Wednesday 11 January 2012

धूम्रपान - एक सार्वजनिक आजार

धूम्रपान करण्यासाठी लोक वेगवेगळी कारणे शोधत असतात. कधी ट्रेंड म्हणून तर कधी टेन्शनवर उतारा म्हणून,कधी मित्रांचा आग्रह म्हणून तर कधी सवयीचा गुलाम म्हणून! स्वत: धूम्रपान करून इतरांच्या भोवतालचे वातावरण प्रदूषित करणारे हे महाभाग संख्येने विपुल आहेत. कधीतरी उत्सुकतेपोटी एखादी सिगारेट ओढून बघणारे एकदम दिवसागणिक चाळीस चाळीस सिगारेटी सुद्धा सहजपणे ओढत असतात. त्यात चित्रपटातील त्यांचे सो कॉल्ड रोल मोडेल्स असे आदर्श प्रस्थापित करण्यात माहीर असतात. रफ आणि टफ कपडे,ट्रेंडी शूज घालायचे, दाढीची खुंटे वाढवायची,डोळ्यांवर गॉगल, ओठांत सिगारेट शिलगवायची म्हणजे मग या आपल्या रुपड्यावर फिदा होणाऱ्या छब्यांची नुसती लाईन लागते असा समज काही हिरो सतत करून देतंच असतात. 
धूम्रपान हे व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हा मजकूर सिगारेटच्या पाकिटावर लिहूनही सिगारेट्स ओढणाऱ्यांची संख्या दिसामाशी वाढतेच आहे. पण जसे सिगारेट ओढणे हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीसाठी धोकादायक असते तसेच ज्या व्यक्ती त्या माणसाच्या संपर्कात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे येतात त्यांच्यासाठीही तेवढेच धोकादायक असते. आपल्या कोणत्याही व्यसनामुळे दुसऱ्याच्या आरोग्याला इजा पोहोचवायचा आपल्याला काय नैतिक अधिकार आहे हा विचार ही मंडळी कधीच करताना दिसत नाहीत. आपण 'passive smoker' व्हायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकारही इतरांना असला पाहिजे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे. मला एका गोष्टीची खरोखर मजा वाटते. काही ठिकाणी 'इथे धूम्रपान करण्यास मनाई आहे' किंवा 'no smoking zone' असे लिहिलेले असते. म्हणजे इतरत्र धूम्रपान केले तरी चालेल असाच याचा अर्थ होतो. सुरक्षेच्या कारणास्तव असे लिहावे लागते पण मग जे धूम्रपान करत नाहीत त्यांच्या सुरक्षेचं काय? सरकार सिगारेट ओढण्यामुळे किंवा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या अपायांची सूचना पाकिटावरील संदेशातून देते पण सिगारेटवर मिळणाऱ्या करामुळे त्यावर बंदी आणू शकत नाही. त्यामुळे सिगारेट ओढून पुढील परिणामांना सामोरे जाणे ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब ठरते. इथे प्रश्न येतो तो धूम्रपान न करणाऱ्यांचा! बरं, तुम्ही कृपया धूम्रपान करू नका कारण आम्हाला त्याने अपाय होऊ शकतो असे एकतर आपल्याकडे सांगण्याची पद्धत नाही आणि असे सांगितले तर त्या माणसाची खिल्ली उडवली जाऊ शकते. रस्त्यावरून चालताना, बससाठी उभे असताना, रेल्वेसाठी तिष्ठत असताना,थिएटरमध्ये किंवा अगदी निसर्गरम्य वातावरणात सहलीसाठी गेलो असताना हा धूर आपल्या नाका-तोंडात जात असतो. आपली इच्छा असो वा नसो या धुराची वलये आपल्याही फुफुसांत बिनदिक्कत शिरू शकतात. 
मुळात ही जी माणसे सिगारेट ओढतात त्यांना मला विचारेवेसे वाटते की तुम्ही नाही ओढलीत सिगारेट तर तुमचे काय बरे नुकसान होणार आहे? सिगारेट ओढल्यानेच माणूस आजकालच्या भाषेत 'ट्रेंडी' किंवा 'इन' वाटायचे कारण काय? कोणत्याही ताण-तणावावर सिगारेट ( आणि मद्य ) हा जर एकाच रामबाण उपाय असेल तर मग डॉक्टर्स का या गोष्टी 'प्रिस्क्राईब' करत नाहीत? मानसोपचार तज्ञांकडे या गोष्टी का उपलब्ध होत नाहीत? यातील निकोटीन नामक द्रव्याने फुफुसांची कार्यक्षमता कमी होऊन पुढे यासंबंधीचे अनेक आजार संभवतात हे ठाऊक असूनही आपण हा आत्मघाती मार्ग हा पत्करतो? आपण एक कुटुंबप्रमुख आहोत, आपल्यावर अनेकांची नुसती जबाबदारी नाही तर तेवढीच मायाही आहे हे सत्य आपण विसरून जातो का? आपल्या सिगारेट ओढण्याने फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या सानिध्यात येणाऱ्या अनेकांना अपाय होऊ शकतो याचा आपण गांभीर्याने का विचार करू शकत नाही? 
इतरत्र सिगारेट ओढण्यासाठी जरी शासनाने बंदी केलेली नसली तरीही याचा अर्थ तुम्हाला इतरांनी धूम्रपान करण्याचे लायसेन्स दिले आहे असाही होत नाही. कुणीही रस्त्यावर यावं, भकाभका सिगारेट ओढून आपल्या आजूबाजूची हवा प्रदूषित करावी ,समोरून येणाऱ्यांवर धुराची वलये सोडून त्याला शारीरिक इजा पोहोचवावी हा हक्क तुम्हाला कुणीही दिलेला नाही. दिवाळीत वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या धुराविरुद्ध आवाज उठवले जातात पण रोजच्या रोज या धुराचे जे अतिक्रमण धूम्रपान न करणाऱ्यांवर होते आहे त्याविरुद्ध आवाज उठताना दिसत नाहीत? जन-जागृती मोहीम काढली जात नाही. नुसते पोस्टर्स लावून या फोफावणाऱ्या घातक सवयीचे निराकरण होणार नाही. हनुमानाने जशी लंका पेटवली तशीच या धुम्रपानाविरुद्धची आग जनमानसात भडकली पाहिजे. एखाद्या विरुद्ध निषेध नोंदवताना ज्याप्रमाणे त्याची पोस्टर्स किंवा त्याच्या प्रतिमा जाळण्यात येतात त्याप्रमाणे सिगारेट ओढणाऱ्यांच्या हातातील,खिशांतील सिगारेटच्या पाकिटांची होळी करता आली पाहिजे. हा उपाय कोणाला कदाचित जहाल वाटेल परंतु सिगारेट ओढणारयांकडून आजूबाजूस जे हलाहल दिवसेंदिवस पसरते आहे आणि त्यात अनेक धूम्रपान न करणाऱ्यांचे फुकाफुकी बळी जात आहेत त्यापेक्षा हा उपाय निश्चितच कमी जहाल आहे. 
आपल्या वैयक्तिक घातक सवयींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ द्यायचा की नाही हा विचार करणे हे प्रत्येक  नागरिकाचे कर्तव्य आहे आणि इतरांच्या आयुष्याला इजा न पोहोचवणे ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. या गोष्टींचे भान न ठेवणाऱ्यास शासन करणे ही या देशातील सुज्ञ नागरिकांची सामुहिक जबाबदारी आहे. 

No comments:

Post a Comment