Wednesday 31 December 2014

नाना -एक विलक्षण रसायन

नाना हे एक अजब रसायन आहे. त्याला प्रेम करणारा रागीट माणूस म्हणावा की रागावणारा प्रेमळ माणूस हे समजत नाही. त्याच्याविषयी खूप कुतुहल वाटतं. इतर कलाकारांचा यथायोग्य आदर राखून असे म्हणता येईल की तो पडद्यावर असता त्याच्या इतकी दुसरी कोणतीही व्यक्ती प्रेक्षणीय वाटू शकत नाही. वास्तविक पाहता तो हिरोच्या कोणत्याच व्याख्येत चपखल बसत नाही. एक उंची सोडली तर त्याचे दिसणे हे सो-कॉल्ड सौंदर्याच्या कक्षेबाहेरचे असूनही त्याचे अस्तित्व हेच बघणाऱ्याला मुग्ध करणारे असते. आज साठी ओलांडून चार वर्षे उलटल्यानंतरही तो अनेक तरुणांना त्यांचा 'रोल मॉडेल' वाटतो.   
छबिलदास शाळेत तेव्हा 'पाहिजे जातीचे' या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग चालू होता. विहंग नायक, नाना पाटेकर आणि इतर काही पात्रे हा प्रयोग सादर करत होती. त्यात माझी आत्या शरयू भोपटकर ही सुद्धा होती. तेव्हा प्रथम नाना पाटेकर ह्यांना मी स्टेजवर बघितलं. एक वर्णाने सावळा शिडशिडीत तरुण एवढीच त्यांची त्यावेळेस ओळख होती. या नाटकात शेवटी चुकीच्या व्यक्तीला म्हणजेच माझ्या आत्याला घोंगड लपेटून पळवून आणतात असा काहीसा प्रसंग होता. हे नाटक मी बऱ्याचदा पाहायला जायचे.  नाना तेव्हा माझ्या आत्याला म्हणायचा, अगं बाई तुझं वजन कमी कर. तुला उचलताना माझा हात दुखून येतो. नानाच्या प्रहार या चित्रपटातही एक छोटीशी भूमिका आत्याने केली होती. त्यामुळे एक कलाकार म्हणून नानाला अगदी जवळून बघण्याची संधी त्यावेळेस मला मिळाली होती. अर्थात त्या वेळेस मी हे सगळे बालसुलभ दृष्टीकोनातून अनुभवले होते.      
नानाचे घर माहीमला असल्याने आणि आम्ही सुद्धा माहीमलाच राहत असल्याने नानाच्या घरच्या गणपतीला मला आत्या घेऊन जात असे. नाना कमर्शिअल आर्टीस्ट आहे. तो रोज फुलांची वेगवेगळी सजावट करतो. ती बघण्यासाठी खूप गर्दी असते वगैरे माहिती आत्याकडून कळली होती. काही वेळेस नानाचे दर्शन व्हायचे. आलीस का बाई, ये ये बस असे स्वागत व्हायचे. नानाकडे कोणतीही औपचारिकता नसायची. आत्याला तो बाई असेच म्हणायचा.          
नानाचा लहरी,विक्षिप्त स्वभाव, त्याचे रागावणे,तिरकस बोलणे, कसलाही विधिनिषेध न बाळगणे या विषयी नाट्य-चित्रपट वर्तुळात बोलले जायचे. त्याला भिणारेच जास्त असावेत. तो सेटवर असला की इतर कलाकारांची धाबी दणाणतात हेही ऐकले होते. इतका दबदबा असूनही त्याच्या विषयीचे कुतूहल कधी शमले नाही. त्याचे अनेक चित्रपट बघितले. माफीचा साक्षीदार या चित्रपटात दुसऱ्याच्या गळ्याभोवती फास आवळताना त्याच्या चेहऱ्यावर होणारे विकृत बदल मनाचा थरकाप उडवून गेले. परिंदा मधील त्याची खलनायकी भूमिका बघताना अंगावर शहारे येत होते. क्रांतिवीर मधला क्रांतीची मशाल प्रत्येकाच्या मनात पेटवू पाहणारा नाना मनाला एकदम भावून गेला. त्याची संवादफेक , त्याची सारखी डोक्याला हात लावून बडबड करण्याची लकब, त्याचे उपहासपूर्ण विकट हास्य ज्याच्या त्याच्या मनात ठाण मांडून बसलं. नाना जसा चित्रपटात दिसतो तसाच प्रत्यक्षातही असावा ही कल्पना दृढ व्हायला नानाचे रांगडे व काहीसे राकट वाटणारे व्यक्तिमत्वसुद्धा कारणीभूत होतेच की ! 
पण मग कालांतराने ग्रेट भेट मध्ये नानाला पहिले ते थेट शेतकऱ्याच्या वेशात. बैलाच्या अवतीभवती वावरणारा नाना, विहिरीचे पाणी काढणारा नाना बघताना एक वेगळीच अनुभूती येत होती. बऱ्याच कालखंडानंतर पडद्याबाहेर घडलेले नानाचे हे दर्शन त्याच्यातील संवेदनशील माणसाची साक्ष देत होते. हिरोंना आपली इमेज टिकवण्यासाठी  विशेषत: उतारवय झाल्यावर जो काही आटापिटा करावा लागतो त्याची पुसटशी जाणीवही नानाच्या चेहऱ्यावर नव्हती. त्यावेळचा नाना काही वेगळाच भासला. आपला धर्म चार भिंतीतच राहू द्यावा हे ठासून सांगणारा नाना सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारा वाटला.       
अगदी अलीकडे 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर अवतरलेला नाना पुन्हा एकदा मनातील जाणीवा समृद्ध करून गेला. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या उभयतांचे अजोड कर्तृत्व समृद्धी पोरे ह्यांनी पडद्यावर नाना आणि सोनाली ह्या कलाकार द्वयीला घेऊन साकारलं आणि एक सर्वस्वी वेगळा असा नाना सगळ्यांना पाहायला मिळाला. अत्यंत मृदू, हळवे, वात्सल्याचे आगर असलेले डॉ.प्रकाश बाबा आमटे नानाने तितक्याच सहज सुदरतेने साकारले. नानाच्या मूळच्या स्वभावाशी म्हणा किंवा नानाने आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांशी फारकत घेणारी ही भूमिका होती. एका बाईच्या प्रसूतीसमयी  अडचण उद्भवल्याने बाळाचा तोडायला लागलेला हात आणि यामुळे कमालीचे व्यथित झालेले डॉक्टर ही जाणीव नाना प्रत्यक्ष जगला. नेगल गेल्यानंतरचा नानाचा शोक सुद्धा असाच अनेकांच्या काळजाला घरे पडून गेला. इतके संयत,संतुलित आणि स्वीकारलेलं आयुष्य सुंदर करून जगणारे आणि इतरांच्या जगण्याला निमित्त ठरणारे डॉ.प्रकाश आमटे नानाच्या अभिनयातून आणखी जास्त उमगले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.            
बोटे नुसती मतदान करून शाई लावून घेण्यापुरतीच पुढे करायची नाहीत तर वेळप्रसंगी बोटांचे खंजीरही करता यायला हवेत अशी एक जाज्वल्य जाणीव उरात घेऊन फिरणारा नाना उद्या १ जानेवारी रोजी अजून एका वर्षाने मोठा  होणार आहे. त्याची ही वाटचाल आणखी अनेक सुंदर टप्पे गाठू दे आणि समाजाला प्रेरणा देत राहूदे हीच सदिच्छा!   

Monday 29 December 2014

हे नव्या वर्षा ………

हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना

शेतकऱ्याच्या विझत चाललेल्या डोळ्यांना
सुगीचे अंजन घेऊन ये
हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
बीभत्स दलदलीने वेढलेल्या निरागस कमलफुलांना
तुझ्या शाश्वत हातांनी अलगद उचलून घे 

 हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
महागाईचा शाप भस्मसात करण्यासाठी
सिद्ध कमंडलू घेऊन ये
हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
मानवतेच्या छाताडावर थैमान घालणाऱ्या आतंकवादाला
कायमची गारद करणारी
शौयाची बंदूक घेऊन ये 

हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
भोगवादाची तृष्णा नियंत्रित करणारी
वैचारिक गंगा घेऊन ये
 हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
धर्मांधतेची बीजे पेरणाऱ्या अ-मानवी वृत्तीला उध्वस्त करणारे
महाकाय वादळ घेऊन ये  

हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
संकटांना संधी म्हणून वापरणाऱ्या राजकीय वृत्तीवर
कणखरतेची  तलवार परजून ये
 हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
विवाहितेचे हुंड्यासाठी बळी घेणाऱ्यांवर
न्यायाचा हातोडा उगारून ये
 हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
भौतिक सुखांच्या मागे जीवघेणे पळणारयांना
क्षणभंगुरतेची व्याख्या पटवून दे

हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
भ्रष्टाचाराचे लोणी खाणाऱ्या बेईमानांसाठी
नैतिकतेच्या संथा घेऊन ये
हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या ढोंगी बुवा-बाबांसाठी
तुरुंगाचे दरवाजे उघडून ये
हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
आयुष्य ही शर्यत आहे ह्या गैरसमजुतीत वावरणाऱ्यांना
आत्मोन्नतीची रहस्ये उलगडून दे
 हे नव्या वर्षा
तू नक्की ये पण येताना
कैलास-मलाला चे clone
जागोजागी पेरून ये 




Wednesday 24 December 2014

मनाचा साबण ……।

'नाही निर्मळ हे मन काय करील साबण' ही ओळ लहान असताना वाचनात आली होती. त्या वेळेस मनाचा आणि साबणाचा काय संबंध एवढाच बालसुलभ प्रश्न मनात आला होता. अजूनही अनेकांच्या लेखी साबणाचा आणि शरीराचा संबंधच फक्त प्रस्थापित झालेला आहे. मन आणि साबण हा संबंध प्रस्थापित व्हायची आज गरज आहे.  कारण मलिन झालेलं शरीर स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक  brands  चे साबण उपलब्ध आहेत पण आपलं मलिन  होत चाललेलं मन स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असणारा साबण आपणच निर्माण करण्याची निकड आहे.   
रोज खराब झालेले कपडे साफ करणं, आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवणं ही कामे आपण करतच असतो. नव्हे ती आपली सवयच झालेली असते. पण आपल्यापैकी कितीजण त्याच तत्परतेने रोज आपले मन स्वच्छ ठेवतात? का कपड्यांची आणि शरीराची स्वच्छता लोकांच्या नजरेत येते म्हणून आपण ती करतो आणि मनाची येत नाही म्हणून ती करत नाही? जसा स्वच्छ शरीराचा प्रथम आपल्याला फायदा होतो तसा स्वच्छ मनाचा सुद्धा प्रथम आपल्यालाच फायदा होणार असतो.     
मन हे विचारांनी बनतं. जसे विचार तसे मन तयार होत असते. जन्मजात संस्कार आणि परिस्थिती विषयक ज्ञान यातून विचार निर्माण होत असतात. मूल मोठे होत असताना जी माहिती त्याला प्राप्त होत असते, जे अनुभव ते घेत असते त्याप्रमाणे त्याच्या बऱ्या-वाईट विचारांची जडणघडण होत असते. पण आपण जसजसे वयाने मोठे होत असतो तसतशा आपल्या ज्ञानकक्षा रुंदावत जातात. एखाद्या परिस्थितीचे आपण विश्लेषण करू शकतो. आपली आकलनशक्ती विस्तारते. योग्य विचारांची मांडणी आपण करू शकतो. विचारांना योग्य दिशा देऊ शकतो. विचारांना विवेकाची जोड देऊ शकतो. विकारी विचारांची बीजे समूळ उपटून टाकू शकतो. मग शकणे आणि होणे यातील अंतर कोणत्या कारणामुळे आपण कमी करु शकत नाही याचा सांगोपांग विचार होणे आपल्याला महत्वाचे वाटत नाही का?          
स्वत: कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळ दिसतं अशी म्हण आहे. मग अशी विचारांची कावीळ आपण आपल्या शरीरात दिवसरात्र घेऊन फिरतो त्याचे काय? देवालयात जाताना शरीराची शुचिता तेवढी आपल्या लेखी महत्वाची असते पण आपल्या मनाची शुचिता देवदर्शन घेऊन बाहेरील बाकावर बसल्यानंतर मात्र सांडून जाते. अनेक सासवांना मुक्त कंठाने त्यांच्या सुनांची निंदा करण्याचे ते हक्काचे स्थान आहे असे वाटते. लग्न समारंभाला जाताना आपण शरीर नुसते स्वच्छ नाही तर सुशोभित आणि सुगंधित करून जातो. मनाचे सुशोभीकरण आपल्या लेखी अजिबात महत्वाचे नसते. तिथे गेल्यावर 'ए त्याच्या मानाने ती काही एवढी खास नाही' किंवा याउलट विधान आपण किती सहजतेने करतो. तिच्या अंगावर घातलेल्या दागिन्यांचा हिशेब करण्यात मन गुंतून जातं. देवाणघेवाणीची उघडउघड चर्चा करण्यात आपण रंगून जातो.  एखाद्याची बरकत बघून आपल्यला मनोमन त्रास होतो. एखाद्याचा त्रास बघून मनोमन आनंद होतो. मुलीला कामात दिलेली सूट आपण सुनेला अजिबात देत नाही. मुलीला बरे नसताना तिच्या डोक्यावरून मायेने फिरवलेला हात सुनेच्या डोक्यापाशी जाताना थबकतो. जातीधर्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या अत्याचारात एक हात आपलाही असतो. विधवा स्त्रीचे मंगल प्रसंगी येणे आपल्याला खटकते. मूल नसलेल्या स्त्रीचे बारशाला हजर राहणे आपल्याला अस्वस्थ करते. विवाहितेचा जीवघेणा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या माणसांमध्ये आपलाही सहभाग असतो. एखाद्याच्या तोंडचा घास काढून आपल्या तुंबड्या भरताना आपल्या वर येऊ पाहणाऱ्या विवेकाला आपण हेतुपुरस्सर दाबलेले असते. कुणीतरी आपल्याला नकार दिला म्हणून तिच्या आयुष्याचे तीनतेरा वाजवताना आपला सारासारविवेक आपण गहाण ठेवतो.   
हजारो लिटर दुग्ध वाया घालवून परमेश्वराला अभिषेक करण्याचे पुण्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचेच असते पण तेच दूध दीन-गरीब,अनाथ मुलांना देऊन आपल्या पुण्यकर्माचे रांजण भरू देण्यास आपला नकार असतो. जाती-धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या धर्मग्रंथांच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचे विवरण  करताना आपली तोंडे थकत नाहीत पण  मानवतेचा धर्म पाळण्यास आपण बांधील नसतो. कोणत्याही देवाचे आणि धर्माचे आपल्या मनातील स्थान हे समाजमन कलुषित करून दंगे घडवून समर्थ असते. आपल्या जातीचा,विद्वत्तेचा,आर्थिक स्तराचा दंभ मानवतेची पाळेमुळे चिरडण्यास अग्रस्थानी असतो. मानवी मूल्यांचा ऱ्हास आपल्याला मान्य असतो पण आपल्या अ-मानवतावादी विचारांना तिलांजली देणे आपल्याला मंजूर नसते.       
ज्याप्रमाणे शरीरात मल साठून राहिल्यास त्याचे विष तयार होते त्याचप्रमाणे दुर्विचारांचा मल मनात साठून राहिल्यास संपूर्ण मन विषारी होते आणि समाजातील अनेक निष्पाप मनांना त्याचा दंश झाल्याशिवाय राहत नाही. मग हत्याकांडे होतात, नृशंस संहार होतात, पाशवी प्रहार होतात.    
विचार सुयोग्य दिशेने वळवले की मन भरकटत नाही. विचारांना योग्य आकार मिळाला की हातून घडणारी कृती उदात्त होते. विचारांच्या मुळांना चांगल्या संस्कारांचे खतपाणी घातले की आचार उत्तम होतो. एका निरोगी मनातून संघटीत निरोगी समाजमन तयार होण्यास मदत होते जे उन्नत जीवनाचे निदर्शक ठरू शकते व जे  अशा अनेक भरकटलेल्या आयुष्यांचे तारू विधायक दिशेला वळवू शकते.          

Thursday 18 December 2014

नाही म्हणायला शिका ……


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक  क्षण येतात जेव्हा आपण नाही म्हणायला कचरतो.  लोक काय म्हणतील, मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, घरचे काय म्हणतील,ऑफिसचे सहकारी काय म्हणतील याचा विचार आपण बहुधा जास्तच करतो आणि तेही आपल्या स्वत:च्या नाही म्हणायच्या अधिकाराला डावलून! शंभर लोकांच्या दृष्टीने जे वागणे 'नॉर्मल' या संज्ञेत बसते ते आपल्या दृष्टीने नॉर्मल असेलच असे नाही परंतु जर आपण नकार दिला तर आपले वागणे त्यांच्या दृष्टीने 'नॉर्मल' म्हणून गणले जाणार नाही याची आपल्याला मनोमन धास्ती वाटत असते.        
हल्ली 'work culture' च्या नावाखाली ओफ़िसमध्ये कामाची वेळ संपल्यानंतरसुद्धा  थांबवले जाते. बॉसची आज्ञा होते आणि केवळ नाईलाजास्तव थांबावे लागते. काय करणार? मजबुरी आहे. Reputation का सवाल है भाई. सबको रुकना पडता है. बॉस को कौन ना बोलेगा? वैसे मेरा तो प्रमोशन due है. बॉस को तो खुश करना ही पडेगा.  थांबणे आवडले नसले तरी मनात उत्तरे तयार असतात जी आपणच तयार केलेली असतात.  मग ऑफिसमध्ये थांबण्याची  सवय हळूहळू वाढायला लागते आणि मनातून ओठांवर आलेला नकार आपण बॉस काय म्हणेल या सबबीखाली गिळत राहतो.
 नव्या मित्रांच्या कळपात आपण अलगद सामावले जातो. खाणे-पिणे मौजमजा चालू असते.  सिगारेटची देवाणघेवाण सुरु होते. आपल्या हातापर्यंत ती येउन पोहोचते. इतर सगळे मस्त झुरके मारण्यात मग्न असतात. आपल्या ओठांची आणि सिगारेटची अजून ओळख झालेली नसते. साहजिकच सिगारेट हातात येताच आपण कमालीचे गोंधळून जातो. मित्र आपल्याला हसत असतात. थोडक्यात आपण कच्चे लिंबू असतो. पण आपल्याला सिगारेट ओढायची इच्छा नसते. सगळ्यांची नजर आपल्यावर रोखलेली असते. आपल्याला नाही असेच म्हणायचे असते पण काय यार एवढी पण हिम्मत नाही का तुझ्यात? अरे पोरी कशा गटवणार मग? Be smart. एक कश मार मग बघ कसा उडशील.  आता सिगारेट हा मित्रांमधील आपल्या इभ्रतीचा प्रश्न होऊन बसतो आणि त्यांच्या आग्रहाला आपला भिडस्तपणा बळी पडतो.   

आपली जीवश्च कंठश्च मैत्रीण तिच्या एका मैत्रिणीकडे आपल्याला ओढून घेऊन जाते. ती ड्रेस विकण्याचा व्यवसाय करत असते. अगं सॉलिड stock आलाय तिच्याकडे. तू अगदी वेडी होशील असे ड्रेस पीस आहेत. म्हणून सगळ्यात आधी मी तुलाच सांगितलं. मी माझ्या मैत्रिणीलाही सांगितलंय की तू तिच्याकडून भरपूर खरेदी करशील. आपण तिथे जातो. नुकतीच आपण बरीच खरेदी केलेली असते. तिच्याकडचे  ड्रेस पीस वाईट नसतात पण आपल्या खास पसंतीस उतरत नाहीत.  नाही म्हणणे जीवावर आलेले असते. आपल्या मैत्रिणीला काय वाटेल आणि तिच्या मैत्रिणीला काय वाटेल या विचारांनी आपण घेरले जातो. अखेर त्या दोघींच्या आग्रहाला बळी पडून आपण अनावश्यक आणि मनाविरुद्ध खरेदी करतो. घरी आल्यावर महिन्याचे पुरते कोलमडलेले बजेट बघता  हतबल होण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो.            
या संदर्भातील एक वास्तवात घडलेली गोष्ट मला इथे आवर्जून उधृत करावीशी वाटते जी नंतर अत्यंत गभीर स्वरूप धारण करते.  अ नावाचा मुलगा  आणि ब नावाची मुलगी लहानपणापासून खूप जवळचे मित्र असतात. तो software engineer होतो आणि ती एका बँकेत नोकरी करू लागते. काही कारणाने त्याची नोकरी सुटते. घरी भाऊबंदकीचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होते. डोक्यावर कर्ज असते. ते दोघे एकमेकांना अधूनमधून भेटत असतात. ती विवाहित असते. नवराही तिच्याच बँकेत नोकरी करत असतो. त्या दोघांच्या मैत्रीवर तिच्या नवऱ्याचा विश्वास असतो पण तिचा मित्र आपल्या बायकोला भावनिक रित्या exploit करतो आहे अशी त्याची पक्की खात्री झालेली असते. कारण आजपर्यंत तिने त्याला भरपूर आर्थिक मदत केलेली असते. पुन्हा एकदा ते दोघे भेटतात. त्याचे नेहमीसारखे रडगाणे सुरु होते. ती त्याला सांगते की सध्या तिच्याकडे त्याला देण्यासाठी फारसे पैसे नाहीत. आता त्याला तिचे पैसे नको असतात तर तिची वेगळीच मदत त्याला अपेक्षित असते. यावेळेस त्याची गरज पन्नास ते साठ लाखांची असते. तो तिला विश्वासात घेऊन एक योजना सांगतो. ती प्रथम खूप चक्रावते, आढेवेढे घेते. आपण पकडले जाऊ असे त्याला वारंवार सांगते. परंतु असे काहीही होणार नाही. माझी योजना १००% फुल प्रुफ आहे असे तो तिला सांगतो. त्यांच्या मैत्रीची शपथ देतो. तुझ्या बँकेतील क्लायंटची लिस्ट फक्त मला पाठव, बाकी मी बघून घेईन असे तो सांगतो. तिला त्याला नाही म्हणणे अवघड जाते आणि घडू नये तो अपराध तिच्या हातून घडतो. ती बँकेत लपतछपत पेन ड्राईव्ह घेऊन जाते आणि त्याला लिस्ट उपलब्ध करून देते. या बँकेत काहींचे account 'dormant' म्हणजेच inactive राहिलेले असतात किंवा त्यांच्या खात्यांत कसलेही transaction झालेले नसते. अशा लोकांच्या लिस्ट मधून एका जिवंत नसलेल्या account धारकाचे नाव तो निवडतो आणि तिच्याकरवी 'change of address' ची पुढील कृती करवून घेतो. यथावकाश त्याची खेळी यशस्वी होते. त्याला त्या account मधून पैसे withdraw करता येतात आणि तो स्वत:ची पाठ थोपटून घेतो. परंतु त्याचवेळी  'change of address' विषयी एक लेटर जुन्या पत्त्यावर जातं  जिथे दिवंगत account holder चा मुलगा राहत असतो. यानंतर हा गुन्हा उघडकीला येतो पण त्यात ब अडकली जाते. अ पैसे घेऊन फरार झालेला असतो त्याच्या जवळच्या मैत्रिणीला अशावेळी एकट सोडून. तिच्या नवऱ्याने तिला अनेकवेळा अ च्या intentions बद्दल वॉर्न केलेलं असतं पण ती तिच्या नवऱ्याच काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नसते कारण तिला तिची मैत्री जास्त प्यारी असते.  अखेर तिची रवानगी तुरुंगात होते. आता पश्चात्तापाशिवाय तिच्या हाती काहीच उरलेलं  नसतं. तिच्यावर fraud म्हणून आता कायमचा शिक्का बसतो. तिचं कौटुंबिक आणि सामाजिक जीवन पुरतं उध्वस्त होतं. तिच्या नाही न म्हणण्याची एवढी मोठी शिक्षा तिला भोगावी लागते.    मित्रमैत्रिणींच्या,ओळखीच्यांच्या,नातेवाईकांच्या व कोणाच्याही आपल्याला योग्य न वाटलेल्या गोष्टीला स्पष्टपणे नाही म्हणणं हा आपला अधिकार आहे व त्याचा वापर आपल्याला करता यायला हवा. आपल्या नकार देण्याने समोरचा जर दुखावला जाणार असेल तर तो आपल्या मैत्रीच्या व्याख्येत बसत नाही असे समजायला हरकत नाही. नकार नम्रतेनेही देत येतो त्यासाठी आक्रमक होण्याची गरज नाही पण आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची मात्र नितांत आवश्यकता असते.                                     
    

Tuesday 16 December 2014

देवाला भेटताना ……


देवाला भेटायची तुमची तयारी पक्की असेल तर मंदिरात प्रवेश करायला हरकत नाही. परंतु या मंदिरात प्रवेश करताना अहंभावाच्या, द्वेषाच्या,वैमनस्याच्या, सूडाच्या चपला मात्र बाहेर काढाव्या लागतील. फक्त परोपकार, कल्याणाची दक्षिणा स्वीकारणारा हा देव आहे. असा हा देव कोणत्याही तथाकथित सोन्या-चांदीने मढवलेल्या  देव्हाऱ्यात वसत नाही तर आनंद,शांती,वात्सल्य,दया,विवेक अशा सदगुणांचा संतत अभिषेक होत असलेल्या मनाच्या पवित्र गाभाऱ्यात वसतो.     
शरीराला जखम झाली तर डॉक्टरांकडून मलमपट्टी करायची आणि मनाला जखम झाली की मादिरातल्या त्या वत्सलमूर्ती समोर झोळी पसरायची असा सरळ साधा हिशोब असतो माणसाचा! आपण सगळे रस्त्यावर उभारलेल्या मंदिरातल्या देवाचे दर्शन अनेकदा घेतो. शेंदराचे टिळे लावतो. प्रदक्षिणा घालतो. दानपेटीत भरघोस दक्षिणा घालतो. माझी सगळी कामे पार पडू देत म्हणून त्याच्या मिनतवाऱ्या करतो. लोटांगणे घालतो. यावेळी झालेल्या चुका पदरात घे पुढल्या वेळेस दक्षिणा वाढवीन असा करार ही करतो आणि तीर्थ घेऊन बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावरचे सात्विक भाव पुसून लोकांत वावरतानाचा मुखवटा सराईतपणे धारण करतो.  
लहानपणी आपण देवदेवतांच्या अनेक कथा-कहाण्या ऐकलेल्या असतात.  त्यातूनच आपली देव नामक संकल्पना दृढ झालेली असते. मारणारा तो राक्षस आणि तारणारा तो देव हे समीकरण मनात घट्ट झालेलं असतं. पण हे देव आणि दानव मानवी प्रवृत्तीतच दडलेले असतात ह्याचा उलगडा झाला तरी आपण ते स्वीकारत नाही. कारण आपण चुकलो तर बाहेरील मंदिरातल्या देवाला नोटांची लाच देणे सोपे असते पण मनातील देवाला चांगल्या वर्तणुकीची ग्वाही देणे कठीण असते. वाहत्या पवित्र गंगेत आपली वर्षभराची पापे धुवायची आणि बाहेर येताच पुन्हा पापे करायला मोकळे व्हायचे असा हा सारा मामला असतो.     
संत-महात्म्यांना निराकार निर्गुण देव दिसत होता. त्यांनी त्यांच्या सत्कर्मात तो शोधला होता पण सर्व सामान्यांना तो दिसत नसल्याने त्यांनी सगुण रूपातील देवाची स्थापना केली. त्याला वेगवेगळी नावे,रूपे आणि ठिकाणे दिली. त्या देव देवतांच्या भोवती अनेक रंजक कहाण्या गुंफल्या गेल्या. पुढे देवस्थाने हा एक व्यापाराचा अड्डा झाला.अमका देव नवसाला पावतो म्हटल्यावर तिथे भाविकांचे लोंढे येउन धडकू लागले. बजबजपुरी माजली. देवापेक्षा सेलिब्रिटीमुळे देवस्थान पॉप्युलर होऊ लागले. देवाभोवती कोट्याधिपतींचा विळखा पडला. देवाला आणि देवस्थानाला glamour आले. देवाने आपले काम करावे यासाठी देवाला लाच देण्याचीही सोय झाली. पुजारी,बडवे,महंत यांचे महत्व एकाएकी प्रचंड वाढले. आधी त्यांची गुजराण यावर होत होती पण आता त्यांच्या इस्टेटी, खाजगी गाड्या आणि तिजोऱ्या शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे विस्तारू लागल्या.  
देव पावावा यासाठी लोक उपवास करतात, होमहवन करतात. उपवासात तमोगुण असलेले अन्न वर्ज्य केले जाते पण मनातील तमोगुणी विचारांना तिलांजली दिली जात नाही. होमहवनात सामिधांची आहुती दिली जाते पण मनातील क्रोध,द्वेष,मत्सर,मोह ,लोभ सूड,इर्षा आदी भावनांच्या सामिधांची आहुती दिली जात नाही. म्हणजेच वरील विधी हे वरकरणी केले जातात. त्यात मनाचा सहभाग नसतो.         
जेव्हा तृषार्त गाढवाच्या मुखात पाण्याची गंगा संत एकनाथ वाहती करतात तेव्हा देवत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही.  बाबा आमटे जेव्हा कुष्ठरोग्यांच्या जखमांवर सहृदयतेची मलमपट्टी करतात तिथे देवत्व प्रत्ययाला येतं. जेव्हा मदर तेरेसा, सिंधुताई सकपाळ अनाथ मुलांच्या मनावर मायेची फुंकर घालतात तेव्हा तिथे देवत्वाची प्रचीती येते. अनाथ प्राण्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून जेव्हा  डॉ.प्रकाश आमटे पुढे सरसावतात तेव्हा देव आहे याची खात्री पटते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत; अनेक हालअपेष्टा सोसून जेव्हा सीमेवरील सैनिक देशबांधवांचे  प्राणपणाने रक्षण करतात तेव्हा त्यांच्यातील देवत्व आश्वासक वाटतं.  आज कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई या दोघांनी त्यांच्यातील दिव्यत्वाची लखलखती ज्योत जगाला दाखवली आहे.  
देवत्वाची प्रचीती येण्यासाठी कोणत्याही देवालयात डोकावण्याची गरज नाही. ते चैतन्य, ते दिव्यत्व, ती वैश्विकता, ती अनुभूती आपल्या प्रत्येकाच्या मनात सदैव नांदत असते. फक्त तिचे दर्शन घेण्यासाठी तिच्यावर साचलेले अज्ञानाचे मळभ दूर करण्याची आवश्यकता असते.            

The quality of thoughts

“We are addicted to our thoughts. We cannot change anything if we cannot change our thinking.”

Do we ever pay attention to our thoughts? Do we all realize that the thoughts influence our personality? Thoughts are created through the information which we collect from our surroundings. In the morning when we open the newspaper, there is so much of information which we are not supposed to take in as the  absorption rate of our brain is at its highest. As we take in the information, our thought process starts. For example, if we read a case of an accident, certain thoughts get created in our mind. All the thoughts we churn thereafter emit negative vibrations which deplete the power of our soul. The news of destruction, violence, abuse, corruption, suicides create certain vibrations of fear, tension, anger, hatred, insecurity within us. Suddenly we start feeling low.  
Why we experience peace when we go to the temple? Why we feel low when we go for the funeral? The vibrations in the temple are positive as the thoughts created there are of peace,happiness,content,optimism etc. When we go for the funeral, we create the thoughts of uncertainty, insecurity, helplessness, pessimism etc. Researches have proved that mind affects our body. The thoughts are produced in the mind which are the result of information that we absorb. We just can't take in the information without involving our mind into it. As the information goes in, the related thoughts are produced which reduce the power of our spirit. As a result the quality of thoughts is degraded.
Suppose a person visits an astrologer & asks him about his future. If the astrologer says that after 2 years, there will be some mishap in your house. So please be alert. He comes home. Before going to an astrologer, he was totally in a different mood & now there is a vast deviation in his mood. The actual situation is going to arise after 2 years but just see what will be the quality of thoughts that he is going to create during this period? His soul power gets depleted day by day & when the situation actually comes, he is not in the condition to face it. The emotional stability one needs to face certain mishap is already lost in the meantime. 
Emotionally unstable person gets wounded very easily as he is not in a position to take charge of his mind. If I get hurt because somebody says something to me means I allow that person to take charge of my mind. It is completely my choice whether to get hurt or not. We often get angry, upset for small things. Sometimes the situation is the cause of our anger or worry & sometimes people are the cause of our discomfort. As we are emotionally unstable from inside, we give the situation or the people the power to rule on us. Ultimately the situation or the people overpower us & the negative vibrations start ruling our mind. The soul battery gets very easily discharged.
It is written in Vedas & Upanishadas "as the food, so are the thoughts". This perspective can't be neglected.All animals are instinctive. The animal knows that it is going to be slaughtered. The vibrations the animal radiates at this time are of fear,anger,hatred. We not only consume the flesh but we consume these vibrations also which are harmful for our mental health.When a human being dies natural death, we all feel so much pain,sorrow for that person.But when the animal is slaughtered, we consume that dead thing with great joy & happiness. There is a lot of discrepancy in our thinking which needs to be observed. .    .   .
Checking of thoughts on the daily basis is a must thing that we all need to do. The situation & the people are not in our control. We can't anticipate anybody's behaviour. We can just focus on the quality of thoughts that we are going to produce & its consequences on our body. If a persons falls, the one who lifts him up should be capable enough to hold him firmly. So if we are emotionally internally stable then only we can tackle the adverse situation or critical people with great ease. Our quality of thoughts plays a significant role in dealing with the circumstances. We all should be aware of it & try to produce only those thoughts which would prove conducive for our emotional health..     
     

Monday 15 December 2014

What is spiritual awakening?

Permanence, perseverance and persistence in spite of all obstacles, discouragements, and impossibilities: It is this, that in all things distinguishes the strong soul from the weak.

Spiritual awakening means exploring the true qualities of our own spirit or soul & applying those qualities in our journey of life to empower ourselves. It has no connection with the religious customs that are done outwardly. Every soul has the qualities of purity, peace,happiness or bliss & power. But as we start walking on this journey, these qualities take a backseat or these qualities are replaced by the other acquired qualities like anger, jealousy, hatred,resentment,fear,anxiety & soft skills( speaking good & thinking otherwise) etc. which are not conducive for our spiritual growth. 
We say that life is a competition & so we try to give our 100% to remain at the top. First of all we should understand that life is not a competition. It is the journey of each soul. We all carry different 'sanskars' with us which are a result of our past karmic accounts. If the sanskars are so different, how can we compete with the others?  
Even though we possess all materialistic things still we say that we are not happy from inside. One feels that if he buys a new car, he will be happy. The other feels that if he purchases a new property then he will be happy. Parents think that if their child scores so & so marks then they will be happy. One feels that if his boss approves his promotion then he will be happy. So in all these examples our happiness is dependent upon the outer things. If a person buys a new car & by chance it gets damaged then his happiness gets replaced by unhappiness. If the child scores less marks in the exam then it becomes the cause of parent's unhappiness.    

In the journey of life almost everybody has to face some unpleasant situations. For instance if a person is going to office & his car gets stuck in a traffic jam then immidiately he feels helpless & therefore starts cursing the situation. Here he visualizes a picture if he reaches late in the office, what will the office collegues think about him? How his boss will react? What will happen to his reputation? This thought process starts creating a lot of wrong or negative energy in him & his soul power gets depleted.We can never ever control or change the situation arising outside but we can definitely try to control the thoughts which are created by us in the present situation.   
Spirituality helps us to learn to become stable in any situation. People undergo heavy finantial crisis, emotional crisis, health crisis. As their state of mind is very low, they try to seek help from others. The other person suggests some remedies to make the situation favourable. People do all the outer things except changing their own perspective. Spirituality makes us aware of the inner turmoil which makes our life a miserable journey. It helps to create the right thoughts in our mind to face any situation with mental stability. 
Spirituality focuses on preserving the soul power which can be used in the best manner to stand tall in the situation. 
 Only treating the symptoms will not prove beneficial as the root cause needs to be observed carefully. The whole thought process needs to be replaced with right thoughts so that one can deal with the situation with the right perspective. 
Similarly the behaviour of the people coming in our contact is not in our control. There are differnces of opinion even at the domestic fronts also. If somebody doesn't behave according to our norms, we get upset & blame that person very easily. We never try to understand the other person's perspective. We say, because of u I am not happy. Because of u I get irritated. Because of u I get disturbed. So in this way the other person becomes the cause for our unhappiness. Spirituality teaches you to become aware of the fact that nobody in the world can cause unhappiness to you unless you choose the state of unhappiness for you. 

Suppose there are two dishes. One is spicy & full of negative thoughts & the other is sweet & full of positive thoughts. Obviously the ingredients for each dish will differ. We can't prepare the sweet dish using the ingredients that can be used for preparing spicy dish. Right chioce of thoughts in the right proportion will enhance the flavour of sweet dish. But it is up to us to choose between a spicy dish or a sweet dish. Spirituality will teach us to make the right choice of ingredients so that we can preserve the flavour of life even though some ingredients get mixed with each other.               

Saturday 13 December 2014

सुखाची परिभाषा





“Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.”
Mahatma Gandhi 


Happiness is not something ready made. It comes from your own actions.”
Dalai Lama XIV


सुखाची परिभाषा ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. दोन वेळा अन्नाची भ्रांत असलेल्यास एक वडापावही सुखप्राप्ती करून देऊ शकतो तर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असलेल्या भागात अर्धा बादली पाणी आंघोळीसाठी मिळणे ही सुखाची परमावधी होऊ शकते. इथे सुख हे साधनांशी म्हणजेच वडापाव किंवा पाणी ह्या गोष्टींशी निगडीत आहे. परंतु भौतिक सुखाची सर्व साधने उपलब्ध असूनही माणसे सुखप्राप्तीच्या शोधात फिरताना दिसतात. अनेक वैध वा अवैध मार्गांनी आपली सुखाची झोळी कशी भरेल या शोधार्थ अनेकजण भटकत असतात. वास्तविक पाहता सुख,आनंद,शांती ह्या खऱ्या तर माणसाच्या सहज(natural ) प्रवृत्ती आहेत. परंतु शिक्षण,हुद्दा, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा,स्थावर जंगम इस्टेट,गाड्या या संपादित (acquired ) गोष्टींच्या मांदियाळीत त्या कुठेतरी
वळचणीला पडल्या आहेत.       

घरीदारी ऐश्वर्यलोलुप जीवन जगणारा माणूस जेव्हा ती आत रिक्त राहिलेली सुखाची-समाधानाची-आनंदाची पोकळी भरण्यासाठी बाहेर उपाय शोधत राहतो तेव्हा सुख हे कोणत्याही बाह्य किंवा जड साधनांशी निगडीत नाही हे प्रत्ययास येते.  
आईवडील मुलाला म्हणतात तू येत्या परीक्षेत इतके मार्क मिळव म्हणजे आम्हाला आनंद होईल. परीक्षा देणाऱ्या मुलाला वाटते की उत्तम मार्क मिळवणे का एकच आपल्या आईवडिलांना सुखी करण्याचा मार्ग आहे. मग मुलाला आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतील की नाही या विवंचनेत आईवडील आपली दिनचर्या व्यतीत करतात आणि आपण उत्तम अभ्यास केला तरी आईवडिलांच्या अपेक्षा पुऱ्या करून त्यांना आनंद देऊ शकू का या तणावात मुलाचे दिवस जातात. वाशी येथे राहणारी जिया एक अतिशय अभ्यासू,प्रामाणिक मुलगी. वर्गात बहुधा दुसरी वा तिसरी येणारी. चित्रकलेत कमालीचा हात ! दहाव्वीचे वर्ष त्यामुळे घरीदारी फक्त अभ्यासाच्याच परवचा आणि अभ्यासाचेच श्लोक. धनुर्धर अर्जुनापेक्षाही लक्ष अभ्यासावर जास्तच एकाग्र करावे यासाठी पालकांचा व शिक्षकांचा प्रचंड आटापिटा. जिया शाळा,कोचिंग क्लास आणि चित्रकला या सर्वांचा समतोल नीट सांभाळत असते. तिला प्रिलिम्स मध्ये ८९.७० % मिळतात. हातात मार्कशीट येताक्षणी ती विलक्षण कासावीस होते. आईवडिलांचे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळतात. ती त्याच मानसिक अवस्थेत घरी येते. आतल्या खोलीत जाऊन आपल्या छंदातून ताण हलका करू पाहते. वडील घरी आल्यावर आधी कमी मार्क मिळाल्यामुळे रणकंदन होते. पण मग फायनलला ८९ च्या विरुध्द म्हणजे ९८ मिळवीन असे मला प्रॉमिस कर असे वडील आज्ञार्थी प्रेमळपणे सांगतात. जिया कसेबसे प्रॉमिस करते. ती या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा पुढचा शैक्षणिक प्रवास तिच्या आईवडिलांनी अगोदरच आखलेला असतो. शिक्षणाचा तो टप्पा गाठल्यानंतरच  ते सुखाने श्वास घेऊ शकणार असतात. शाळेतील,क्लासमधील शिक्षकांकडून  'Exam is like a war. Either you win or you loose. So fight.' असा मोलाचा सल्ला दिला जातो. जियाला तर आपण प्रत्येक क्षणी रणांगणावर आहोत असे वाटू लागते. ती हतबल होते, मनोमन निराश होते. आपण आईवडिलांच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही अशी तिची खात्री होते आणि ती एक निर्णय घेते. मित्राकडे पार्टीला गेलेले आईवडील घरी परततात तेव्हा त्यांना पलंगावर पडलेले जियाचे निष्प्राण शरीर दिसते आणि काही महिन्यांपूर्वी घरात नांदणारे सुख कापरासारखे केव्हाच उडून गेलेले असते.                             
अ नामक इसम नवी कोरी करकरीत मारुती गाडी खरेदी करतो. मनासारखा रंग, आतील सोयी, मऊ गुबगुबीत उशा त्याला मनोमन सुखावतात. तो त्या गाडीतून  फिरायला बाहेर पडतो. सुखाची, आनंदाची चव चाखत प्रवास सुरु असतो. एके ठिकाणी सिग्नलला गाडी थांबते. सहज अ चे लक्ष शेजारी जाते. त्याच्या गाडीच्या शेजारी अलिशान, जास्त गतिमान, तरलपणे रस्ता कापणारी, अद्ययावत, जास्त capacity असलेली मर्सिडीज उभी असते. त्या मर्सिडीजचा चालक अ च्या गाडीकडे काहीशा तुच्छतेने पाहतो. आता अ ची सुखाची संकल्पना पूर्णपणे जमीनदोस्त होते. त्याला आपली गाडी मर्सिडीज पुढे अगदी क्षुल्लक वाटू लागते. काही क्षणांपूर्वीचा  त्याचा हसरा चेहरा आता पूर्णपणे म्लान होतो. त्याच्या सुखाच्या व्याख्येलाच छेद जातो.  
ऋतु आहुजा गिफ्ट म्हणून मिळालेल्या साडीकडे पुन्हा पुन्हा पाहते. या साडीचा रंग, पोत तिला खूप आवडलेला असतो. तिच्या अंदाजाने ती साडी कमीत कमी तीन-चार हजाराची असणार असते. इतकी सुंदर साडी नेसून परवाच्या नीलम अरोराच्या पार्टीला आपल्याला जाता येईल म्हणून ती मनोमन खूष होते.  तिला सुखाच्या हिंदोळ्यावर असल्यासारखे वाटते. एवढ्यात तिच्याकडे तिची एक मैत्रीण येते.  ऋतु तिला अगदी कौतुकाने ती साडी दाखवते. ती साडी बघताच मैत्रीण उद्गारते, 'अगं अशी साडी परवाच मी एका प्रदर्शनात पहिली. पाचशे रुपयांना मिळत होती.'  ऋतु चा सगळा आनंद मावळतो. सुख विरघळून जातं. कारण तिची सुखाची कल्पना त्या साडीच्या किमतीशी निगडीत असते.    
सुखाचा विचार हा जरी साधनांमुळे निर्माण झाला असला तरी कोणतीही जड वा निर्जीव साधने सुख निर्माण करू शकत नाहीत. नाहीतर या साधनांनी सर्वांना सारखंच सुख दिलं असतं. एखाद्याला आवडलेली वस्तू दुसऱ्याला आवडतेच असे नाही पण ती दुसऱ्याला आवडली नाही म्हणून सुख देण्याच्या दृष्टीने तिचे मूल्य कमी झाले असे समजणे ही वैचारिक अपरिपक्वता आहे.  
इतरांच्या यशापयशावर आपले सुख वा आपला आनंद अवलंबून ठेवणे हे असमंजस वृत्तीचे निदर्शक आहे. सुख वा आनंद हा ज्याचा त्याचा वैचारिक गाभा आहे. सुख अथवा दु:ख हे विचारांतूनच निर्माण होत असतं. भोवती वावरत असलेली माणसे त्यांच्याकडे असलेली माहिती आपल्याकडे प्रवाहित करतात आणि या मिळालेल्या अनुकूल वा प्रतिकूल माहितीच्या आधारे आपले विचार जन्म घेतात. इतरांच्या सुखाचे संदर्भ हे आपल्या सुखाच्या संदर्भापेक्षा वेगळे आहेत परंतु आपले सुखाचे संदर्भ आपल्यासाठी अमुल्य आहेत हे ज्याला वेळीच कळते तो सर्वार्थाने सुखी होतो.                          


Thursday 11 December 2014

आपले दैव (destiny ) कुणाच्या हातात?





“It is not in the stars to hold our destiny but in ourselves.”
William Shakespeare 


"The only person you are destined to become is the person you decide to be.”
Ralph Waldo Emerson


आपल्याकडे फार वर्षांपासून दोन समज समांतर चालत आलेले आहेत. एक म्हणजे 'या जगात जे काही घडते ते केवळ त्या विधात्याच्या मर्जीनुसार', आणि दुसरा समज असे सांगतो की ' जसे आपण पेरतो तसे उगवते,
( as you sow, so shall you reap) आपण हे दोन्ही समज आजमितीलाही  उराशी बाळगून आहोत. पहिल्या समजानुसार आपल्या आयुष्यात जे काही बरे अथवा वाईट घडून गेले आहे,घडते आहे किंवा घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी त्या जगनियंत्याची! दुसऱ्या समजानुसार आपल्या आयुष्यात जे काही बरे अथवा वाईट घडून गेले आहे,घडते आहे किंवा घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आपली. कारण जे कर्म आपण केले आहे तेच आज आपल्या दैवाच्या रुपात समोर येउन ठाकले आहे. यावर थोडे चितन केले तर असा निष्कर्ष सहज काढता येईल की हे दोन्ही समज किंवा दोन्ही विचारप्रवाह एकत्र work out होऊ शकत नाहीत. एकतर पहिला समज तरी खरा असू शकतो किंवा दुसरा. बहुतांश लोकांना पहिला समज जास्त सोयीस्कर वाटू शकतो कारण काहीही घडल्यास 'त्याची' जबाबदारी म्हणून हात झटकता येऊ शकतात. दुसरा समज जास्त तर्कशुध्द वाटत असेल तर त्यानुसार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या बऱ्या -वाईट गोष्टींची जबाबदारी वा श्रेय फक्त आपलेच असू शकते.     
आपण पेरलेले बीज काय दर्जाचे (quality ) आहे यावर त्याला येणारे फळ अवलंबून असते. साधा तांदूळ पेरला तर बासमती उगवू शकत नाही. इथे बीज पेरणे म्हणजे विचारांचे बीज पेरणे. भिंतीवर फेकलेला बॉल जेव्हा rebound होऊन परत येतो तेव्हा त्याचे फूल न होता तो त्याच स्वरुपात येतो. इथे बॉल हा ऋण म्हणजेच निगेटिव्ह विचारांचे द्योतक असेल तर त्याच दर्जाचे,प्रतीचे विचार परावर्तीत होऊन आपल्याकडे येतात. शब्दांपेक्षा विचारांमध्ये जास्त शक्ती असते. बरेच वेळा एखाद्या व्यक्तीसमोर शब्द चांगले बोलले जातात परंतु मनातील विचार मात्र त्या शब्दांशी विसंगत असू शकतात. म्हणजे वेष्टन चांगलं पण आतील वस्तू हीन दर्जाची असा प्रकार असू शकतो. शब्दांना चांदीचा वर्ख कितीही चढवला तरी आपल्या मनातील विचार energy च्या स्वरुपात त्या माणसापर्यंत पोहोचतातच. आपल्या वरवरच्या वाक्चातुर्यामुळे आपण या विचारांच्या energy चा दर्जा बदलू शकत नाही. परिणामी त्याच विचारांनी भारलेली उर्जा (energy ) आपल्याकडे परतून येते आणि यालाच आपण नशीब असे संबोधतो.      
 वैचारिक बैठक >विचार >शब्द >कृती >साचा >व्यक्तिमत्व असा हा एकंदर प्रवास असतो. अमुक एक विचार करणं, विशिष्ट शब्द उच्चारणं,त्याप्रमाणे कृती अथवा आचरण करणं हा एखाद्याच्या सवयीचा भाग होतो आणि मग यातूनच एक व्यक्तिमत्व आकाराला येतं. परंतु आपले व्यक्तिमत्व ही आपली निवड (choice ) असते. कारण यासाठी लागणारे raw material म्हणजेच वैचारिक बैठक (belief system ), विचार (thoughts ), शब्द (words ), कृती (action ) आणि साचा (pattern ) आपलेच असते. ज्या प्रकारचे विचार त्या प्रकारची उर्जा सभोवताली प्रक्षेपित होत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या -वाईट घटनांचे निर्माते आपणच असतो.  हे एकदा मनोमन स्वीकारल्या नंतर आपल्या सत्कृत्यांची अथवा दुष्कृत्यांची जबाबदारी त्या परमेश्वराची साहजिकच राहत नाही.                 
आज भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा यासाठी अनेकजण हट्ट धरून बसले आहेत. कोर्टातही गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली जाते. गीतेच्या तत्वज्ञानाचा उहापोह आजवर अनेक प्रकांड पंडितांनी केला आहे. पण यातील 'जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला त्याला पुनश्च जन्म निश्चित
आहे ' या भगवान श्रीकृष्णांच्या तत्वज्ञानावर खरोखर किती जणांचा विश्वास आहे?  या जगात प्रत्येकाला फक्त एकदाच जन्म मिळतो असे गृहीत धरले तर मग प्रत्येकाचे आयुष्य इतके वेगळे कसे? एकाच घरातील भावंडाचे नशीब एवढे वेगळे कसे ? कुणी महालात तर कुणी झोपडीत, कुणी राव तर कुणी रंक,कुणी आस्तिक तर कुणी नास्तिक, कुणी संत तर कुणी राक्षसी प्रवृत्तीचे, कुणी सुखी तर कुणी दु:खी, कुणी शरीराने धडधाकट तर कुणी अपंग अशा असंख्य तफावती कशा? परमेश्वराला जर दयेचा,करुणेचा सागर मानले तर तो या तफावती कशा निर्माण करू शकेल? आपली सर्व लेकरे सुखी व आबाद रहावीत असेच त्याला वाटेल ना ? कर्मयोगाची महती सांगणारे भगवान श्रीकृष्ण, रामकृष्ण, विवेकानंद हे चुकीचे आहेत का?            

पण स्वत:वर जबाबदारी घेतली तर आपले दैव बदलण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच येउन पडेल या भीतीने म्हणा आज कुठे काही खुट्ट झाले की माणसे वर बोट दाखवून मोकळी होतात. आज माणसे ही हृदय, मन असलेली संवेदनाशील व्यक्ती न राहता केवळ पैसे कमावण्याचे साधन होऊन राहिली आहेत. एवढे श्रम करून आणि वारेमाप पैसे कमावूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कधी सुखशांती विलसताना दिसत नाही. जो तो फक्त अधिकाधिक पैसे आणि त्या पैशांनी मिळणारी भौतिक सुखे कमावण्याच्या नादात मग्न असतो. पैशाने अन्न मिळू शकेल पण पोटाला भूक असेल तर त्याचा उपयोग. पैशाने उत्तम प्रतीची मखमलीची बिछायत मिळेल पण त्यावर निद्रा आली तर तरच त्याचे महत्व. सर्व भौतिक वस्तू ही सुखाची साधने आहेत  पण ते अंतिम सुख नव्हे. आणि म्हणूनच सगळे राजवैभव उपभोगूनही मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या अतृप्त राहिलेला राजकुमार सिद्धार्थ सर्वसंगपरित्याग करून चिरंतन शांतीच्या शोधात निघाला आणि त्यातूनच गौतम बुद्धांचा जन्म झाला.     
आज आजूबाजूची परिस्थिती जी बाजारू,हिंसक,विध्वंसक,विकृत,आपमतलबी होताना दिसते आहे ती अनेक सामुहिक विचारांचा परिपाक आहे. परिस्थिती बदलायची असेल तर आज आपले विचार बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुखाचे आभास निर्माण करणाऱ्या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा खरे सुख कशात आहे हे जाणून घेतले तर आयुष्य सुसह्य होण्याला मदत होईल. मुख्य म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या गोष्टीवर आपला इलाज नसला तरी आज चांगले विचार व त्यानुसार आचार केला तर आपल्या सगळ्यांचेच भविष्य उज्ज्वल असेल हे सांगायला कोणत्याही तथाकथित ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही.       

Wednesday 10 December 2014

तुलनेचा विध्वंसक काटा

मार्क ट्वेनचा तुलनेसंदर्भातील विचार पहा, ' “Comparison is the death of joy.”  
Shenon Alder यांचे या संदर्भातील सूचक वाक्य पहा, “The battle you are going through is not fueled by the words or actions of others; it is fueled by the mind that gives it importance.”  

प्रत्यक्षात मात्र या तुलनेची प्रचीती आपणा सर्वांना जळीस्थळी येत असते. या संदर्भातील एक सत्य घटना मी इथे नमूद करू इच्छिते जी अनेकांसाठी 'eye opener' ठरू शकेल.     
दिल्लीत अ आणि ब ही दोन कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होती. अ घरातील मुलीशी ब घरातील मुलाची सतत तुलना केली जायची. आणि ही तुलना करणारी दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द त्या मुलाची आई होती. तिने बघ किती छान मार्क मिळवले नाहीतर तू. सगळेजण बघ तिचे किती कौतुक करताहेत, आपल्या गल्लीतही ती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाली आहे. मला तुझे कौतुक करायची आणि ऐकायची अशी संधी कधी मिळणार आहे कोणास ठाऊक? त्या मुलाच्या कानावर ही मुक्ताफळे पडणे हे नित्याचेच झाले होते. प्रथम प्रथम तो आईच्या या उपहासपूर्ण बोलण्याने आतल्या आत निराश व्हायचा, खच्ची व्हायचा, न्यूनगंडाने त्याला पुरेपूर घेरले होते. पण मग जसजसे दिवस,महिने आणि वर्षे उलटली तेव्हा या न्यूनगंडाची जागा संताप, द्वेष आणि कमालीचा तिरस्कार या भावनांनी घेतली. ती मुलगी घरी आली की तो तिच्याशी अवाक्षर ही न बोलता निघून जायचा. रस्त्यात ती दिसली की फूटपाथ बदलायचा. परंतु त्याच्या या वृत्तीचा अर्थ मात्र त्या मुलीला कधी उमगलाच नाही. कारण त्यांच्या घरातील या प्रकारच्या तणावाबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. त्याचा हा विक्षिप्तपणा तिच्या लक्षात आल्यावरही तिने त्याला काहीही विचारले नाही व त्याच्या वागण्याकडे कानाडोळा केला. यथावकाश तिचे शिक्षण पूर्ण होऊन तिला मुंबईला नोकरी मिळाली. appointment letter हातात पडताच तिच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शेजारी सुद्धा ही बातमी गेलीच. झाले. त्या मुलाच्या आईने त्या मुलाला टोमणे मारले, त्याचा उद्धार केला आणि तिच्या तुलनेत तो कसा क्षुद्र आहे ते जाणवून दिले. तो मुलगा आतून संतापाने,द्वेषाने,तिरस्काराने खदखदत होता. आता त्याला त्याच्या भावनांना वाट मोकळी  करून द्यायची होती.  काहीएक योजना त्याच्या मनात आकार घेऊ लागली. ती मुलगी नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईला निघाली. सोबत तिचे वडील होते. आपल्या मनात नव्या आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवत ती मुलगी दादर स्टेशनवर उतरली आणि तिच्या खांद्यावर कुणीतरी थोपटले म्हणून तिने मागे वळून पहिले आणि डोळ्यांचे पाते लावते न लावते तोच तिच्या चेहऱ्यावर कुणीतरी acid टाकले आणि तिच्या चेहऱ्याबरोबर तिची स्वप्नेही जाळून खाक झाली. तिच्या वडिलांच्या दृष्टीने हा सगळाच प्रकार अनाकलनीय असाच होता. तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले परंतु जवळजवळ आठवड्या भरातच  तिने या जगाचा निरोप घेतला. तपासाअंती  कळून आले की त्या शेजारच्या मुलानेच सूड भावनेपोटी हे कृत्य केले होते. त्याने पोलिसांना सांगितले कि त्या मुलीशी माझे काहीच वैमनस्य नव्हते पण आईच्या सततच्या तुलनेला कंटाळून मनाच्या प्रचंड वाईट अवस्थेत मी हे केले. त्याच्या आईला हे ऐकून जबर मानसिक धक्का बसला. दोन्ही कुटुंबातील एकी या एका घटनेने नष्ट तर झालीच शिवाय मानसिक दृष्ट्या दोन्ही कुटुंबेही उध्वस्त झाली.      
जन्माला आलेले प्रत्येक मुल हे जसे काही शारीरिक संस्कार घेऊन जन्माला येत असते तसे काही मानसिक,भावनिक आणि कार्मिक संस्कार घेऊन जन्माला येत असते. त्यामुळेच प्रत्येकजण हा दुसऱ्या पेक्षा वेगळा असतो परंतु कमी किंवा जास्त नसतो. एका मुलामध्ये असलेली एखादी विशेषता दुसऱ्या मुलात असतेच असे नाही पण त्याच्यात काही खास गुण असू शकतो जो इतरांत नसतो. पण घरीदारी लहानपणापासूनच आपल्याला एकाच फूटपट्टीने मापले जाते. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेव, त्याचे काहीतरी गुण घे असे सांगितले जाते म्हणजे थोडक्यात इतरांचे अनुकरण कर पण स्वत:तील विशेषत्वाला  किंवा सत्वाला मारून टाक असेच अप्रत्यक्षरित्या सांगितले जाते.  हे कितपत योग्य आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.       
या तुलनेपायी अनेक मुले आज शालेय जीवनातील निर्भेळ आनंदाला वंचित होतात. मुलांमधील सुप्त गुणांचा योग्य विकास  होत नाही परिणामी अशी मुले मनोमन खुरटतात तरी किंवा बंडखोर अथवा विकृत होतात. त्यांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीवर तुलनेची गदा येते आणि फुले उमलण्याआधीच कोमेजून जातात.  अनेक पालकांना वाटते की तुलना केली म्हणजे तरी आपले  पाल्य सुधारेल पण त्यांना हे कळत नाही की अशी सततची तुलना करून आपण आपल्या मुलाला भावनिक दृष्ट्या कमकुवत करतो आहोत. त्याला निराशेच्या गर्तेत ढकलतो आहोत. त्याच्या मनातून येणारी उजेडाची तिरीप आपण या सततच्या तुलनेने कायमची विझवतो आहोत.     
 प्रत्येक मुलाला जन्मत:च एक सुंदर देणं लाभलेलं असतं ते म्हणजे विचारांचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच. त्याला जर पालकांनी प्रोत्साहनाच खतपाणी घातलं व त्या विचारांचा सन्मान केला तरच रोप सर्वार्थाने बहरेल नाहीतर सततच्या तुलनेच्या घणाघाती फावड्याने अकालीच कुस्करून जाईल.                            

Tuesday 9 December 2014

मुले की पैसे निर्माण करणाऱ्या टाकसाळी?

आपण शिक्षण नक्की कशासाठी घेतो याचा बहुधा आज बहुतांश लोकांना विसर पडत चालला आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. स्वत: शिक्षित होऊन स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला त्याचा उपयोग करून देता येत असेल तरच त्या शिकण्याला काही अर्थ आहे. केवळ उद्याच्या अवास्तव  ' pay package' कडे लक्ष ठेऊन त्या दिशेने व त्या उद्देशाने शिकणारा विद्यार्थी आज शाळा घडवत आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.    
पहिल्या पाचात येणारे विद्यार्थी हे शाळेचे 'brand ambassador' समजले जातात. या विद्यार्थ्यांमुळे शाळेचे नाव केवळ उज्ज्वल होणार नसते तर यामुळे अनेक grants, donations मिळण्याचा मार्ग सुकर होणार असतो. यांच्या शैक्षणिक प्रगतीवर शाळा आपल्या उत्कर्षाचे इमले बांधत असतात. अशा रेस मध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळांचा शैक्षणिक जुगार चालू असतो. हे आजच्या बऱ्याच शाळांचे चित्र आहे.
बरं शाळांना किती दोष देणार?  काल आस्था अगरवाल हिचा channels वर interview काय दाखवला, IIT चे फोन अव्याहत खणाणू लागले. तिला जर facebook ने २.५ कोटी चे  pay package ऑफर केले आहे तर भविष्यात माझ्या मुलाला किंवा मुलीलाही ते मिळू शकते या विचारांनी पालकांचा एवढा ताबा घेतला की आता सहावी-सातवीतच त्यांना IIT चे कोचिंग मिळू शकेल काय याचा विचार करण्यात आता त्यांचे अनेक दिवस अन रात्री जातील.    

मुलांच्या पाठीवरील ओझे आणि मनावरील स्पर्धात्मक अभ्यासाचा ताण कमी करावा असे आज अनेक डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञ सांगत आहेत. कोवळ्या वयात लादलेल्या अपेक्षांची पूर्तता करताना निर्माण होणारा अंतर्गत तणाव अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आहे. हे माहित असूनही परिस्थिती आणि अपरिहार्यता या सबबी पुढे करून शाळा आणि पालक आपापल्या महत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर अविरत लादत असतात.    
आता थोडा तर्कशुध्द रीतीने काही गोष्टींचा विचार करायला हवा. IIT तज्ञांच्या मते, एकूण सीट्स १०००० आणि पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ ते ६. ५ लाख. म्हणजे IIT मध्ये प्रवेश मिळेल याची संभवनीयता अर्थात probability किती? त्यात आस्थाने ज्या शाखेचे शिक्षण घेतल्याने तिला हे यश प्राप्त झाले त्या शाखेच्या किती सीट्स? शिवाय तिला मिळालेले pay package हे तसे दुर्मिळ कोटीतले त्यामुळे ही शक्यता सुद्धा इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत तशी धूसरच नव्हे काय? तरीही आपापल्या पाल्याला नेमके त्याच शाखेचे IIT मधील शिक्षण मिळावे यासाठी पालकांची ही तडफड पहिली की वाटते खरेच हि यांनी जन्माला घातलेली मुले आहेत की पैसे generate करण्याच्या संस्था आहेत?      
आज इंजिनियरिंग चे शिक्षण घेऊन विद्यार्थी फायनान्स ला जातात हा त्या घेतलेल्या शिक्षणाचा व्यय नाही का? आज 'research &development' ला न जाण्याचे नक्की कारण काय? या बाबतच्या शैक्षणिक सुधारणा करण्याबाबत सरकार पुरेसे गंभीर आहे का? मुळात अशा प्रकारच्या फक्त पैसा हे अंतिम लक्ष्य ठेवून त्यानुसार केवळ त्याच प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ करणाऱ्या शिक्षण संस्था तितक्याच दोषी नाहीत का? 
या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता आपली आपणच शोधायची आहेत.  मुलांचा फक्त शैक्षणिक बुद्ध्यांक वाढवून त्यांचा भावनिक बुद्ध्यांक संपुष्टात आणणारे हे शिक्षण समाजमान्य कसे होऊ शकते? आपण उद्याचे उत्तम नागरिक तयार करतो आहोत की operating machines हा विचार करण्याची वेळ येउन ठेपली आहे इतके हे वास्तव भयानक आहे. प्रेम, समानूभूती, दया, आदर, अनुकंपा,विवेक, संयम, शांती अशा काही मानवी मूल्यांच्या खुणा जतन करणारे शिक्षण यापुढे मिळणार आहे की धाप लागेपर्यंत जीवघेणे धावा आणि जमेल तितकी माया ओरबाडा असा संदेश घरीदारी दिला जाणार आहे? मुलांच्या वैयक्तिक आवडीनिवडीला तिलांजली दिली जाऊन यावर काळाची गरज या सबबीखाली फक्त अमाप पैसा असलेले व्यवसायच त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे?   
शिक्षण हवे ते माणसाला दुसऱ्या माणसाशी वैचारिक दृष्ट्या जोडण्यासाठी. पण आज बाहेरील प्रचंड ताण निर्माण करणाऱ्या स्पर्धांमुळे माणूस माणसापासून तुटत चाललाय. इर्षा, द्वेष,असूया, हाव, आर्थिक ताकद, अहंकार असे सगळे अवगुण जिथेतिथे तणासारखे माजले आहेत, फोफावत आहेत. या सगळ्यात चिरडले जाते आहे, कोमेजले जाते आहे ते बालमन. 'बाल्य'  हा शब्दच कालबाह्य होत चाललाय. तू खूप मोठा हो म्हणजे खूप पैसे कमव असा त्यामागील अर्थ आहे.              
जन्म आणि मृत्यू या टोकांमधील प्रवास सहज,सुंदर व निखळ आनंदाचा व्हावा यासाठी जीवन असतं. सुदृढ मन आणि सुदृढ शरीर घेऊन आपण मार्गक्रमणा केली तर आपोआप हा प्रवास अधिक छान, रमणीय होतो. आपल्या आवडीनुसार आपण या जीवनप्रवासात रंग भरू शकतो. त्याला योग्य तो आकार देऊ शकतो. आयुष्य एकदाच मिळते व ते अनमोल असते असे वाचले आणि अनेकदा ऐकलेले सुद्धा असते मग अशा आयुष्यात रंग भरून ते सुरम्य करण्यासाठी कुंचला सुद्धा आपल्याच हातात हवा ना? आपल्याला मिळालेले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे की त्याची किल्ली इतरांच्या हातात द्यावी हा निर्णय ज्याने त्याने घ्यावा.          
आपली मुले ही आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची साधने नसून, त्या स्वत: पूर्ण विचार करून निर्णय घेणाऱ्या सक्षम व्यक्ती आहेत हे आज पालकांनी मनोमन समजण्याची गरज आहे. त्याचबरोबर पैसा हा जरी अपरिहार्य असला तरी आनंदाचा आणि सुखाचा तो एकमेव मापदंड नाही हेही लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.       

Sunday 7 December 2014

विचार बदला नशीब बदलेल ………

काही वर्षांपूर्वी एका ट्रकच्या मागील बाजूला मी हा सुविचार वाचला होता. त्या ट्रक मालकाला हा सु-विचार कसा सुचला असेल याचा त्यानंतर मी विचार करत होते. आपण अनेकजण असे विचार येताजाता वाचत असतो खरे परंतु तो विचार आत्मसात करून, त्यावर मनन करून तो आचरणात आणणारे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात.  
आज प्रत्येकानेच स्वत:चे विचार पुनश्च तपासून पाहण्याची गरज आहे. अशा विचारांचा स्त्रोत अथवा मूळ बदलण्याची गरज आहे. कारण प्रत्यक्ष चोरी करण्या आधी ती चोरी विचारांत झालेली असते. समाजविघातक कृत्ये घडण्याआधी ती करणाऱ्यांच्या मनात घडलेली असतात. मनात विचार येणं, ते बोलून दाखवणं आणि त्याप्रमाणे योजनाबद्ध कृती घडणं हे आज आपण सर्रास बाहेर अनुभवत असतो. जळीस्थळी  याचा प्रत्यय आपल्यापैकी अनेकांना आलेला असतो. सगळी माणसे अशी गैर कृत्ये करत नसली तरी आपल्या विचारांना बरेच वेळा योग्य दिशा देऊ शकत नाहीत.         
अनेक वेळा माणसे इतरांचे विचार बदलण्याचा खटाटोप करतात. त्याने असे वागले पाहिजे, तिने असे वागता कामा नये असे मतप्रदर्शन वारंवार करतात. परंतु हीच माणसे स्वत:चे विचार बदलण्याचा विचारही मनात आणत नाहीत. आपण इतरांना बदलू शकत नाही हे प्रत्येकाने मनात अधोरेखित करण्याची गरज आहे. दुसऱ्याचे विचार माझ्या नियंत्रणात नाहीत पण माझे विचार माझ्या नियंत्रणात असू शकतात या वास्तवाचा स्वीकार माणसे करताना दिसत नाहीत. एकाच कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार जर सारखे असते तर मग कौटुंबिक वाद हे उद्भवलेच नसते. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाचे विचार जर परस्परांशी जुळले असते तर समाजात एकोपा,शांतता नांदली असती.          
परंतु असे घडत नाही याचे कारण प्रत्येकाच्या विचारांची बैठक वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती तिच्याबरोबर निराळे 'संस्कार' घेऊन आलेली असते. प्रत्येकाचे एक logic असते त्यानुसार ती व्यक्ती वागते, आचरण करते. ते त्या व्यक्तीच्या दृष्टीने योग्य असते म्हणूनच ती करत असते. तिचे वर्तन चूक की बरोबर ही बाब सर्वस्वी वेगळी पण तिच्या वागण्यावर किंवा विचारांवर आपले नियंत्रण असू शकत नाही. समोरची व्यक्ती सिगारेट ओढते हे आपल्याला गैर वाटून आपण त्या व्यक्तीच्या तोंडातील सिगारेट हिसकावून फेकली तर आपल्या अशा कृत्याने तिची सिगारेट ओढण्याची सवय नष्ट होईल का याचा विचार आपण करायला हवा. आपण अशा व्यक्तीपासून दूर राहण्याचा विचार जरूर करू शकतो कारण त्या व्यक्तीच्या विचार किंवा आचारावर आपले नियंत्रण असू शकत  नाही.        
काही वेळा परिस्थिती अशी येते की माणसे हतबल होतात. समजा सकाळच्या वेळी आपली गाडी traffic मध्ये बराच वेळ अडकली आहे. आपल्याला ऑफिसला  पोहोचायला उशीर होणार हे उघड आहे. आपल्यासारखीच इतरही अनेक माणसे त्यांच्या वाहनांमध्ये खोळंबली आहेत. अशा वेळी प्रामुख्याने आपल्या मनात काय काय विचार येतात. 'आजच उशीर व्हायचा होता, माझी महत्वाची मिटिंग आहे, काय कटकट आहे या traffic ची, आता मला उशीर होणार, बॉसची बोलणी उगाचच खावी लागणार, इतरांसमोर माझ्या इज्जतीचा फालुदा होणार, माझ्या प्रमोशनवर गदा येणार, तो लेले माझ्या पुढे जाणार, आज रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार, बायकोला प्रॉमिस केले होते की लवकर येईन म्हणून, बाहेर जाणार होतो, शी! सगळ्या plan चा चुथडा झाला' या सगळ्या विचारांनी आपण पुरते घेरले जातो. पण या विचारांचे जनक आपणच असतो ना? शिवाय या विचारांनी traffic jam  सुटतो का? हे विचार बरोबर घेऊनच आपण ऑफिसला जातो. परिस्थितीचा राग आपण ज्याच्या त्याच्यावर काढतो आणि अनेक मने दुखावतो. आपल्या त्या दिवसाच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो. आपला सबंध दिवस अर्थातच वाईट जातो. उरलेल्या यातना आपण घरी भोगतो. त्रास होणे हे जरी साहजिक असले तरी तो किती करून घ्यायचा आणि त्यामुळे इतरांना किती द्यायचा हे आपल्या विचारांतच असते ना?                    
दुसरी माणसे आणि परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या कक्षेबाहेर असतात. अमुक एक परिस्थिती उद्भवल्यास अथवा अमुक एक व्यक्ती आपल्याशी विशिष्ट प्रकारे वागल्यास नेमका कशाप्रकारे विचार करायचा हे शिकवणाऱ्या शाळा नाहीत पण आपल्या मनात अशा वेळी येणाऱ्या विचारांना नेमकी दिशा  कशी द्यायची या करता आज त्या संबंधीचे विपुल वाचन, आत्मपरीक्षण, मनन आणि चिंतन करण्याची खरी आवश्यकता आहे.  कुटुंब आणि समाज सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनातील विचार आणि विचारांचा स्त्रोत सुयोग्य दिशेने वळवण्याची गरज आहे.   
मनाच्या मुळाशी प्रत्येकाने उत्तम व योग्य विचारांचं खतपाणी घातलं तर आणि तरच नशीब म्हणजेच future आपल्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येईल.   
एक अतिशय सुंदर विचार मला या ठिकाणी उद्धृत करावासा वाटतो:
'ज्याप्रमाणे तुम्ही रोज चोखंदळपणे आपल्यावर सुंदर दिसतील अशा कपड्यांची निवड करता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी योग्य विचारांची निवड करा. कारण ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुमच्या नियंत्रणात असू शकते.'    


Monday 24 November 2014

भाजपचे भविष्य स्मृती इराणींच्या 'हाती'? - विषयाचा विपर्यास


मनुष्यबळ विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आपला हात भविष्य समजून घेण्यासाठी ज्योतिषापुढे पसरत भाजपच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. याच्या निषेधार्थ जवळजवळ सर्व channels नी आपापला आवाज उठवला. वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. वास्तविक पाहता अनेक दिग्गज राजकारणी, उद्योगपती, अभिनेते आणि समाजातील इतर प्रतिष्ठित यांची ज्योतिषांकडे व्यवस्थित उठबस असते. अनेकांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात गंडेदोरे, बोटांत अंगठ्या असतात आणि हे आपण पाहिलेले असते. फक्त या गोष्टींचा जाहीर बोलबाला होत नाही. या 'activities' अत्यंत गुप्तपणे होत असतात. स्मृती इराणींनी एवढे चातुर्य दाखवले असते तर आज त्यांच्यावर असे टीकेचे अस्त्र सोडण्याची संधी channels ना मिळाली नसती. पण त्या आपल्याबरोबर सगळा लवाजमा घेऊन गेल्या आणि मिडियाला आयतेच खाद्य मिळाले. आता हे त्यांनी हेतुपुरस्सर केले असेल तर माहित नाही किंवा हा 'attention seeking' चा ही प्रकार असू शकेल.              
मंत्र्यांना खाजगी जीवन नसते.  त्यांना हे मंत्रिपद अपघाताने मिळाले. त्यांनी वेळेचा अपव्यय केला. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्हच आहे. ज्योतिषाला हात दाखवून त्या आजच्या तरुण पिढीसमोर नक्की कोणता आदर्श ठेवू पाहत आहेत? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी त्यांच्यावर झाडल्या गेल्या. त्यांचे या संदर्भातील फोटो सुद्धा प्रसारित झाले. त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल रान उठवून झालं. मात्र त्यानंतर channels  वर 'फलज्योतिष' हे शास्त्र की थोतांड आहे ही जी चर्चा सुरु झाली ती पूर्णपणे अप्रस्तुत होती.       
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसटशी सीमारेषा आहे. जो कर्तृत्ववान आहे तो सुद्धा श्रद्धाळू असू शकतोच की! श्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे. कोणाची श्रद्धा परमेश्वरावर, कोणाची महंत लोकांवर तर कोणाची ज्योतिषावर. ही एक अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. मी अनेक डॉक्टर सुद्धा बुवा-बाबांच्या चरणी लीन झालेले बघितले आहेत. ज्यांचे कर्तृत्व अगोदरच सिध्द झाले आहे व तेही सार्वजनिक रित्या त्यांना ज्योतिषांची गरजच काय असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. मनगटातील कर्तृत्व आणि दैववाद यांची सांगड कशासाठी घालायची? अनेक ज्योतिष्यांनी कालच्या चर्चेत अतिशय सावध भूमिका घेतली होती. कोणाचे चूक किंवा कोणाचे बरोबर, कोण योग्य व कोण अयोग्य हे ठरवण्याचा नैतिक अधिकार दुसऱ्याला नाही जोपर्यंत तो दखलपात्र गुन्हा नाही. देव मुळी नाहीच आहे असे म्हणून तुम्ही मंदिरे उभारण्यासाठी हरकत घेऊ शकता का? मी नास्तिक आहे म्हणून दुसऱ्यानेही नास्तिकच असावे हा आग्रह कितपत रास्त आहे? ज्याप्रमाणे देव आहे असे अत्यंत ठामपणे सांगणारे आहेत तसेच देव अस्तित्वातच नाही असे छाती पिटून सांगणारेही आहेत. ज्योतिष हे एक सन्माननीय शास्त्र आहे असे म्हणणारे आहेत तसे ज्योतिषाचे शास्त्रीयत्व अमान्य करणारे सुद्धा ढीगभर आहेत. याचे कारण प्रत्येक माणूस आणि त्याची मानसिकता ही इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळी असते आणि यापुढेही असणार आहे.               
अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत की कर्तृत्व असूनही त्या व्यक्तींना यश प्राप्त झालेले नाही. कारणे काहीही असोत. आपल्या शेतात प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास निसर्गाच्या अवकृपेने असंख्य वेळा काढला गेला आणि जातोय. तो शेतकरी कुठे प्रयत्नात कमी पडला? परंतु त्याच्या मनगटातील कर्तृत्व सिध्द करून दाखवण्याची संधी मात्र निसर्गाने हिरावून घेतली. आज शिकून सवरून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखवायला जगाच्या पाठीवर निघालेल्या अनेक तरुणांना अपयशाला सामोरे जायला लागतेय. बेकारी, बेरोजगारी यांचा सामना करताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक आसन्नमरण अवस्थेत असलेले वयोवृध्द रुग्ण नको झालेला जीव मरण येत नाही म्हणून कसेबसे जगवत आहेत तर दुसरीकडे तरणेताठे अपघाती किंवा अचानक मृत्यूला कवटाळत आहेत. या गोष्टींचे 'logical calculation' काय असू शकेल? अंदाज, तर्क या गोष्टी जर अ-शास्त्रीय ठरवल्या तर मग ज्या तर्काच्या, अनुमानाच्या आधारे पोलिस गुन्हेगार लोकांपर्यंत पोहोचतात ती सुसंगतताही मोडीत काढायला लागेल.           
मी घरातून यावेळी बाहेर पडू का? इतपत ज्योतिषाच्या आधीन व्हायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. प्रत्येक माणसाला उपजत विवेकबुद्धी किंवा सद्सद विवेक हा असतोच. त्याचा वापर त्याने केला नाही तर तो त्याचा दोष आहे. माझ्यावर आज मंत्रीपदाची मोठी जबाबदारी आहे. मी जाहीररीत्या ज्योतिषाकडे गेले तर त्याचे समाजात आणि राजकारणात काय पडसाद उमटतील ह्या गोष्टीचा विचार स्मृती इराणी यांनी करायला हवा होता. त्यांच्या विवेकशून्यतेला शास्त्र कसे जबाबदार?       
एकीकडे आपला 'TRP' वाढवण्यासाठी पेपर आणि वाहिन्यांमधून भविष्यकथनाचे  कार्यक्रम करायचे व  दैनंदिन भविष्य छापायचे आणि दुसरीकडे याच शास्त्राची 'TRP' वाढावा या दृष्टीकोनातून संभावना करायची हे दुटप्पी धोरण किती योग्य आहे याचा विचार करण्याची आज आत्यंतिक गरज आहे. 

Friday 21 November 2014

मतवारे बलमा………

संगीत विदुषी श्रीमती किशोरीताई आमोणकर यांच्या गाण्याबद्दल स्वत:ची प्रतिक्रिया पुलंनी अशी दिली की  नाव किशोरी असलं तरी तिचं गाणं प्रौढ आहे. त्याच धर्तीवर मी म्हणेन की सावनी शेंडे हिचं शारीरिक वय तेवढं नसलं तरी तिचं सांगीतिक वय अंमळ जास्तच आहे.    
पेपरसाठी मी संगीत परीक्षणे करत असताना अनेक गवयांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला. आपल्याबरोबर गाण्याविषयी संवाद साधणारा माणूस दोन तंबोऱ्यांच्या मध्ये जाउन बसला की एकदम वेगळाच भासतो. संगीतातील शास्त्रीय लीला इथून पुढे श्रोते ऐकणार असतात. बहुतेक गवई अतिशय गंभीर चेहरा करून, कोणी तोंडे वेडीवाकडी करून, कोणी बघा मी स्वरांचे शिवधनुष्य कसे पेलतोय अशा अविर्भावात विशिष्ट राग सादर करत असतात. श्रोत्यांमध्ये काही कानसेन सोडले तर सर्वसामान्य लोक गाण्याचा निखळ आनंद लुटायला आलेले असतात. शास्त्रीय संगीत हे खूप कठीण आहे, क्लिष्ट आहे, सहजसाध्य नाही अशा प्रकारच्या सूचना अशा गवयांच्या गाण्यातून श्रोत्यांना मिळत असतात. काही गवयांचे गाणे तांत्रिक दृष्ट्या अचूक असते तरीही त्यांत लालित्याचा, रंजकतेचा अभाव दिसून येतो. असे विद्वज्जड, पांडित्यपूर्ण पण अ-प्रासादिक गाणे फक्त ऐकले जाते ते चिरस्मरणीय असत नाही.            
पण सावनीचे गाणे याला अपवाद आहे. सावनीचे गाणे हे गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडणारया 
संततधारे सारखे आहे. विलक्षण शांत व संयमित! या गाण्यात मी पहा कशी स्वरचमत्कृती लीलया केली असा पांडित्यपूर्ण अभिनिवेश नाही. हसतमुख चेहऱ्याने स्वत: गाण्याचा आनंद घेत तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रयत्न खचितच स्तुत्य आहे. तिच्या गाण्यात लालित्य आणि रंजकता यांचा अतिशय सुंदर मिलाफ आढळतो.     
संगीतातील शिक्षणाचे धडे हे तिने प्रथम तिच्या आजीकडून आणि वडिलांकडून गिरवले आहेत व तद्नंतर तिला शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका श्रीमती वीणा सहस्त्रबुद्धे यांचे सांगीतिक मार्गदर्शन लाभले आहे. याच शास्त्रीय संगीताच्या मुशीतून आज तिचे गाणे अधिकाधिक परिपक्व झाल्याची ग्वाही आमच्या सारख्या सुरांच्या आहारी गेलेल्या कानांनी दिली आहे.
कोणताही राग किंवा गाणे सौंदर्यपूर्ण रीतीने फुलवण्याची एक विलक्षण हातोटी सावनीला लाभली आहे.  मग तिची 'जाओ सजना , मैं नाहि बोलू' ही मारू बिहाग रागातील स्वरचित बंदिश असो वा 'मतवारे बलमा नैना मिलाके मत जाना' ही ठुमरी सदृश रचना असो वा 'कोई कहियो रे प्रभू आवनकी' ही भक्तिरसपूर्ण रचना असो   अतिशय सहजपणे एखादा राग उलगडण्याचे तिचे कसब प्रशंसनीय आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या आजीवासन संस्थेत तिने गायलेली रागमाला ही निव्वळ अप्रतिम! 'हिंडोल गावत सब, ओडव कल्याण राग' इथपासून आरंभ करून भूप, देस, छायानट,तिलककामोद, शंकरा, श्री, मारवा, पुरिया, मालकंस ई. १९ रागांची गुंफण इतकी सुंदर आणि नेटकी की कानांची भूक भागतच नाही.  
आजच्या वेगाच्या आणि कृत्रिमतेच्या जमान्यात अभिजात संगीत तग धरू शकेल काय अशी भीती मनाला वाटू लागली आहे. पण सावनीचे आश्वासक गाणे या प्रश्नाचे चोख उत्तर आहे. तिच्या श्रोतृवर्गात तरुणाई मोठ्या संख्येने असते हे ऐकल्यानंतर खूप बरे वाटले. असेच तिचे नितळ, पारदर्शक गाणे शास्त्रीय संगीताचा झरा नव्या पिढीच्या मनात प्रवाही करण्यात आणि त्यांना प्रेरणा देण्यात सफल होऊ दे हीच तिच्या संगीतमय वाटचालीला शुभेच्छा!               



Tuesday 18 November 2014

अल्पमतातील सरकार - आरंभीच घरघर





भाजपने विश्वासदर्शक ठराव आपल्या बाजूने पारित करून घेतला खरा परंतु त्यानंतर मात्र आपल्याला कोणकोणत्या दिव्व्यांना सामोरे जावे लागणार आहे याची खरी कल्पना त्यांना आली होती का? आज विश्वासार्हतेच त्यांचं अस्त्र दुबळं आहे. किंबहुना विधानसभेत त्यादिवशी घडलेल्या अभूतपूर्व नाट्याने जनमानसात त्यांची प्रतिमा सत्ता काबीज करण्यासाठी काहीही करणारे अशीच उमटली आहे.   
पवारांचा पॉवर प्ले सुरु झाला आहे. आधी बिनशर्त पाठींबा व आता एखादा निर्णय चुकीचा  (राष्ट्रवादीच्या दृष्टीने)  ठरल्यास विचार करावा लागेल या पद्धतीचे भाष्य सुरु झाले आहे. राज्यातील सुज्ञांना याचा नक्की अर्थबोध झाला आहे. भाजपला झाला आहे का हा खरा प्रश्न आहे.     
कॉंग्रेसच्या एका प्रवक्त्याच्या मते मुळातच हे सरकार रीतसर बनलेलं नाही. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही.  हे 'illlegitimate' सरकार आहे. त्यामुळे मोठमोठाले निर्णय घेऊन योजना राबवण्याचा त्यांना कायदेशीर आणि नैतिक अधिकार नाही. मनसे या पक्षाचे सर्वेसर्वा हेही काल म्हणाले की त्या दिवशी विधानसभेच्या आत नक्की काय झालं ते कोणाला तरी कळलं का? बहुतेक सर्व पक्ष (भाजप सोडून) संभ्रमावस्थेत वावरत आहेत. कोणाचा कोणाला पाठींबा आहे तेच कळेनासे झाले आहे. भाजप एकीकडे राष्ट्रवादीचा पाठींबा आम्हाला नको, तो त्यांनी काढून घ्यावा असेही म्हणायला धजावत नाही. त्याचवेळी  आमची दारे आमच्या नैसर्गिक मित्रासाठी सदैव उघडी आहेत असे सांगून शिवसेनेपुढे सत्तेची ( न मिळणारी ) गाजरे नाचवीत आहेत. या सर्वांवर कडी म्हणजे मुख्यमंत्र्यांना या सरकार अस्थिरतेच्या संदर्भात काहीही विचारले असता ते छातीठोकपणे सांगतात की आमचे बहुमत सिद्ध झाले आहे आणि आम्ही पाच वर्षे सत्तेवर राहणार आहोत. हा विश्वास मात्र नक्की कुणाच्या भरवशावर आहे हे गुपित मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.      
मराठवाड्यात भीषण दुष्काळाने अनेक शेतकऱ्यांना ग्रासल्याने त्यांना मृत्यूचा मार्ग सोपा वाटतो आहे. घरचे पशुधन अन्नानदशेने मरू नये म्हणून त्यांनी बाजारात मातीमोल भावाने विकायला काढले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक आणि भावनिक दिलासा देणे हे सत्तारूढ पक्षाचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी केंद्र सरकारकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.आज अंधश्रद्धांचा विळखा या देशाला करकचून पडला आहे. वाटेल ते अघोरी उपाय, प्रथा आज त्या त्या प्रतिगामी समाजात घट्ट रुतून बसल्या आहेत. अशा अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्याची अतीव गरज आहे व यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आधी साक्षर व नंतर सुशिक्षित होणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही विशेष मोहीम सरकारकडून राबवण्याची गरज आहे. आरक्षणाचे मुद्दे हे ही परत परत डोकी वर काढणारच आहेत. त्यांना कायदेशीर रित्या आरक्षण न मिळवून दिल्यास सरकारवर त्यांची खप्पामर्जी  ओढवणार आहे यात शंका नाही.  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काही कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. स्वच्छता अभियानाप्रमाणे गावागावात पिण्याचे पाणी आणि मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. रोगराईला आळा घालण्यासाठी समाजात त्याविषयीची जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी खास शिबिरांचे आयोजन सरकारने करणे आवश्यक आहे. विजेचा अतिरिक्त व अनाश्यक वापर टाळला ( उदा. अनावश्यक रोषणाई)  तर इतर ठिकाणीही विजेचे दुर्भिक्ष्य भासणार नाही याविषयीची सजगता लोकांत निर्माण होण्यासाठी काही उपक्रम सरकारने हाती घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शालेय स्तरावर सरकारतर्फे काही योजना आखणे गरजेचे आहे. ही फक्त काही मोजक्या विषयांची यादी आहे. असे अनेक विषय आज चिंतेचे ठरत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेने आज अनेकांचे बळी घेतले आहेत तर अनेकांचे जीवघेणे अपघात झाले आहेत. या समस्येचे लगोलग निराकरण होणे गरजेचे आहे.   
उदाहणादाखल वर उद्धृत केलेल्या व अशा अनेक प्रश्नांकडे सरकारला पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असेल तर प्रथम सरकारला स्थिरता येणे गरजेचे आहे. यालाही गोंजारायचे नि त्यालाही चुचकारायचे हे धोरण जे सरकारने सत्तेसाठी अवलंबले आहे ते निषेधार्ह आहे. जर राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा सरकारच्या निर्णयात दखलअंदाजी करून त्यांचा स्वार्थ साधणार असेल तर त्यांना रीतसर दूर करून शिवसेनेच्या मदतीने हे सरकार चालवणे यावाचून आजतरी सरकारला गत्यंतर नाही. परंतु शिवसेनेला मंत्रिपदेही नाकारायची आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवायची हे दुटप्पी धोरण भाजप पुढचे प्रश्न अधिक जटील करेल. यापैकी काहीच शक्य नसेल तर स्वाभिमान शिल्लक ठेवून राजीनामा देणे आणि पुनश्च जनतेची विश्वासार्हता संपादन करणे एवढे तरी सत्तारूढ पक्षाने करावे ही ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेच्या मनातील इच्छा आहे.       
   
  

  

Sunday 16 November 2014

विनोदाचे आणि माणुसकीचे आगर- पुलं

शालेय पुस्तकातून पुलं डोकावले आणि कायमचे मनामध्ये शिरले. माझ्या बाबांचे ते गुरु. माझे बाबा हरी भोपटकर orient हायस्कूलचे विद्यार्थी. तिथे पुलं आणि सुनिताताई सारखे प्रतिभावान शिक्षक बाबांना लाभले. माझे बाबा उत्तम पेटी वाजवायचे. बाबांकडून पुलं विषयी खूप ऐकले होते त्यामुळे माझे बालसुलभ कुतूहलही जागे झाले होते. पुलं खूप हसवतात ही गोष्ट सगळ्याच परिचितांकडून मनावर कोरली गेली होती.          
पुढे मी कविता करायला लागले. तसा लिखाणाचा वारसा बऱ्यापैकी घरातूनच मिळाला होता. माझी आत्या शरयू भोपटकर ही लेखिका होती तसेच ऑफिस सांभाळून इतर वेळ आधी रंगायतन व नंतर आविष्कार या संस्थेच्या नाटकांसाठी ती देत होती.
तू असाच यावास आणि अशा काही निवडक कविता मी पुलंच्या अभिप्रायार्थ पोस्टाने पाठवल्या.  आधी मी बाबांनाच म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी त्यांना पत्र  टाका. पण त्यांनी सरळ नकार दिला. मला त्यांचं वागणं पटलं नाही पण काय करणार?  मग बाबांचाच संदर्भ देऊन मी माझं पहिलंवहिलं पत्र पाठवलं. मी खूपच excited होते. त्यांच्या उत्तराची चातकासारखी वात पाहत होते. पण बरेच दिवस गेले आणि माझी आशा मावळत चालली. वाटायचं ते कुठे मी कुठे? आणि बाबा तरी त्यांना कसे आठवणार? कारण त्या गोष्टीला बरीच वर्षे लोटली होती. एव्हाना माझे लग्नही झाले होते. १९८१ सालची गोष्ट.         
आणि एके दिवशी अचानक माझ्या नावचं अंतर्देशीय पत्र आलं.  त्यावरील पुलंचं नाव आणि पत्ता मी बघितला आणि मला अक्षरश: आकाश ठेंगणं झालं. मी पत्र उघडलं आणि कमालीच्या आतुरतेने वाचू लागले. आश्चर्य म्हणजे माझे बाबा त्यांना अगदी व्यवस्थित आठवत होते. बाबांनी बसवलेल्या संगीतिका आणि त्यांच्या पेटीवादनाचं पुलंनी कौतुक केलं होतं एवढंच नव्हे तर हरीमुळे तुला जो वारसा मिळाला आहे जो चांगल्या प्रकारे जोपास असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. माझ्या कवितांविषयी पुलंनी सविस्तर लिहिलं होतं. कविता कशी लिहावी व कशी लिहू नये याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं. ज्या कविता वृत्तात चुकल्या होत्या त्या लिहिताना काय खबरदारी घेतली पाहिजे हेही सांगितलं आणि तू असाच यावास ही माझी कविता त्यांना मनापासून आवडली हे सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. (त्यामुळे १९९५ साली प्रकाशित झालेल्या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचं नाव मी 'तू असाच यावास ' हेच ठेवलं.) माझा तर कितीतरी वेळ पुलंनी  आपल्याला पत्र लिहिलं आहे आणि तेही एवढं सविस्तर यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्या पत्राची आणि त्यातील मजकुराची पारायणे झाली. त्या दिवसांत माझे पाय जमिनीपासून थोडे वर उचलले गेले होते.           
त्यानंतर कवितेचं नक्की स्वरूप काय अशा आशयाचं पत्र मी त्यांना टाकलं. पहिलं पत्र येउन सुद्धा या पत्राच्या उत्तराबद्दल मी जर साशंकच होते. मनात म्हणतही होते, त्यांना दिवसाकाठी अशा लाखो वाचकांची पत्रे येत असणार. ते कुणाकुणाला लिहित बसतील? मला एकदा लिहिलं त्यांनी पत्र म्हणजे परत थोडेच लिहितील? त्यांना काय तेवढंच काम आहे का? पण मग असं वाटायचं की नक्की उत्तर येईल. आणि यथावकाश उत्तर आलं कवितेचं स्वरूप अतिशय उत्कृष्ट रीतीने उलगडून दाखवणारं. मी खूप आनंदले. प्रोत्साहित झाले.  
नंतर काही निमित्ताने अशा पाच-सहा पत्रांची आमची देवाणघेवाण झाली. मध्यंतरी घरात वाचनालय सुरु करावे असे मनात आले होते परंतु त्यासाठी समर्पक असे नाव सुचत नव्हते. तेव्हा पुलंना पत्र टाकले आणि त्यांनी 'पसाय' हे नाव द्यावे असे सुचवले. पुढे मात्र तो वाचनालयाचा माझा बेत बारगळला. पुढे काही वर्षांनी पुण्याच्या स. ह. देशपांडे यांचे मला पत्र आले. पुलंचा  पत्रव्यवहार चाळत असताना त्यांना माझी काही पत्रे त्यात सापडली. त्यातील कवितेचं नक्की स्वरूप काय हे माझं पत्र त्यांना मिळालं परंतु त्यावरील पुलंच्या उत्तराचं पत्र त्यांना हवं होतं. मी ते पाठवून दिलं आणि पुलंच्या  ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या अमृतसिद्धी ग्रंथात ते समाविष्ट झालं. ही माझ्यासाठी नि:संशय गौरवाची गोष्ट आहे.            
त्यांना भेटावेसे खूप वाटायचे पण तशी संधी कधी मिळाली नाही. मी ठाण्याला राहायला आल्यानंतर श्रीमती विजया जोशी यांचेकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यासाठी काही वेळेस जायचे. त्यांचा एन सी पी ए ला गायनाचा कार्यक्रम होता. आम्ही शिष्यमंडळीही ऐकायला जाणार होतो. तेथील हॉलमध्ये आम्ही  प्रवेश करते झालो. कार्यक्रमाला थोडा वेळ होता. माझी नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. एवढ्यात मला पुलं आणि सुनीताताई मागील खुर्च्यांवर बसलेले दिसले. मी पुढचामागचा विचार न करता धावले आणि प्रथम त्या उभयतांच्या पाया पडले. नंतर मी त्यांना माझे नाव आणि त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल सांगितले. दोघे खूप छान बोलले. लगेचच announcement झाली आणि मी पुढे जाउन खुर्चीवर स्थानापन्न झाले. गाणे संपल्यावर मी मागे वळून बघितले पण ते दिसले नाहीत. मागाहून कळले की पुलंची तब्येत ठीक नव्हती. अनपेक्षितपणे  आपले आराध्यदैवत असे भेटल्याने माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर मात्र मी पुढे कधीच त्यांना भेटू शकले नाही. त्यांच्या दुखण्याची, आजाराची बातमी ऐकली की मन खिन्न व्हायचे.    
आज पुलं नाहीत आणि सुनीताताई सुद्धा नाहीत. त्यांच्या विनोदाइतकाच त्यांच्यातील माणुसकीचा झरा खूप निर्मळ आणि सच्चा होता. अहंगंड त्यांना कधी शिवला नाही. त्यांच्या पत्रातून मला सदैव त्यांच्यातील एक प्रेमळ,स्नेहपूर्ण,प्रोत्साहन देणारा मार्गदर्शकच जाणवला. हा माझा २०० वा ब्लॉग आहे. माझ्या कवितेला ज्यांनी पहिलंवहिलं मार्गदर्शन केलं आणि लेखनाचा व गाण्याचा वारसा जपण्याचा ज्यांनी मला मोलाचा सल्ला दिला त्या पुलंना माझा हा ब्लॉग मी कृतज्ञ भावनेने समर्पित करते आहे.              
       
  

Thursday 13 November 2014

पुढील राजकीय पेपर सोडवा ……


अ खालील गाण्यांच्या ओळी नेमक्या कोणत्या पक्षाला उद्देशून आहेत ते सांगा
१) दोस्त दोस्त ना राहा
२) फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
३) टिकटिक वाजते डोक्यात
४) तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा
५) बनाके क्यों बिगाडा रे
६) जाने कहाँ गए वो दिन
७) आसूँ भरी है ये जीवनकी राहें
८) मैं  इधर जाऊँ या उधर जाऊँ
९) तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना
१०) परदे के पिछे क्या है


ब  कारणे  द्या 
१) पूर्वी कमळ सूर्याकडे बघून फुलायचे पण अलीकडे ते घड्याळाकडे बघत फुलते
२) इंजिन चालू झाले पण अल्पावधीतच बाकीच्या डब्यांपासून ते तोडले गेले
३) अभिमानाने हात वर करणाऱ्यांनाच लोकांनी हात दाखवला
४) दुसऱ्यांवर अचूक नेम साधणारे यावेळेस स्वत:च्याच वाग्बाणांनी घायाळ झाले
५) धनुष्यबाण व कमळ या जोडीने आणि घड्याळ व हात या जोडीने एकाच वेळी एकमेकांशी घटस्फोट घेतला


क असे कोण म्हणाले ते सकारण सांगा
१) हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी
२) आम्ही एक वेळ अविवाहित राहू पण NCP चा पाठींबा कदापि घेणार नाही
३) तुम्ही फक्त एकदाच माझ्या हातात राज्य सोपवून बघा  


ड  कंसातील सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा
१) मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी - (इथे मुंगी कोण व सूर्य कोण ते सांगा )
२) क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा ( इथे वादा, कसम  व इरादा या शब्दांचे राजकीय अर्थ स्पष्ट करा)
३) सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है ( ही वैद्यकीय लक्षणे कोणत्या पक्षाची आहेत ते ओळखा )
४) श्रीरंगा कमलाकांता हरी पदराते सोड ( येथे कमलाकांता आणि हरी हे शब्द कोणाला उद्देशून वापरले आहेत ते सांगा )
५) हम और तुम तुम और हम खुश है यू आज मिलके ( यातील हम आणि तुम कोण आहेत ते स्पष्ट करा )


ई  फरक विशद करून फायदे व तोटे सांगा
     आवाजी मतदान व गुप्त मतदान


फ पुढील गाण्यांच्या ओळींपैकी एका ओळीचे अर्थासहित स्पष्टीकरण द्या
१) कभी खुद पे कभी हालात पे रोना आया   
                            किंवा
२) प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यू लागता है डर

Wednesday 12 November 2014

सत्तेसाठी काहीही …………

विधानसभेत काल घडलेल्या सबंध नाट्याचा मला पुनरुच्चार करायचा नाही परंतु या कृतीमुळे भाजप सरकारची राज्यातील विश्वासार्हता निश्चितच लयास गेली आहे.   
सुशिक्षित,सुजाण ,सुज्ञ असा मतदार ( नोटांची चळत पाहून आपली मते न विकणारा आणि कोणत्याही पक्षाला बांधील नसणारा ) काहीएक विचार करून आपले मत अमुक एका पक्षाच्या पारड्यात टाकत असतो. त्या त्या पक्षातील मुख्य चेहऱ्याकडे आणि त्याच्या आजवरच्या राजकीय कर्तृत्वाकडे पाहून हे बहुमुल्य मत मतदार देत असतात. कॉंग्रेस -राष्ट्रवादीने त्यांच्या राजकीय कर्तृत्वाने जनमानसात जो अविश्वास निर्माण केला त्यांची परिणती म्हणून यावेळेस मतदार राजाची पावले भाजप सरकारच्या दिशेने आपसूकच वळली.   
हे नवीन सरकार तरी नागरिकांच्या हिताचे व त्यांचे दैनंदिन आयुष्य सुकर व्हावे असे काहीतरी करेल या विश्वासापोटीच हि नवी सोयरिक जनता जुळवू पाहत होती. भाजप सरकार मोठ्या संख्येने राज्यात आले खरे पण जनतेने या पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. भाजप नंतर दुसरा मोठा  पक्ष म्हणून शिवसेनेला जनमान्यता मिळाली. आता भाजप आणि शिवसेना मिळून या राज्याचा नवा संसार थाटतील  असे जनतेला वाटत असतानाच त्या पक्षांतर्गत मानापमानाची नाटके रंगली आणि भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला.    
ज्या राष्ट्रवादीला 'भ्रष्ट्वादी ' आणि NCP म्हणजे 'naturally corrupt party' म्हणून कुत्सितपणे भाजप हिणवत राहिली आणि ज्या भाजपने सत्तेवर येताच अशा भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये  टाकू अशा वल्गना केल्या त्याच भाजपची आज राष्ट्रवादी पक्षाबाबतची भूमिका संदिग्ध व संशयास्पद असावी हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आम्ही विश्वास दर्शक ठरावाची सगळी प्रक्रिया कायदेशीर रित्याच पार पाडली असा भाजप आज कितीही ठणाणा करून सांगत असली तरी ते कितपत खरं आहे हे त्यांनाही माहित आहे आणि सुज्ञ जनतेलाही ते आता ज्ञात झाले आहे.  

ज्येष्ठ घटनातज्ञ प्रा.उल्हास बापट यांनी काल सांगितले की त्यांनी तांत्रिक बाबी जुळवून आनत्या खऱ्या परंतु जे काही काल विधानसभेत घडले ते नैतिकतेला धरून तर नव्हतेच शिवाय यात लोकशाहीचे सर्व संकेत भाजपने झुगारून दिले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री.पी .बी .सावंत  यांनी विश्वास दर्शक ठरावाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बेकायदेशीर असे संबोधले आहे.    
विधानसभेच्या अध्यक्षपदी श्री. हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि कॉंग्रेस व शिवसेनेने शस्त्रे खाली ठेवून या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पुढचे काम भाजपच्या दृष्टीने अत्यंत सोपे झाले. वास्तविक पाहता विधानसभेचा अध्यक्ष हा नि:पक्षपाती असायला हवा पण सत्तेच्या मोहापायी काय वैध नि काय अवैध याचा सारासार विचार आणि  विवेक कोणालाच राहू नये याचे सखेद आश्चर्य वाटते आहे.  
या सगळ्या प्रक्रियेत भाजपने १४५ चा बहुमताचा आकडा गाठला आहे असे कुठेच सिध्द झालेले नाही. पण भाजपचे प्रवक्ते तर जोरजोरात सांगत आहेत की आम्ही बहुमत सिद्ध केले. पण ते नक्की कसे हे तुम्हाला मत दिलेल्या जनतेला तरी समजण्याचा हक्क आहे की नाही?
राष्ट्रवादीने आम्हाला पाठींबा जाहीर केला आहे, आम्ही थोडाच त्यांच्याकडे मागितला होता असे एकीकडे सारखे म्हणत राहायचे आणि शिवसेने बरोबर अजूनही आमची चर्चा सुरु आहे असे म्हणत संभ्रमावस्था निर्माण करायची अशी खेळी भाजपने सुरवाती पासूनच आरंभली आहे. राष्ट्रवादीचा पाठींबा न मिळता भाजपचे बहुमत कसे सिद्ध झाले हे एकदा जनतेला तरी कळू दे.  काँग्रेस -शिवसेनेचे मतविभाजन मागण्याचे 'timing' चुकले अशी तांत्रिक बाब पुढे करून भाजपने आवाजी मतदानाने  विश्वास दर्शक ठराव पारित करून घेतला आहे हे न समजण्या इतकी जनता दुधखुळी नाही.      

यापुढे सत्ता स्थापनेसाठी आसुसलेले इतर पक्ष सुद्धा याच तांत्रिक '(अ)-नीतीचा ' अवलंब आपल्या फायद्यासाठी करून घेतील हे निश्चित आहे. असा नवा 'आदर्श' प्रस्थापित करण्याचे श्रेय भाजपला द्यायलाच हवे.   
या महाराष्ट्र देशातील सर्वसामान्य मतदार भलेही या तांत्रिक बाबींशी अवगत नसेल परंतु अशा बनवाबनवीच्या आयुधाने व राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यावर तरलेले सरकार 'विश्वासार्ह' नाही हे खचितच त्याच्या मनामध्ये आजपासून अधोरेखित करेल.        

Tuesday 11 November 2014

जनहित म्हणजे काय असतं रे भाऊ ?

राजकारणात अगदी नव्याने दाखल झालेला गंप्या नव्या नवरीच्या नवलाईने मोठमोठ्या नेत्यांकडे विस्मयाने पाहत होता. त्यांचे हातवारे, लकबी, बोलण्याची ढब बारकाईने निरखित होता. त्याला काही गोष्टी समजत होत्या  तर काही गोष्टींचा उलगडा काही केल्या होत नव्हता. त्याने राजकारणाच्या क्षेत्रात त्याच्याहून एक पाउल पुढे असणाऱ्या भाऊ म्हस्केला विचारले, ते मोठे पुढारी लोक त्यांच्या भाषणात सारखे जनहित जनहित म्हणत असतात. हे जनहित म्हणजे नक्की काय रे भाऊ? भाऊ गंप्याला सिनियर असल्याने त्याच्यापुढे जरा टेचात वावरत होता.  तो म्हणाला, अरे आमचे साहेब म्हणतात की एक किलो राजकारणात शंभर ग्रॅम जनहित मिसळावे लागते. गंप्या काहीच न समजल्याने तोंडाचा चंबू करून म्हणाला, ते कशाला? भाऊ उत्तरला, अरे मग जनता कशाला निवडून देईल आपल्याला.         
या उत्तराने गंप्याचे फारसे समाधान झाले नाही. पण इतर अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंघावत होते. आपल्याला कोणी विचारलं की राजकारणात का आलात तर काय सांगायचं भाऊ? अरे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो असं सांगायचं, भाऊने एकदम तयार उत्तर दिलं. कोणते प्रश्न? गंप्याने पुढला बॉल टाकला.  हेच म्हणजे रस्त्यावरील खड्डे, कचऱ्याचे साचलेले ढीग, वाहतुकीचा खोळंबा, परप्रांतीयांचे लोंढे, वीज-पाणी टंचाई, अल्प दरात घरे, भेडसावणारी महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, तृतीयपंथीयांच्या  समस्या, शिक्षणाचे वाढते ओझे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांचे शोषण, रोगराई वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न आपण कसे सोडवायचे रे भाऊ ?  गंप्या प्रश्नांची ही लांबलचक यादी ऐकून अगदी काकुळतीला आला. हे प्रश्न आपण सोडवायचे असे मी म्हटले का? भाऊने  विचारले. अरे पण त्याचा अर्थ तोच होतो ना ? गंप्याचा जीव कासावीस झाला. गंप्याला आईने वैतागून जाउन त्याच्या पेकाटात मारलेली लाथ आठवली. एवढा घोडा झालाय पण काम करायचं नाव घेत नाही. काय रे ए मुडद्या, जन्मभर लोळायचा वसा घेतला आहेस का? आम्ही तुला यापुढे पोसणार नाही. बाहेर जा आणि काम शोध. आईच्या या सारख्या  धोशामुळे गंप्या कंटाळला आणि भाऊसमोर त्याने आपली व्यथा मांडली.   
भाऊ क्षणाचाही विलंब न लावता गंप्याला म्हणाला, अरे तू राजकारणात सक्रिय हो. म्हणजे काय करू? म्हणजे politics मध्ये admission घे. हे वाक्य मात्र गंप्याला कळले आणि त्याने ताबडतोबीने admission घेऊन टाकली. कसलाही फॉर्म आणि पैसे न भरता आपल्याला admission मिळाली याचेच त्याला कौतुक वाटले. पण पुढे काय याचे उत्तर फक्त भाऊवर अवलंबून होते. मी साहेबांकडे तुझ्यासाठी शब्द टाकला आणि ते लगेच हो म्हणाले. आपल्या शब्दाला वजन आहे गंप्या. काय कळलं weight weight, भाऊने पेपरवेट हातात धरून तो पेपरच्या गठ्ठ्यावर ठेवला. गंप्या एखाद्या सिनेमातील हिरोकडे  पाहावं तसं भाऊकडे आदराने पाहू लागला.   
भाऊंची मुलाखत घ्यायला एक पत्रकार आला होता पक्षाच्या ऑफिसमध्ये. काय म्हणतीय राजकारणातील प्रगती? पत्रकाराने ऑफ द रेकॉर्ड विचारले. साहेबांची कृपा आहे, भाऊ उत्तरला.  मुलाखत सुरु झाली. आपल्या पक्षाचं निश्चित धोरण काय आहे ते सांगू शकाल? पक्षाचं धोरण साहेब ठरवतात. आम्ही  पालन करतो. अहो पण आता जो प्रसंग घडला त्या बाबतीतील आपल्या पक्षाची भूमिका जरा स्पष्ट करता का? कालच ह्या प्रसंगा विषयीची आपल्या पक्षाची भूमिका आमच्या साहेबांनी स्पष्ट केली आहे. तीच आमची भूमिका.  आपला पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे असे इतर पक्षाचे लोक आरोप करत आहेत. लाचारी साहेबांच्या रक्तात नाही त्यामुळे ती आमच्याही रक्तात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अखेरीस आपला निर्णय काय झालाय ते सांगता का?  जो निर्णय साहेबांचा तोच आमचा. अहो ते ठीक आहे पण म्हणजे नक्की निर्णय काय? ते योग्य वेळेस आमचे साहेब जाहीर करतील. काळजी नसावी.           
पत्रकार काहीच थांग न लागल्याने खिन्न मनाने परतला.  काय गंप्या कशी झाली माझी मुलाखत? भाउने जिंकल्याच्या अविर्भावात विचारले. एकदम बेस्ट भाऊ. मग तयारीला लाग. तुलाही उद्या अशी उत्तरे देण्याचा सराव करावा लागेल. हो हो नक्की, गंप्या म्हणाला.       
घरी गेल्यावर गंप्याला आईने विचारलं, काय रे इतक्या रात्रीपर्यंत कसलं काम करतोस? गंप्या उत्तरला, साहेब आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही काम करतो.