Wednesday 30 May 2012

पन्नाशी onwards........


निसर्गाच्या सेलवरून SMS येतो 'हाफ सेंच्युरी'
अन कालचक्राच्या 'Big Bazar' मध्ये आपण
Out dated product सारखे वाटायला लागतो ......
आपल्या केसांना पांढऱ्या रंगाचं लेबल लागलेलं असतं
आपले 'रिफ्लेक्सेस' स्लो होतात    
'आयला', 'च्यायला' शब्दांची आतषबाजी करायला आपण कचरतो 
आपल्यावर वर्षानुवर्षांच्या परंपरांची धूळ साचलेली असते
अनुकरणीय वास्तवाची आपण धास्ती घेतलेली असते
पुढचा येणारा बॉल गुगली असेल की यॉर्कर
या विवंचनेत आपल्या रात्री खराब होतात
सौदर्याच्या अनेक साईट्स आपल्यासाठी क्लोज होतात   
आपण काळज्यांच्या गेरूने, चिंतांच्या रंगात रांगोळी चितारतो
बी.पी., डायबेटीस यांची महिरप आपल्या ताटाभोवती साकारतो
बिनधास्तपणाच्या डोंगरावर चढताना आनंदाचा प्राणवायू विरळ होतो
उन्मेषाच्या पावसात न्हाताना सर्दीचा बहाणा सबळ होतो
आजकालची पोरं, तरुण पिढी, कलियुग 
अमके तमके पोक्त शब्द आपली हत्यारे बनतात
'आमच्यावेळी असं नव्हतं' अशा टिपिकल वाक्यांच्या 
त्सुनामी व्हेव्ह्ज तयार होतात
शीर्षकं बदलतात, मायने बदलतात
मजकूर बहुधा तोच असतो
पन्नाशी नंतरचा आलेख
इकडून तिकडून तोच असतो
फुलांचं उमलणं, झाडांचं बहरणं
आपण कितींदा पाहिलेलं असतं?
नदीचं खळखळणं, झऱ्याचं झुळझुळणं 
आपण कितींदा ऐकलेलं असतं? 
रवीशंकरची सतार, विश्वमोहनची गिटार 
ऐकायची राहून गेलेली असते
चित्रांची मांडणी, शिल्पांची धाटणी
बघायची राहून गेलेली असते 
हौसेच्या वाक्या, छंदांचे तोडे 
मिरवण्यासाठी वय नसतं
स्वप्नांच्या मखमली बिछायतीवर  
पहुडण्यासाठी वय नसतं 
हसण्याच्या कलेचं कोचिंग नसतं 
जगण्याच्या कलेचं टीचिंग नसतं 
सृष्टीच्या युनिव्हर्सिटीत 
स्वानंदाच्या झाडाखाली 
भविष्याच्या आशेवरती
आपण फक्त करायचं सर्फिंग असतं .  


Sunday 27 May 2012

स्पर्धा

'पळा पळा कोण पुढे पळे तो' नावाचे एक नाटक होते. आजच्या जीवनशैलीला अगदी अनुरूप असे हे शीर्षक आहे. मूल शाळेत जाऊ लागते आणि या स्पर्धात्मक युगाला सुरवात होते. मुलांना शाळेत पोहोचवायला आलेल्या आया किंवा मुलांना स्कूल बसपर्यंत पोहोचवून घरी जाणाऱ्या आया यांच्यामधील चर्चेचा विषय असतो मुलांचे मार्क्स. दुसऱ्या मुलाच्या मार्कांच्या तुलनेत आपल्या मुलाला मार्क जास्त आहेत का कमी हे पाहणे हा बऱ्याच आयांचा छंद असतो. मग आपल्या मुलाला त्या मुलापेक्षा कमी मार्क  आहेत हे समजताच खट्टू होणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळाल्यास आनंदित होणे असे बालिश प्रकार या आया करत असतात.
हे बघ या परीक्षेत तुला त्या अनुपपेक्षा थोडे कमी मार्क आहेत पण पुढच्या परीक्षेत हे चालणार नाही हं. तुला त्याच्यापेक्षा एक मार्क जरी जास्त असेल तरी मला आनंदच होईल हे स्पर्धेचे विचित्र बाळकडू आईच मुलाला पाजत असते. माझी मुलगी शाळेत असतानाची ही गोष्ट आहे. तिच्या वर्गात एक दाक्षिणात्य मुलगा होता. हुशार होता पण त्याच्या आईची अशी अपेक्षा होती की त्याने सर्व परीक्षांत पहिला नंबर पटकवावा. जेव्हा जेव्हा त्याचा दुसरा अथवा त्याहून मागे नंबर यायचा तेव्हा ती त्याला बडवत असे. इतर मुलांबरोबर खेळायला सोडत नसे. इयत्ता फक्त पाचवी. दुसऱ्या एका मुलीची आई तिच्या मुलीला अमक्या अमक्या प्रश्नाला त्याच्यापेक्षा किंवा तिच्यापेक्षा अर्धा मार्क कमी का मिळाला यावरून तिच्या वर्गशिक्षिकेशी अकारण हुज्जत घालत असे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. मुळात ही अशा प्रकारची स्पर्धा कशासाठी? याचा कुणालाही विचार करावासा वाटत नाही हीच खेदजनक गोष्ट आहे.  
आठवी, नववी, दहावी या इयत्ता तर अशा स्पर्धांसाठी जणू काही राखूनच ठेवलेल्या असतात. आपल्या मुलाचे शाळेतील आणि क्लासमधील परीक्षेत मिळालेले मार्क हा चर्चा करण्यासाठी एक चविष्ट विषय असतो. मूल हुशार असेल तर ही स्पर्धा अधिक तीव्र होते. ज्यांची मुले पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमात हुशार नाहीत (म्हणजेच मार्कांनी मागे आहेत) त्या मुलांचे पालक या स्पर्धात्मक चर्चेतून आपोआपच बहिष्कृत होतात. आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळालेले मार्क हा ज्याच्या त्याच्या प्रतिष्ठेचा, इभ्रतीचा विषय होऊन बसतो. 
दहाव्वी उत्तीर्ण झाल्यानंतर याच मार्कांच्या तुलनेनुसार विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो. अव्वल येण्यासाठी ही मुले आणि विशेषकरून त्यांचे पालक जीवाचा आटापिटा करत राहतात. माझी मुलगी दहाव्वीला बसली होती. रिझल्टचा दिवस होता. शाळेत मार्कशीट्स दिल्या जात होत्या. तिच्या एका मैत्रिणीला ऐशी टक्के मिळाले. त्या कुटुंबाचा एका कुटुंबाशी घरोबा होता. त्या कुटुंबातील मुलाला तिच्यापेक्षा चार टक्के अधिक मिळाले. झाले. तिच्या आईला हा प्रश्न पडला की दोघेही एकाच क्लासला जाऊन त्या मुलाला हिच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेच कसे? त्या बाई पुन्हा पुन्हा अविश्वासाने दोघांच्या मार्कशीट्स डोळ्यांखालून घालत होत्या. ह्या त्यांच्या मनातील सततच्या स्पर्धेने मुलीच्या रिझल्टचा आनंदही नासवून टाकला. 
का आपण सतत करत राहतो ही स्पर्धा? प्रत्येक मूल वेगळे असते हे आपल्या मनाला समजत नाही की ते आपल्याला समजून घ्यायचे नसते? प्रत्येक मुलासाठी एक वेगळे क्षितीज असते. त्या क्षितिजापर्यंत आत्मविश्वासाने पोहोचण्यासाठी त्याला आप्तांची साथ हवी असते. त्यांचा भक्कम पाठिंबा, त्यांचे प्रोत्साहन हवे असते. आपण इतरांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याला किंवा तिला घरच्यांचे पाठबळ हवे असते. त्याचे किंवा तिचे मनोबल खच्ची न होऊ देणे ही जबाबदारी सर्वस्वी मातापित्यांची असते. इतरांच्या मुलांबद्दल सतत असूया बाळगून, त्यांचा हेवा करून, द्वेष करून आपल्याला आपल्या मुलाला मोठे करता येत नाही. परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आपले मूल इतर मुलांच्या योग्यतेचे नाही असे समजणे हा तर एक गुन्हाच आहे. अनेक पालक सातत्याने आपल्या मुलांचा पाणउतारा करण्यात धन्यता मानतात. आपण कळत नकळत आपल्या मुलाच्या मनात न्यूनगंडाचे बीज पेरतो आहोत हे त्या आई-वडिलांच्या ध्यानीमनीही नसते. अशा अपमानास्पद अनुभवांनंतर ' I am fit for nothing' अशी अनेक मुला-मुलींची धारणा होते. 
हीच मुले पुढे नोकरी-व्यवसायात पदार्पण करतात. आपापल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी धडपडतात. काहींचा  मार्ग सुकर असतो तर काहींचा खडतर. काहींची भरारी गगनाला गवसणी घालते तर काहींची उडी थोडी थिटी पडते. प्रयत्नांनाही दैवाची, नियतीची जोड लागते हे मान्य करण्यास अनेकजण कचरतात. जी मुले अल्पावधीतच यशाची शिखरे सहज गाठतात त्यांना दैव, नियती नावाची गोष्ट मान्य नसते. आपण लाथ मारू तिथे पाणी काढू हा फाजील विश्वास त्यांच्या ठायी निर्माण झालेला असतो. यालाही अपवाद मुले, माणसे असतात , नाही असे नाही पण बोटावर मोजण्या इतकीच! या सो कॉल्ड हुशार म्हणून गणल्या जाणाऱ्या मुलांचा अहंगंड त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी, नात्यातल्यांनी चांगलाच पोसलेला असतो. ही मुले खूप शिकतात, उच्चपदस्थ होतात, परदेशी जातात, गडगंज पैसा कमावतात पण माणुसकी, सहृदयता नावांच्या गोष्टींपासून अस्पर्श राहतात, अलिप्त राहतात. 'मी म्हणेन तीच पूर्व दिशा' हा त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र होतो.  
अशा माणसांची मग इतरांना, त्यांच्या नोकरी-व्यवसायाला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती बळावते. अशा एखाद्या कमी शिकलेल्या किंवा कमी कमावणाऱ्या मित्राची यांना लाज वाटू लागते. त्याच्यासमवेत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण त्याच्या स्मृतीतून आता कायमचे हद्दपार झालेले असतात. आपला हा मित्र सर्वस्वी निकम्मा आहे किंवा त्याच्या अभ्यासातील बिन-हुशारीमुळे त्याचे आयुष्य फुकट गेले असा एक सोयीस्कर समज ही माणसे आपल्या आपणच करून घेतात.  वास्तविक पाहता हा मित्र ज्या क्षेत्रात काम करतो त्याची यांना सुतराम माहिती नसते आणि ती करून घ्यायची यांना गरजही वाटत नाही. तो जे काही कमावतो त्यात तो आनंदात असतो पण ही माणसे मात्र आपण या वयात इतरांपेक्षा खूप जास्त कमावतो या आसुरी आनंदात त्यांचे आयुष्य व्यतीत करत असतात.  
एक पाठ्यपुस्तकीय गोष्ट मला आठवते. दोन जिवलग मित्र असतात. एक शहरात जाऊन शिकून मोठ्ठा अधिकारी होतो आणि एक त्याच गावात राहून नावाड्याचे काम करतो. या दोघांच्या कर्तबगारीत जमीन-अस्मानाचे अंतर असते. एकदा हा शिकलेला मित्र त्याच्या गावी येतो. पण त्याचे घर पैलतीरावर असते. तो मित्राच्या नावेतून घरी जाण्यास निघतो. त्याला स्वत:च्या शिक्षणाचा कोण अभिमान असतो. तो त्याला पाठ्यपुस्तकीय अभ्यासाचे दाखले देऊन, तुला हे येत नाही ना मग तुझा पाव जन्म फुकट, अर्धा जन्म फुकट , पाउण जन्म फुकट असे सारखे हिणवत राहतो. मित्र शांत राहतो. एवढ्यात जोराचे वादळ येते. नाव डुगडूगायला लागते. काय रे तुला पोहता येते का? हा प्रश्न तो त्याच्या उच्चशिक्षित मित्राला विचारतो. मित्र नाही असे म्हणतो. यावर मग तर तुझा सगळाच जन्म फुकट असे तो नावाडी मित्र म्हणतो. नाव बुडू लागते. मित्र गटांगळ्या खाऊ लागतो. अखेरीस त्याला आपल्या फोल विचारसरणीची प्रचीती येते. नावाडी मित्र त्याला आपल्या पाठीवर घेऊन सुखरूपपणे त्याच्या घरी पोहोचवतो आणि तो उच्चविद्याविभूषित मित्र जीवनदान दिल्याबद्दल त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानतो.   
आयुष्यात प्रत्येकाने आपापल्या वकुबाप्रमाणे प्राप्त केलेली विद्या ही कनिष्ठ श्रेणीची कधीच नसते ही साधी गोष्ट पाठ्यपुस्तकातील हा धडा वाचूनही ज्यांच्या अंगवळणी पडत नाही त्यांचा जन्म सार्थकी लागला असे तरी कसे म्हणायचे? 

Saturday 26 May 2012

पालक-शाळा-कोचिंग क्लासेस--एक जळजळीत वास्तव

आमच्या वेळेस म्हणजे साधारण १९७५-७६ साली एखादा मुलगा वा मुलगी कोचिंग क्लासेसला जात असेल तर  तो किंवा ती अभ्यासात बरी नसावी असा एक सर्वसामान्य निष्कर्ष निघत असे. 'ढ' किंवा 'सुमार' ( ही लेबलेही आपणच आपल्या सोयोसाठी लावत असतो) विद्यार्थ्यांसाठी शाळेबाहेरील क्लासेस ही एक सोय होती. शालान्त  परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून मग ही मुले अशा क्लासेसचा आधार घेत असत.  पण आज मात्र ह्या कोचिंग क्लासेसची व्याख्या पूर्णांशाने बदलली आहे. आज जो कोचिंग क्लासला जात नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे. अशा विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मित्र-मैत्रिणींकडून बहिष्कृततेची वागणूक मिळते. शिक्षक आणि इतर पालकांच्या नजराही याबाबतीत बोलक्या असतात. आपण कोचिंग क्लासला जात नाही म्हणजे आपण काही गुन्हा केला आहे अशी भावना मनात बाळगून ही मुले ते दहाव्वीचे वर्ष जगत असतात. 
माझी धाकटी मुलगी २००३-२००४ साली दहाव्या इयत्तेत गेली. मी पहिल्यापासूनच ठरवले होते की तिला कोणत्याही क्लासला घालायचे नाही. ती वृत्तीने अभ्यासू होती. फक्त तिच्यात योग्य आत्मविश्वासाचा अभाव होता. गणित याविषयाची मुख्यत्वेकरून बीजगणित या विषयाची तिला थोडी धास्ती होती. नियमित अभ्यास केलास आणि लिहिण्याचा सराव ठेवलास तर तुला परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही हे मी तिला सांगितले होते. मे महिन्याच्या सुट्टीतच तिच्या अभ्यासाचे एक वेळापत्रक आखून मी तिचा थोडा थोडा अभ्यास घेऊ लागले. धडा वाचून महत्वाच्या गोष्टी अधोरेखित करणे, कठीण गणिते पुन्हा पुन्हा सोडवणे, पेपर लिहिण्याचा सराव करणे व अमुक एक प्रश्न सोडवण्यासाठी वेळेचे नियोजन करणे इत्यादी गोष्टी मी तिला शिकवल्या.  शाळेतील मिड-टर्म एक्झाम्स जवळ आल्या होत्या. तू कोणत्याही क्लासला जात नाहीस त्यामुळे तुला निश्चित कमी मार्क मिळणार असे तिच्या जवळच्या म्हणवणाऱ्या मैत्रिणींनी तिला छातीठोकपणे सांगितले होते. माझी मुलगी शाळेतून घरी यायची तीच हिरमुसली होऊन. जणू काही क्लासला न जाऊन ती मोठ्ठा अपराधच करत होती.   मैत्रिणींच्या अशा वागणुकीने ती काही वेळेस रडवेली होत असे. पण मी आणि माझ्या मोठ्या मुलीने तिला वेळोवेळी खूप धीर दिला. समजावून सांगितले. अखेरीस मिड-टर्म परीक्षेचा निकाल लागला आणि माझ्या मुलीला त्यात चांगले मार्क मिळाले. मैत्रिणींची तोंडे आपोआप बंद झाली. माझी मुलगी ही त्यांच्या वर्गात क्लासला न जाणारी एकमेव मुलगी होती. तिच्या वर्गशिक्षिकेनेही तिचे कौतुक केले. तिचा आत्मविश्वास वाढला. आता ती अधिक जोमाने अभ्यास करू लागली. कोणत्याही क्लासला न जाता शालान्त परीक्षेत तिला ८३% मिळाले. तिच्या काही मैत्रिणींना मात्र प्रश्न पडला की आपण जर क्लासला जात होतो तर मग तिच्यापेक्षा  आपल्याला कमी मार्क कसे मिळाले? 
मला वाटते ही प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणत्याही कोचिंग क्लासच्या जाहिरातबाजीला बळी न पडता आपण नियमित आणि व्यवस्थित अभ्यास केला तर सहज चांगले मार्क मिळू शकतात. अर्थात प्रत्येकाची चांगल्या मार्काची व्याख्या ही भिन्न असू शकते. प्रत्येक मूल प्रत्येक विषयात पारंगत असणे शक्य नाही. आपल्या मुलाचा जो विषय थोडा कच्चा आहे असे आपल्याला व त्याला वाटते त्या विषयापुरते त्याला मार्गदर्शन करणे हे उचित आहे. पण सरसकट सगळे विषय त्याला कंटाळा येईपर्यंत शाळेत आणि क्लासमध्ये परत परत शिकायला लावणे हा अन्याय आहे. त्याला किंवा तिला वैयक्तिक मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. पण शाळा संपल्यावर क्लास नामक दुहेरी शाळेत त्याला किंवा तिला ढकलून मुलांचा वेळ वाया घालवण्याचे कार्य बरेच पालक मात्र निष्ठेने पार पाडत असतात. 
बहुतांश कोचिंग क्लासेसना त्यांच्या क्लासचे नाव उज्ज्वल करणारे हिरे हवे असतात. कारण या गुणी मुलांच्या मार्कांच्या जोरावर त्यांच्या क्लासचे भविष्य अवलंबून असते. घरीदारी तू अजून मार्क मिळव, या परीक्षेत नव्वद टक्के मिळाले  आहेत यावर समाधान न मानता पंच्याण्णव टक्के कसे मिळवता येतील ते बघ असा उपदेश वडीलधारयांकडून सतत केला जातो. ( विशेष म्हणजे ह्या मुलांच्या पालकांना शाळेत कधीही उत्तम मार्क मिळालेले नसतात) शाळेतही शिक्षक ही परीक्षा नसून हे एक युद्ध आहे हे लक्षात असू द्या आणि जास्तीत जास्त ( म्हणजेच शंभराला दोन-तीन टक्के कमी) मार्क मिळवून दुसऱ्यांना ( इतर शाळांना) नेस्तनाबूत करा आणि आपल्या शाळेचे नाव मोठे करा असा मौलिक संदेश वेळोवेळी देतच असतात.  
नववी संपवून तुमचे मूल दहाव्वीत पदार्पण करते आणि अनेक नामवंत क्लासेसकडून प्रवेशाबाबत विचारणा होते. तुमच्या मुलाला ऑलरेडी चांगले मार्क मिळाले असतील तर क्लासवाल्यांच्या दृष्टीने ही एक नामी संधी असते. '८५ टक्के आहेत ना, मग आमच्या क्लासमध्ये घाला नव्वदच्या वर मिळण्याची हमी आम्ही देतो किंवा यावर्षी नव्वद टक्के मिळालेत ,आमच्या क्लासला आल्यावर दहाव्वीत हमखास ९५-९६ टक्के मिळतील.' या क्लासवाल्यांच्या गोड आर्जवाला भुलून पालक पाल्याचे कल्याण करण्यासाठी त्याला वा तिला त्या क्लासमध्ये घालतात. आजकाल ७० ते ८० टक्के मिळवणारी मुले कमी गुणवत्तेची समजली जातात आणि त्याखाली टक्के मिळवणारी मुले ही कोणाच्या खिजगणतीतही नसतात.  
शाळेचे साडेपाच-सहा तास आणि त्यानंतर क्लासचाही जवळजवळ तेवढाच वेळ मुले फक्त खर्डेघाशी करत असतात. घराच्या मंडळींना अभ्यास या एका शब्दाशिवाय दुसरे काही सुचत नाही. शाळेतील शिक्षक शाळेचा शंभर टक्के निकाल लागावा यासाठी मुलांच्या डोक्यावर प्रेशरची तलवार सतत टांगती ठेवतात. क्लासमधील शिक्षक खूप मेहनत करा, जास्तीत जास्त मार्क मिळावा, आपल्या क्लासचे नाव रोशन करा हे मुलांवर सातत्याने बिंबवत राहतात. शाळा -क्लास आणि घराबाहेरील रम्य विश्व मुलांना कितीही खुणावत असले तरी घाण्याला जुंपलेल्या बैलांप्रमाणे ही मुले अहोरात्र या अभ्यास नामक चक्रव्यूहात अडकलेली असतात.  दोन-तीन खाऊचे डबे देऊन आणि जबरदस्तीने दूध प्यायला लावून मुलांना दिवसभरासाठी पिटाळले जाते. शाळा आणि क्लास या दुहेरी कटकटीतून दमूनभागून घरी आलेली मुले जरा कुठे विसावतात. पण त्यांचे हे भाग्य त्यांच्यापासून अनेकदा हिरावून घेतले जाते आणि त्यांना होमवर्क नामक गोष्टीला जुंपले जाते. ही वस्तुस्थिती आहे. 
मूल दहाव्वीत गेले की त्याच्यासाठी सर्व करमणूकांचे दरवाजे बंद होतात. टी.व्ही. बंद, मैदानी खेळ बंद, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरणे बंद, फोन बंद, सर्व छंद बंद. त्यांनी फक्त दिवस-रात्र अभ्यासाला वाहून घ्यायचे. कारण पालकांची कॉलर ताठ करायची जबाबदारी त्यांची असते, शाळा आणि क्लासच्या नावाचा झेंडा अटकेपार नेण्याची जबाबदारी त्यांचीच असते. त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या परिश्रमाच्या, मेहनतीच्या सुरस कथा वृत्तपत्रांतून प्रकाशित होणार असतात, पुष्पगुच्छांनी त्यांची घरे ओसंडून वाहणार असतात, त्यांच्या मुलाखती वाहिन्यांवरून प्रसारित होणार असतात, राजकीय, सामाजिक वर्तुळात त्यांच्या हुशारीच्या कथा रंगणार असतात, भविष्याची सोनेरी दालने त्यांना आपसूक खुली होणार असतात, त्यांची कारकीर्द आंतरराष्ट्रीय भरारी घेणार असते. 
दहाव्वीत गेलेल्या मुलाला अथवा मुलीला एक मनही असतं हे सोयीस्कररित्या विसरण्यात सगळ्यांना आनंद असतो. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना इतरही काही विश्व असतं पण या विश्वाशी इतरांना काही देणं-घेणं नसतं. पाल्याने आपल्या मनाप्रमाणे वागावे असे पालकांना वाटते, विद्यार्थ्याने शाळा किंवा क्लासचे नाव उज्ज्वल करावे असे शिक्षकांना वाटते पण त्या मुलाला किंवा मुलीला काय वाटते याचे सोयरसुतक मात्र कुणालाच नसते. 
अभ्यासाचा, अपेक्षांचा भार दिवसेंदिवस वाढत जातो, चरकातून पिळून निघाल्याचा अनुभव मुलांना येत राहतो, पालकांच्या, शिक्षकांच्या अवास्तव आकांक्षांचे ओझे नकोसे वाटू लागते.  फुलपाखरासारखी भिरभिरणारी रंगीबेरंगी युवावस्था अर्थहीन, रसहीन वाटू लागते. आणि अशा प्रचंड निराशेच्या गर्तेत सापडलेल्या कुणा विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला केमिस्टच्या दुकानातील त्या झोपेच्या गोळ्यांची बाटली खुणावू लागते जी तिला या सगळ्या ताणापासून चिरमुक्ती देणार असते.   
पाहा विचार करा.

Friday 25 May 2012

व्यथासूक्त

महागाईने केले सामान्यांना बेजार 
सरकारला भाववाढीचा जडला आजार 
गरिबांच्या तोंडचे पळाले पाणी
गायची आता त्यांनी अश्रूंची गाणी 
श्रीमंतांच्या महालात विजेचा चमचमाट 
गरीबाच्या झोपडीत उजेडाचा नायनाट
उच्चभ्रू घरांमधून खळखळते पाणी 
गरीबाच्या नळाची कोरडीठक्क वाणी  
भाज्या-डाळी-पेट्रोल-फळे उंच भाव जाती
सामन्यांच्या खिशाचे रोज बारा वाजती
नित्य वस्तू गरजेच्या कशा काय टाळाव्या?
मुठी फक्त रागाने घट्ट आवळाव्या ?
अर्थहीन चर्चा अन अर्थहीन वाद 
जनांपुढे उभा रोज नवा छळवाद 
राजकारणी चरकातून जनतेची पिळवणूक 
आश्वासने भरमसाट बघून निवडणूक
नव्या बांधकामांची महाकाय भूक
रयतेला नाडले तर झाली कुठे चूक?
नैसर्गिक संपत्ती लुटा-तोडा-बुजवा 
उघडणारी तोंडे आता पैशांनी मिटवा 
कर्जाचा असुर घाले विळखा देशाला
बुलडोझर महागाईचा छिन्न करी मनाला 
दारू-बाई-बाईक अन रेव्ह पार्ट्या धुंद
पैसेवाल्या तरुणांचे बीभत्स छंदफंद 
खून-लुटमारीने पोखरला देश
आत्महत्यांचा दारोदार हैदोस 
गळाठले भान आणि सारासार शक्ती
भ्रष्टाचारी बडव्यांनी नासवली भक्ती
बेकारी-लाचारी नागविते मानव
नाईलाजापोटी मग आकारतो दानव
स्त्री-भ्रूणहत्या अन शोषण बाल्याचे 
हळहळती क्षणिक फक्त घोळके षंढांचे 
 चंगळ-भोगांची चिपडे चढती डोळ्यांवर
बासनात सत्वाला लागली घरघर 
स्व-स्वरूप ब्रम्हाला नाचविते माया
येईल कोण आता माय-भू ताराया? 

Wednesday 23 May 2012

स्वातंत्र्य आणि स्त्री - एक चिकित्सा

स्त्रियांवर होणारे अनन्वित अत्याचार पाहता आज या कलियुगातही पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व पावलोपावली जाणवते. अत्याचार शारीरिक असो वा मानसिक, त्याचे व्रण आजन्म पुसले जात नाहीत. लहान कोवळ्या मुलींवर शारीरिक जबरदस्ती करणे, त्यांच्याकडून त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त कामे करून घेणे, आहार आणि शिक्षणाच्या बाबतीत मुलामुलीत भेदभाव करणे, मुलींच्या मर्जीविरुद्ध त्यांची लग्ने लावणे वा त्यांना विकणे, हुंड्यासाठी मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, प्रसंगी तिचा जीव घेणे अथवा तिला आत्महत्त्या करावयास भाग पाडणे हे प्रकार प्रगतीपथावर असलेल्या भारत देशात आजही सर्रास घडत असतात याचा खेद वाटतो. 
आज भारताला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्षे लोटली तरीही स्त्रियांना मिळणारे स्वातंत्र्य अतिशय संकुचित आहे. अनेक स्त्रिया अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. जिथे दोन वेळेच्या खाण्यापिण्याची भ्रांत आहे तिथे शिक्षणाची गोष्ट तर चार हात लांबच आहे. या देशातील अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याने आर्थिक दृष्ट्या परावलंबी असणाऱ्या स्त्रियाच संख्येने जास्त आहेत. अजूनही 'चूल आणि मूल' या चाकोरीतून बाहेर पडून स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्या स्त्रिया मोजक्याच आहेत. शिक्षण नाही. नोकरी नाही. कमाई नाही. अशा परिस्थितीत पडतील ती कामे करून दोन घास कसेबसे गिळणाऱ्या आणि नवऱ्याचे अत्याचार निमुटपणे सहन करणाऱ्या स्त्रिया संखेने खूप आहेत. 
एका गोष्टीचे मात्र खरोखर आश्चर्य वाटते की शहरी भागातील स्त्री ग्रामीण भागातील स्त्रीपेक्षा सुशिक्षित, कमावती असूनही तिच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत. बऱ्याच सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांच्या घरात स्त्रीला मात्र समान दर्जा दिला जात नाही, अधिकार दिले जात नाहीत. घरातील लहानसहान गोष्टींसाठीही तिला घरातील कर्त्या म्हणवणारया पुरुषावर अवलंबून राहावे लागते. घरखरेदी, फर्निचर, विद्युत उपकरणे, बँक व्यवहार आदींच्या बाबतीत तिचे मत ग्राह्य धरले जात नाही. एखादी वस्तू आवडली तरी ती खरेदी करण्यासाठी तिला तिच्या अहोंची परवानगी घ्यावी लागते.कामावरून थकूनभागून आलेल्या पुरुषाला घरी आल्यानंतर विसावण्याची, पेपर वाचनाची, टी.व्ही. बघण्याची मुभा असते पण कामावरून आलेली स्त्री मात्र घरी आल्या आल्या स्वयंपाकघरात शिरते. चहा करते, खाण्याचा पदार्थ करते आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागते. मुलांचा अभ्यास घेण्याची जबाबदारीही तिलाच पार पाडावी लागते. रात्री बिछाने घालून तिचे दमलेले शरीर झोपेच्या आधीन होण्याआधी पतीच्या स्वाधीनही करावेच लागते. दुसऱ्या दिवशी सकाळची कामाची लगबगही तिच्या माथी लिहिलेली असते. कुठे आहे स्त्री-पुरुष समानता? स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळत नसते तर ते प्राप्त करून घ्यावे लागते हा धडा आपण इतिहासातून शिकलोच आहोत. तेव्हा स्त्रियांना स्वातंत्र्य, अधिकार, दर्जा, समानता ह्या गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी प्रयत्नही त्यांनीच करायला हवेत. 
इथे स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असा अभिप्रेत नाही. मी सोदाहरण सांगते. घरातील कोणती कामे मी करणार हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीला हवा. ती जरी एखाद्याची पत्नी आहे, सून आहे, मुलगी आहे किंवा आई आहे तरीही ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचा विसर इतरांना पडता कामा नये. तिच्या स्वत:च्या इच्छांना, आकांक्षांना तिलांजली देत तिने इतरांची मर्जी सांभाळणे अजिबात बंधनकारक नाही. तिला सदासदैव गृहीत धरणे हे अतिशय चुकीचे आहे. तिच्यावर मालकी हक्क गाजवणे हा अक्षम्य गुन्हा आहे. 
स्त्रियांनीही त्यांची मुळमुळीत, कचखाऊ वृत्ती सोडायला हवी. सर्वप्रथम तिचा आर्थिक पाया भक्कम हवा. नवरा कितीही पगार घेत असू दे, तिने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. साड्या नेसायच्या की ड्रेसेस घालायचे, कोणते दागिने अंगावर घालायचे याचा निर्णय तिनेच घ्यायला हवा. आपल्या पगारातील किती हिस्सा घरखर्चासाठी द्यायचा हा ही निर्णय सर्वस्वी तिचाच असायला हवा. काही कामांच्या समान वाटण्या होणे गरजेचे आहे आणि स्त्रीच्या स्वास्थ्यासाठी ते हितकरही आहे. तिला काही नवीन शिकवायचे असल्यास त्यासाठी इतरांच्या परवानगीची तिच्यावर सक्ती असता कामा नये. लग्न झालेल्या स्त्रीचे सगळे आयुष्य फक्त नवऱ्यासाठी, मुलांसाठी आणि सासरच्यांसाठी असते ही व्याख्या बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तिचे आयुष्य तिच्या स्वत:साठीही तितकेच महत्वपूर्ण असते हे इतरांनी समजायला हवे. तिच्या वैयक्तिक आवडीनिवडी, छंद तिने जपायला आणि जोपासायला हवेत. घर आणि ऑफिस याभोवती एकवटलेले तिचे विश्व तिने स्वत:हूनच व्यापक करायला हवे. मित्र-मैत्रिणींबरोबर  संवाद, सहली घडायला हव्यात. घराच्या जबाबदाऱ्यांची योग्य वाटणी झाल्यानंतर तिच्या वाटणीला पुरेसा वेळ यायला हवा.   
तिच्या मतांचा घरच्यांनी आदर करणे गरजेचे आहे. काही बाबतीत मतभेद असू शकतील पण तिच्या विचारांची कदर करता यायला हवी. लहान मुले ही सर्वसाधारण मोठ्यांचे अनुकरण करत असतात. आपले आजी-आजोबा, काका-आत्या, बाबा आईला मान देत नाहीत, तिला वाट्टेल ते बोलतात हे मुले पाहतात. आई असल्याने मुले तिच्याविषयी हळवी होऊ शकतात पण ही मुले पुढे स्वत:च्या पत्नीशी अशीच कशावरून वागणार नाहीत? काही मुले तर आईचा सदैव अपमान करत असतात. तिला, तिच्या मतांना, विचारांना तुच्छ लेखतात. त्यांच्या वडिलांच्या आचरणाने ती प्रभावित झालेली असतात. किंबहुना असे वागणे म्हणजेच योग्य वागणे अशी त्यांची धारणा होते. 
बऱ्याच वेळा स्त्रीच्या गुणांचा उल्लेख फक्त तिच्या पाककलेसंदर्भातच होत असतो. म्हणजे माझी बायको स्वयंपाक छान करते, तिला वेगवेगळ्या डिशेश बनवता येतात, ती नॉन-व्हेज जेवण उत्तम करते इत्यादी. ह्या स्तुतीसुमनांमागे तिचा सीमित परिघही अधोरेखित होत असतो. त्यामुळे तिचे इतर क्षेत्रातील गुण सहसा इतरांसमोर प्रदर्शित होत नाहीत. विवाह इच्छुक स्त्रीने गृहकृत्यदक्ष असावे असा मुलाकडच्यांचा आग्रह असतो. पण आपल्या मुलानेही घरी येणाऱ्या सुनेच्या गृहकृत्यांचा काही भार उचलावा असे किती जणांना मनापासून वाटते? त्याच्या व्यावसायिक कर्तृत्वाचे कौतुक जळी-स्थळी होत असते पण तिला मिळालेल्या प्रमोशनमुळे किती नवरे खरोखरीच सुखावतात? ही संशोधनाची बाब आहे. 
घरचे काम संपवून ती जरा टेकते. तिला टी.व्ही. बघावासा वाटतो पण तिच्या हातात रिमोट कंट्रोल देणे हे बऱ्याच नवरोबांना कमीपणाचे वाटते. मी जे बघतो आहे ते तिनेही निमूटपणे बघावे असे त्यांना वाटते. तिच्या हातात शेवटपर्यंत रिमोट येत नाही आणि ती कंटाळून आत निघून जाते. बिछाने घालून पुस्तक वाचत पडते. टी.व्ही. बघून नवऱ्याचे मन भरले की तोही आत येतो. तिच्या पुस्तक वाचनाची पर्वा न करता दिवा मालवतो आणि तिला जवळ ओढतो एखादी हक्काची वस्तू ओढावी तशी. ती आतल्या आत स्फुंदत राहते. धगधगत राहते. घुसमटत राहते. 
ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे. स्त्रियांनीच. आपले महत्व इतरांच्या लक्षात येत नसेल तर ते त्यांच्या सोयीस्कर बुद्धीला जाणवून देता आले पाहिजे. आपल्यासाठी आदराचे स्थान आपल्यालाच निर्माण करता यायला हवे. आपल्या स्वातंत्र्याची, आपल्या अधिकारांची जपणूकही आपल्यालाच करता यायला हवी. तरच उद्याचे अमर्याद आकाश एका सन्मान्य स्त्रीचे असेल! 

Tuesday 22 May 2012

सूडाचा प्रवास

भारत हा तरुणांची संख्या सर्वात अधिक असलेला देश आहे. हा तरुण वर्ग वेगवेगळ्या आर्थिक तसेच सामाजिक स्तरातील आहे. प्रत्येक तरुणाची जडण-घडण, शारीरिक क्षमता, वैचारिक क्षमता वेगळी आहे. या समस्त तरुणाईने स्वत:ची उर्जा विधायक कामासाठी खर्च करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. कारण ही उर्जा, ही शक्ती जर चांगल्या कामांकडे योग्य वेळीच वळवली गेली नाही तर ह्या उर्जेचा दुरुपयोग समाजविघातक कृत्यांसाठी होण्याची शक्यता जास्त बळावणार आहे. 
मुलगा किंवा मुलगी वयात येते आणि त्यांचा सामाजिक परीघ विस्तारतो. नवनवे मित्र-मैत्रिणी त्यांच्या दैनंदिन जीवनात सामील होत असतात. संगतीचा सु-परिणाम वा दुष्परिणाम होत राहतो. अनेक मुलांचे आई-वडील नोकरीनिमित्ताने संपूर्ण दिवस बाहेर असतात. प्रत्येकाच्या घरी आजी-आजोबा किंवा इतर जबाबदार नातेवाईक असतातच असे नाही. त्यामुळे आपला मुलगा वा मुलगी शाळेव्यतिरिक्त काय करतात, कोठे जातात, त्यांचे मित्र-मैत्रिणी नक्की कोण आहेत याविषयी आई-वडील पूर्णपणे अनभिज्ञ असतात. आपण मुलाकडे आपल्या नोकरीमुळे जातीने लक्ष देऊ शकत नाही या  अपराधी भावनेमुळे हे पालक त्याची भरपाई म्हणून मूल मागेल ते देतात जराही पुढचा-मागचा  विचार न करता! महागड्या वस्तू मुलांच्या झोळीत सहजगत्या पडत राहतात. वयाप्रमाणे मुलांच्या गरजाही रुंदावतात. चैनीचे, सुखासीन आयुष्य जगण्याची सवय होते. उंची हॉटेले, सिगारेट्स, दारू, गर्लफ्रेंड्स, पब्ज, वाहने या गोष्टी त्यांचे आयुष्य व्यापून टाकतात. केवळ हेच सुखाचे समीकरण आहे असे वाटायला लागते. विस्तारणाऱ्या सामाजिक वर्तुळात उच्चभ्रू समकालीनांची ओळख वाढत जाते. संदर्भ बदलतात, दृष्टीकोन बदलतात. ड्रग्जसेवनाविषयी विषयी औत्सुक्य वाटू लागते. आपणही असे एखादे थ्रील करावे म्हणून एखादा झुरका मारला जातो जो आपल्या संपूर्ण भविष्याला ग्रासायला पुरेसा ठरतो.   
मुलामुलींचे ग्रुप्स तयार होतात. बऱ्याचवेळा वैयक्तिक आवडीनिवडी, जातीय अथवा आर्थिक निकषांवर हे ग्रुप्स निर्माण होतात. शाळा, कोचिंग क्लासेस इथेही हेच ग्रुप्स वावरत असतात. आज बहुतेक शाळांमध्ये 'मार्क' हेच एकमेव उद्दिष्ट असल्या कारणाने शाळा, क्लास मधील शिक्षक मुलांच्या वा मुलींच्या ह्या इतर, अवांतर गुणांकडे दुर्लक्ष करतात. पालक अर्थार्जनात गुंतलेले, शिक्षक मार्कांच्या शर्यतीत गुंतलेले त्यामुळे शाळा आणि क्लास अटेंड केल्यानंतर ही मुले काय करतात, कुठे जातात या गोष्टीचे त्यांना सुतरामही ज्ञान असण्याची शक्यता नसते. 
एखाद्या सुंदर मुलीवरून मुलांच्या ग्रुप्समध्ये सातत्याने भांडणे होत राहतात. ह्या मुलीला प्राप्त करण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका लागते. प्रश्न प्रतिष्ठेचा होतो. त्या मुलीच्या मनातील विचार जाणून घेण्याचा मूर्खपणा कोणी करत नाही. आपल्याला ती मुलगी हवी या एकाच विचाराने या दोन्ही ग्रुप्सचे म्होरके झपाटून जातात. मग एकमेकांचा पाणउतारा करणे, अर्वाच्य बोलणे, घरच्यांचा उद्धार करणे रीतसर सुरु होते. त्या मुलीवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते. दोन्ही ग्रुप्समध्ये द्वेषभावना जागृत होऊ लागते. कुरघोड्यांना अंत राहत नाही. अखेरीस एका ग्रुपलीडरला दुसऱ्याकडून चारचौघांसमोर थोबाडीत बसते. त्याची सगळ्यांसमोर बदनामी होते. छी थू होते. अपमानाचा घाव वर्मी बसतो आणि दुसऱ्या ग्रुपलीडरला संपवण्याचे प्लानिंग सुरु होते. रात्रीच्या वेळी समेटाच्या गोष्टी बोलण्यासाठी म्हणून दुसऱ्या ग्रुपला पाचारण केले जाते. ऐन वेळी बाईकमध्ये लपवलेल्या हॉकी स्टिक्स बाहेर येतात आणि अतिशय निघृणपणे त्यांची टाळकी फोडली जातात. ग्रुपलीडर जागीच गतप्राण होतो आणि बाकीचे गंभीर जखमी होतात. हिंसक प्रवृत्तींचा विजय होतो.
आजच्या तरुण पिढीच्या विचारांचे इतके भयंकर चित्र बघून अंगावर शहारा उभा राहतो. ही काही कुणा कथाकाराची कल्पना नाही तर एक ज्वलंत वास्तव आहे. अशा पद्धतीची सुडाची भावना विकसित होण्यास काही माध्यमेही अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत. खंडणी मिळवण्यासाठी मित्राला किंवा मैत्रिणीला पळवणे व नंतर त्याची वा तिची हत्या करणे, मुलीवर सामुहिक बलात्कार करणे, मुलीने नकार दिला असता तिला विद्रूप करणे, पैशांसाठी, मालमत्तेसाठी जिवलग नातलगाचा खून करणे ह्या घटना गेल्या काही वर्षात जास्त प्रमाणात वाढीस लागल्या आहेत. टी.व्हीवर नको ती दृश्ये पाहून मनाच्या कप्प्यात बंदिस्त करणे, संगणकावर हिंस्त्र खेळ खेळणे, बोलण्यात, वागण्यात अवाजवी आक्रमकता दाखवणे, पालकांनी, शिक्षकांनी केलेल्या शिक्षेचा राग मनात धरणे आणि सूडबुद्धीने वागणे दिवसेंदिवस बोकाळत चालले आहे.     
आम्ही शाळेत असताना 'मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती' अशा घोषणा देत असू. याच संपत्तीला आता आर्थिक आणि वैषयिक कीड पोखरू लागली आहे. मुलांकडे होणारे पालकांचे दुर्लक्ष, एकटेपणा, हातात नको तेवढा खूळखूळणारा पैसा, चुकीची संगत, शिक्षकांचे मूल्याधिष्ठीत नाही तर मार्काधिष्ठीत शिकवणे यामुळे या राष्ट्रीय संपत्तीचे यथायोग्य जतन केले जात नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नितीमत्ता, शील, चारित्र्य हे शब्द कालबाह्य झाले आहेत. ज्याला त्याला लवकरात लवकर करोडपती व्हायचे आहे. कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा, मालमत्ता आणि छोकरी हासील करायची आहे. त्यासाठी आप्तांचे रक्त सांडायचीही त्यांची तयारी आहे. मित्र-मैत्रिणींची शकले करायचीही त्यांची तयारी आहे. सूडभावनेची रुजवात तरुणाईच्या मनात कधीचीच झाली आहे. आपल्याला मिळालेल्या संस्कारांची नाळ त्यांनी स्वहस्ते तोडली आहे. 
प्रत्येक देशाच्या विकासाची भिस्त तरुण पिढीवर असते. ह्या तरुणाईतूनच उद्या राष्ट्राला सक्षम नेतृत्व मिळणार असते. त्यांच्या सु-संस्कृत आचार -विचारांतूनच अनेक भावी पिढ्या उदयाला येणार असतात. देशाचे आर्थिक, वैचारिक, नैतिक स्तर उन्नत होणार असतात. गरिबी, विषमता, बेरोजगारी, निरक्षरता, जातीयवाद ह्या गोष्टी हद्दपार होणार असतात. उत्तम मूल्यांची कास धरून देश प्रगतीपथावर वाटचाल करणार असतो. पण उत्तम आचार-विचारहीन, चारित्र्यहीन, संस्कारशून्य, भोगवाद-चंगळवाद याला चटावलेली ही तरुणाई या देशापुढे कोणता आदर्श निर्माण करणार याचा विचार करण्याची आज गरज आहे.     
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जनोद्धारासाठी, समाजकल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून अरुपाचे रूप दाखवले. आज मानवी रूपातील भेसूरता अधोरेखित करणाऱ्या तरुणांनी ज्ञानेश्वरीतील विचारांचा सहस्त्रांश तरी स्वत:त रुजवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 

Thursday 17 May 2012

प्रश्न - एक सामाजिक सवय

माणसांना प्रश्न विचारायची नको तेवढी खोड असते. त्यांचं त्या प्रश्नांशी प्रत्यक्ष देणं असो वा नसो प्रश्न विचारल्याशिवाय त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  अगदी नवजात अर्भकाच्या संदर्भातही, मुलगा की मुलगी? किती पौंडाचा किंवा पौंडाची?काळा की गोरा?  दिसायला आईसारखा की बापासारखा? असे कितीतरी प्रश्न पडत असतात.
मूल जन्माला आल्यानंतर आईशी जोडलेली त्याची नाळ तुटते आणि लोकांनी उपस्थित केलेल्या असंख्य प्रश्नांशी त्याची नाळ जोडली जाते. मूल शाळेत जायच्या वयाचं झालं की कोणत्या शाळेत प्रवेश मिळाला? किती डोनेशन द्यावं लागलं? शाळेचं टायमिंग  काय? शाळा घरापासून लांब आहे की जवळ? एस.एस.सी बोर्ड की आय.सी.एस.ई? असे एक ना दोन, हज्जार प्रश्न इतर माणसांना पडतात. मूल पाठीवर दप्तरांची आणि लोकांना पडलेल्या प्रश्नांची ओझी वाहून दमलेलं असतं. काय रे परीक्षा झाली का ? पेपर कसे गेले? रिझल्ट कधी? प्रश्नांच्या  तोफा धडाधड सुटत असतात. मूल दहावीत गेले की पालकांच्या अपेक्षांप्रमाणे लोकांचे प्रश्नही मोठे होत जातात. कोणत्या क्लासला जातोस रे? मग काय किती मार्क मिळवणार? जोरात अभ्यास करतोयस ना? आम्ही पेढ्यांचे बुकिंग आधीच करून ठेवले आहे तुझ्या बाबांकडे. पुढे काय करायची इच्छा आहे? या सर्व प्रश्नांवर त्या मुलाचे अथवा मुलीचे मनोगत असे असू शकेल. मला माझ्या कानात कापसाचे बोळे कोंबायची इच्छा आहे. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला मला उत्तर देण्याची अजिबात इच्छा नाही. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. आधीच क्लाससाठी बाबांनी खूपच जास्त पैसा खर्च केला आहे. कॉलेजचा खर्चही उद्या आ वासणार आहे. तेव्हा कमीच मार्क मिळालेले बरे. पेढ्यांचा खर्च तरी वाचेल.  
शालेय अभ्यासक्रम संपून कॉलेज पर्व सुरु होते. पदव्युत्तर अभ्यासक्रम कोणता निवडावा याविषयी तो किंवा ती साशंक असतात. अनेक अनाहूत सल्ले, मतांच्या अर्थहीन पिचकाऱ्या त्यांच्या कानांवर आदळत असतात. पुढे एम.बी.ए करणार आहेस का? परदेशात जायची इच्छा आहे का? फायनान्स ह्या विषयात कितपत रुची आहे? मेडिकलला जाण्यासाठी अभ्यास खूप करायची तयारी आहे का? आर्ट्स घेऊन तू काय साध्य करणार आहेस? तुला फॉरेन लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे काय? अरे किती प्रश्न विचाराल रे त्याला? आणि काय करायचं आहे तुम्हाला? त्याचं तो बघून घेईल की! त्याने कोणताही अ ब क अभ्यासक्रम निवडला  तरी अभ्यास त्याचा त्यालाच करायचा आहे. तो परदेशात जाईल अथवा इथेच राहून अभ्यास पूर्ण करेल, तुमचा या साऱ्याशी संबंध काय व कसा येतो?  तो आर्ट्स घेईल, कॉमर्स घेईल नाहीतर सायन्स घेईल, how does it matters to you?  त्याच्या भविष्याचा तो विचार करेल, तुझी सकाळची ९.४४ ठाणा-सी एस टी कशी चुकणार नाही याचा तू विचार कर.  
मुलगी वा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला किंवा झाली की आई-बापाच्या डोक्याला काय कटकट असते ते त्यांनाच ठाऊक! कटकट विवाह जमवताना होत नाही इतकी लोकांच्या फालतू प्रश्नांना उत्तरे देताना होते. नोकरी करते का? कुठे करते? तो व्यवसाय करतो का? कोणता? विवाह नोंदणी केली का? मुलीची पत्रिका आहे ना? वधू-वरांचे गुण नीट जमताहेत ना? एकनाड नाही ना? गोत्र कोणते हो तुमचे? कुलदैवत कोणते? एखादी मुलगी वयाने थोडी जास्त असता काहो हिच्या लग्नाचे जमत नाही का कुठे? मुलीला मंगळ आहे का? अपेक्षा काय आहेत तिच्या? विवाहयोग पत्रिकेत नक्की केव्हा आहे हे ज्योतिषाला विचारले आहे का? उपरोक्त प्रश्नांची माहिती पृच्छा करणाऱ्याला नाही मिळाली तरी त्याचे काहीच बिघडणार नसते. पण आपले इतरांविषयीचे नॉलेज अपडेट करण्याचा हा एक प्रयत्न असतो. 
तिचा विवाह जमतो. यथासांग पार पडतो. आई -वडील मोकळा श्वास घेतात. पण लोकांच्या डोळ्यांत अजूनही अनेक प्रश्न साचलेले असतातच. नवरामुलगा काय करतो? घराणे कोणते? राहायला कुठे? हनिमूनला कोठे जाणार? लग्नानंतर मुलगी नोकरी करणार का? इत्यादी इत्यादी. लग्नाला एक-दोन वर्षे होतात ना होतात यांना पुढचा प्रश्न डाचू लागतो. मग काय गोssssड बातमी कधी देणार? प्लानिंग वगैरे चालू आहे का? इतर काही प्रॉब्लेम आहे का? रस्त्यात भेटल्यानंतरही हे प्रश्न पुढे रेटता येतात.  
अगदी माणूस गेल्यानंतरही कसे गेले हो ते? काय झाले होते? हॉस्पिटलमध्ये होते का? सकाळी गेले की संध्याकाळी? गेले तेव्हा आजूबाजूस कोण होते? ऑफिसमध्ये कळवले ना? दिवस वगैरे करणार ना? पिंडाला कावळा शिवला का चटकन? काही इच्छा राहिली होती का मागे? आता राहते घर कोणाच्या नावावर होणार? हे प्रश्न माणसाचा पिच्छा सोडत नाहीत. 
प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण विचारतो त्यातले अनेक प्रश्न अनावश्यक असतात, बाळबोध असतात, अर्थहीन असतात. इतरांना आपल्याला पडलेल्या त्यांच्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भरीस पाडण्यापेक्षा आपल्याला स्वत:च्या संदर्भातील प्रश्न उत्तम रीतीने सोडवता यायला हवेत. आयुष्याचे गणित दोन अधिक दोन चार या समीकरणाने नेहमीच सुटू शकत नाही. सुखाच्या बेरजेचे गणित आणि दु:खाची वजाबाकी यांचा चांगला ताळमेळ बसला तर किचकट प्रश्नही चांगल्या पद्धतीने हाताळता येतील. प्रश्नहीन आयुष्य जगणं माणसाला जरी शक्य नसलं तरी प्रश्नांच्या डोंगरात स्वत:चा आणि इतरांचा जीव घुसमटू देणं गरजेचं नाही. प्रश्नार्थकता माणसाला बऱ्याचदा साशंकतेप्रत घेऊन जाते. अचूक उत्तरे मिळवण्यासाठी माणसाला अनेक वेळा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 
या मर्त्यलोकात आपल्याला पडणाऱ्या असंख्य अनाकलनीय, गूढ, अगम्य प्रश्नांच्या अचूक उत्तरांची फाईल मात्र वरूनच अप्रूव्ह होऊन येत असते. शेवटी आपण केवळ प्रश्नांचे धनी असतो, उत्तराचा अधिकारी तो सर्वसाक्षी असतो. 

Wednesday 16 May 2012

तिची 'प्रभाच' आगळी!

शास्त्रीय संगीताच्या तंत्रशुद्ध चौकटीत गातानाही ज्यांनी लालित्याचे नाते कधी सुटू दिले नाही त्या 'स्वरमयी' डॉ. प्रभाताई अत्रे ह्या एक आदर्श गायिका आहेत. काही वेळेस तंत्राकडे जरा जास्तच लक्ष पुरवल्यामुळे गायलेला राग हा रुक्ष किंवा रसहीन वाटण्याची भीती असते. त्या रागाचा ठराविक परीघ सांभाळणे गायकाच्या दृष्टीने जरी अत्यावश्यक असले तरी त्याच्या रसपरिपोषाचे  अवधान सांभाळणेही तितकेच आवश्यक असते. गायक रागाचा रतीब घालतोय आणि श्रोते कंटाळून तो ऐकताहेत असे दृश्यही बरेच वेळा दिसून येते. यमनसारखा एखादा राग श्रोत्यांचा कब्जा घेताना वेळ लावत नाही परंतु काफी सारखा राग गाताना मात्र तो जर योग्य रीतीने श्रोत्यांसमोर मांडता आला नाही तर निरस, रुक्ष आणि कंटाळवाणा होण्याचीच जास्त शक्यता असते. 
आबासाहेब आणि इंदिराबाई अत्रे यांच्या पोटी हे कन्यारत्न १९३२ साली जन्माला आलं.  प्रभाताई आणि त्यांची बहिण उषा दोघींनाही गाणे ऐकण्यात रुची होती पण गाणे हेच करियर म्हणून निवडणे असे त्यांच्या मनात तोपर्यंत आले नव्हते. प्रभा लहान असताना इंदिराबाईंची तब्येत ठीक राहत नव्हती. तेव्हा कुणीतरी त्यांना गाणे शिकण्याचे सुचवले. बाईंनी संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली आणि लहानग्या प्रभाला इथूनच प्रेरणा मिळाली. आधी श्री.विजय करंदीकर यांच्याकडून आणि नंतर सुरेशबाबू माने तसेच हिराबाई बडोदेकर अशा संगीत क्षेत्रातील किराणा घराण्यातील दिग्गजांकडून प्रभाताई गाणे शिकल्या. त्यांच्या गायकीवर उस्ताद आमीर खान आणि बडे गुलाम अली खान या दिग्गजांचाही प्रभाव जाणवतो. शास्त्र आणि कायदा या विषयांतील पदवी त्यांनी मिळवली. शिवाय गंधर्व महाविद्यालयातून त्यांनी 'संगीतालंकार' ही पदवीही प्राप्त केली.  पुढे प्रभाताईंनी संगीतात पी.एच.डी. घेतली. 
प्रभाताई एक उत्तम शास्त्रीय गायिका तर आहेतच परंतु त्यांनी आजपर्यंत अनेक बंदिशी बांधल्या आहेत. 'स्वरांगिनी' तसेच 'स्वरंजनी' या दोन पुस्तकांत त्या समाविष्ट केल्या आहेत. त्यांनी रचलेल्या ख्याल, छोटा ख्याल, टप्पा, ठुमरी, दादरा यांची संख्या जवळजवळ पाचशेच्या घरात आहे. अपूर्व कल्याण, दरबारी कंस, पटदीप मल्हार, तिलंग भैरव यासारखे नवीन राग त्यांच्या प्रतिभेतून निर्माण झाले आहेत. देश-विदेशांत जाऊन त्यांनी गायन तसेच शास्त्रीय संगीतावर मार्गदर्शनही केले आहे. डॉ.सुचेता भिडे चाफेकर यांनी दिग्दर्शित केलेला  'नृत्य प्रभा' हा नृत्याविष्कार प्रभाताईंच्या रचनांवर आधारित आहे. अनेक संगीतिकांसाठी त्यांनी स्वररचना केली आहे. मानापमान, संशयकल्लोळ, सौभद्र, विद्याहरण आदी संगीत नाटकांत त्यांनी अभिनयही केला आहे. 
अत्यंत तरल आवाज, सर्व सप्तकांतील उत्तम फिरत, हरकती-ताना-बोलताना घेण्यातील नजाकत, स्पष्ट स्वरोच्चार आणि रागाची भावस्पर्शी मांडणी ही प्रभाताईंच्या गायनाची वैशिष्टे आहेत. 'मन तू गाई हरीनाम', 'लागी लागी रे' या यमन मधील बंदिशी, 'जागू मै सारी रैना बलमा' ही मारुबिहाग रागातील बंदिश, 'तनमनधन तोपे वारू ' ही कलावती रागातील बंदिश, 'सगुण सरूप नंदलाल' ही बंदिश गात आळवलेला चंद्रकंस तसेच 'शाम मोरे मंदिर आये' ह्या बंदिशीने खुलवलेले मधुवंती या रागाचे रूप आणि त्यांच्या अशा अनेक बंदिशींनी वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर विलक्षण मोहिनी घातली आहे. 
अनेक पुरस्कारांनी प्रभाताई सन्मानित झाल्या आहेत. जगतगुरू शंकराचार्यांनी त्यांना 'गान-प्रभा' हा किताब बहाल केला आहे. आचार्य अत्रे पारितोषिक, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पद्मश्री, पद्मभूषण या सन्मानाच्या त्या मानकरी आहेत. कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी सन्मान आदिंनी त्या विभूषित आहेत. आजवर अनेक महत्वपूर्ण पुरस्कारांच्या त्या धनी झाल्या आहेत.  
'स्वरमयी गुरुकुल' नावाची संस्था त्यांनी पुण्याला स्थापन केली आहे जिथे पारंपारिक शास्त्रोक्त संगीताचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो. 
प्रभाताईंच्या गानप्रतिभेला आणि स्वररचनांतून सौंदर्यानुभूती देणाऱ्या त्यांच्यातील रचनाकाराला माझा सलाम!



Tuesday 15 May 2012

नमस्कार वर्तनाला करायचा असतो, वयाला नव्हे !

आपल्याला लहानपणापासून घरातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा असे शिकवले जाते. यात गैर असे काहीच नाही परंतु माणसातील चांगुलपणाची, सभ्यतेची, वडिलकीची फुटपट्टी हे  त्याचे वय नसून त्याची वागणूक असते. वडीलधारयांपुढे नतमस्तक होण्याऐवजी अनेकदा त्यांच्या विचित्र वर्तनामुळे कोपरापासून हात टेकायची पाळी येते.  काही घटना घडतात आणि मग प्रश्न पडतो, यांना आपण वडीलधारे म्हणायचे? यांचा आपण का म्हणून आदर करायचा? यांच्या कोणत्या वर्तनाबद्दल यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे? 
माझी आत्या व माझे बाबा दोघेही लहान असतानाची एक गोष्ट. आत्यानेच सांगितलेली. आमच्या घरी अनेक पाहुण्यांचा सतत राबता असायचा. माझ्या बाबांचे मामा आणि मामी काही कामानिमित्त बऱ्याचदा घरी येत असत. बाबा आणि आत्या खेळण्याच्या वयातले. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मामा-मामी याला त्याला द्यायला अनेकदा मिठाईचे पुडे आणत. लहान मुलांना खाऊचे आणि भेटवस्तूंचे किती आकर्षण असते हे कुणाला सांगायची गरज नाही. त्या मिठाईच्या पुढ्यातील थोडीशी मिठाई आत्या आणि बाबांच्या हातावर त्यांनी कधीच ठेवली नाही. ना ती आमच्या घरी कधी आली. माझ्या आत्याला आणि बाबांना या गोष्टीचे आश्चर्यही वाटायचे आणि वाईटही वाटायचे. मला जेव्हा हे तिने सांगितले तेव्हा खूपच विचित्र आणि वाईट वाटले. ज्यांच्या घरी आपण राहण्यासाठी उतरतो त्या घरच्या आपल्याच छोट्या भाचरांना थोडा खाऊ द्यावासा वाटू नये?  हे कसले वर्तन? आणि अशी माणसे मात्र इतरांनी त्यांना यथोचित मान द्यायला हवा यासाठी आग्रही असतात. 
ज्येष्ठ नागरिक म्हणून एखाद्याला मान द्यायला जावा तर त्याची नजर गिधाडाची असते. मला एकदा एका ओळखीच्या आणि चांगल्या कुटुंबातील ज्येष्ठाने धीटपणे विचारले, काय हो तुमचे यजमान घरी कधी नसतात ते सांगा. त्यावेळेस मी तुमच्याशी गप्पा मारायला येईन. त्यावर मी ताबडतोब म्हणाले, तुमच्याशी गप्पा मारण्याकरता माझ्याकडे अजिबात फावला वेळ नाही त्यामुळे कधी गप्पा मारायच्या असतील तर शनिवार-रविवार जरूर या आणि यांच्याशी मारा. माझ्या सुदैवाने तो शनिवार आणि रविवार कधी उजाडलाच नाही. अशा लोकांना वडीलधारे मुळातच का म्हणायचे? 
माझ्या परिचयातील एक वयस्कर बाई कधीही भेटल्या की नुसत्या नजरेने मापत राहतात. आकारमान बरंच वाढलंय असा त्यांचा शेरा ऐकण्याचे भाग्य माझ्या वाट्याला अनेक वेळा आले आहे. वास्तविक पाहता कोण जाडे, कोण बारीक, कोण पोटाकडून किती सुटलेले, कोणाची कंबर कशी या डीटेल्समधून पृच्छा करणाऱ्यांना काय साधता येतं?  आपण कधीतरी रस्त्यात घटका-दोन घटका भेटतो त्याचे प्रयोजन काय शारीरिक मूल्यमापन असावे?  आपल्या जाड-बारीक होण्याने दुसऱ्याच्या आयुष्यात काही उलथापालथ खासच होणार नसते. पण काही ज्येष्ठ बायका अशा पृच्छकाची भूमिका  मोठ्या इमाने-इतबारे पार पाडत असतात.  
सून लग्न करून घरात आली रे आली की सासूचा वॉचमन होतो. सुनेवर सतत पहारा करणे हेच आद्यकर्तव्य होऊन बसते. तिची हालचाल, बोलाचाल, तिचे नवऱ्याशी गुलुगुलू बोलणे, जवळीक साधणे, घरात वावरणे डोळ्यांत प्राण आणून सासू बघू लागते. नवविवाहितेला कसे वागवू नये याचा वस्तुपाठ म्हणजे ह्या सासूचे वर्तन असते. तिला घालूनपाडून बोलणे, तिच्या माहेरच्यांचा उद्धार करणे, ती नोकरी करत नसेल तर तिच्याकडे रद्दीच्या भावाने बघणे, तिच्यावर गृहकृत्याच्या सूचनांचा भडीमार करणे ह्या गोष्टींना मग उत येतो. बहुतेक वेळेस सासरा चांगला असला तरी त्याच्या बायको विरुद्ध जायची त्याची हिम्मत नसते आणि जर तो बेरकी निघाला तर मग आगीत तेल घालण्याचे सत्कार्य तो नित्यनेमाने करत राहतो. अशा महाभागांना कोणत्या कारणास्तव आदरणीय लोकांच्या यादीत गणायचे? त्यांना नमस्कार का करायचा? जगात अशाही काही सासवा आहेत की ज्या सुनेला तिच्या नावाने हाक न मारता अर्वाच्य शब्दाने तिला संबोधतात. 

वय आणि परिपक्वता, प्रगल्भता याचा यत्किंचितही संबंध नाही. एखादे मूल लहान वयातच विचाराने प्रगल्भ होते, समंजस होते. इतरांशी कशा पद्धतीने वागावे हे त्याला अथवा तिला नीट कळते. पण साठी-सत्तरी पार केलेल्या बायका आणि पुरुष त्यांच्या वयाला अशोभनीय असे वर्तन करतात. त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नात मुलीच्या आई-वडिलांकडून अवास्तव मागण्या करतात. ऐन लग्नात, मंडपात रुसून बसतात. मानपानासाठी अडवणूक करतात. मुलगा-सुनेच्या नात्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अशा वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल याची त्यांना जराही पर्वा नसते.
सगळेच वडीलधारे असे वागत नाहीत. काही अनिष्ट घटनांमुळे, आयुष्यातील विचित्र, तापदायक अनुभवांमुळे त्यांचे मन कडवट झालेले असते हे मान्य. पण आपल्या अनुभवांच्या शिदोरीतून ते शिकत मात्र काहीच नाहीत. समंजसतेने नात्यातील तिढा सोडवण्याऐवजी ते नात्यांतील गुंतागुंतच अधिक वाढवतात. यातील किती वडीलधारे खरोखर वयाने लहानांना आशीर्वाद देण्यास योग्य असतात ही एक संशोधनाचीच बाब आहे. 
कोण चांगले, कोण वाईट हा उहापोह इथे मला करायचा नाही. पण वयाने मोठा असलेलाच जर आपली पायरी विसरला, आपल्या अनुभवाने शहाणा झाला नाही, परिपक्व झाला नाही तर वयाने लहान असलेल्याला कोणताही उपदेश करायला, सल्ला द्यायला लायक कसा ठरणार? सभ्यतेच्या, सुसंस्कृततेच्या मर्यादांचे उल्लंघन करणारा ज्येष्ठ नागरिक नमस्कारास कसा पात्र ठरणार? 
रामायणातील दाखला देताना मी असे म्हणेन, रामापेक्षा रावण वयाने ज्येष्ठ होता पण त्याने सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्याने तो वर्तनाने रामापेक्षा खुजा झाला. रामाने स्वकर्तृत्वाने रावणातील असुर प्रवृत्तीचा नाश केला पण मरणोत्तर रावणाच्या शरीराला, त्याच्या वयाला , त्याच्या ज्येष्ठत्वाला त्याने नमन केले. आपल्याकडून ब्राह्मणहत्येचे पातक घडले म्हणून त्याने प्रायश्चित्तही घेतले. रामाच्या या सुशील वर्तणुकीमुळे तो वंदनीय ठरतो. 
सभ्य,सुसंस्कृत, परिपक्व वर्तन करणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीस माझा नमस्कार आणि  नीच, असंस्कृत, अशोभनीय, अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीचा माझ्याकडून धि:कार! 
 शेवटी हे म्हणावेसे वाटते,  'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती' , मग ते लहान मूल असेना का!

Monday 14 May 2012

मी रेखाटलेली व्यक्ती-चित्रे

शाळेत असताना चित्रे काढायची खूप आवड होती पण हातात तेवढी चांगली चित्रकला नव्हती. माझ्या वर्गातील सुनील राजे नावाचा मुलगा उत्कृष्ट स्केचेस काढायचा. त्याने रेखाटलेले लोकमान्य टिळकांचे अप्रतिम चित्र अजूनही माझ्या स्मरणात आहे. आपल्याला अशी चित्रे काढता यायला हवीत असे मनोमन वाटायचे. पुढे ८ वी, ९ वीत गेल्यावर चित्रकला आणि संगीत यांपैकी एक विषय निवडणे भाग होते त्यामुळे मग मी संगीत हा विषय घेतला आणि अशा रीतीने चित्रकलेशी उरलासुरला संबंध संपुष्टात आला.  
पुढे कॉलेजला गेल्यानंतर कविता, गाणे आणि अभ्यास या विषयांपुरतेच माझे विश्व सीमित झाले. वयाची चाळीशी जवळ आली तशी चित्रे रेखाटायची ओढ लागली. हे डोहाळे माझे मलाच पुरवायचे होते पण त्यासाठी लागणारी साहित्यसंपदा माझ्याजवळ नव्हती. व्यक्तिचित्रे काढण्यात मला स्वारस्य होते. या विषयांतील नेमके गुरु माहित नव्हते. एक दिवस बुक डेपोत गेले. सुबोध नार्वेकरांची हाताला लागतील तेवढी पुस्तके आणली, रबर, पेन्सिल अशा काही आवश्यक गोष्टी आणल्या आणि श्रीगणेशा केला.  
तंत्रशुद्ध रीतीने स्केचेस कशी काढायची याबद्दल त्या पुस्तकांत चांगली माहिती होती. मला कोणत्याही प्रदर्शनात चित्रे लावायची नव्हती तरीही माझ्या परीने ती उत्तम काढता यायला हवीत यासाठी मी रोज नेटाने सराव करत होते. प्रापंचिक कामे आणि व्यवसाय सांभाळून उर्वरित वेळ मी या छंदासाठी गुंतवत होते. चित्राचे मोजमाप पट्टीने घेऊन त्याबरहुकूम मी चौकट आखून घेत असे. मग चित्राची बाह्याकृती म्हणजेच आउटलाईन मी रेखाटत असे. सगळ्यात कठीण भाग होता तो चेहऱ्यावरील भाव जसेच्या तसे रेखाटण्याचा. मूळ फोटोवरून नव्हे तर काढलेल्या स्केचवरून मी चित्र रेखाटत होते. 
पहिलेवहिले चित्र रेखाटले आवडत्या सुभाषबाबूंचे ! करारी, तेजपुंज चेहरा. चेहऱ्यावरील कडक शिस्तीचे भाव. राष्ट्रप्रेमाखातर स्वत:ला समर्पित करण्याची वृत्ती आणि जिद्द. तीन तासांनंतर चित्र तयार झाले आणि चित्रपूर्तीचा आनंद मनाला समाधान देऊन गेला. चित्र बऱ्यापैकी जमले होते. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीचे चित्र मी काढले होते ती व्यक्ती सहज ओळखू येत होती.  ती व्यक्ती सुप्रसिद्ध असल्याने सर्वांच्या माहितीची होती. आता अधिक आत्मविश्वासाने हातातून पेन्सिल फिरू लागली. अनेक नामवंत व्यक्ती स्केचेसमधून  साकारू लागल्या. माझ्या लेकींकडून कौतुक आणि प्रोत्साहन मिळू लागले. माझ्या आवाक्याप्रमाणे ही व्यक्तिचित्रे मूर्त होऊ लागली. 
एक पंचवीस-तीस चित्रांचा संग्रहच तयार झाला. कितीतरी गोष्टी नव्याने, शाळकरी मुलीच्या उत्सुकतेने शिकता आल्या. चिकाटीने बसल्यामुळे एका बैठकीत एक चित्र मी पूर्ण करू शकले. शाळेत चित्रे रेखाटायची राहून गेलेली इच्छा इतक्या वर्षांनतर का होईना पूर्ण करता आली.
                                   
रेखाटनात अजूनही कौशल्य यायला पाहिजे ही जाणीव होती. कुणीतरी मला चित्रकलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या एका व्यक्तीचे नाव सुचविले. शिवाय त्या व्यक्तीचे घर माझ्या घरापासून जवळचे असल्याने इतर व्याप सांभाळून हा छंद जोपासणे मला शक्य होणार होते. मी मोठ्या उत्साहात त्यांच्याकडे गेले. मला योग्य दिशेने नेणारा कुशल वाटाड्या हवा होता. मला चित्रकलेत करियर करायचे नव्हते पण जास्तीत जास्त उत्तम रीतीने चित्रे रेखाटायला येणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या व्यक्तीने मात्र माझा संपूर्ण भ्रमनिरास केला. मी रेखाटलेल्या चित्रांची फाईल बघून 'अशी चित्रे तर लहान मुलेही काढतात' असा एक अत्यंत कुत्सित आणि त्यांच्या या क्षेत्रातील वकुबाला न शोभणारा शेरा मारून मला हताश केले. चाळीसाव्या वर्षीही असा शेरा ऐकून मला वाईट वाटले आणि छोट्या मुलांची त्यांच्या शिक्षकांचे अभिप्राय ऐकून  काय अवस्था होत असेल याची मला प्रचीती आली. मला ही कला छंद म्हणूनच जोपासायची होती आणि आहे. या कलेला मला व्यवसायाचे रूप द्यायचे नव्हते. फक्त चित्रे अधिक उत्कृष्ट रीतीने काढता यायला हवीत एवढीच हे शिकण्यामागची माझी धारणा होती. परंतु त्या व्यक्तीने गुरूपेक्षा व्यावसायिक या दृष्टीने माझ्या चित्रांकडे बघितले आणि या क्षेत्रात एवढा लौकिक असतानाही त्या व्यक्तीला असुरक्षित वाटू लागले. असो. अजूनही मी योग्य अशा 'गुरूच्या' शोधात आहे. 

माझी मामेआत्या आणि जयपूर-अत्रौली घराण्याची ज्येष्ठ गायिका कै.कमल तांबे हीचे हे वर रेखाटलेले चित्र. हे चित्र मात्र तिच्या पुस्तकावरील फोटो बघून काढण्याचा मी प्रयत्न केला आहे.  

आणखीही काही व्यक्ती-चित्रे मी रेखाटली आहेत. अभ्यासाच्या आणि संगीताच्या वाढत्या ट्युशन्स यामुळे सध्यातरी या कलेपासून थोडी फारकत झाली आहे. पण काही सांगता येत नाही, उद्या माझ्या हातात शुभ्र कोरा करकरीत कागद, पेन्सिल असे साहित्य असेल आणि एखाद्या व्यक्तीला किंवा शक्तीला कागदावर जिवंत करण्यासाठी मी पुन्हा एकदा तितकीच अधीर झालेली असेन. 

सत्यमेव जयते - एक काळजाला हात घालणारा शो

सत्यमेव जयतेचे बघता बघता दोन एपिसोड्स झाले आणि लाखो प्रेक्षकांची हृदये पाझरली. ज्या सुरक्षित कोशात, वातावरणात आपण आपले दैनंदिन आयुष्य कंठत असतो त्या भोवतीच्या परिघात एवढी भीषण रहस्ये दडलेली आहेत हे पाहताना जीवाचा थरकाप होतो. प्रत्यक्ष प्रसंग ऐकताना मन सुन्न होऊन जाते. जीवनाच्या या भयंकर लढाईतून तावून सुलाखून निघालेल्या या शोषीतांना सलाम करावासा वाटतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली ही कहाणी निर्भीडपणे, नि:संकोचपणे प्रेक्षकांसमोर कथन करणाऱ्यांचे मनोमन कौतुक वाटते.  
स्त्री भ्रूणहत्या या विषयानंतर बालकांचे लैंगिक शोषण हा विषय या कार्यक्रमाद्वारे लोकांसमोर आला. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील मुलांच्या तसेच मुलींच्या लैंगिक शोषणाचे भीषण वास्तव काळीज हलवून गेले. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या एकूण मुलांमधील ५३% आकडेवारी ही फक्त मुलांची आहे हे ऐकताना पटकन विश्वास बसला नाही. मुला-मुलींचे निरागस बाल्य अशा घृणास्पद रीतीने संपवणाऱ्या विकृत नराधमांची विलक्षण चीड आली. 
घर, शाळा, खेळ, सवंगडी, सहली  हे ज्यांचे अवघे विश्व, निष्पाप डोळे , निरागस भाव हाच ज्यांचा स्थायीभाव, डोळ्यांना निद्रादेविने दिलेले स्वप्नांचे पंख लावून त्या सुंदर साम्राज्यात विहार करणारे ज्यांचे निकोप मन अशा लहानग्यांना इतक्या बीभत्स अनुभवांना सामोरे जावे लागावे यासारखे दुर्दैव नाही. आपल्या अंगप्रत्यांगाचा वापर असाही कुणी करून घेऊ शकतो याचे आकलन न होण्याच्या वयात ही मुले या विदारक प्रसंगांना सामोरी गेली. त्यांनी अपार शारीरिक वेदना तर सहन केल्याच पण प्रचंड मानसिक आघातही सोसले. 
भयंकर प्रपातकारी वादळातून ही चिमुकली रोपटी उन्मळून पडता पडता कशीबशी सावरली गेली. हे आघात केले होते त्यांच्याच जवळच्या म्हणवणाऱ्या माणसांतील पशूंनी! समुद्रावर जाऊन शंख-शिंपले गोळा करण्याच्या वयात यांनी शारीरिक व्रण झेलले. आकाशात झेप घेतलेले विमान भान हरपून पाहण्याच्या वयात त्यांचे कोवळे अस्तित्व छिन्न होऊन गेले. रंगीत चित्रे रेखाटण्याच्या उद्योगात मग्न होण्याच्या वयात ही मुले मानसिक छळाला, अत्याचाराला बळी पडली. माणसाच्या रूपातील सैतानांनी त्यांचे स्वप्नवत आयुष्य कधीही न बऱ्या होणारी जखमांनी नासवून टाकले. 
या कार्यक्रमात सहभागी होऊन अशा अनेक पिडीतांनी आपापल्या भावनांना, मनातील उद्वेगाला, अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तसेच या लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्यांना मदतीचा हात देणाऱ्या काही संस्थांची माहितीही मिळाली. परंतु अशा पिडीतांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देणारा आणि त्याद्वारे अशा असंख्य छुप्या नराधमांच्या विकृत प्रवृत्तीला चाप लावणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही हे ऐकून धक्काच बसला. या अपराध्यांना वास्तविक पाहता कायद्याद्वारे प्रचंड जरब बसावयास हवी. घरातील एखाद्या नातेवाईकाने हे घाणेरडे कृत्य केले असेल तर इतर नातेवाईकांनी त्याला बहिष्कृत करावयास हवे. सर्वांसमक्ष त्याच्या निंदनीय कृत्याची छाननी व्हावयास हवी. अपराधी जर घराबाहेरील असेल तर त्याच्या संपर्कातील लोकांसमोर त्याचा बुरखा फाडावयास हवा. जेणेकरून त्याच्यापासून इतर सावध होतील आणि अशा काही कोवळ्या जीवांच्या आयुष्याची राखरांगोळी व्हायची तरी वाचेल. 
या २ एपिसोड्स मधून हाताळले गेलेले विषय नवीन नाहीत. इतरही असेच बहुचर्चित विषय यानंतर हाताळले जाऊ शकतील पण आमीर खान सारख्या सशक्त आणि सक्षम कलाकाराला घेऊन अशा सामाजिक समस्यांना, प्रश्नांना जाहीर वाचा फोडणे हे या कार्यक्रमाच्या यशाचे गमक आहे. सामाजिक बांधिलकी मानणारा आमीर पीडितांच्या कथा ऐकताना अनेकदा भावविव्हल होतो. पूर्ण तयारीनिशी, आकडेवारीनिशी मैदानात हा गडी उतरला आहे. अनेकांना बोलते करतो आहे. शोकाकुलांना मिठीत घेतो आहे. आजवर अशा अनेक समस्यांचा उहापोह प्रसारमाध्यमांतून होत आला आहे. पण या सर्व समस्यांवर सर्वमान्य तोडगा काढणे आता अपरिहार्य होऊन बसले आहे. एखादा कायदा संमत करून घ्यायचा तर त्यासाठी जनमताचा रेटा हवा. जनतेची ताकद हवी. सरकारदरबारी अपील करायचे तर लेखी स्वाक्षऱ्या हव्यात. प्रसंगी जन-आंदोलन उभारावयास हवे. सर्वसामान्यांच्या अधिकारासाठी लढणारा खंदा लढवय्या हवा. तरच हे काम तडीस जाऊ शकेल. तरच या सामाजिक समस्यांची उकल होऊ शकेल. तरच पीडितांना, शोषितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू हकेल. तरच अशा सैतानी वृत्तीला अंकुश बसू शकेल. 
या कार्यक्रमाअखेर आमिरने घेतलेले मुलांचे वर्कशॉपही परिणामकारक होते. हा अवेअरनेस, ही जागृती लहान असली तरी मुलांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. काही न कळण्याच्या अजाण वयात आयुष्याला कोणतेही गंभीर वळण मिळण्याआधी ह्या गोष्टी प्रत्येक घरातील पालकांनी मुलांना त्यांना सहज आकलन होईल अशा पद्धतीने समजून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करण्यास शारीरिक दृष्ट्या असमर्थ असलेल्या लहानग्यांना स्वत:चा बचाव करण्याचे तंत्र तरी मोठ्यांनी सांगणे अत्यावश्यक आहे. किंबहुना शाळाशाळांमधून अशी वर्कशॉप्स आयोजित करण्यात आली पाहिजेत. 
एखादे फूल फुलण्यासाठी आजूबाजूस पोषक वातावरण नसेल तर ते फूल अकालीच कोमेजून जाईल. त्याचे निर्माल्य होईल. या गोष्टीचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे आणि या कार्यक्रमात आमिरसोबत आपलाही खारीचा वाटा उचलला पाहिजे. अशा अपप्रवृत्तींना मुळासकट उपटून टाकण्यासाठी आपण जास्तीत जास्त सजग आणि प्रयत्नशील राहिले पाहिजे. तरच अनेक लहानग्यांचे भविष्य सुरक्षित होऊन त्यांचे बाल्य अ-बाधित राहील. 
( या कार्यक्रमाच्या अखेरीस सादर झालेल्या दोन्ही गीतांनी मनाला हळवा स्पर्श केला हे मी आवर्जून नमूद करू इच्छिते.)

Sunday 13 May 2012

विजेची चणचण, पाण्यासाठी वणवण.......

देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक गावांत, खेडोपाड्यांत वीज आणि पाण्याचे आत्यंतिक दुर्भिक्ष्य आहे. कळशीभर पाणी मिळवण्यासाठी तेथील लोकांनी, विशेषत: बायकांनी मैलोनमैल केलेली पायपीट बघून मन व्यथित होते. विजेअभावी अनेक यंत्रे, उपकरणे खितपत पडून आहेत, नादुरुस्त झाली आहेत. पुरेशा पाणी-पुरवठ्या अभावी शेते, झाडे, रोपे सुकून गेली आहेत. तेथील जनावरांना खाण्यासाठी ओला, हिरवा चारा उपलब्ध नाही. हे दृश्य आहे एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राचे, भारताचे! 
आज अनेक वाहिन्यांवर कोण मंत्री, उच्चपदस्थ किती विजेचा आणि पाण्याचा वापर करतो याची आकडेवारी प्रसिद्ध होते. सगळेच तथाकथित बडे लोक जरुरीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात विजेचा आणि पाण्याचा गैरवापर करतात. त्याच्या अशा बेजबाबदार आणि बेसुमार वापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने इतर लोकांच्या वीज आणि पाणी वापरावर गदा येते. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. पाणी असले तर वीज नसल्याने पाण्याचा पंप किंवा इतर विजेवर चालणारी यंत्रे ठप्प होतात. परिणामी शेतकऱ्यांचे हाल कुत्रेही खाणार नाही अशी भीषण परिस्थिती जागोजागी निर्माण होते आहे. 
बीड जिल्ह्यातील एक घटना मला या निमित्ताने इथे नमूद करावीशी वाटते. आपल्या लहान मुलाला आंघोळ घालावी म्हणून एक महिला जेमतेम पाण्याचे दोन-तीन तांबे त्याच्यावर उपडे करते आणि तेच आंघोळीचे पाणी एका भांड्यात साठवून ते स्वयंपाकासाठी वापरते. याहून या देशातील गावाची अधिक विदारक अवस्था कोणती असणार? जनावरांसाठी असलेल्या पाणवठ्यांतून महिलांना पिण्याच्या, स्वयंपाकाच्या, नित्यकर्माच्या पाण्याचा उपसा करावा लागतो. याचे भीषण परिमाण मग मुक्या जनावरांनाही अपरिहार्यपणे सोसावे लागतात. अपुरा चारा, आंबोण आणि पाण्या-अभावी जनावरे मरतुकडी होतात, शेतात कामे करण्यास असमर्थ होतात, आजारी पडतात.  
आज शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना पुरवण्यात येणारे पाणी, वीज यांचे प्रमाण निश्चितच जास्त असणार. बहुतेक बिल्डरांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे, स्थानिक नगरसेवकांचे साटेलोटे असल्याने त्या इमारतींतील रहिवाश्यांना वीज आणि पाणी-पुरवठा यथास्थित होणार परंतु यासाठी कोठून तरी, कोणाचे तरी पाणी आणि वीज तोडली जाणार. भारत हा विकसनशील देश, येथील भूमी सुजलाम, सुफलाम अशा कोणीही आणि कितीही गप्पा मारल्या तरी आज अनेक गावांतील आणि खेड्यांतील दारूण परिस्थितीही लपून राहिलेली नाही. 'शेतकरीराजा' या शब्दातील विरोधाभास  आज अधिकाधिक जाणवू लागला आहे. सर्व प्रजेला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी आज सर्वार्थाने कंगाल झाला आहे, देशोधडीस लागला आहे. एकेकाळच्या या राजाचे ऐश्वर्य लुप्त होऊन त्याचा रंक झाला आहे. उन्हाने रापलेला काळाकभिन्न चेहरा, खुरटलेली दाढी, डोळ्यांतील पाण्यात चिंतांचे आगर, त्याचे सुकलेले आणि सुरकुतलेले निस्तेज शरीर, आकाशाकडे टक लावून बसलेले त्याचे व्याकूळ डोळे, झोपडीत गालांच्या वाट्या आणि पोटाची खपाटी घेऊन हिंडणारी त्याची पोरे, पाण्याच्या आशेने हंडा घेऊन निघालेली त्याची बाईल, विझलेली चूल अशी काळजाला घरे पडणारी एकेकाची घरे आणि त्याच्याशी निगडीत एकेकाच्या कर्मकहाण्या!  
आज अनेक सोसायट्या, बंगल्यांतून विजेचा आणि पाण्याचा गैरवापर होत असतो. पाणी आहे म्हणून घराच्या भिंती, दारे, ग्रील्स, आवार,बाल्कनी धू ,गाड्या धू हे चालूच असते. अनेक घरांतून चोवीस तास टी. व्ही. चालू असतो. आमच्या घरांत टी.व्ही. बंद करण्याची पद्धतच नाही असेही ऐकिवात येते. काही भागांत भार-नियमन तर काही भागांत अजिबात नाही. एसी, गिझर, इस्त्री, फ्रीज अशा जास्तीत जास्त वीज खेचणारी उपकरणेही बिनधोक चालू असतात. म्हणजे काही ठिकाणी साधी गरज भागवण्यापुरतेही पाणी आणि वीज नाही आणि काही ठिकाणी वीज आणि पाण्याची नुसती रेलचेल असे परस्परविरोधी चित्र आहे.
हे वर्षानुवषे असेच चालू आहे. हे चित्र बदलण्याची गरज कुणालाच कशी वाटत नाही? ज्यांच्याकडे पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, पाण्याअभावी ज्यांच्याकडे अन्न शिजत नाही, विजेअभावी ज्यांची शेती चालत नाही अशांनी खुशाल उपासमारीचे बळी होऊन मरून जावे, आपले शरीर त्यांनी गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाच्या स्वाधीन करावे अशी इतरांची इच्छा आहे की काय? त्यांचे प्रश्न बासनात गुंडाळलेल्या स्थितीत कैक वर्षे पडून आहेत. त्यावर राजकीय धूळ साचली आहे. स्वार्थांधतेची पुटे चढली आहेत. अवेळी बरसणारा पाऊस आणि योग्यवेळी न येणारा पाऊस ग्रामीण भागांतील लोकांच्या डोळ्यांतील पाऊस सतत  खळाळत ठेवतो. अनेक निष्पाप जीवांची आसवे आज शुष्क झालेल्या जमिनीने गिळंकृत केली आहेत. काळीभोर कसदार जमीन आणि खिल्लारे, धष्टपुष्ट जनावरे ही ज्याची एकेकाळी धन-दौलत समजली जायची त्या शेतकरीराजावर आज वीज-पाण्याविना भुईसपाट व्हायची पाळी आली आहे. अपार काबाडकष्ट करून रयतेच्या तोंडात सुखाचा घास घालणारा हा शेतकरी अन्नाच्या एका घासालाही पारखा झाला आहे. हा काय लोकशाहीचा विजय समजायचा की हा काय भारत प्रगतीपथावर आहे असे सांगून जनतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधणाऱ्या मूठभर स्वार्थी, अप्पलपोट्यांचा विजय समजायचा? शेतकऱ्यांचा कर्दनकाळ होऊ पाहणाऱ्या घृणास्पद राजकीय व्यवस्थेचा विजय समजायचा? त्याच्या कष्टावर, घामावर, रक्तावर गब्बर झालेल्या समाजातील मुर्दाड व्यक्तीमत्वांचा विजय समजायचा? 
माणसामधील देवत्वाचा अंश दिसामाशी कमी होत चालला आहे हा त्याचा सबळ पुरावा आहे. परोपकारासाठी झटणारा माणूस आता दुसऱ्याच्या छाताडावर उभा राहून उन्मत्तपणे गर्जना करू लागला आहे. असहाय, दुर्बल माणसाचे रक्त शोषू लागला आहे. कधीतरी परिस्थितीच्या विखारी नांग्या आपल्यालाही दंश करू शकतील  याचा त्याला पूर्णपणे विसर पडला आहे.
या सगळ्या वाईट, स्वार्थी, निर्लज्ज प्रवृत्तीच्या महासागराला गिळंकृत करण्यासाठी आज एका अगस्तीची गरज आहे.