Tuesday 10 January 2012

सृजनाला वाव द्या .........

सृजन म्हणजे निर्मिती. प्रत्येकातच  ही सृजनक्षमता निरनिराळ्या प्रमाणात असते. तिचा खराखुरा उपयोग करायची पाळी मात्र दुर्दैवाने फारच कमी लोकांवर येते. मुळातच माणसाच्या मेंदूच्या उजव्या भागाचा वापर हा अत्यंत कमी प्रमाणात होतो. कल्पकता,निर्मितीक्षमता या मानवी मेंदूला मिळालेल्या देणग्या आहेत परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर न झाल्याने या पैलूचा आविष्कार सगळ्यांमध्ये दिसून येत नाही. 
मुलांना शाळेत पाठ्यपुस्तकातून रेडीमेड उत्तरे लिहावयाची सवय त्यांच्या शिक्षकांनी लावलेली असते. इथपासून ते तिथपर्यंतचे उत्तर पाठ करून तसच्या तसं लिहिणारा हुशार या व्याख्येत बसतो. भूमितीची प्रमेये पाठ करावी लागतात एवढेच नाही तर भाषेचे निबंधही पाठ करावे लागतात. चित्रकलेचे नमुने गिरवायचे असतात. शिकवलेले गाणे घोटायचे असते. व्यायामाची प्रात्याक्षिके दाखवली जातात. वक्तृत्वातील भाषणाचा मसुदा लिहून मिळालेला असतो. प्रोजेक्टच्या नावाखाली इथून तिथून माहिती गोळा करून आणि आई-वडिलांची मदत घेऊन तो आपापल्या वर्गशिक्षिकेकडे काही मार्कांसाठी सुपूर्द करायचा असतो. त्यामुळे ज्याचे पाठांतर उत्तम,लिहिण्याचा सराव उत्तम तो विद्यार्थी बाजी मारून जातो. 
एखाद्या विद्यार्थ्याला फक्त निबंधाचा विषय द्या पण कोणतीही मदत ( लिखित स्वरूपातील) देऊ नका. बघा तो निबंध लिहू शकतो का ते! तो लिहू शकणार नाही कारण निबंधाला लागणारी विचारशक्ती,शब्दसंपदा त्याच्याकडे अति मर्यादित स्वरुपात असेल. कधीही स्वतंत्र विचार करायला ज्याला किंवा जिला आपण प्रवृत्तच केलेलं नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थच नाही का? चित्रकलेसाठी कोणताही अमुक एक विषय न देता मुलांना मुक्तपणे त्यांची मनातील चित्रांचं रेखाटन करायला देणारे किती शिक्षक आहेत?  कोणताही अभ्यासक्रम म्हटला की त्याला साचेबद्धपणा येतोच किंवा त्याची एक विशिष्ट चौकट तयार करावी लागते हे कबूल पण म्हणून मुलांमधील सृजनक्षमतेला कुठेच वाव मिळू नये अशी परिस्थिती का निर्माण व्हावी हे कळत नाही. 
बरेच वेळा काही विद्यार्थी घरी स्वत:ची कल्पनाशक्ती वापरून एखादे सुंदर चित्र काढतात, इलेक्ट्रोनिक्सचे  एखादे मॉडेल बनवतात, एखाद्या विषयावर कविता करतात, एखादे गाणे स्वत: पेटीवर बसवतात पण या गोष्टींना म्हणावे तसे प्रोत्साहन पालकांकडून वा शिक्षकांकडून मिळत नाही. उलट येता जाता आधी अभ्यास पूर्ण कर मग या गोष्टी कर असा मोलाचा सल्ला दिला जातो. अभ्यास पूर्ण होणे निश्चितच गरजेचे असते पण बुद्धीला स्वतंत्ररित्या चालना मिळणे, ती विकसित होणेही तितकेच गरजेचे नसते का? संगणकासमोर तासनतास बसून खेळ खेळणारी,टी.व्ही.वरील कार्टून्स आणि मालिका पाहणारी बाल आणि युवा पिढी बौद्धिकदृष्ट्या अचेतन ( passive ) होत चालली आहे. हातातील रंगीत कागदाचे क्षणार्धात सजीव वाटणारे पक्षी करून दाखवण्याचे श्री.अनिल अवचट यांचे कसब आपल्या मुलांना दाखवायला हवे. कागदावर ओढलेल्या रंगांच्या फराट्यातून होणारी चित्रनिर्मिती मुलांनी अनुभवायला हवी. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी निर्माण केली जाणारी शास्त्रीय उपकरणे मुलांना दाखवून अशा प्रकारची उपकरणे,अवजारे,आयुधे बनवण्याची त्यांची क्षमता चाचपून पाहायला हवी. अनेक संशोधनांचे प्रेरणास्त्रोत, जन्मदाते यांच्या आयुष्याची मुलांची ओळख व्हायला हवी.  
बुद्धीला चालना देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिचय मुलांना करून देणे अत्यावश्यक आहे. शाळेतील स्पर्धांचे आयोजन मुलांनी करायला हवे तेही कुणाच्या मदतीशिवाय! व्यासपीठावरील नेपथ्य, प्रकाशयोजना, पात्रांचे वावरणे, संवाद, नाट्य, कविता, गाणी,वक्तृत्व अशा सर्वच बाबतीत मुलांचे स्वतंत्र योगदान हवे. एखाद्या प्रश्न मालिकेचे ( quiz contest ) आयोजनही मुलांनी करावयास हवे. कार्यक्रमातील संभाव्य अडचणींवरही त्यांना मात करता यायला हवी. विविध खेळांचे आयोजन सुद्धा त्यांनी करावे. अनेक संशोधकांचा, नाटककारांचा, लेखकांचा, चित्रकारांचा, गायकांचा, जादुगारांचा परिचय त्यांच्या मुलाखतीतून, चर्चेतून मुलांना व्हायला हवा. त्यांना त्यांची प्रेरणास्थाने, दैवतं यातून शोधता यायला हवीत. बाबा आमटेंच्या,प्रकाश आमटेंच्या  कार्याशी मुलांचे नाते जडायला हवे. आपल्याला भविष्यात कोणकोणती दालने उपलब्ध होणार आहेत, कोणता रस्ता आपला मार्ग अधिक प्रकाशमय करणार आहे किंवा आपल्याला कोणत्या रस्त्यावरून चालणे अधिक आनंददायी ठरणार आहे याचा धांडोळा मुलांना घेता आला पाहिजे. डॉक्टर, इंजिनिअर, सी ए, एम बी ए च्या कुंपणात बंदिस्त झालेल्या बुद्धीला अनेकविध विषयांचं विस्तीर्ण आकाश आपल्याला उपलब्ध करून देता आलं पाहिजे.  

मी कोण होणार या प्रश्नाचं निश्चित उत्तर हे फक्त माझ्यापाशीच असायला हवं. माझी बुद्धी, माझी सृजनशीलता, माझी प्रयोगशीलता याची सुयोग्य सांगड मला घालता आली पाहिजे. माझी प्रज्ञा माझ्याभोवतीचे जग तेजाळायला कारणीभूत झाली पाहिजे. 
  

No comments:

Post a Comment