कुठे बिघडले? एखाद्या मुलाने कोणते शिक्षण घ्यावे, कशाप्रकारची नोकरी करावी ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे असे पाश्चात्य देशीय मानतात. तिथे मुलेही आपले स्वातंत्य्र पराकोटीचे जपताना दिसतात. पण आपल्याकडे मात्र मी सांगेन तसं आणि तसंच माझं मूल वागलं पाहिजे असा अट्टाहास पालकांच्या वर्तनातून जाणवतो. 

आपल्या मुलाची क्षमता, त्याची आवडनिवड, त्याच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणारे पालक आज दुर्दैवाने हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. मुलाला योग्य वाटेवरून जाण्याकरता मार्गदर्शन करणे म्हणजे त्याचे निर्णय स्वत: घेणे नव्हे. त्याला चांगल्या-वाईटाची, भल्या-बुऱ्याची जाणीव करून देणे एवढेच पालकांचे कर्तव्य असते. त्याला त्याचे आवडते शिक्षण घेण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकांचे उद्दिष्ट असावयास हवे. शालेय पुस्तकी अभ्यासाची आवड असेल तर ठीक अन्यथा इतर काही मार्गांनी त्याचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्याचे आयुष्य मार्गी लागणार असेल तर अशा मुलांसाठी पालकांनी त्यांचे मित्र होणं गरजेचं आहे. त्यांना समजून घेऊन आपण त्यांच्या उत्तम आणि उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवत आहोत याची खात्री पालकांनी स्वत:च स्वत:ला देणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षकांनीही मुलांच्या भविष्याची दोरी सर्वस्वी आपल्याच हातात घ्यायचा नाद सोडला पाहिजे. त्यांना त्यांच्या कलांनी फुलण्यासाठी ,बहरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत, क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्याला अथवा तिला प्रोत्साहित करण्यासाठी झटले पाहिजे. 
मुलांच्या नाजूक भावविश्वाला,त्यांच्या बाल्याला धक्का न लावता, त्यांच्या इच्छा कोमेजू न देता, त्यांचे स्वातंत्य्र अबाधित ठेऊन व त्यांच्या मनाची भाषा समजून घेऊन जर पालकांनी त्यांना वाढवण्याचा,घडवण्याचा प्रयत्न केला तर इतक्या चिमुकल्या,निष्पाप,निरागसतेला आत्महत्त्या नामक घातक विचार  कधीही दंश करणार नाही. 

Thursday 29 December 2011

लोकपालाचा तमाशा

ज्याप्रमाणे दरवेशी दारोदारी हिंडून एखाद्या प्राण्याचा खेळ करतात त्याप्रमाणे लोकपाल विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत नाचवले गेले. प्रत्येक  पक्षाच्या खासदाराने, नेत्याने आपापल्या वकुबाप्रमाणे लोकपालला वेगवेगळ्या पद्धतीने तपासले, त्याची छाननी करून, सरकारने मांडलेले लोकपाल विधेयक कुचकामी असल्याचा निर्वाळा दिला. राजकीय चर्चा रंगल्या, वाद-विवाद झडले,  दुसऱ्या पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे तीन-तेरा वाजवून झाले. अधिवेशनाची नियोजित वेळ संपली आणि लोकपाल विधेयकाची कोणत्याही ठोस निर्णयाअभावीच  सांगता झाली.  
लोकशाही राज्यपद्धतीत एकमताने कोणताही अति-महत्वाचा निर्णय  घेणे हे अत्यंत जिकीरीचे काम आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगळी, धारणा वेगळ्या त्यामुळे लोकपालातील सगळ्या तरतुदींविषयी एकवाक्यता होणे अवघड होऊन बसले. त्यात सत्ताधारी पक्ष एकीकडे आणि इतर पक्ष दुसरीकडे असे चित्र दिसत होते. अरुण जेटली, अभिषेक मनु सिंघवी  यांच्यासारख्यांनी प्रभावी वक्तव्य केले खरे परंतु लोकपालातील त्रुटी सुधारण्याकरता किंवा मांडलेले लोकपाल स्वीकारण्या करता याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. मत-मतांतरामुळे गदारोळ मात्र झाले. कोणीतरी अण्णा हजारेंनाच लोकपाल म्हणून नेमा असेही छद्मीपणे सुचवून पहिले. सीबीआय स्वायत्त हवी की नको यावरूनही रान उठवले गेले. मांडलेल्या लोकापालाची कोणी खिल्ली उडवली तर कोणी उपहास केला. हे लोकपाल नको यावर मात्र विरोधी पक्षांचे मतैक्य झालेले दिसले.   
इकडे एमएमआरडीए मैदानावर चाललेले उपोषण अण्णांनी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे मागे घेतले आणि ते राळेगणसिद्धीला परतले. सामान्यांचाही सक्षम लोकपालासाठी लढण्याचा नेट ओसरल्यासारखा वाटला. या सर्वामुळे सध्यातरी लोकपालाचे भवितव्य अधांतरी आहे. सरकारने मांडलेले लोकपाल जरी क्षणभर बाजूला ठेवले तरी मुळात सक्षम लोकपाल कुणाला हवे आहे काय असा प्रश्न निश्चितच पडला आहे.  
भ्रष्टाचाराला समूळ उपटून टाकण्यासाठी एखादी सबळ योजना राबवता यावी म्हणून लोकपालचा विचार करण्यात आला. इतकी वर्षे बासनात पडून राहिलेली ही योजना अण्णा हजारे आणि त्यांच्या लाखो अनुयायांच्या दबावामुळे तसेच जनमताच्या रेट्यामुळे विचाराधीन होऊ शकली. सत्ताधाऱ्यांनी आणि इतर पक्षांनी त्याचा कीस काढला. मुळात एखादी महत्वाची यंत्रणा स्वायत्त हवी की तिच्यावर सरकारचा अंकुश हवा हीच खरी हे विधेयक अयशस्वी होण्यामागची मेख आहे. एखाद्या यंत्रणेवर सरकारी अंकुश असेल तर ती योग्य वेळी हवी तशी वाकवता येऊ शकते, एखाद्या गैर-व्यवहाराची चौकशी थांबवता येऊ शकते, त्या यंत्रणेत हवा तसा हस्तक्षेप करता येऊ शकतो परंतु ती यंत्रणा जर स्वायत्त झाली तर सत्ताधारी पक्षाच्या स्वातंत्र्यावर घाला येईल , अनेक सत्ताधारी, नामधारी पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावे लागेल आणि भ्रष्टाचारविरहित  आचाराचे धडे गिरवावे लागतील, जे सत्ताधारी पक्षाच्या हिताचे होणार नाही आणि म्हणूनच असे लोकपाल न आलेलेच बरे असेच जर राजकीय पक्षाला वाटत असेल तर त्यात वावगे काय?    
अनेक वाहिन्यांवरही या लोकपालाविषयी पोटतिडीकीने आपली मते मांडताना बरेचजण दिसतात खरे पण सारखे असे वाटत राहते की असे सर्वार्थाने परिपूर्ण, समर्थ लोकपाल खरेच आपल्या लोकशाहीला लाभणार आहे काय?  लोकशाही राज्यपद्धतीत प्रत्येकालाच आपले तोंड उघडण्याचा जर सारखाच अधिकार आहे तर सगळ्यांची तोंडे सारख्याच प्रकारे बंद करणारं आणि भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणारं लोकपाल अस्तित्वात येऊ शकेल काय? या देशातील कोट्यावधी जनतेला पावलोपावली गिळणारा, त्यांचे जगणे कठीण करणारा महागाईचा भस्मासुर या यंत्रणेअंतर्गत जाळून खाक होईल काय? पट्टेवाल्यापासून  ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना एकसमान न्याय लागू केला जाईल काय? चिरीमिरीपासून ते कोट्यावधींची भ्रष्टाचारी उलाढाल करणाऱ्यांना ही यंत्रणा कडकलक्ष्मीचा अवतार दाखवू शकेल काय? सर्वसामान्याचे जगणे या यंत्रणेमुळे अधिक सुकर, सोपे होईल काय? या देशात आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत ही भावना जनमानसात वाढीस लागेल काय? आपल्या अर्थव्यवस्थेला, सुरक्षिततेला भगदाडे पाडणाऱ्यांना ही यंत्रणा सज्जड शिक्षा ठोठावेल काय? 

वर उल्लेखिलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे जर ही यंत्रणा देऊ शकणार नसेल तर मग असे हे लोकपाल विधेयक जरी संमत होऊन आले तरी या देशातील जनतेला त्याच्याशी काहीही सोयरसुतक नसेल.



Saturday 24 December 2011

आपलं मत


हे फक्त निवडणुकीत ग्राह्य धरलं जातं एरवी याला कुत्र्याच्या भूंकण्याइतकही महत्त्व नाही. आपण मारे घरी-दरी यंव नी त्यंव मतांच्या पिंका टाकत असतो पण त्याला काडीइतकीही किंमत असते का याचा विचार आपण करतच नाही. 
सकाळच्या घाई-गर्दीच्या वेळेला जरा जादा गाड्या सोडा असे कितीही सौजन्यपूर्वक आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले तरी आपल्या आणि आपल्यासारख्या इतरांच्या मताचा त्यांच्यावर का म्हणून परिणाम होईल? आपण म्हणजे कोण? सकाळच्या वेळी रेल्वेच्या प्रवाशांना कोंडीत पकडून घायकुतीला आणण्याची त्यांचीही काही ठाम मतं आहेत. ऐन वेळेस ओव्हरहेड वायर तुटायला हवी, पेंटोग्राफ जळायला हवा, गाडी डिरेल व्हायला हवी अशी त्यांची काही वर्षानुवर्षांची घट्ट साचलेली मते आहेत ती कोणी विचारात घ्यायची? आपणच ना? 
आयबीएन आणि झी २४ तास या दोन्ही वाहिन्यांवर रात्रीच्या वेळेस अनेक पक्षांच्या लोकांची आपापल्या पक्षाच्या मतांवरून झोंबाझोंबी चालू असते. प्रत्येकजण आपल्या मतावर ठाम राहून आपल्या पक्षाच्या वागणुकीचे समर्थन करत असतो. एकमेकांवर यथेछ्च आगपाखड करून झाल्यावर हा करमणुकीचा कार्यक्रम संपतो. या मतामतांच्या गल्बल्यातून काहीच साध्य होत नाही. एकमेकांची निन्दानालस्ती आणि प्रेक्षकांचे मनोरंजन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन हा कार्यक्रम आखलेला असतो.    
आपापली गाडी पार्क करण्यावरून सोसायटीतील रहिवाश्यांची प्रचंड भांडणे होतात. याचे एकमेव कारण म्हणजे माझी गाडी मी इथेच पार्क करणार या मतावर प्रत्येकजण ठाम असतो. आपले मत इतरांनी मनावर घ्यायचे काही कारणच नसते कारण त्यांचीही मते आपल्या इतकीच पक्की असतात. त्यामुळे भांडणे होत राहतात, तोडगा निघत नाही. आपली गाडीच्या टायर मधली हवा जोपर्यंत कुणी काढत नाही तोपर्यंत ही भांडणे फक्त तोंडातोंडी चालतात त्यानंतर आपापल्या हाताची मते आजमावायला कुणी मागेपुढे पाहत नाही.
आज आयटेम साँगच्या नावाखाली स्त्रीदेहाचे जे उत्तान प्रदर्शन मांडले जाते, ज्या बीभत्स हावभावांचा, अश्लील शब्दांचा वापर केला जातो त्याच्या विरुद्ध कितीही जनमताचा पाऊस पाडा, काहीही उपयोग होत नाही. तुम्ही टी.व्ही.ऑफ करा, अशा चित्रपटांवर बहिष्कार टाका,फार काय रस्त्यात अश्लील चित्रे दिसली तर डोळे मिटून घ्या की. तुम्हाला कोणी मनाई केलीय? राखी सावंतला तुम्ही बेंबीच्या  देठापासून कितीही ओरडून सांगितलेत की बाई गं  तुझ्या आणि तुझ्यासारख्या अनेकींच्या अशा नाचण्याने युवा पिढी बिघडत चाललीय,बहकत चाललीय, निलाजरी होत चाललीय तरी त्या तुमचं काय म्हणून ऐकतील? तुम्ही कोण? त्या अशा नाचतात म्हणून तरुणांचं मनोरंजन होतं, त्यांना बऱ्याच गोष्टी शिकता येतात. तुम्ही आक्षेप घेणारे कोण?  
शाहरुख खानला, 'अरे बाबा आता तू म्हातारा दिसायला लागला आहेस तेव्हा पिक्चर मध्ये काम करणे थांबव' असे कितीही कंठशोष करून आपण सांगितले तरी त्याने का ऐकावे? तो पैशांच्या राशीत लोळतो म्हणून तुम्ही जळताय. बॉक्स ऑफिसवर त्याचे पिक्चर भले फार दिवस न टिकू देत पण खर्च केलेला पैसा जोपर्यंत वसूल होतो आहे तोपर्यंत असे शाहरुख खान येतंच राहणार. तुम्ही बघा दिलीप-देव-राज यांना घरातल्या छोट्या पडद्यावर! फुकटची मते मांडू नका.       
नवीन लोकलवर,बसवर, मोटारींवर, उपाहार आणि सिनेमागृहांमध्ये आणि रस्त्यांवर कृपया थुंकू नका हे मत जाहीररीत्या प्रदर्शित करायचं कुणालाच काय कारण? थुंकदाणी शिवाय इतर ठिकाणी थुंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे भारतात जन्माला आलेल्या बहुतांश लोकांचे मत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे हाही आपल्या लोकांचा अत्यंत आवडता छंद आहे तेव्हा तुमच्या फुसक्या मतांनी त्यांना विचलित होण्याचं काही कारणच नाही.  
कसाब सारख्या अनेकांचा निर्घृणपणे जीव घेणाऱ्या अपराध्यावर इतके कोट्यावधी पैसे खर्च करू नका,तो सरकारचा जावई नाही, त्याला लवकरात लवकर फाशी द्या आणि न्यायदेवतेची विटंबना थांबवा असे अनेकजण घसे कोरडे पडेपर्यंत ओरडले, तज्ञांच्या मतांचा कीस पडला, जनसामान्यांत चर्चा घडवून आणल्या गेल्या, या भयानक दुर्घटनेत ज्यांचे बळी गेले त्यांच्या निकटवर्तीयांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न झाला, आले का यश? कोणाची मते विचारात घेतली गेली? उलट कसाबला बिर्याणी आवडते ह्याचीच बातमी झाली.     
या सगळ्याचे तात्पर्य काय तर तुमची मते ही फक्त तुमच्याजवळच असली पाहिजेत, इतरांवर ती लादायचा जरा जरी प्रयत्न केलात तर त्यांची मते तुमच्यावर बरसलीच म्हणून समजा. आता ते उडणारे शिंतोडे गंगाजलाचे असतील किंवा सांडपाण्याचेही असू शकतील. तेव्हा मते व्यक्त करण्याआधी स्वत:चा विचार जरूर करा.

Tuesday 20 December 2011

आजी-आजोबा

कालौघात आजी-आजोबा ही जिव्हाळ्याची संस्था नामशेष होत चालली आहे. जणू काही घरातून देवघराची उचलबांगडीच झाली आहे. सुरकुतलेल्या हातांनी मायेच्या माणसांसाठी केलेल्या  पुरणपोळीचे महत्व  कमी कमी होत चालले आहे. सायंकाळी तुळशी-वृंदावना समोर भक्तिभावाने जोडलेले हात, नातवंडे मांडीवर घेऊन म्हटलेले श्लोक , मायेने भरवला जाणारा गुरगुट्या भाताचा घास, डोळ्यांवर पेंग येत असताना ऐकू येणाऱ्या पंचतंत्रातील सुरम्य कथा,परीक्षेचा निकाल चांगला लागल्यानंतर पाठीवरून फिरणारा आजोबांचा कौतुकाचा हात आणि त्यानंतर आजीने हातावर दिलेली खोबऱ्याची वडी या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
आजकाल न्युक्लीयर कुटुंबाची कल्पना जिथेतिथे बोकाळली आहे. घराच्या चार भिंती इतक्या संकुचित झाल्या आहेत की त्यात आजी-आजोबांना सामावून घेण्यासाठी जागाच राहिलेली नाही. सोयी-सुविधांची तणे नको तेवढी माजली आहेत. पैसे कमावण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण स्वत:ला मरेस्तोवर झोकून देतो आहे. अपरिहार्यतेच्या नावाखाली ज्याने त्याने नात्यांनाही कडी-कुलुपात बंदिस्त केले आहे. यंत्राच्या आधीन माणूस झाला आहे आणि त्याने स्वत:चेही यंत्र करून घेतले आहे. या यंत्रवत आयुष्यात भाव-भावनांची पाळेमुळेच गोठून गेली आहेत. म्हणूनच टोलेजंग इमारतीत खरेदी केलेल्या हजार चौरस फुटांच्या प्रशस्त ब्लॉकमध्ये  आजी-आजोबांसाठी एखादी खोलीही नाही. आधुनिक यंत्रे,खेळणी,फर्निचर यांच्या साम्राज्यात जुन्यापुराण्या आउट-डेटेड मॉडेल्सना जागाच नाही. 
आजकाल म्हणे लग्न करू इच्छिणारी मुलगी लग्नाआधी मुलाला विचारते की तुझ्या घरात किती गार्बेज आहे? या गार्बेज मध्ये मुलाचे आई-वडील,असले तर आजी-आजोबा,काका-काकी,आत्या इत्यादी कुणीही मोडू शकतात. किती गार्बेज आहे हे मुलाने सांगितले की मग ती ठरवणार की असल्या गार्बेजवाल्या गोडाऊनमध्ये राहायचं की नाही ते. मुलाला तिच्याशी लग्न तर करायचं असतं त्यामुळे तो मग नवीन ब्लॉक घेतो आणि अडगळीच्या वस्तू जुन्या जागेत सोडून येतो. तिला स्वतंत्र राज्य मिळतं आणि भंगार तिच्या घरात येत नाही. काही वर्षे गेल्यानंतर आपल्यालाही रद्दीचाच भाव येणार आहे या सत्याकडे तात्पुरती का होईना पण पाठ फिरवली जाते. 
मुलांनी शाळेतून घरी आल्यानंतर दाराला काय बघायचं तर मोठ्ठं कुलूप! ते स्वहस्ते उघडून आत शिरायचं, खायचं अन्न मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचं, संगणकाशी खेळत मन रमवायच, रिकामं घर न्याहाळत बसायचं आणि अभ्यास संपवून रात्री उशिरा येणाऱ्या आई-वडिलांची वाट पहायची. या दिनक्रमात पाहुणे म्हणून चार दिवस आलेल्या वडील-धारयांच्या येण्याने खंड पडला तर चरफडत राहायचं. ही नव्या युगातील कितीही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे.      

ढळला रे ढळला दिन सखया
संद्याछाया भिवविती हृदया 
अता मधूचे नाव का सया
लागले नेत्र रे पैलतीरी 
अशा अवस्थेप्रत मार्गक्रमणा करणाऱ्या आजच्या आजी-आजोबांची ही हृद्य कहाणी आहे व त्यावर आस्थेची,मायेची फुंकर घालता न येऊ शकणाऱ्या तुम्हा-आम्हा सर्वांचाच हा दारूण पराभव आहे. 

Monday 19 December 2011

हॉस्पिटल

माझ्या आत्याच्या 'Thalium' टेस्टच्या निमित्ताने मला माहीमच्या 'हिंदुजा' हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग आला. ही हिंदुजा हॉस्पिटलची वास्तू माहीम चौपाटीला जवळजवळ लागून आहे. हॉस्पिटल भव्य आहे, स्वच्छ आहे, टापटीप आहे ,शिस्तशीरही असावं बहुतेक!  थोडक्यात बघणेबल आहे. लीलावती,हिंदुजा,जसलोक,ब्रीच क्यांडी,अंबानी ही हॉस्पिटल्स सुद्धा अद्ययावत सोयींनी सुसज्ज आहेत, मुंबईची शान आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पण तरीही हॉस्पिटल हे शेवटी हॉस्पिटलच! जे.जे. काय,वाडिया काय, के.ई.एम काय,नानावटी-कूपर काय किंवा लीलावती-हिंदुजा-अंबानी काय! ती काही प्रेक्षणीय स्थळे होऊ शकत नाहीत. एखाद्या रविवारी उठून आपण चला चला एक्सेलवल्डला जाऊया तद्वत चला चला आपण लीलावतीला जाऊया,हिंदुजाला जाऊया असं खासच म्हणणार नाही.       
या टेस्ट ज्या विभागात केल्या जातात तिथे आम्ही वेळेवर पोहोचलो. काउंटरवर पैसे भरले, पावती घेतली आणि आतमध्ये गेल्यावर रुग्णाची वैद्यकीय माहिती असलेला फॉर्म भरून दिला. सगळे सोपस्कार पार पडले आणि आता वेळ होती प्रतीक्षेची! थोड्याच वेळात माझ्या आत्याला टेस्टसाठी आतमध्ये नेण्यात आले आणि मी व माझी बहीण बाहेरील कक्षात बसून राहिलो. हॉस्पिटल भलतेच वातानुकुलीत असल्याने प्रचंड गारठा जाणवू लागला. हळूहळू इतर रुग्ण त्यांच्या त्यांच्या नातलगांसह येऊ लागले. आम्ही या वातावरणाला नवखे असलो तरी इतर मात्र बऱ्यापैकी सरावलेले असावेत. त्यांच्याकडे रिपोर्टच्या थप्प्या होत्या. मानसिक तयारी होती. आतील जीवघेण्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी शाली आणल्या होत्या. आजूबाजूला वावरणारे ज्युनियर डॉक्टरही त्यांच्या परिचयाचे होते.    
माझी मामेआत्या सुरतेची. तिचे जवळचे असे कुणी नाही. तिची वृद्ध आईही काही महिन्यांपूर्वी निवर्तलेली! आत्या मुलखाची घाबरट. तिच्या शरीरात तिच्या म्हणण्याप्रमाणे वस्तीला बरेच किरकोळ आजार. बीपी,डायबेटीस या तिच्या नातलगांनी केव्हाच वर्दी दिलेली! इसीजी काढला आणि स्ट्रेस टेस्ट करण्याचा सल्ला तिला दिला गेला. तिच्या मनात या स्ट्रेस टेस्ट विषयी प्रचंड भीती कारण तिच्या ओळखीचे तीनजण ही टेस्ट करतानाच गचकले होते. अन्जिओग्राफि करायची नव्हती त्यामुळे मग तिच्या वाट्याला ही 'Thalium' नावाची टेस्ट आली. तिच्या म्हणण्याप्रमाणे सुरतेला ह्या विशिष्ट टेस्टचं नावही कुणी ऐकलेले नाही. त्यामुळे मुंबईला येणं तिला भाग होतं. तिची काळजी, त्या अपरिचित टेस्ट विषयीची धाकधूक आमच्या मनात होती. 
तास झाला,दोन तास झाले तरी टेस्ट संपत नव्हती. ती फक्त एका रूममधून  दुसऱ्या रुममध्ये जाताना आम्हाला दिसत होती. इकडे ही प्रचंड वातानुकुलीत थंडी आमची टेस्ट घेत होती. शाली पांघरणारे आमची अवस्था नजरेने टिपत होते. अंगावर आलेले काटे पुन्हा पुन्हा निरखणे, उठून उठून बाथरुमला जाणे,डॉक्टर,नर्सेस,आया यांची धावपळ बघणे असा आमचा टाईमपास सुरु होता. आत्या बरी असेल ना, तिला काही होणार नाही ना, तिचे रिपोर्ट्स नॉर्मल येतील ना अशा चिंता करण्यातही बऱ्यापैकी वेळ जात होता.   
एका विशिष्ट प्रकारचं रसायन किंवा द्राव नसांद्वारे शरीरात सोडला जातो आणि मग त्याबरहुकूम हृदयातील हालचाली सूक्ष्मरित्या टिपल्या जातात. स्क्रीनवर सगळ्या घडामोडी रुग्णाला पाहता येतात. या घडामोडींचा तपशील म्हणजे रिपोर्ट. तो उलगडून सांगण्यासाठी निष्णात डॉक्टर्स असतातच! नंतर त्यानुसार पुढील उपाययोजना केली जाते. त्यामुळे ही टेस्ट होऊन,त्याचे रिपोर्ट्स येऊन, त्या रिपोर्टमध्ये काय दडलेलं आहे हे जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत अनेक शंका-कुशंकांना जागा होती. अनुकूल-प्रतिकूल विचारांना थारा होता. आत्याचा घाबरलेला चेहरा सारखा नजरेसमोर येत होता. तसं तिचं काही वाईट होणार नाही असं मन म्हणत असतानाच असं काही झालंच तर प्रथम कुणाला सांगायचं याच्या नोंदीही मनातल्या मनात तयार होत होत्या. 
तिथे नेहमीच येणारे जरा खाली जाऊन चहा वगैरे घ्या म्हणजे बरं वाटेल असा सल्ला देत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आम्ही खाली गेलो आणि पोटाला चहा-खाण्याचा आधार दिला. थंडीची भीषणता थोडी कमी झाली. पायही मोकळे झाले. दिवस वर येत होता तशी लोकांची वर्दळही वाढत होती. बरेच लोक बाहेर तिष्ठत बसले होते. काही समुद्र न्याहाळत डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत होते. पोर्चमध्ये गाड्याच गाड्या उभ्या होत्या. तो नजारा काही वेळ बघितला आणि आम्ही पुह्ना वर आलो. वरच्या परिस्थितीत जराही बदल नव्हता. स्वागत कक्षात माणसे खोळंबली होती. आतमध्ये रुग्णांच्या टेस्ट सुरूच होत्या. अंगाभोवातीच्या शाली आणखीनच घट्ट झाल्या होत्या. आमच्या प्राक्तनात आणखी कुडकुडणे लिहिलेले होते. 
एका गुजराती कुटुंबातील स्त्री आजारी होती. तिच्या पोटात ट्युमर होता. दोन वर्षांपासून अनेक टेस्ट होत होत्या. अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवूनही हा ट्युमर काढावा की न काढावा याविषयी एकवाक्यता होत नव्हती. त्या रुग्णाची फाईल वेगवेगळ्या रिपोर्ट्सनी ओसंडून वाहत होती. डोळे मिटून शांत बसणे, देवाचे नाव आळवणे,पुन्हा एकदा रिपोर्टची प्रतीक्षा करणे यापलीकडे त्या कुटुंबाच्या हातात काहीच नव्हते. एका लहान मुलीला किडनीचा आजार होता. तिच्या सततच्या होणाऱ्या टेस्ट मुळे त्या मुलीचे आई-वडील हैराण झाले होते. मुलीला आपल्याला सारखे सारखे इकडे का आणले जाते हे कळण्याइतपत  ती मोठी नसल्याने रडत होती आणि आई-वडिलांच्या विमनस्कतेत भर पडत होती. या आजारावर उपाय शोधण्यात डॉक्टरांना यश आलं नव्हतं. कसनुसा झालेला तिच्या आईचा चेहरा, तिच्या डोळ्यांत वारंवार येणारं पाणी बघताना आम्हाला गलबलून येत होतं. या हॉस्पिटलच्या पोटात अशा कितीतरी  करुण  कहाण्या दडलेल्या होत्या. 
सरतेशेवटी आमची सहा ते सात तासांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आणि माझी आत्या त्या टेस्ट मधून तावून सुलाखून सुखरूप बाहेर आली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स मिळाले, ते नॉर्मल असल्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली आणि विजयी मुद्रेने माझी आत्या सुरतेला परतली देखील! तिथल्या भयानक थंडीचे परिणाम मात्र नंतर आठवडाभर सर्दी-खोकल्याच्या रुपात आम्हाला भोगायला लागले. 
त्या रात्री झोपताना या अशा हॉस्पिटल्स मधलं जग पुन्हा अनुभवायची पाळी आणू नकोस अशी प्रार्थना करायला मी विसरले नाही.

Sunday 18 December 2011

पतीचा छळवाद वर्षानुवर्षे निमुटपणे सोशीत जगणाऱ्या तमाम स्त्रियांना .........


कालपासून नुकतीच 'Life OK' नावाच्या channel वर सौभाग्यवती भव: ही मालिका सुरु झाली आणि वर्षानुवर्षे चावून चावून चोथा झालेला तो विषय पुन्हा एकदा ऐन प्रवाहात आला. स्त्री मग ती कुठल्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असो, छळवादासाठी तिचे स्त्री असणे हेच पुरेसे असते. चांगले सुशिक्षित,संस्कारित माहेर लाभलेली स्त्री या पुरुषी छळवादाला बळी पडू शकणार नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही.   
छळवाद हा मानसिक,शारीरिक अशा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. मजा म्हणजे आर्थिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून नसणाऱ्या स्त्रियांच्या वाट्यालाही जर या यातना येत असतील तर ज्या स्त्रिया पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहेत त्यांच्या व्यथा काय वर्णाव्या?  
बायकोच्या माहेराकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, तिच्या माहेरच्यांचा सतत उद्धार करणे, बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणे, तिचा सातत्याने इतरांसमोर मानभंग करणे, तिच्या उठण्या-बसण्याला मर्यादा घालणे, तिच्या बौद्धिक कुवतीची खिल्ली उडवून आसुरी आनंद घेणे, तिच्या छंदांवर, स्वातंत्र्यावर गदा आणणे, तिला एक निव्वळ हक्काची उपभोगाची वस्तू या दृष्टीकोनातून बघणे, तिला सतत घरकामात पिचत ठेवणे, मुलाबाळांची जबाबदारीही तिची एकटीचीच असल्यागत वागणे, वेळप्रसंगी तिला धमकावणे, तिच्या अंगावर हात टाकणे, तिला अर्वाच्य बोलणे, तिचे स्त्रीधन स्वत:कडे ठेवून तिला बाहेरचा रस्ता दाखविणे अशा अनेक प्रकारच्या छळवादांना स्त्रीला सामोरे जावे लागते.   
मुळातच स्त्री व पुरुष हे एकमेकांना पूरक असावेत, निसर्ग नियमांनुसार एकमेकांशी बध्द असावेत, एकमेकांच्या अपेक्षांची पूर्तता करत त्यांनी संसार सुकर करावा, पोटच्या मुलाबाळांना त्यांनी उत्तम घडवावे, जनमानसात आदर्श प्रस्थापित करावा, पुढील पिढ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, कौटुंबिक शुचिता,महत्ता जपावी यासाठी विवाहसंस्था अस्तित्वात आली. दोन घराण्यांचा मिलाफ, पुरुषाला स्त्रीचा व स्त्रीला पुरुषाचा आधार, स्त्री व पुरुष या दोघांकडील नातेसंबंधांचा मुलांना होणारा फायदा, मुलांना फुलण्यासाठी,सर्वार्थाने उमलण्यासाठी उपलब्ध होणारी कौटुंबिक पार्श्वभूमी याचा साकल्याने विचार करूनच लग्ने  ठरवली जातात. हे सर्व ज्ञात असूनही लग्न झाल्यानंतर माशी शिंकते आणि लग्न झाले नसते तर फार बरे झाले असते हा विचार असा छळवाद भोगणाऱ्या बायकांच्या मनात थैमान घालू लागतो.         
ही आपली हक्काची बायको आहे यापेक्षा ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे असा विचार खरोखर किती पुरुष करतात? तिने माझ्या घरच्यांची सेवा करावी अशी मागणी करणारे पुरुष बायकोच्या माहेरच्यांची सेवा किती तत्परतेने करताना दिसतात? ऑफिसमधून दोघेही सारखेच थकूनभागून घरी परतल्यानंतर पुढ्यात आयता चहा आणि गरमागरम खाणे या फर्माइशीचा  हक्क फक्त पुरुषांनाच का व कोणी दिला आहे? घरातील सर्व निर्णय घेण्याचा मक्ता फक्त पुरुषांकडेच का?  स्त्रीचे वैयक्तिक मत किती पुरुष ग्राह्य धरतात? बायकोचा आत्म-सन्मान ( self-respect ) पायदळी तुडवण्याचा, खच्ची करण्याचा खटाटोप न करणारे पुरुष किती आहेत? घर घेणे, घराचे सुशोभीकरण, आर्थिक गुंतवणुकी, मुलांचे शिक्षण, वाहनाची खरेदी अशा अनेक महत्वाच्या निर्णयाबाबत आपल्या बायकोशी सल्ला-मसलत करणारे नवरे किती आहेत? लग्न झाल्यानंतर बायकोने नोकरी करावी की न करावी, घरच्यांसाठी तिने नेमका किती वेळ आखून ठेवावा, स्वयंपाकपाणी स्वत: करावे की करवून घ्यावे, तिची एखादी आवड जोपासावी की न जोपासावी, सोशल नेट्वर्किंग वाढवावे की मर्यादित ठेवावे , कपडे-दागिने कोणते घालावेत, समाजात तिने कसे वावरावे याबाबतीतले निर्णय तिच्यावरच सोडण्यातली प्रगल्भता किती नवरे दाखवतात?        
लग्न झाल्यानंतर आपला नवरा ही काय वल्ली आहे हे बायकोच्या ध्यानात यायला लागते आणि मग तिच्या स्वभावानुसार तिची भूमिका ठरते. बंडखोर प्रवृत्तीची स्त्री नवऱ्याला त्याची चूक दाखवायला कमी करत नाही, त्याच्या पुरुषी अहंकारा विरुध्द सक्षमपणे उभी राहू शकते परंतु जन्मजात सोशिकपणाचे बाळकडू प्यायलेली स्त्री मात्र त्याच्या अहंकाराला कुरवाळत, समाजाला घाबरत त्या घर नामक कोंडवाड्यात पिचत राहते. दुर्दैवाने आजमितीला  स्वत:ला निराशेच्या गर्तेत लोटणाऱ्या, पिचून घेणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. लोक काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,समाज काय म्हणेल याचा विचार करता करता स्वत:चे आयुष्य मात्र या स्त्रिया पणाला लावतात. आपण लग्न केल आहे म्हणजे पुढील शारीरिक,मानसिक अत्याचाराला आपण बांधील आहोत असा गैरसमज बहुतांश स्त्रिया करून घेतात. आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपण सुशिक्षित,सु-संस्कारित आहोत, आपण कुटुंबाचं एक अविभाज्य अंग आहोत, जसे आपण भावनिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून आहोत तसाच तोही आपल्यावर आहे, जसा तो आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तशाच आपणही आहोत हा विचार करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज नगण्य आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.    
आपण जन्माला येतो तीच आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची पहिली खूण असते. आपल्या इच्छा-आकांक्षा, आपल्या आवडी-निवडी, आपली साध्ये यांच्यावर फुली मारून जे निरस आयुष्य आपल्या वाट्याला येतं ते जगण्यासाठी का  आपला जन्म झालेला असतो? पंख बांधलेला पक्षी इच्छा असूनही गगनभरारी घेऊ शकतो का?  आपलं आयुष्य आपण आनंदाने उपभोगावं आणि इतरांनाही त्यांचं आयुष्य आनंदाने उपभोगू द्यावं हे माणुसकीच व्रत प्रत्येकानेच घ्यायला हवं. दुसऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणे तसेच दुसऱ्याकडून अन्याय मुकाट सहन करणे या गोष्टी भूषणास्पद नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
तेव्हा पतीच्या जाचाला बळी पडणाऱ्या तमाम बायकांनो, वेळीच सावध व्हा! 

Tuesday 13 December 2011

हरवत चाललेला आकाशाचा तुकडा


पूर्वी माझ्या  घरातून सूर्य,चंद्र,तारे ही नभांगणातील संपदा व्यवस्थित दिसत असे. सूर्य उगवतानाचे आकाश ,चंद्र उगवतानाचे आकाश मी अनुभवत असे. आजकाल आकाशापर्यंत दृष्टी पोहोचण्यासाठी मान वर करावी तर बिल्डींगांचे  अवाढव्य राक्षसी सांगाडे दृष्टीपथात येतात. दोन उंच इमारतींच्या मधून  छोट्याशा आकाशाच्या तुकड्याचे दर्शन होते हेही भाग्यच म्हणायचे! 
आता खरोखरीच मुलांना पुस्तकातून आकाश, सूर्य,चंद्र,तारे दाखवण्याची वेळ आली आहे. आकाश निळसर असते हे समजायला आधी आकाश तर दिसले पाहिजे ना? इमारतींची गच्ची, समुद्र, रस्ता ही आकाश नीट दिसण्याची सध्यातरी हमखास ठिकाणे आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी बालपणी ज्या चंद्रासाठी हट्ट केला होता तो हा चंद्र असे म्हणत घरातून बोट दाखवावे तर अजस्त्र इमारतींनी चंद्राला गिळंकृत केलेले! सूर्य वर येताना सोनेरी लालसर होत जाणारे क्षितीज, सूर्य मावळताना क्षितिजावर पसरत जाणारे संध्या-रंग आता चित्रातून मनात सजीव करायचे दिवस आलेत. आता कवींनाही चंद्र-सूर्यावर कविता करताना मोकळ्या ठिकाणाची निवड करावी लागेल. आकाशातून विहार करणारे पक्षी बघण्यासाठी  आता काय मुला-बाळांना घेऊन रस्त्यावर उतरायचे? ढगांतून जाणारं विमान पाहण्यासाठी गच्चीवर धाव घेण्याशिवाय पर्याय नाही. आपण राहतो तो मजला खालचा असेल तर रस्ता,वरचा असेल तर गच्ची आणि मधला असेल तर पुस्तक अशी निवड करायची आता पाळी आली आहे. 
अजूनपर्यंत तरी बिल्डर लोकांनी गच्च्या,समुद्र,रस्ते,बगीचे, खेळांची मैदाने,विमानांच्या धावपट्ट्या मोकळ्या सोडल्या आहेत हे आपलं सुदैव! घराच्या बाल्कनीत बसून,हातात गरमागरम वाफाळत्या चहाचा कप घेऊन आकाशातून पाऊस पडताना बघण्याची मजा  अनुभवायला आता थेट लोणावळा-खंडाळ्याला जायचं का; की आता 'कितना बारीश हो रहा है' हे बम्बैय्या हिंदी समोरच्या बाल्कनीतील लोकांकडून ऐकण्यात धन्यता मानायची? 'हे विमान फिरते अधांतरी,किती मौज दिसे ही पहातरी' असे ती मजा अनुभवत लिहिणारे तेव्हाचे कवी परत तोच अनुभव घेण्याच्या फंदात कसे पडणार? निरभ्र आकाश कसं दिसतं,ढगाळलेलं आकाश कसं दिसतं हे दृश्य मुलांना कसं दिसणार? 
मला तर वाटतं की पुढची पिढी ही घर सोडून एकतर मॉल मध्ये किंवाएसी गाड्यांमध्ये राहील.. आकाश, ग्रहगोल, ढग, ऋतू,जलाशय,तरुवर या निसर्गनिर्मित गोष्टींपेक्षाही अनेक कृत्रिम प्रलोभने यांना गुंगवून टाकतील. कदाचित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम आकाशही ग्रहगोलांच्या सकट त्यांच्या भेटीस येईल. काय सांगावे,दोन इमारतींच्या मधून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आमच्या पिढीची कहाणी त्यांना उद्या पाठ्य-पुस्तकातून वाचायला मिळेलही!

Sunday 11 December 2011

राजकारण्यांचा 'The End' नसणारा सुपर 'डर्टी' पिक्चर

'बालाजी' निर्मित आणि विद्या बालन 'हिरो' असलेला डर्टी चित्रपट अडीच तासात संपण्याची शाश्वती आहे परंतु सत्ताधारी आणि विरोधक जनतेला दाखवत असलेला सुपर डर्टी चित्रपट कधीही समाप्त होण्याची शाश्वती नाही. पोटाची भूक शमविण्यासाठी आणि पैसा व प्रसिद्धीची लालसा असणारी 'सिल्क' अध:पतनाच्या खाईत लोटली जाते, परतीचे मार्ग केव्हाच बंद झालेले असतात, तिच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी निव्वळ एक भोगवस्तू  एवढीच आहे हे ही तिला कळून चुकते आणि मग व्यसनाधीन सिल्क  स्वत:चे अस्तित्व या जगातून कायमचे पुसून टाकते. पण हे अस्तित्व पुसून टाकताना एकवार आपली साडीतली सोज्वळ प्रतिमा  ती आरशात न्याहाळते. अंगावरचे कपडे बेधडकपणे उतरवून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटवणारी सिल्क स्वत:ला अंगभर कपड्यांत शेवटची साठवू पाहते. तिची ही केविलवाणी धडपड पाहताना अंगावर काटा उभा राहतो. या शोकांतिकेला पैसे मोजून प्रेक्षक अडीच तास इच्छा असेल तर स्वीकारतात पण वर्षानुवर्षे सामान्य जनतेला नागवे करून स्वत:चे स्विस बँकेतील खाते फुगावणाऱ्या राजकारण्यांना मात्र लोकांची इच्छा असो व नसो स्वीकारावेच लागते. 
भ्रष्टाचाराच्या कुविख्यात मार्गावरून चालतानाही आपले पाऊल वाकडे पडते आहे याची क्षिती राजकारण्यांना वाटत नाही. सामाजिक,नैतिक अध:पतन वगैरे शब्द यांच्या शब्दकोशातून कायमचे गायब झालेले असतात. एकमेकांवर दोषारोप करून शाब्दिक वस्त्रहरण करणे, देशातील जनतेला सतत असुरक्षिततेच्या वातावरणात अडकवून ठेवणे, देशातील अति गंभीर समस्यांचे तातडीने निवारण करण्यात प्रचंड चालढकल करणे, देशांतर्गत जातीयतेची बीजे रोवून एकात्मतेची शकले पाडणे आदी कार्यक्रम राजकारण्यांच्या अजेंड्यावर सर्वप्रथम असतात. मोठमोठी भाषणे ठोकून जनतेला प्रभावित करायचे, मोठमोठी आश्वासने देऊन कामकरी,चाकरमानी यांना तात्पुरते खुश करायचे, सवलतींचे आमिष दाखवून गरिबांना आपल्याच पक्षाला मते द्यायला प्रवृत्त करायचे, सोयीसुविधांची आकर्षक चित्रे जनतेच्या डोळ्यांना दाखवायची, अमका कर तमका कर जनतेवर लादून स्वत: मात्र करबुडव्याची भूमिका बजावायची, भारताचे शांघाय करायच्या कैफात सामान्यांच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करायची असे हे या सुपर डर्टी चित्रपटाचे न संपणारे कथानक आहे.
देशाच्या कोपऱ्यात कुठेही आणि केव्हाही घडणाऱ्या अपघातांचे,घातपातांचे भांडवल करून राजकारणातील उंट,घोडे,हत्ती,प्यादी यांच्यावर मात करायची हा ही वर्षानुवर्षे खेळला जाणारा राजकारण्यांचा मनोहारी खेळ आहे.  लोकांचे जीव जातात, माणसे लुळी -पांगळी  होतात, कुणाच्या कुटुंबातला आधार जातो, कुणी देशाच्या रक्षणासाठी कामी येतात, कुणी अनपेक्षित धक्क्याने मानसिक संतुलन हरवून बसतात पण यापैकी कुठल्याही समस्येशी या पुढाऱ्यांचे,नेत्यांचे देणेघेणे नसते. निवडणुका जवळ आल्या की निरनिराळी कधीच पूर्ण न होणारी आश्वासने द्यायची, जनतेपाशी मतांची भिक मागायची, रस्त्यातील खड्डे बुजवण्याची नाटके करायची, तेवढ्यापुरते कचऱ्यांचे ढिगारे जनतेच्या दृष्टीआड करायचे, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरायचे,  दोन-चार बसेस,लोकल जादा सोडायच्या हा यशाचा हमखास मार्ग जवळजवळ बहुतांश राजकारणी थोड्याफार फरकाने अवलंबत असतात. 
याच राजकारण्यांच्या कृपेमुळे शिक्षणव्यवस्था भ्रष्ट होते, डोनेशन घेण्याची व्याधी तिला कायमची जडते, जीवघेण्या शैक्षणिक शर्यतीत अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडते, अभ्यासाच्या अवाजवी दबावाखाली आत्महत्यांचे पेव फुटते, शेतकरीराजा कर्जाच्या बोज्याखाली त्याचा जीव जाईपर्यंत पिचत राहतो, स्वत:चा जीव घेण्याची कल्पना त्याच्या डोक्याचा ताबा घ्यायला लागते, त्याच्या बायको-मुलांचा विचार न करता तो फक्त स्वत:च्या मृत्यूचा स्वार्थी विचार करू लागतो, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या जीवांना व्यसने जिवाभावाची वाटू लागतात, कंपन्या बंद झालेले चाकरमानी कुटुंबासकट रस्त्यावर येतात, बॉम्बस्फोट, गोळीबार, राडे-दंगली  आपण कायमच असुरक्षित  असण्याची हमी देतात, जातीयवाद,प्रांतीयवाद  आपल्या उरावर बसतो, महागाई महामारीसारखी पसरून सगळ्यांचेच आर्थिक शोषण करते, गल्लोगल्ली साठलेला कचरा, वेगवेगळी प्रदूषणे जनतेला आजारी पडण्यास समर्थ ठरतात, हॉस्पिटल ही वास्तू एखाद्याला रोगातून मुक्त करू शकते पण हलगर्जीमुळे ओढवलेल्या अपघाताच्या योगातून सोडवू शकेल याची हमी देता येत नाही, लाचखोरी,चोरी,दलाली,अफरातफर ही कृत्ये सन्माननीय वाटू लागतात, भ्रष्टाचार केलेले,बलात्कार केलेले,हत्या केलेले  अपराधी एखाद्या हिरोच्या अविर्भावात वावरताना आढळतात.
डर्टी पिक्चरमधील सिल्कला निदान शेवटच्या क्षणी तरी स्वत:ची अंगभर साडीतली प्रतिमा न्याहाळावीशी  वाटते परंतु स्वत:ची मलीन झालेली प्रतिमा ओळखून ती सुधारण्यासाठी लागणारी निकोप  आणि धीट दृष्टी राजकारणी केव्हाच गमावून बसले आहेत.

Wednesday 23 November 2011

मुलगा-मुलगी

तुम्हाला मुलगा झाला आहे असं डॉक्टरीण बाईंनी सांगितल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. नुसत्या आईच्या चेहऱ्यावर नाही तर प्रसूतीची वाट बघत बसलेल्या आप्तेष्टांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य दिसतं. लढाई जिंकल्याच समाधान त्यातून प्रतीत होतं.  मुलगी झाली अशी बातमी कानी पडताच आनंद होतो खरा परंतु त्या आनंदात काहीतरी निसटल्याच शल्य असतं. मुलगी-मुलगा यातील तफावतीला इथूनच तर खरी सुरवात होते. 

कुलदीपक जन्माला आल्याचा आनंद गगनात मावत नसतो. असे कुलदीपक मोठे होऊन आई-वडिलांची जबाबदारी झटकून,परदेशी जाऊन आपापला संसार थाटून राहिले तरीही घराण्याला शोभा आणण्यासाठी,वंश पुढे नेण्यासाठी मुलगा हा हवाच!
मुलींनी आई-वडिलांचे कितीही करायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्या परक्याचे धन या बिरुदावलीखालीच राहतात. वास्तविक पाहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रियाही कामे करतात,जबाबदाऱ्या समर्थपणे पेलतात,घर आणि ऑफिस अशी दुहेरी  'टास्क' सांभाळतात. मुलांचे भविष्य घडवतात. असे असतानाही कर्त्याच्या भूमिकेचा मान मात्र  समाज पुरुषालाच बहाल करायला उत्सुक असतो. 
पुरुष आणि स्त्री मधला शारीरिक फरक वगळता आज स्त्री कुठल्याही पद्धतीने पुरुषापेक्षा कमी नाही. उलटपक्षी मानसिकदृष्ट्या स्त्रीच पुरुषापेक्षा जास्त खंबीर असते. स्त्रिया 'multi-tasking' जास्त उत्तम रीतीने करू शकतात. 
लहानपणापासून घरगुती लहानसहान कामे मुलींनाच शिकवली जातात. चहाच्या कपबश्या विसळणे,केर काढणे,जेवणाची ताटे घेणे, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, फर्निचर पुसणे, झाडझूड करणे वगैरे. मुली वयात आल्यावर जास्त हसण्या-खिदळण्यावर निर्बंध येतात. मुलांशी बोलणे,गप्पा मारणे गैर समजले जाते. कपडे कोणते घालावे,कसे बोलावे, कसे चालावे,कसे वागावे याबद्दल शाळा घेतली जाते. दिवेलागणीनंतर बाहेर राहण्याची मुभा मुलींना फारशी दिली जात नाही. 'आज ना उद्या तुझं  लग्न होईल आणि तू दुसऱ्या घरी जाशील. तिथे असं वागून कसं चालेल?' ही समज मुलीला सातत्याने  देण्याचे महत्कार्य आई-वडील करत असतात. मुलाने मात्र घरी केव्हाही यावे,इतरांशी गप्पा-टप्पा हाणाव्या,घराच्या कामांमध्ये लक्ष घालू नये असा अलिखित नियम असावा. आजही ऑफिसमधून थकूनभागून आलेला नवरा घरी आल्यावर पंख्याखाली पाय पसरून पेपर वाचत बसतो आणि त्याच्या इतक्याच थकूनभागून आलेल्या बायकोकडून आयता चहा पिण्यात धन्यता मानतो वर पुन्हा एखाद्या चमचमीत डीशची फर्माईश करण्यातही त्याला गैर काहीच वाटत नाही.  घरची गाडी असल्यास बहुतेककरून  पुरुषच ती घेऊन ऑफिसला जातात आणि बायका मात्र लोकलमध्ये अनेकांचे धक्के खात लोंबकळत प्रवास करतात. 
सकाळी उठल्यापासून घरातील सगळी कामे बाईनेच हातावेगळी केली पाहिजेत असा नियम कोणत्या कायद्याच्या पुस्तकात आहे? जसा तिचा संसार असतो तसा आणि तेवढाच त्याचाही नसतो का? तिची मुले त्याचीही असतातच ना? मग त्यांना शाळेसाठी तयार करणे,त्यांचा नाश्ता,खाऊचा डब्बा तयार करणे,त्यांचा अभ्यास घेणे,त्यांची दुखणी-खुपणी काढणे,त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही जबाबदारी फक्त तिचीच कशी? त्याच्या आई-वडिलांना तिने मान देणे खचितच गरजेचे पण तिच्या आई-वडिलांना मान देणे त्याच्यासाठी कसे गरजेचे नाही?  
मुलगा आणि मुलगी म्हणून आपल्या मुलांना वाढवण्यापेक्षा त्यांना सुजाण नागरिक म्हणून घडवणे हे आई-वडिलांचे आद्य कर्तव्य असले पाहिजे असे मला वाटते. खाण्या-पिण्यासारख्या गोष्टींपासून  ते स्वत:च्या पायांवर भक्कम उभे राहण्यासाठी मुलगा-मुलगी हा निकष न लावता आई-वडिलांनी त्यांना सक्षम बनवले पाहिजे. वर्गभेद,वर्णभेद,लिंगभेद यांचा अतिरेक समाजहितासाठी घातक ठरू शकतो या गोष्टीचे भान असू द्यावे. दुर्लक्षित राहिलेली ,उपेक्षिलेली , फारकतीच्या झळा सोसलेली कोणत्याही घरातील,थरातील,स्तरातील मुलगी ही एकतर सोशिकतेच्या भावनेने अन्याय सहन करत आयुष्यभर पिचत राहते नाहीतर या समाजाप्रवाहाविरुद्ध बंड करून उठते. मुला-मुलींना संतुलित रीतीने,सम्यक भावाने जगायला शिकवणे हे ज्या दिवशी आई-वडील ठरवतील तो दिवस जगाच्या इतिहासातील 'सोनियाचा दिवस' ठरेल!  

Tuesday 22 November 2011

भीती


भीती ही एखाद्या व्यसनासारखी असते. ती जडली की जडली. व्यसनांनी शरीर पोखरले जाते आणि भीतीने मन! व्यसनमुक्ती केंद्रांप्रमाणे आता जागोजागी भीतीमुक्ती केंद्रेही उघडली गेली पाहिजेत. 
हिंस्त्र प्राण्यांची अथवा खून-दरोड्यांची भीती सर्वव्यापी असते पण प्रत्येक व्यक्तिगणिक मात्र भीती कसलीही असू शकते. काळोखाची भीती असू शकते. एकटेपणाची भीती असू शकते. पुढे होणाऱ्या एखाद्या आजाराची भीती असू शकते. आगीची भीती असू शकते,पाण्याची भीती असू शकते. विमानाची भीती असू शकते. पोलिसांची किंवा तुरुंगाची भीती असू शकते. ( सामान्य जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात हे क्षण जवळजवळ येत नाहीत तरीही)  रेल्वे स्टेशनवरील गर्दीची, थरथरणाऱ्या पुलाची, खिसेकापूंची, कधीही होणाऱ्या बॉम्बस्फोटांची, गर्दुल्ल्यांची यापैकी कशाचीही वा सगळ्यांचीच भीती असू शकते. चाकू-सुऱ्या,नेलकटर,कात्री अशा धारदार वस्तूंची सुद्धा भीती असू शकते. कीटकनाशक औषधांची भीती असू शकते. बंद लिफ्टची भीती असू शकते. विजेच्या उपकरणांची भीती असू शकते. घरातील सिलेंडरची भीती असू शकते. सरकत्या जिन्याची भीती असू शकते.बंद थिएटरची भीती असू शकते. रस्ता क्रॉस करायची भीती असू शकते. डॉक्टरांकडे गेल्यावर इंजेक्शनची, तपासण्यांची, बिलाची, निदानाची भीती असू शकते. वाहनात बसल्यावर वाढणाऱ्या मीटरची भीती असू शकते. रस्त्यावरच्या मवाल्यांची भीती असू शकते. वरिष्ठांची भीती असू शकते. आपली आर्थिक,सामाजिक पत खालावण्याची भीती असू शकते. अशा अनेक भित्यांच्या सावटाखाली आपली जगणं नामक दैनंदिन मालिका चालू असते.   
आपल्या भीतीचं मूळ शोधून काढायला यांपैकी कुणीच उत्सुक नसतो. उलटपक्षी या भितींच्या साम्राज्यात राहायला काहीना मनापासून आवडते. माझ्या एका आत्याला औषधाची गोळी गिळायची विलक्षण भीती वाटते. लहानशी गोळी जिभेवर ठेवूनही तिला ती यशस्वीरीत्या गिळता येत नाही. कितीही पाणी ढोसलं तरी गोळी काही घशाखाली उतरत नाही. गोळी कुटणे एवढाच पर्याय प्राप्त परिस्थितीत उरतो. तिच्या ह्या समस्येवर रामबाण उपाय कुठल्याही डॉक्टरकडे नाही. काही भीत्या तर खूपच मजेशीर असतात. एका बाईला म्हणे नुसती उशी दिसली तरी भीती वाटते. कुणीतरी तिच्या उरावर बसून त्या उशीने तिचा गळा दाबतंय असं काल्पनिक चित्र तिच्या डोळ्यांसमोर येतं. तिच्या घरच्यांची किती पंचाईत होत असेल याची कल्पनासुद्धा  आपल्याला येणार नाही. एका तरुण मुलीला म्हणे चावीवाल्या खेळण्यांची भीती वाटते. ती आपल्या अंगावर येतील या भीतीने ती त्यांच्याकडे बघतही नाही. एका बाईला टोलेजंग पाळण्याची  ( giant wheel )  भयंकर भीती वाटायची. तो वरून खाली येताना पहिला की तिच्या छातीत धडधड व्हायची आणि भीतीपोटी ती किंचाळायची. म्हणजे ते प्रत्यक्ष थ्रील अनुभवासाठी तिला पाळण्यात बसण्याची गरजच नव्हती. आमच्या नात्यातल्या एका माणसाला उंचावरून खाली पाहण्याची खुप भीती वाटायची. दहाव्या मजल्यावरून खाली नुसता दृष्टीक्षेप टाकला तरी आपण पडतोय या भीतीने हा गळाठून जायचा. एका माणसाला जिना चढताना आपल्या मागावर कुणीतरी आहे असं सारखं वाटायचं.   
प्रत्येकाचा जन्म,सभोवतालचे वातावरण,वावरणारी माणसे,त्यांच्या बोलण्याचे विषय ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे प्रत्येकाभोवती  भीतीचे अथवा सुरक्षिततेचे वलय तयार होत असते. भीतीचे वलय भेदून पुढे येण्याचा प्रयास करणारे थोडेच  असतात. प्रत्यक्ष देवाचं वास्तव्य ज्या वास्तूत आहे ती वास्तू ज्यांना भयप्रद वाटते त्यांच्या भीतीचं निरसन कोणता देव करू शकेल?

Sunday 13 November 2011

व्यक्त व्हायला शिका !

एक किलो जिव्हाळा अधिक एक किलो माधुर्य अधिक एक किलो संवेदना यांचा मिलाफ म्हणजेच नात्यांचं घट्ट श्रीखंड असं गृहीत धरलं तरीही त्यावर सुगंधी केशरी वर्ख चढविण्यासाठी मनातील अव्यक्त रूपातील भावनांची पखरण करण्याचा खटाटोप हा हवाच! आपली दुसऱ्याविषयीची भावना जोपर्यंत योग्य माध्यमाव्दारे जाहीररीत्या व्यक्त होत नाही तोपर्यंत त्या नात्याच्या कळ्या पूर्णपणे विकसित होत नाहीत. 
आपल्या मराठी संस्कृतीत भावना व्यक्त करणे हा काही दखलपात्र गुन्हा मानला जातो की काय अशी मला नेहमीच शंका येते. एखाद्याचं कौतुक करायला आपण एवढे का कचरतो? केवळ अभिनंदनपर चार कोरडी वाक्ये फेकण्यात आपण धन्यता का मानतो? एखाद्या समारंभाच्या प्रसंगी एखाद्या विषयीची आपुलकी, प्रेम, निष्ठा व्यक्त करण्यासाठी आपण मागेपुढे का पाहतो? तुम्ही भले एखाद्याला स्तुतीसुमनांची आंघोळ घालू नका अरे पण चार-दोन प्रशंसापर वाक्यांचे शिंतोडेही त्याच्यावर उडणार नाहीत याची खबरदारी तुम्ही का घेता? 
प्रगतीपुस्तकातून आपल्या मुलाने किंवा मुलीने कमी मार्क आणले की आपली जिव्हा तिखट बोलण्यासाठी किती लसलसते ते आठवून पहा. आपण अपमानकारक शब्दांची मुक्त उधळण करत आपल्या पाल्ल्याची  कोणतीही गोष्ट ऐकून न घेता भावनांच्या हिंस्त्र डरकाळ्या फोडतो. तेच त्याने किंवा तिने चांगले मार्क मिळवल्यास आपली चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याची कक्षा आपण किती रुंदावतो? शब्दातून अथवा स्पर्शातून त्यांच्याविषयीचा अभिमान त्यांना जाणवू देण्याइतपत आपण सक्रीय होतो का? 
किमती,महागड्या भेटवस्तू मुलांना देऊन जे साध्य होत नाही ते त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भावना त्यांना जवळ घेऊन व्यक्त केल्यावर होतं. दोघांमधील नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी पैशांचा नव्हे तर सु-संवादाचा दोर लागतो. दिखाऊपणाच्या भिंती या पोकळ असतात परंतु समंजसपणाचे लिंपण असलेल्या भिंती मात्र परिपक्व आणि भक्कम असतात. 
सण-समारंभ येतात. माणसे भेटवस्तू देऊन, चार शब्द बोलून निघून जातात. समारंभ संपल्यावर एकाकीपणा आपल्याला खायला उठतो. जवळच्या वाटणाऱ्या माणसांनी आपापला वेळ, पैसा खर्च केलेला असतो. तरीही स्नेहाची, निखळ प्रेमाची ती जागा रिकामीच राहिल्यासारखी वाटते. शब्दांचे बुडबुडे केव्हाच हवेत विरून गेलेले असतात. आपण अपेक्षिलेल्या प्रेमाची, आपुलकीची झाक आपल्याला जमलेल्या डोळ्यांत अभावानेच दिसलेली असते. आत्तापर्यंत आपणही उपचारांचेच रतीब घातलेले असतात. स्पर्शातील उब,मुलायमता,तरलता माहित असूनही ती आपण इतरांना जाणवू दिलेली नसते. आनंदाच्या-दु:खाच्या प्रसंगी आपण तिथे फक्त आपली उपस्थिती असणे यालाच महत्त्व देत आलेले असतो. दुसऱ्याचा आनंद आपल्यामुळे कसा द्विगुणीत होईल किंवा त्याचे दु:ख कसे कमी करता येईल यासाठी आपण काही खास असे प्रयत्न केलेले नसतात. तसे करण्यामुळे आपली सहसंवेदना समृद्ध होईल याचाही आपण कधी फारश्या गांभीर्याने विचार केलेला नसतो.   
आपल्याला पडत्या काळात सांभाळणाऱ्या, समजून घेणाऱ्या, धीराचे चार शब्द सांगून मनाला उभारी आणणाऱ्या आप्तेष्टाचे आपण जाहीररीत्या आभार का मानत नाही? कारण असे करणे आपल्याला एकतर कृत्रिम वाटत असावे किंवा असे आभार मानताना समोरचा आपल्यापेक्षा मोठा होतो आहे याचा आपल्याला मनोमन खेद वाटत असावा. स्वत:च्या अंगभूत कर्तृत्वाने, गुणाने जो ठसा उमटवतो, प्रतीकूलतेला स्व-प्रयत्नाने भेदतो त्याचेही जाहीर कौतुक करायला  आपल्या जिभा का सरसावत नाहीत? आज आपल्याला त्याची जागा घेता येत नाही ही जाणीव आपल्याला बोचते का? 
प्रत्येकानेच यावर आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. आपलं आयुष्य हा जिंकण्या -हरण्याचा आखाडा नसून नात्यांचे निसटत चाललेले,उसवत चाललेले धागे स्व-प्रयत्नांनी गुंफण्याची सुसंधी आहे. तेव्हा व्यक्त व्हायला शिका,शिकवा आणि सोन्यासारख्या नात्यांना झळाळी द्या!  

Monday 24 October 2011

मोठे कुणा म्हणू मी?

काही वर्षांपूर्वी दादरच्या किंग जॉर्ज शाळेत एका कार्यक्रमाला गेले होते. एका नामवंत सतारियांच्या सतारवादनाचा  कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम संपला. ते सतारिया व्यासपीठावरून खाली उतरले आणि श्रोत्यांमध्ये मिसळले. आम्हीही त्यांना अभिप्राय देण्यास उत्सुक होतो. "मेरा बजाना आपको अच्छा लगा?" त्यांच्या या विनम्रतेने मला बुचकळ्यात टाकले. नावलौकिक प्राप्त झाल्यानंतर इतक्या अदबीने, इतक्या नम्रतेने वागणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतात. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात. काही माणसे तर आपण त्यांच्यापेक्षा कुठेतरी कमी आहोत ही न्युनतेची  भावना आपल्यावर ठसवण्यासाठी कायम तत्पर असतात. 

अशाच एका नामवंत कवी-साहित्यिकाला मी माझ्या काही कविता वाचण्यासाठी  दिल्या व त्यावर त्यांचा अभिप्रायही मागितला. हेतू हा की त्यांच्यासारख्या साहित्याचं शिखर गाठणाऱ्याकडून माझ्यासारख्या होतकरू कवयित्रीला बहुमुल्य मार्गदर्शन मिळावं. आपण या क्षेत्रात योग्य मार्गाने जात आहोत ना याचीही खातरजमा करता यावी. परतू अभिप्राय तर सोडाच पुढल्या वेळी भेटल्यानंतर मी असा काही काव्यसंग्रह त्यांना दिला होता हे त्यांच्या खिजगणतीतही  नव्हतं. मला फार वाईट वाटलं. पण काही वेगळं वाटलं नाही. याउलट माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला लाभलेले  कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट,शिरीष पै  या काव्याच्या प्रांतातील ज्येष्ठांचे अभिप्राय मला खूप बोलके वाटले. १९८४ साली माझ्या काही निवडक कवितांबद्दलचे विश्लेषण माझ्या पत्राच्या उत्तरादाखल म्हणून पु.लंनी अंतर्देशीय पत्रातून केले तेव्हा तर मला अस्मान ठेंगणे झाले. सुरेश भटांनी तर गझल कशी लिहावी व कशी लिहू नये याबद्दल  पत्रातून आपुलकीने सविस्तर माहिती दिली. वर आणखी तुमचा पिंड गझल लिहिण्याचाच आहे हेही ठामपणे सांगितले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनीही त्यांना काव्यमय पत्र पाठविल्यानंतर तितक्याच तत्परतेने आणि आस्थेने पत्र पाठविले. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या काव्यसंग्रहाची शीर्षके निवडून त्यावर कविता करून मी पाठवली होती. ती त्यांना पोहोचताक्षणी त्यांनी आवर्जून माझ्या घरी फोन केला होता. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. अशा काही चांगल्या घटनांमुळे माझ्या मनातील या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची एक माणूस म्हणूनही प्रतिमा उंचावली गेली.     
   साहित्याप्रमाणे संगीत क्षेत्रातही मी माझ्या कुवतीप्रमाणे मला थोडे आजमावले. काही प्रतिभावंताच्या रचनांना स्वरबद्ध करून ती गाणी रसिकांसमोर प्रस्तुत करून कानसेनांची तसेच संगीत क्षेत्रातील नामवंतांची दाद मिळवली. तबलावादनात ज्यांचे नाव अभिमानाने आणि अग्रणी घेतले जाते त्या पं.भाई गायतोंड्यांमुळे मराठी भावगीताचे जनक गजाननराव वाटवे यांना भेटण्याचा योग आला. पुढे आर्थिक अडचणींमुळे या कार्यक्रमांना खीळ बसली. या निमित्ताने कलावंताच्या आत वसलेल्या मानवरूपाचे मला बरे-वाईट दर्शन झाले. 
मुळातच आपण एखाद्या कलावंताला हा मोठा, हा ग्रेट, हा लोकप्रिय अशी लेबले लावतो खरी परंतु ते केवळ त्याच्या कलेच्या संदर्भात! अशा एखाद्या कलावंताला माणूस म्हणून बघावे तर कधी कधी तो अतिसामान्य निघतो. कळसावर पोहोचलेल्याने कळसाच्या पायापाशी असलेल्याला मार्गदर्शन करण्यात कमीपणा का वाटावा? की उद्या याला हात दिल्यानंतर हा आपल्या पर्यंतचे अंतर लवकर कापेल अशी भीती त्यांना आतून खात असावी? "मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो" या कविवर्य बोरकरांच्या काव्यपंक्ती  इथे सार्थ ठरतात. लोकप्रियता, कीर्ती, पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा ,मानसन्मान या मुखवट्याआड दडलेला माणूस खरोखरीच मोठा आहे की खुजा आहे , सामान्य आहे की असामान्य आहे , अहंकारी आहे की निरहंकारी ही एक संशोधनाची बाब आहे.     

Saturday 22 October 2011

आली दिवाळी दिवाळी..............


२०११ सालची दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. घराभोवती काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, घरगुती फराळ, आप्तांच्या भेटीगाठी, पाडवा-भाऊबीज सगळं काही  साजरं होईलच पण तरीही काहीतरी हातातून निसटल्याची हुरहूर लागून राहिली आहे. 

आमच्या लहानपणी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरकचतुर्दशीला आम्ही पहाटे चार वाजता उठायचो.  आई आम्हा भावंडांना पाटावर बसवून सुगंघी तेल लावायची. नंतर एकेकाची उटणे लावून आंघोळ व्हायची. आंघोळ चालू असताना आम्हाला पेटत्या फुलबाज्या दाखवल्या जायच्या. मग घराच्या देवाला,वडीलधाऱ्यांना नमस्कार! दिवाळीची पाकिटे मिळायची. नवीन कपडे  अंगावर चढवण्याची कोण घाई व्हायची. मग मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळून आम्ही फटके उडवायला सज्ज व्हायचो. मनसोक्त फटके उडवल्यानंतर घरच्यांबरोबर  घरी तयार झालेला  खमंग फराळ खाताना खूप मज्जा यायची. 
लक्ष्मीपूजनाला घरातील दागिन्यांची, पैशांची पूजा व्हायची. पाडव्याला आई बाबांना ओवाळायची. पाडव्याची ओवाळणी म्हणून आईला बहुधा साडीच मिळायची. भाऊबिजेला आम्ही आमच्या भावाला ओवाळायचो. ओवाळणी म्हणून अर्थातच पाकीट असायचं. त्यात लपलेल्या अकरा किंवा एकवीस रुपयांचं आम्हाला कोण अप्रूप वाटायचं . घरातील मोठ्यांकडून मिळालेल्या एक्कावन्न रुपयात सगळी बाजारपेठ खरेदी करता येईल असं वाटायचं. या चार दिवसांत अख्ख्या वर्षाचा आनंद उपभोगायला मिळायचा. फराळाची देवाणघेवाण, शेजाऱ्यांचे,नातेवाईकांचे येणेजाणे सुखद वाटायचे. 
इतक्या वर्षांनंतरही  दिवाळी साजरी होतेच पण फक्त वेगळ्या पद्धतीने! बहुतेक लोक दिवाळीत फटाक्यांपासून वाचण्यासाठी   आऊटिन्गला जातात. दिवाळीची खरेदी मॉलमध्ये होते. फराळ आयता आणला जातो. पाडवा-भाऊबिजेला एकमेकांना मोठमोठ्या  महागड्या गिफ्ट्स देणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. बहिणीही याबाबतीत आता माघार घेत नाहीत. बाह्य सजावटीला अवास्तव महत्त्व दिलं जातं. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या चीजवस्तू  आप्तांना भेट म्हणून दिल्या जातात. काही ठिकाणी पाकीटातून चेक्सची  देवाणघेवाण होते. दिवाळीचे उपचार शिताफीने पाळले जातात पण अंत:करणातली ज्योत काही केल्या पेट घेत नाही. आईच्या हाताने लावलेल्या तेलाची,उटण्याची कसर भरून काढता येत नाही. ज्येष्ठांनी मायेने दिलेल्या अकरा,एकवीस,एक्कावन्न रुपयांची सर पाकिटातील हजारांच्या आकड्यांना येत नाही. घरात सगळ्यांनी मिळून केलेल्या  फराळाचा आनंद बाजारातून आणलेला फराळ देऊ शकत नाही. दिवाळीला मुलांना चांगले-चुंगले कपडे घेण्यासाठी आई-वडिलांनी वर्षभर केलेल्या काटकसरीची कहाणी  कपाटातील  अनावश्यक ओसंडणारे कपडे  सांगू शकत नाहीत. रांगोळ्यांची स्पर्धा होते पण एकमेकांकडून उसने मागून आणलेले ठिपक्यांचे कागद, गेरू,रंग, रांगोळ्यांची पुस्तके यातील उत्साहाची आणि आनंदाची स्पर्धा नाही होऊ शकत. पूर्वी दिवाळीच्या नुसत्या चाहुलीने मन आनंदित व्हायचं, उल्हसित व्हायचं आणि आता मात्र  कोणत्याही सणांच्या आगमनाची सूचना पहिल्यांदा वर्तमानपत्रातील जाहिरातींमधून, घरात टाकलेल्या पत्रकांतून, सजविलेल्या, रोषणाई केलेल्या दुकानांतून मिळते. पूर्वी घराघरांतून दिवाळीसाठी एक निश्चित बजेट आखलं जायचं पण आता दिवाळीत जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची जणू अहमहमिकाच लागलेली दिसते.   
दिवाळीचे चार दिवस येतात तसेच सरतात. फराळ,
फटाके,शुभेच्छा कार्डे, गिफ्ट्स सारे काही यथासांग पार पडते. पण औपचारिकतेचे उटणे लावून आलेली आणि कृत्रिमतेचे रंग घेऊन सजलेली दिवाळी अंतर्मनातील आनंदाची फुलबाजी काही पेटवू शकत नाही.   


Tuesday 18 October 2011

डोअरबेल आणि राशी


डोअरबेल वाजविण्याच्या विशिष्ट वैयक्तिक पद्धतीवरून राशी ओळखल्या जाऊ शकतात का? एकदा शरद उपाध्यांना विचारले पाहिजे. डोअरबेल हे  घरातील लोकांना दचकविण्याचे, घाबरवण्याचे  हत्यार आहे अशी मानसिक धारणा असणाऱ्याची रास कोणती? डोअरबेल हे घरातील लोकांशी लपाछपी खेळायचे साधन आहे अशी मनोभूमिका असणाऱ्यांची रास कोणती? या आणि अशासारख्या प्रश्नांची उत्तरे मेष ते मीन या बारा राशींमध्ये दडली आहेत का ते पडताळून बघूया.
 मेष राशीचे उतावळे नवरे दारावरची बेल इतक्या कर्कश रीतीने वाजवित असतील की घरातल्या आबाल-वृद्धांचे कान किटावेत.थांबणे हा मेष राशीचा स्थायीभाव नसल्याने जोपर्यंत दार उघडले जात नाही तोपर्यंत यांचा बेलवरचा हात निघत नसावा.राशीस्वामी मंगळाचा आक्रमकपणा डोअरबेल वाजवण्याच्या पद्धतीतून प्रत्ययास येत असावा.
वृषभ राशीच्या लोकांचे डोअरबेल वाजविणे काहीसे याप्रमाणे असावे असे वाटते. एकतर हे लोक जास्तीत जास्त मंजुळ आवाजाची डोअरबेल बसवून घेत असावेत. तीही अतिशय अलवारपणे वाजवून आपली रसिकता घरच्या जिवाभावाच्या माणसांना दाखवून देण्याचा यांचा प्रयत्न असतो. या रसिक शुक्राच्या प्रयत्नांवर बोळा फिरवणाऱ्या घरातल्यांच्या राशी असतील तर मात्र यांची अवस्था कठीण होऊ शकते.

मिथुन राशीचे लोक बेल वाजवून हळूच जिन्यात लपत असतील, पळून जात असतील असे वाटते. यात काही लोकांचा बुध नको तेवढा खेळकर असतो. खेळ केव्हा खेळावा आणि कोणत्या राशींच्या माणसांशी खेळावा हे तारतम्य यांनी राखले नाही तर दार उघडता क्षणी यांच्या चेहऱ्यावरील खट्याळ हास्य विरून जाऊ शकतं. 
कर्क राशीचे लोक डोअरबेलही भावनेने ओथंबून वाजवित असावेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भावव्याकुळता डोअरबेलच्या माध्यमातून घरातील लोकांना कळावी असे त्यांना मनोमन वाटत असणार. त्यांच्या डोअरबेलचा आवाजही रडण्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा असावा असे वाटते. घरात कोणत्या राशीच्या वल्ली नांदत आहेत यावरून त्यांच्या डोअरबेलला मिळणारा प्रतिसाद कसा असेल हे कळू शकते. 

सिंह राशीचे लोक राजेशाही थाटाची डोअरबेल घराला लावत असावेत. ही बेल ते अशा विशिष्ट पद्धतीने वाजवत असावेत की घराबाहेर राजकुमार आल्याची वर्दी त्या बेलने द्यावी. घरातील लोकांनी दार उघडताच आपल्याला मुजरा करावा, घरातील सिंहासनावर आपण विराजमान व्हावे, थंड, सुगंधी सरबताचा पेला आपल्या ओठांना लागावा अशी स्वप्ने ही माणसे बेल वाजविताक्षणी पाहत असावीत. शनीच्या राशीची उदासीन माणसे घरात असल्यास यांच्या स्वप्नांना खीळ बसू शकते.
कन्या राशीचे लोक डोअरबेल पुन्हा पुन्हा वाजवित असावेत. एकतर आपण बेल नीट वाजवली आहे की नाही याबद्दल ते नेहमीच साशंक असतात. घरातील माणसांना बेल ऐकू गेली असेल का? दुपारच्या वेळी ढाराढूर झोपलेल्या घरातल्यांना आपल्या बेल वाजवण्याने नक्की जाग येईल का? एखादा सेल्समन समजून त्यांनी आपण आल्याची दखलच घेतली नाही तर ? हे आणि अशासारखे कैक प्रश्न यांच्या मनात हलवायाच्या मिठायांवरील माश्यांसारखे घोंघावत असतात. बेल पुन्हा पुह्ना वाजवल्याने घरात कावलेल्या, चिडलेल्या माणसांकडून यांना चांगलीच तंबी मिळू शकते. 
तूळ राशीची माणसे आपण सकाळी घरातून निघताना घरातल्या माणसांचा मूड कसा होता हे calculate करून डोअरबेल वाजवतात. घरातल्यांचा मूड बरा होता हे आठवून बेल थोडी जलद वाजते, मूड बिघडला होता हे आठवल्यावर बेल जरा हळू वाजते, मूड फारच चांगला होता हे आठवल्यानंतर बेल तीन-चारदा वाजवली जाऊ शकते. थोडक्यात घरातल्यांचा मूड आणि बेलचा स्पीड यांचा ताळमेळ जमला पाहिजे हा यांचा कटाक्ष असतो. 

वृश्चिक राशीचे लोक एखाद्यावर जन्मोजन्मीचा सूड उगवल्यासारखी डोअरबेल वाजवतात. दार लवकर उघडले गेले नाही तर आतल्या माणसांची खैर नसते. पदोपदी भांडणे, निराश होणे, एककल्ली वागणे, विक्षिप्त असणे या रसायनातून वृश्चिक मन तयार झालेले असते. त्यांच्या विखारी नांग्या समोरच्याला दंश करायला तत्पर असतात. त्यामुळे बेल वाजवण्याच्या पद्धतीवरून घरातील अनुभवी लोकांनी दार पटकन उघडावे आणि स्वत:चे रक्षण करावे.    
धनु राशीचे लोक मूड चांगला असल्यास डोअरबेल सुसह्य वाजवतात पण मूडचे खोबरे झाले असल्यास डोअरबेल भयानक प्रकारे वाजवू शकतात. ते त्यावेळी माणूस आहेत की घोडा यावर बरेच काही अवलंबून असते. घरातील माणसांना  योग्य ट्रेनिंग मिळाल्यास दारावर माणूस आला आहे की घोडा हे त्यांना लगेचच कळू शकते. 
मकर राशीचे लोक डोअरबेल वाजवतानाही उत्साह दाखवीत नाहीत. आता घरापर्यंत आलो आहोत तर घरातल्यांना आल्याची वर्दी देणे भाग आहे अशा कंटाळवाण्या भूमिकेतून यांच्या हातनं बेल एकदाची वाजते. आत दुसरी मकर रास असेल तर दार बऱ्याच वेळाने , उदासीन चेहऱ्याने उघडले जाते. पण त्यावर यांचे काहीच म्हणणे नसते. काही म्हणण्यापुरतेही तोंड उघडायचा यांना विलक्षण कंटाळा असतो. जीवावर येऊन बेल वाजवणे म्हणजे काय हे फक्त मकर राशीच्या माणसांनाच कळू शकते.
कुंभ राशीची माणसे डोअरबेल वाजवताना एखाद्या गहन विचारात गढली असण्याची शक्यता असते. कदाचित त्यामुळे दुसऱ्याच घराची बेल वाजवली जाऊ शकते. यांच्या स्वभावाप्रमाणे दारावरची बेलही धीर-गंभीरपणे वाजते. दार उघडल्यानंतर समोरच्याची साधी दखलही न घेता आत येत ही माणसे आपल्याच विचारात हरवतात. हसण्याचे यांना वावडे असते. विनोद यांचा शत्रू असतो. खेळीमिळीच्या वातावरणाचा यांनी धसका घेतलेला असतो. " मेरी तनहाई और मै" हे यांचे ब्रीदवाक्य असते. 

मीन राशीचे लोक आपण डोअरबेल वाजवली आहे की नाही हेच विसरून जातात. त्याचवेळी शेजाऱ्याशी बोलणे चालू असते किंवा मोबाईल चालू असतो त्यामुळे आपण बेल वाजवण्याची कृती नक्की केली आहे की नाही हे परत एकदा बेल वाजवून पारखले जाते. घरात हिंस्त्र राशी वावरत असतील तर बिकट प्रसंगाला यांना सामोरे जावे लागते. पण अनुभवातून ही माणसे काहीही न शिकता परत परत त्याच चुका करत राहतात आणि इतरांचा रोष ओढवून घेतात. 
यापुढे ज्योतिषाची डोअरबेल विशिष्ट पद्धतीने वाजल्यास बाहेर कुठल्या राशीची व्यक्ती अथवा वल्ली आली आहे हे ओळखण्याचा प्रस्तुत लेखावरून त्याने किंवा तिने रीतसर अभ्यास करावा आणि या शास्त्राच्या कक्षा अधिक रुंद कराव्यात ही विनंती!

Wednesday 5 October 2011

भोंडला आउट दांडिया इन


पाटावर गजराजांच सुरेख चित्र काढलेलं आहे. त्यावर हळदी-कुंकू-फुलं वाहून सुवासिनी पूजा करताहेत. नऊवारी साडी,नाकात नथ या पेहरावात सगळ्या माहेरवाशिणींनी पाटाभोवती फेर धरला आहे. ऐलमा पैलमा गणेश देवा, झिपर कुत्र सोडा ग बाई सोडा, सासूबाई सासूबाई मला आलं मूळ, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने, यादवराया राणी रुसुनी बसली कैसी अशी भोंडल्यातील परिचित गाणी कानी पडताहेत. रोज एक याप्रमाणे नवव्या रात्री नऊ गाणी म्हणून या भोंडल्याची सांगता होते आहे. रोज वेगवेगळी खिरापत होते आहे. सासवा, सुना, लेकी, त्यांच्या मुली सगळ्या मिळून भोंडल्याचा आनंद लुटत आहेत हे दृश्य आता शहरांतून हद्दपार झाले आहे. 'डिस्को-दांडिया' नावाच्या आधुनिक नृत्यप्रकाराची जिथेतिथे चलती  आहे.  
पूर्वीच्या काळी बायका घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त असायच्या. त्यांची विरंगुळ्याची साधने फार मोजकी होती. त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने बायका एकत्र यायच्या. स्वत:ची सुखदु:खे गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांबरोबर त्या 'शेअर' करायच्या. साड्या,आभूषणे ही त्यानिमित्ताने नटण्याची पर्वणी ! यजमानीण बाई म्हणजे जिच्या दारात भोंडला व्हायचा ती खिरापत करायची व ती झाकून ठेवायची. भोंडला खेळून झाल्यावर साऱ्या पोरीसोरींनी ती खिरापत ओळखायची. खिरापतीचा आस्वाद घेतल्यानंतर त्या दिवशीचा भोंडला संपायचा. अशी ही महाराष्ट्रीयन भोंडल्याची परंपरा! आता फक्त काही वाहिन्यांवर जी सणांची साथ पसरलेली असते त्या त्या वेळापुरते हे भोंडल्याचे दृश्य कधीतरी बघायला मिळते. नाहीतर आजकाल मराठी मुलीही भोंडल्यापेक्षा  दांडिया 'प्रिफर' करतात. 
नवरात्र सुरु झाली की जिथेतिथे या दांडियाचे भलेमोठ्ठे फलक लागतात. त्यावर राजकारणी,स्पोन्सरर्स यांची नावे असतात. मुली-मुले गुजराथी पेहरावात नटून-थटून, हातात दांडिया घेऊन खेळण्यास सज्ज होतात. व्यासपीठावर स्पीकर्स आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली युवापिढीला मोहून टाकणारी कर्कश्य गाणी फेकत असतात. अभूतपूर्व जल्लोषात दांडिया सुरु होतो. दांडिया ग्रुप्सच्या सामाजिक इभ्रतीप्रमाणे कधी मंचावर दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक अवतरते आणि दांडिया हिट होतो.  स्पर्धा आयोजित केल्या जातात. विजेत्या ग्रुपवर बक्षिसांची खैरात होते. गुजराथी पारंपारिक गरबाही फार कमी ठिकाणी खेळला जातो. 
जागर करून देवदेवतांचा आशीर्वाद घेण्याची सर्वमान्य पद्धत आता मागे पडली आहे. सणांच्या नावाखाली त्या त्या प्रचलित प्रथेचे भांडवल कसे करता येईल यासाठी काही समाजातील घटक खपत असतात. दहीहंडी,गणेशोत्सव,नवरात्र हे देशव्यापी सण 'कमर्शिअलाईज' करण्याची प्रवृत्ती जागोजागी फोफावत चाललेली आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घेणे म्हणजे काय ते ह्या खास लोकांकडून शिकण्यासारखे आहे. शहरातून बहिष्कृत झालेला भोंडला आणि शहराने अंगिकारलेला दांडिया हे आजच्या भारतीय संस्कृतीचे खरे स्वरूप आहे.     


Tuesday 4 October 2011

दाढदुखीचे महाभारत

वर्गात प्रश्नोत्तराचा तास चालला होता. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव युद्धासाठी उभे ठाकले इथपासून ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या गीतोपदेशाचे वर्णन वाघमारे बाईंनी केले. आता प्रश्नांची वेळ झाली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता कोणी सांगितली? असा साधा प्रश्न बाईंनी विचारला. वर्गातील एका  अत्यंत टारगट  व व्रात्य मुलाने हात वर केला. अर्जुनाला भीमाने गीता सांगितली असे उत्तर त्याने दिल्यानंतर आता टेबलावरील खडू,डस्टर,पट्टी या अस्त्रांचा यथोचित उपयोग होईल असे वर्गातील इतर मुलांना वाटले. परंतु या उत्तरावर, "ठीक आहे. खाली बस." अशी सर्वस्वी अनपेक्षित प्रतिक्रिया वाघमारे बाईंकडून आल्याने सगळा वर्ग कमालीचा अचंबित झाला. एव्हाना वाघमारे बाईंनी स्वत:चा चेहरा दोन्ही  हातांनी झाकून घेतला होता. याचे विद्यार्थ्यांना कळलेले एकमेव कारण होते - दाढदुखी. कुरुक्षेत्रावरील लढाई केव्हाच इतिहासजमा झाली होती पण तोंडाच्या आतील लढाई हातघाईवर आली होती. त्यामुळे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली या तपशीलापेक्षाही आपल्या दातांचे सारथ्य कुठल्या निष्णात दंतवैद्याच्या हाती सोपवावे या विवंचनेत वाघमारे बाई गढल्या होत्या. एकंदर दाढदुखीपुढे  कुरुक्षेत्र-अर्जुन-श्रीकृष्ण संवाद-गीता यांनी तूर्तास माघार घेतली होती.
हा किस्सा सांगण्यामागचा उद्देश एवढाच की एकदा का ती अक्कलदाढ ठणकायला लागली की धडधाकट माणूसही सपशेल नांगी टाकतो. सगळ्या सुखद जाणीवा बोथटतात. बाजूने चाललेली सुंदर स्त्री किंवा पुरुषही ही दाढदुखीची वेदना विसरायला लावू शकत नाही. दाढदुखी हे जीवनातील शाश्वत सत्य आहे असे वाटू लागते. चांगलेचुंगले पदार्थही नकोसे वाटायला लागतात. कुरकुरीत गोष्टींची भीती वाटू लागते. फुटाणे, चिक्की, ऊस,शेवकांडीचे किंवा कडक बुंदीचे लाडू आपले जन्मोजन्मीचे वैरी वाटू लागतात. दाढेची ही वेदना सर्वव्यापी असते. खून,बलात्कार,दरोडे,राजकीय लपंडाव,बॉलीवूडच्या ताऱ्यांचा नंगानाच या आत्ताआत्तापर्यंत हादरवणाऱ्या बातम्या मुळापासून हादरवणाऱ्या दाढदुखीपुढे मिळमिळीत वाटायला लागतात.   
अक्कलदाढेची एक गम्मतच असते. ती अक्कल असलेल्यांना येते आणि नसलेल्यांनाही येते. बरं येते म्हणावं तर ती चक्क घुसते. आपलं तोंड हे लोकलचा सेकण्ड क्लासचा डबा समजून आजूबाजूच्या दाढा ढकलत फोर्थ सीट बळकावू पाहते. या तिचे खेळीमेळीच्या वृत्तीने आपला गाल आतून फाडला जातो. जखम होते. दाढदुखीच्या कारणास्तव रजा घेता येत नाही कारण  तिचे दुखणे हा 'दृक एव्हिडन्स'  म्हणून वापरता येत नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांवर तोंडसुख  घेता येत नाही. शेजारच्या पर्शिणीने आणलेले 'क्रिस्पी चिकन' दातांखाली रगडता येत नाही. आपण निद्रिस्त व्हायचा प्रयत्न केला तरी आपल्या तोंडाच्या आतील यंत्रणा भलत्याच जागृत झाल्याने आपण पुरते नामोहरम होतो. कुठलेही 'पेनकिलर' आपले आत्ताचे मरण केवळ तीन-चार तासांपर्यंतच लांबवू शकते. थोडक्यात दाढ हा एकच दुखरा अवयव आपल्या शरीरात उरला आहे असे पदोपदी वाटायला लागते.   
सरतेशेवटी दंतवैद्याकडे जाण्यावाचून आपल्याला पर्याय उरत नाही. दंतवैद्याचा अद्ययावत आणि महागडा दवाखाना पाहून आपली दाढ अधिकच ठणकायला लागते. तोंडात क्षणोक्षणी होणाऱ्या वेदनेच्या स्फोटापुढे बॉम्बस्फोटही  किरकोळ वाटायला लागतात. आपण दंतवैद्याच्या अत्याधुनिक आरामखुर्चीत साशंक मनाने विसावतो. तो आपल्या दातांना हात घालतो. दुखऱ्या दाढेची चर्चा होते. ती अशा जागी नेमकी उगवलेली असते की तिचा थांगपत्ता प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही लागणे कठीण असते. त्यामुळे ती काढणे हा एक महाभारताइतकाच अवघड पेचप्रसंग असतो. ती न काढली तर वेदनाशामकांच्या मदतीने तिला केवळ काही वेळापुरतेच  निष्प्रभ करण्यात यश येणार असते. निवड आपण करायची असते.
दाढ आपलीच असते. आपली आप्त असते. पण वेळीच न काढली तर आपल्याच मुळावर येणार असते. आपलं तोंड हे कुरुक्षेत्र झालेलं असतं. आपल्या दातांच्या आरोग्याचा रथ दंतवैद्याच्या हाती असतो. आपण अर्जुनासारखे अजूनही दाढ काढावी की नाही या संभ्रमावस्थेत वावरत असतो.  दंतवैद्य आपल्याला ज्ञानोपदेश करून मिश्कील हसत असतो आणि आपण ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याच दाढेवर वार झेलायला महत्प्रयासाने तयार होतो.

Monday 3 October 2011

रिक्षा येती दारा,तोचि दिवाळी-दसरा


एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, एक वेळ मुंगी मेरुपर्वत गिळेल, एक वेळ राखी सावंत शालीन वेशभूषेत दिसेल, एक वेळ गायक हरिहरन वेणी न घालता पुरुषी केशभूषा करेल परंतु रिक्षावाले आपल्याला हवी त्या वेळेस रिकामी रिक्षा आपल्या पुढ्यात थांबवतील याची अजिबात शाश्वती देता येत नाही. 
आपल्या नाकासमोरून रिक्कामी रिक्षा भरधाव घेऊन जाणे हा यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यागत हे वागत असतात. संध्याकाळी मुंबईच्या लोकलमधून शरीराचं आणि डोक्याचं भजं करून आलेले लोक रिक्षाच्या शोधार्थ सैरावैरा पळत असतात. चुकूनमाकून एखादी रिक्षा समोर येते आणि आपण अधाशासारखे आतमध्ये उडी मारून बसतो. रिक्षावाला अत्यंत उर्मटपणे आपल्याला कुठे जायचे आहे असे विचारतो. आपण वृंदावन सोसायटी किंवा घोडबंदर रोड किंवा पोखरण किंवा आणखी काही तरी असे सांगून त्याच्या प्रतिक्रियेसाठी श्वास रोखून धरत पाहतो. आता त्याला त्याची रिक्षा लोकमान्य नगर, इंदिरा नगर,वागळे इस्टेट  या परिसरातच हाकायची असते. आपल्याला निमुटपणे रिक्षातून पायउतार व्हावे लागते. आपण ज्याठिकाणी राहत असतो तोच मुळी आपला अपराध असतो. आपल्याला बसच्या जीवघेण्या रांगेत थांबायचे नसते हा आपला दुसरा अपराध असतो. आपल्या का या प्रश्नार्थी शब्दाचे उत्तर द्यायला कोणताही रिक्षावाला बांधील नसतो हा आपला तिसरा अपराध असतो. आपल्याला आपल्या घरापर्यन्तचे  चार-पाच किलोमीटर अंतर पायी तुडवता येत नाही हा सुध्धा आपलाच अपराध असतो. या अशा साऱ्या अपराधांची शिक्षा आपल्याला रिक्षावाला नामक परमेश्वर देतच असतो. 
पावसाळ्यात रानातल गवत कसं माजत त्याप्रमाणे या रिक्षावाल्यांची माजोरडी वृत्ती पण फोफावते. मुसळधार पावसामुळे समोरचं सगळं अस्पष्ट दिसत असतं. रस्त्यावरची उघडी गटारे, खड्डे, उखडलेली जमीन, चिखल-राडा चुकवता चुकवता आपल्या आधीच नाकी नऊ आलेले असतात. समोरून येणाऱ्या रिक्षात कोणी बसलंय की नाही हे सुध्धा नीट दिसत नसते. आपण अंदाजाने हात हलवीत असतो आणि पदोपदी निराश होत असतो. एखादी रिक्षा आपलं भाग्याचं दार किलकिलं करून थांबल्यासारखी वाटते. आपण उत्साहाने पुढे सरसावतो. आपण पत्ता सांगताच वायुवेगाने रिक्षा भर पावसात अदृश्य  होते.  अपमानित,असहाय,हतबल,गलितगात्र झालेले आपण रिक्षावाल्याला मनोमन शिव्यांची लाखोली वाहण्या पलीकडे काहीही करू शकत नाही. पदरी गाडी बाळगणाऱ्या चाकरमान्यांचा आपण विलक्षण हेवा करायला लागतो. सणासुदीच्या दिवसातही फुलांप्रमाणे रिक्षावाल्यांचे भावही भलतेच वधारलेले असतात. आपल्याला ठाण्याच्या अंतर्भागात नक्की कुठे जायचं आहे या गोष्टीवर आपलं नशीब अवलंबून असतं. ती जागा, ते स्थळ जर रिक्षावाल्याला पसंत असेल तरच आपण तिथे पोहोचू शकतो. रिक्षावाल्याच्या मर्जीशिवाय आपल्याला प्रवासाचं दान पडू शकत नाही. काही वेळेस तर आपल्याला कुठे जायचं आहे हे टेलीपथीने  रिक्षावाल्याला कळलेलं असतं म्हणूनच आपण त्याला पत्ता सांगायच्या आधीच ती रिक्षा आपल्यासमोरून नाहीशी होते. आपण मात्र आपल्या नशिबाचा खरा सूत्रधार कोण या न मिळणाऱ्या प्रश्नावर माथेफोड करत राहतो.   
रिक्षावाल्यांचे सुसाट धावणारे मीटर ही एक वेगळीच आपत्ती असते. आपण रिक्षात बसलो की आपले डोळे मीटरला गोंद लावल्यासारखे चिकटतात. मीटर भराभरा बदलतो तसा आपल्या चेहऱ्याचा रंगही पालटायला लागतो. रिक्षावाला कसलं तरी गाणं गुणगुणत असतो आणि त्याची गानसाधना आपण भंग करतो. आपका मीटर फास्ट है, हे वाक्य आवाजातील समतोल साधत आपण उच्चारायचा प्रयत्न करतो. बैठना है तो बैठो नही तो उतर जाव हा त्याचा निगरगट्टपणाचा डोस आपण रिचवू शकलो तर आपले तारू इच्छित किनाऱ्याला लागू शकते अन्यथा आपल्या रागाला रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी राग-क्रोध-संताप-चीड या रिपुंवर विजय मिळवणारे आपण एखाद्या संतासारखे भासू लागतो.  
तात्पर्य,लोकांचा  भर रस्त्यात धडधडीत अपमान करायचा असेल तर रिक्षा चालवायचे प्रशिक्षण घ्यायला हवे. 

Friday 30 September 2011

लग्नसराई


तसा लग्नाचा मौसम बारमाही असतो. रस्ता,लोकल,बस,रिक्षा अशा सगळ्या ठिकाणी नटून -थटून चाललेल्या रमण्या दिसतात. लग्नाचे छोटे-मोठे हॉल तीनशे पासष्ट दिवस बुक्ड असतात. इमारतींना बाहेरून केलेली रोषणाई, सजविलेल्या गाड्या , फटाक्यांच्या माळा अशा अनेक रूपांनी लग्न आपल्या समोर उभं ठाकत असतं. लग्न ठरतं आणि मग खरेद्यांना नुसता उत येतो. केळवणांचा घाट वधू-वराच्या कंठाशी अन्न येईस्तोवर घातला जातो. आधी तो साखरपुडा नावाचा लग्नाचा ट्रेलर होतो. मग प्रत्यक्ष लग्न हा चलतचित्रपट सुरु होतो. ब्युटी पार्लरे ओसंडून वाहू लागतात. जो तो केशभूषा-वेशभूषा या चिंतनात मग्न होतो. बुफेचा बहुढंगी मेनू ठरविला जातो. वधू-वरांची सिंहासने, त्यामागची सजावट, भटजी नावाची संस्था, वातानुकुलीत हॉल, हळदी-कुंकू-अत्तर-पेढे वाटणाऱ्या गौरांगिनी, थंड पेये, स्टार्टर्स वितरीत करणारे, खास पाहुण्यांच्या देखभालीसाठी काही खास माणसे असा सगळा जामानिमा असतो. 

अभूतपूर्व असा लग्नाचा दिवस उजाडतो. यजमानांचे घर नुसते रंगीबेरंगी पिशव्या आणि खोक्यांनी भरून गेलेले असते. एकेकाच्या आंघोळी आटोपता आटोपता घड्याळाचा काटा भराभरा पुढे सरकत असतो. यानंतरचा वेळ साजश्रुंगारावर खर्च होणार असतो. या पुढील आपत्तीला घाबरत एखादी म्हातारी आजीबाई आतून अगं, लवकर आटपा, निघायची वेळ झाली असे ओरडत राहते पण तिच्या ओरडण्याला  कोणीही फारश्या  गांभीर्याने घेतेलेले नसते. सगळ्यांचे सगळे आटोपेपर्यंत मुहूर्ताची वेळ टळते की काय या विचाराने घरातील ज्येष्ठ घामाघूम होतात. पण घरातील भगिनीकृपेने हॉलकडे कूच करण्याचा हिरवा कंदील मिळतो.  
हॉलमध्ये साड्यांवर मारलेल्या परफ्युमचा , एसीवर फवारलेल्या सुगंधाचा,गजरयांचा,फुलांचा,नाश्ता-जेवणाचा असा संमिश्र दरवळ पसरलेला असतो. काही पाहुणे अगोदरच आलेले असतात. त्यांनी यजमानांच्या आगमनाची वाट न पाहताच नाश्याच्या टेबलाकडे धाव घेतलेली असते. थंड पेयांची फिरवाफिरवीही  सुरु झालेली असते. दोन्ही पक्षाकडील लोकांची लगबग सुरु झालेली असते. अनुभवी माणसे त्यांना सूचना देत आपापला भाव वधारून  घेत असतात. फोटोग्राफर क्लिकच्या प्रतीक्षेत असतात. काही माफक विधी पार पडल्यानंतर स्टेजवरील दोन भटजी एकदम उठून आंतरपाट धरतात. जो तो मुठीत  लपविलेल्या रंगीत अक्षताची उधळण वधू-वरांच्या डोक्यावर करण्यास पुढे सरसावतो. करवल्या वधू-वरांच्या मागे आपल्या भविष्याचे असेच काहीसे स्वप्न पाहत अमाप उत्साहाने उभ्या राहतात. वधूची आई स्टेजवरून काही काळापुरती नाहीशी होते. भटजी मंगलाष्टके माईकवरून रेकतात. काही उत्साही मंडळी भटजी बरोबर त्यांचेही कानाला झिणझिण्या आणणारे  गानकौशल्य दाखवतात. एकदाचे लग्न लागते. सी.डी वर ढोलताशे वाजतात. अक्षता टाकून टाकून दमलेली मंडळी एकदाची खुर्चीवर विसावतात. एव्हाना  खुर्च्यांच्या मागे बुफेच्या टेबलावर आकर्षक भांड्यांतून जेवणाची मांडणी सुरु झालेली  असते. जेवणाच्या वासाने पोटात भूक खवळलेली असते. पेढे खाऊन झाल्यावर आता काय करायचे हा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो. तिथे स्टेजवर वधू-वराकडील मंडळी विवाहोत्तर विधी उरकण्यात बिझी असतात. तेव्हा या पार्श्वभूमीवर लोकांच्या माना थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाठी वळून जेवणाचा अंदाज घेत असतात. काहींना जांभया येत असतात. काहीजण कंटाळलेल्या चेहऱ्याने कधी एकदाचा जेवतो आणि घरी जाऊन पसरतो असे स्वगत बोलत असतात. काही वेळासाठी वधू-वर स्टेजवरून दडी मारून त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये अंतर्धान पावतात. यजमान पाहुण्यांना आता जेऊन घ्यायला हरकत नाही असे सांगतात आणि बुफेच्या टेबलांवर अचानक विलक्षण कल्ला होतो. लोक जेवणाच्या ताटांच्या दिशेने पी.टी.उषेपेक्षाही जोरात धावतात. आपला सामाजिक,आर्थिक स्तर विसरण्याची ही एक सर्वमान्य जागा असते. अनेक पदार्थांची रेलचेल असते. आपल्या बिचाऱ्या एकुलत्या एका पोटावर ताण येतोय का नाही ह्याकडे कानाडोळा करत समोरचे फुकटात मिळालेले अन्न ज्याला त्याला हापसायचे असते. त्यात आहेराची भानगड नसेल तर सोन्याहून पिवळे!  मुख्य जेवणानंतर आईस्क्रीम, तांबुल सेवन होते आणि एक लग्न सबंध पचविल्याचे समाधान पाहुण्यांना मिळते.  
आता एवढे भरपेट जेवण झाल्यानंतर वधू-वरांना आहेर आणि आशीर्वाद देण्यासाठी भल्यामोठ्या रांगेत उभं राहायचं अनेकांच्या जीवावर आणि डोळ्यांवर आलेलं असतं. त्यात पुन्हा स्टेजवर भेटायला जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपचा फोटो! त्यात प्रत्येकाच्या आकारमानाप्रमाणे काहीजण फोटोत येणार नाहीत म्हणून त्यांचे वेगळे फोटो ! त्यामुळे उपाशीपोटी,थकलेले वधू-वर , झोपाळलेले पाहुणे आणि सकाळपासून फोटो काढून काढून थकलेला फोटोग्राफर या रसायनातून फोटो निघतात. 
अशी लग्ने बारमाही चालू राहतात.  केशभूषा-वेशाभूषांना अंत नसतो. वधूवरांना आशीर्वाद आणि आहेर  देण्यात रस असो वा  नसो, अनिर्बंध जेवण्याचा हक्क आम्ही असाच बजावीत राहतो.