Monday 9 January 2012

एका जिद्दी गायिकेची कहाणी

मानवी शरीरातील बहात्तर रोगांवर एकाच रामबाण उपायाने मात करता येते आणि ती म्हणजे माणसातील कला! कला ही माणसाच्या जगण्याला नुसताच अर्थ देते असं नाही तर प्रसंगी आजाराशी चार हात करण्याचे सामर्थ्यही देते. कला हे माणसाच्या जगण्याचे बलस्थान आहे,प्रयोजन आहे. संगीतातील सुरांनाच आपलं विश्व मानून निष्ठेने त्याची अर्चना करणाऱ्या,आयुष्यातील कठीण प्रसंगांना केवळ संगीतसाधनेने शह देणाऱ्या एका जिद्दी गायिकेची ही गोष्ट आहे. 
जयपूर-अन्त्रौली घराण्याची गायिका आणि ज्येष्ठ संगीतविदुषी कै.मोगुबाई कुर्डीकर यांची शिष्या कमल तांबे ही नात्याने माझी आत्या. कमलआत्याचे वडील कै.ना.द.तांबे हे पुण्याच्या हुजूरपागा शाळेतील संगीत शिक्षक त्यामुळे संगीताचा जन्मजात वारसा तिला लाभलेला होता. वडिलांकडून संगीताचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर तिनेही त्याच शाळेत संगीत शिक्षिकेची नोकरी धरली. संस्कृत विषयाचाही दांडगा व्यासंग! त्यामुळे मराठी नाटकांचे संस्कृतात भाषांतर करून ते विद्यार्थ्यांकडून बसवून घेणे,रागाच्या स्वरसमूहाची लक्षणगीते तयार करून ती बसवणे सुरु झाले. 
एकीकडे मोगुबाई,केसरबाई यांसारख्या गानविदूषीन्ची श्रवणभक्ती जोरात चालू होती. याच सुमारास अल्लादियाखा घराण्याचे ज्येष्ठ संगीत शिक्षक कै.मोहनराव पालेकर यांच्याकडे तिचे रीतसर शिक्षण सुरु झाले. कमलआत्याची शास्त्रीय संगीतावरील आत्यंतिक निष्ठा आणि तिच्या बुद्धीचा आवाका पाहून मोहनरावांनी मोगूबाईंसारख्या बुजुर्ग गायिकेकडे शब्द टाकला आणि अशा रीतीने कमलआत्या ही मोगूबाईंची शिष्या झाली.
१९५९-६० च्या सुमारास भावंडांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर कमल आत्या मुंबईत स्थायिक झाली. तिने कायम अभिजात संगीतावर भर दिला. शुद्ध शास्त्रीय संगीत जाणकारांसमोर सादर केले. एखादा राग सहजगत्या समजावून देण्यावर तिचा भर असायचा. मोगूबाईचं गाणं त्यात यत्किंचितही फेरफार न करता जसंच्या तसं श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती तत्पर असायची. जवळजवळ प्रत्येक संगीत मैफिलीत तिने राग आणि तालाच्या विविधतेवर तसेच शास्त्रशुद्धतेवर विशेष भर दिला. रसिकानुरंजनासाठी कोणतीही तडजोड तिने कधी स्वीकारली नाही. स्वरांवर भरपूर मेहनत घेणे, नियमित रियाज करणे, स्वत:च्या चुका स्वत:च पारखणे याबद्दल ती आग्रही होती. दोन तासांची मैफिल असो वा पंधरा मिनिटांच रेकोर्डिंग, तिने कायम विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ते रसिकांसमोर सादर केलं. रायसा कानडा, बिहागडा, बसंती केदार, जयजयवंती, बिहाग आणि भूप हे कमल आत्याचे खास आवडते राग. रागातील प्रत्येक पापुद्रा अलगद उलगडत त्या त्या रागाचं संपूर्ण स्वरूप ती रसिकमनात रुजवायची. विवाहबंधनात स्वत:ला बांधून न घेता तिने आपलं सर्वस्व गानकलेला समर्पित केलं. 
१९७३ साली डॉक्टरांनी कमल आत्याच्या ब्रेन ट्युमरचं निदान केलं.  त्यानंतर तिच्या स्मरणशक्तीवर या आजाराचा विपरीत परिणाम होत गेला. परंतु या असाध्य व्याधीचा तिच्या संगीतावर मात्र कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही. तिचं गाणं हे शेवटपर्यंत अबाधित व टवटवीत राहिलं. या आजारानंतर शास्त्रीय संगीताच्या मैफिली तिला करता आल्या नाहीत पण तिची संगीत शिक्षिकेची भूमिका तिच्यापासून हा आजारही हिरावून घेऊ शकला नाही. या धक्क्याने खचून न जाता यानंतरची जवळजवळ वीस-बावीस वर्षे ती संगीत अध्यापनाचे काम तितक्याच निष्ठेने आणि जिद्दीने करत राहिली.  तिचा स्वत:चा असा संसार जरी नसला तरी तिच्या संगीतरज्जूंनी बांधलेल्या आप्तांची,स्नेह्यांची,शिष्यांची संख्या कायम मोठीच राहिली. 

गानतपस्विनी मोगूबाईंबद्दल कमल आत्याला अतीव आदर! याच संदर्भातील कमल आत्याची एक अतिशय हृद्य आठवण आहे. या आजारामुळे तिची स्मरणशक्ती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळेस तिला मोगुबाई भेटायला आल्या. मी गाणं विसरले तर? असा प्रश्न न राहवून कमल आत्याने मोगूबाईंना विचारला. अगं, विसरलीस तर मी तुला पुन्हा नव्याने शिकवीन, त्यात काय एवढं? मोगूबाईंनी वत्सलतेने तिचा हात हातात घेत म्हटलं. पण मला शंभर टक्के खात्री आहे की तू गाणं विसरणार नाहीस आणि हे मोगूबाईंचे शब्द अक्षरश: खरे झाले. आपल्या शारीरिक असमर्थतेवर धैर्याने आणि जिद्दीने मात करत ती शेवटपर्यंत संगीताशी एकनिष्ठ राहिली. 
कमल आत्याच्या एकसष्टीनिमित्त तिच्या शिष्यपरिवाराने दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे जो शानदार सोहळा आयोजित केला होता, त्या समारंभास ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या जातीने उपस्थित होत्या. कमल आत्याच्या गानतपस्येला मिळालेली संगीतप्रांतातील ज्येष्ठांची ही खरीखुरी दादच होती. 
अशा या माझ्या आत्याच्या जिद्दीला माझा मनापासून सलाम! 

( कमल आत्या गेल्यानंतर १३ मे १९९५ रोजी मी तिच्यावर "समर्पित वृत्तीची जिद्दी गायिका" हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये लिहिला होता)

No comments:

Post a Comment