Sunday 30 December 2012

तिला जगायचं होतं ............



तिला खूप खूप जगायचं होतं . तिच्या मनात भविष्याची सुंदर स्वप्ने होती. तिच्या अवघ्या कुटुंबाचा ती आधारस्तंभ होती. तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिला उत्तम शिक्षण देऊ केले होते. एका छोट्याशा गावातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नोकरी निमित्ताने ती आली. आपल्या मित्रासोबत चित्रपट बघून ती द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये बसली आणि जणू काही एखाद्या सावजावर नेम धरून टपलेला काळच तिच्यावर चालून आला. थोड्या वेळात तिच्या देहावर अनन्वित अत्याचार झाले. न भूतो न भविष्यती असे घाव तिला सोसावे लागले. तिचे असह्य वेदनांनी तडफडणारे शरीर विवस्त्र करून रस्त्यावर फेकले गेले. तिच्याबरोबर त्याचेही ! आजूबाजूच्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होत्या पण त्या दोघांची दखल कुणी घेतली नाही. अखेर मोटरसायकलीवरून आलेल्या तिघांना ती आणि तो दिसले आणि पोलिसांना इन्फोर्म केले गेले. अशा रीतीने त्या दोघांची रवानगी सफदरजंग हॉस्पिटलात झाली. 
आज मृत्यूशी चार हात करणारी ती मुलगी 'दामिनी' आपल्यात नाही. अंगावर इतक्या भयंकर जखमांचे ओझे बाळगत तिने तेरा दिवस काढले तरी कसे असा प्रश्न मनाला वारंवार पडतो आहे. दामिनी आशावादी होती. आपल्या वेदनेने ठुसठूसणाऱ्या शरीराला नक्की आराम मिळेल आणि आपण या जीवघेण्या संकटातून बरे होऊ हा विश्वास तिच्या ठायी होता. आतडी जवळजवळ नाहीत, डोक्याला असंख्य जखमा झालेल्या, कंबरेखालच्या भागात असह्य वेदना, अंतर्गत रक्तस्राव, बेशुद्धी अशी देणगी तो महाभयंकर काळच तिला देऊन गेला होता. तरीही जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा 'Mother, I want to live' हा संदेश तिने तिच्या आईला पाठविला. अवघ्या तेवीस वर्षाच्या या दामिनीला ही पराकोटीची वेदना का सहन करायला लागावी? हा प्रश्न मनात अनेक वेळा उठला. नामांकित डॉक्टरसुद्धा तिच्या अंगावरील जखमा बघून हबकून गेले होते आणि तिच्या धैर्याची प्रशंसा करत होते. पण अखेर तिच्या असह्य वेदनांची सांगता झाली. लाखो-करोडो लोकांच्या मनात अनेक प्रश्नांचे जळजळीत निखारे ठेऊन ती गेली. 
आज तिच्या निमित्ताने भारत देशातील अनेक राज्यांतील कैक लोक अपराध करणाऱ्यांना सज्जड शिक्षा द्या अशी मागणी करण्याच्या हेतूने एकत्र आले. अनेक दिवस, महिने, वर्षे कित्येकांच्या मनात साचलेली उद्विग्नता तिच्या निमित्ताने दारोदार चर्चिली गेली. निदर्शने, घोषणा, मूक मोर्चे अजूनही चालू आहेत आणि चालू राहतील. तिला आणि तिच्या सारख्या अनेकींना न्याय मिळावा यासाठी लोकांचे जथ्थे रस्त्यावर उतरतील. सरकारला जन- भावनांची दाखल घ्यावीच लागेल. अपराध्यांना फासापर्यंत न्यावेच लागेल. 
पण एवढे करूनही असे गुन्हे पुन्हा होणारच नाहीत याची कुणी ग्वाही देऊ शकेल काय? किंबहुना या घटनेनंतर लगेचच राजधानीत आणि इतरत्र ठिकाणी अमानुष अत्याचाराच्या घटना घडल्याच! अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती तोपर्यंत घडतच राहतील जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलणार नाही. ही मानसिकता एका दिवसात, एका रात्रीत बदलणार नाही परंतु सातत्याने प्रयत्न केल्यास एक दिवस बदलेल एवढे मात्र निश्चित! माणसाला पैसे कमावण्याची संथा देण्याआधी माणसाला माणूस म्हणून वागण्याची संथा देणे अति आवश्यक आहे असे मला वाटते. नुसते लैंगिक शिक्षण देणे गरजेचे नाही तर वयाशी निगडीत असलेल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे. आपल्या शरीराची वैषयिक भूक भागवण्यासाठी समोर दिसेल त्या स्त्रीला लक्ष्य करणे हे असंस्कृत, कमकुवत, असमतोल मनाचे लक्षण आहे हे मुलांना पटवणे अत्यावश्यक आहे. बाल्यावस्थेतच मुलांना काही मानवी मूल्यांचे जतन करायला सांगणे आवश्यक आहे.  घरातील स्त्री रूपांचा मग ती आई असेल, आजी असेल, बहिण असेल, आत्या असेल योग्य तो आदर करणे हे इतर वडीलधाऱ्यांनी शिकवले पाहिजे. पौगंडावस्थेत भरकटणाऱ्या मुलांच्या मनाला संस्कारांचा आणि संयमाचा लगाम घालायला शिकवले गेले पाहिजे. शाळेतही आपल्याबरोबर शिकणाऱ्या वर्गभगिनी बरोबर चांगले वागायला त्या त्या वर्ग-शिक्षकांनी शिकवावयास हवे. समाजातील पुरुषांचा स्त्री-विषयक दृष्टीकोन बदलायला हवा असेल तर त्यासाठी मुलामुलींच्या बाल्यावस्थेपासूनच कंबर कसायला हवी. 
एकमेकांना दोष देत राहणे, चर्चा-वितंडवाद करत राहणे, सरकारवर सारखी आगपाखड करत राहणे, मुलींना घराबाहेर न सोडणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे काही चिरस्थायी उपाय नाहीत. त्यापेक्षा मुलांना नैतिक-अनैतिक यातील फरक खुबीने समजावणे, उत्तम आचरणाचे शिक्षण देणे, स्त्री असो वा पुरुष प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक वागवण्यास शिकवणे, दुसऱ्याविषयी चांगले विचार मुलांच्या कोवळ्या मनात रुजतील अशी उदबोधक पुस्तके मुलांना उपलब्ध करून देणे, एकमेकांना मदत करण्याचे बाळकडू मुलांना देणे, मुलांची संगत तपासून पाहणे अशा काही गोष्टी प्रयत्नपूर्वक पालक आणि शिक्षक अशा दोहोंनी केल्यास उद्याची सुसंस्कृत पिढी तयार होईल यात शंका नाही. आपल्या मुलांना घडवण्यात प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. हे सामाजिक अत्याचाराचे मूळ समूळ निपटून टाकण्यासाठी जबाबदारीचा हा विडा आज प्रत्येकानेच उचलण्याची नितांत गरज आहे.   

Monday 24 December 2012

ढिम्म सरकार ...... विषण्ण जनता !


आठ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत एक भयानक घटना घडली आणि तिचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले. दिल्लीतील युवा पिढी रस्त्यावर उतरली. निदर्शने, आंदोलने, घोषणा यांनी दिल्ली दुमदुमली. राजधानीत चर्चासत्रे चालू झाली. आरोपी पकडले गेले. देशभरातून त्या दुर्दैवी मुलीसाठी प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टर तिला वाचवण्याची शिकस्त करत आहेत.  परंतु गेल्या आठवड्याभरातील वेगवेगळ्या घटनांमधून  सरकार आणि आम जनता यांच्यातील दरी वाढत जाते आहे. आरोपींच्या शिक्षेसंदर्भातील कोणत्याही ठोस निर्णयाप्रत अजून तरी सरकार पोहोचू शकलेली नाही. असे अनेक बलात्कारी, अत्याचारी आजही या देशाच्या पाठीवर राजरोस निर्भीडपणे फिरत आहेत. त्यांच्या कृष्ण-कृत्यांना आळा घालायला कुणी आलेलाच नाही. आणि जन्मभराची शिक्षा भोगत बसल्या आहेत अनेक असहाय तरुणी ! 
मुंबईत निखिल बनकर या तरुणाच्या हल्ल्याचे लक्ष्य झालेली तरुणी हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत आहे. दिवसेंदिवस या घटना बेसुमार वाढल्या आहेत. जवळजवळ सगळ्या आई-वडिलांच्या डोक्याला नसता घोर लागला आहे. शाळा-कॉलेज-ऑफिस मध्ये जाणारी आपली पोर घरी सुखरूप येईल ना ही चिंता त्यांना दिवस-रात्र  कुरतडते आहे.  'सिंगल रेप-gang रेप' हे शब्द नको त्या वयात मुला-मुलींच्या ओठांवर येत आहेत. छोट्या-छोट्या मुलींना स्वत:चे रक्षण परपुरुषापासून कसे करायचे याविषयी मार्गदर्शन देण्याची वेळ आली आहे.  यातील काही मुली स्वकीयांपासूनच विटंबिल्या जात आहेत.  घरी-दारी लहान मुलींचे, तरुणींचे, स्त्रियांचे शत्रू निर्माण होत आहेत. मुलींच्या वयाचा जराही मुलाहिजा न ठेवता त्यांना आपल्या कामांधतेचे बळी ठरवण्यासाठी अनेक पुरुष तत्पर आहेत.    
हे सगळे अव्याहत चालू असताना सरकार मात्र अनेक गंभीर प्रश्नांना ठराविक चाकोरीबद्ध उत्तरे देत आणि मूळ प्रश्नाला बगल देत ढिम्म बसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेतील दिरंगाई आणि ढिलाईमुळेच अपराध्यांचे फावले आहे. रस्त्यात चालणाऱ्या कोणत्याही मुलीवर हात टाकणे, तिची छेड काढणे, तिच्यावर acid फेकणे, चाकूहल्ला करणे त्यांना सहजसाध्य होते आहे. एकीकडे स्त्रीला देवी म्हणायचे आणि दुसरीकडे तिच्या देहाला खेळणे समजायचे अशा प्रकारची मानसिकता समाजात बोकाळली आहे.  सत्तेवर बसलेल्या व्हीआयपींना मुली आहेत पण त्या मुलींचे आयुष्य आणि सर्वसामान्य मुलींचे आयुष्य यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कडेकोट बंदोबस्तात आपला अभ्यासक्रम आणि करियर करणाऱ्या त्यांच्या मुली आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थतीत कुटुंबाला आधार देत नोकरी करणाऱ्या, घर चालवणाऱ्या, एकट्या-दुकट्या राहणाऱ्या सामान्य मुली यात कुठल्याही दृष्टीने तुलना होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी बसची वाट बघत आणि परक्यांच्या घाणेरड्या नजरा सहन करत एकटीने उभे राहणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? रात्री उशिरा ट्रेनमधून जीव मुठीत धरून प्रवास करणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? त्यामुळे आम्हालासुद्धा मुली आहेत हा त्यांचा युक्तिवाद इथे प्रशस्त ठरत नाही. 
दिल्लीत घडलेली घटना हा क्रौयाचा परमोच्चबिंदू आहे पण याआधीही अशा अनेक अत्याचाराच्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशा अनेक घटना घडूनही सरकारच्या निर्ढावलेल्या डोळ्यांना काही पाझर फुटत नाही. अपराधी मोकाट सुटतात आणि त्यांच्या वासनेला बळी पडलेल्या एकतर मरून तरी जातात किंवा खालमानेने आपला जीव जगवत राहतात. केईम मध्ये आजही अरुणा शानभाग खितपत पडून, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे आणि तिच्यावर अत्याचार करणारा मात्र त्याच्या वाटची जुजबी शिक्षा भोगून त्याचे प्रापंचिक आयुष्य व्यतीत करतो आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी स्त्रीकडे वाकडा डोळा करून बघणाऱ्या माणसास सज्जड शिक्षा होत असे. अमक्याने स्त्रीवर अत्याचार केला आहे हे सिद्ध झाल्यास त्याचे हात-पाय कलम केले जायचे. अपराध आणखी गंभीर असल्यास त्याला हत्तीच्या पायी दिले जात असे. पेशव्यांच्या काळीही अशा प्रकारच्या कठोर शिक्षांची अंमलबजावणी होत असे. तात्पर्य स्त्रीवर केला जाणारा अत्याचार हा अक्षम्य आणि दंडनीय होता. आजही अनेक आखाती देशांत स्त्रीवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराला अतिशय कठोर शिक्षा सुनावली जाते. आपल्याकडे अत्याचाराचे गांभीर्य लक्षात न घेता शिक्षा सुनावल्या जातात, ज्या त्या अपराधाच्या तुलनेत अतिशय माफक स्वरूपाच्या असतात. अवघी काही वर्षे तुरुंगवास आणि मग सुटका! आरोप सिद्ध न झाल्यास विनासायास सुटका! आरोपी 'बडे बापका बेटा' असल्यास उलट अपराधाला बळी पडलेल्या तरुणीवरच चारित्र्यहिनतेचे शिंतोडे! 
शिक्षा अशी द्यायला हवी की ती शिक्षा बघून इतरांना जरब बसावयास हवी. शिक्षा अशी हवी की कुणी स्त्रीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मतच करणार नाही. मग तिच्या अंगाला हात लावण्याची गोष्ट तर दूरच राहिली! जोपर्यंत अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी या देशात होणार नाही तोपर्यंत येथील मुली आणि स्त्रिया कधीच सुरक्षित राहणार नाहीत. प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा यथोचित आदर करायलाच हवा. वेडेवाकडे प्रश्न विचारून स्त्रीला अपमानित करणारे पोलिस, कोर्ट यांनीही योग्य मर्यादा पळून त्या स्त्रीबरोबर घडलेल्या घटनेची पडताळणी करायला हवी.  
शेवटी या पृथ्वीतलावरील प्रत्येक पुरुषाचे अस्तित्व स्त्रीमुळेच आहे हे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. 

Monday 17 December 2012

महिलांवरील वाढते अत्याचार- एक शोचनीय बाब


आपला देश प्रगतीपथावर आहे असे अभिमानाने गर्जून सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांची गांधारी झाली आहे काय असे खडसावून विचारण्याची पाळी आज आली आहे. जाणूनबुजून डोळ्यांवर झापडे लावून रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, प्रांतोप्रांती चाललेल्या महिलांच्या शारीरिक शोषणाविरुद्ध मूग गिळून गप्प बसलेल्या या सरकारला गदागदा हलवून जागे करण्याची वेळ येउन ठेपली आहे. 
रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळेमध्ये, हॉटेलमध्ये कुठेही राजरोस बलात्कार होत आहेत. अगदी चिमुकल्या बाळांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कुणीही या विकृत नराधमांच्या वासनेची शिकार होत आहेत. रस्त्यावरील छेडछाडीला तर अंतच नाही. कुठे 'acid हल्ला तर कुठे 'चाकू हल्ला'! कुणी प्रेमाला नकार दिला म्हणून तर कुणी छेडछाडीला विरोध केला म्हणून स्त्रीत्वावर सरळसरळ , बिनदिक्कत घाला घातला जात आहे. रोड रोमिओ, श्रीमंत बापजाद्यांची पोरे, प्रेमभंगाने माथेफिरू झालेले असे कोणीही सर्रास, कसलाही विधिनिषेध न बाळगता स्त्रियांच्या पदराला हात घालायला धजावत आहेत. नागरिकांच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलेल्या शासकीय यंत्रणेसाठी ही खचितच शरमेची बाब आहे.   
आज स्वत:च्या पायांवर भक्कमपणे उभे राहून कुटुंबाचा भार वाहणाऱ्या अनेक महिला आहेत. नवऱ्याच्या  खांद्याला खांदा लावून सक्षमपणे आर्थिक जबाबदारी पेलणाऱ्या अनेकजणी आहेत. शिक्षणासाठी आपला प्रांत सोडून दुसऱ्या  प्रांतात जाऊन शिकणाऱ्या अनेक आहेत. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या आहेत. रात्रपाळी करणाऱ्या आहेत. निवृत्त जीवन जगत एकाकी राहणाऱ्या आहेत. आपल्या निष्पाप, चिमुकल्या डोळ्यांनी हे विश्व समजून घेण्याचा प्रयास करणाऱ्या आहेत. या महिला वेगवेगळ्या वयातील, आर्थिक व सामाजिक स्तरातील आहेत. या समस्त महिलांच्या संरक्षणाची हमी कोणी द्यायची? वेळी-अवेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची नाही का? दिवसढवळ्या रस्त्यावर पुरुषी अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना योग्य ते संरक्षण मिळणे गैरवाजवी आहे का? 
आज एकविसाव्या शतकातही स्त्री मग ती कोणत्याही वयातील असो, एक उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्याकडे पहिले जाते. ज्या छोट्या बाळाकडे बघून ममत्वाशिवाय इतर कोणत्याही भावना निर्माण होऊ शकत नाहीत , त्या बालिका सुद्धा या लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. जी वृद्ध महिला माता , आजी या संबोधनासाठी योग्य असते तिच्यावरही या विकृतीचे शिंतोडे उडाल्यावाचून राहत नाहीत. अशा राज्यात सारे काही आलबेल आहे असे म्हणायचे? अगदी विकलांग मुलीलासुद्धा या वासनेचे लक्ष्य केले जाते. हे सारे मानवी अधोगतीचे द्योतक नाही काय? 
फक्त खेड्यापाड्यात नव्हे तर शहरी भागातही या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. सामुहिक बलात्कार जिथेतिथे बोकाळला आहे. जर सकाळी हातात पेपर धरायला घ्यावा तर डझनावारी याच बातम्या लक्ष वेधून घेत ढेपाळलेली शासकीय सुरक्षितता अधोरेखित करत असतात. अत्याचाराला बळी पडलेली महिला मग लोकांच्या सहानुभूतीचा, दयेचा, उपेक्षेचा विषय होते. जणू काही ताठ मानेने जगण्याचा तिचा अधिकार संपुष्टातच येतो. तिचा व्यक्तिश: यत्किंचितही सहभाग नसलेल्या दुष्कृत्याची ती अनपेक्षित बळी ठरते आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ होतो. घरी-दारी असे अपमानास्पद जिणे असह्य झाल्याने मृत्यूला कवटाळण्याशिवाय त्या पिडीत स्त्रीकडे अन्य पर्यायच उरत नाही. जी मुलगी अथवा स्त्री आजवर एखाद्या कुटुंबाचा गौरव किंवा आधार ठरलेली असते ती स्त्री किंवा मुलगी या घटनेनंतर शारीरिक तसेच मानसिक आघाताने पुरती खचून जाते. मनोमन उध्वस्त होते. तिच्यासाठी सगळीच आपली वाटणारी माणसे परकी होऊ लागतात. जगण्यापेक्षा मरण सुकर वाटू लागते. 
अनेक पुरुषांची मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे. मी पुरुष आहे म्हणजे मी शारीरिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे. मी काहीही करू शकतो. हा अहंगंड समूळ नष्ट झाला पाहिजे. पुरुष-स्त्री समानतेचे नारे देणारयांनी खरोखरीच अशी समानता लोकांच्या आचरणात आहे का हे तपासून पहिले पाहिजे. कोणत्याही मुलीवर,स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला सज्जड शिक्षा समाजाकडून वेळच्या वेळी दिली गेली पाहिजे. स्त्रीचा आदर करण्याचे बाळकडू पुरुषाला घरातूनच मिळाले पाहिजे. या देशात प्रत्येक मुलीला, स्त्रीला मानाने, सुरक्षिततेने जगण्याचा हक्क आहे आणि तो हक्क नाकारणाऱ्या कोणत्याही माणसास जबरदस्त शिक्षा व्हायला हवी. 
नाहीतर 'सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा' असे गर्वाने स्वातंत्र्यदिनी म्हणणाऱ्या करोडो भारतवासीयांवर शरमेने मान खाली घालण्याची पाळी येईल. 

Friday 14 December 2012

ऑफिस आणि कुटुंब ........ एक कसरत




पूर्वीच्या काळी चाकरमानी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतायचे. संध्याकाळी सहानंतर बहुतांश ऑफिसेस ओस पडायची. दुपारी घरचा डबा आणि रात्री घरचे जेवण यामुळे तब्येत उत्तम रहायची. कामाचा अवाजवी ताण नव्हता. रेल्वेने येणे-जाणे आता इतके भीषण नव्हते. एकत्र कुटुंब असल्याने आपल्या मुलांना कोण बघेल याची क्षिती नसायची. सणासुदीला गावी जाण्यासाठी सुटी मिळायची. एकंदरीत घर आणि ऑफिस हे दोन्ही गड व्यवस्थित राखता यायचे. आता मात्र हे चित्र पूर्णत: बदलले आहे.  
सकाळी घर सोडायचे. तुडुंब भरलेल्या बसमधून अथवा ट्रेनमधून कसेबसे स्वत:ला गोळा करत ऑफिस गाठायचे. कामाचे ढीग हातावेगळे करत राहायचे. यायच्या वेळेची निश्चिती नाही. काम आणि काम. अवाजवी ताण. वेळ मिळालाच तर काहीतरी पोटात ढकलून भूक भागवायची. वरिष्ठांची बोलणी खायची. मनाविरुद्ध गॉसीप ऐकायच्या. प्रमोशनच्या जीवघेण्या लढाया लढायच्या. रात्री उशिरा घरी परतल्यानंतरही laptop उघडून ऑफिसचे काम करत बसायचे. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला वेळ नाही, त्यांची वास्तपुस्त करायला वेळ नाही. सुट्या आहेत पण घेता येत नाहीत अशी अवस्था! आजकाल जवळ जवळ प्रत्येक घराचे थोड्याबहुत फरकाने हेच चित्र आहे. 
बहुतेक ऑफिसेस वातानुकुलीत असतात. त्यामुळे सतत थंड हवा शरीरात झिरपत राहते. कोवळे ऊन अंगावर घ्यायला कुणाला सवड नसते. बहुतांश ऑफिसमध्ये व्हेंडिंग मशिन्स असतात, म्हणून अनेक जण नुसता सारखा चहा किंवा कॉफी ढोसत राहतात. घरून डबा आणणे काहींना कमी प्रतिष्ठेचे वाटते म्हणून मग जेवणाच्या वेळी शेजारील हॉटेलमधून पदार्थ ऑर्डर केले जातात. जंक फूड खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पोळी-भाजी पेक्षा पिझ्झा खाणे प्रिफर केले जाते नव्हे प्रतिष्ठित समजले जाते. या उलट काहींना ऑर्डर करून खायलाही वेळ नसतो. ते चहा-कॉफी वर वेळ मारून नेतात. शरीराला योग्य ते अन्न वेळच्या वेळी न मिळाल्याने शरीर बंड करून उठतं. मग डोकेदुखी, acidity, बद्धकोष्ठ, मेदधिक्य अशा तक्रारी वाढू लागतात. झोपेचा कोटा पूर्ण न झाल्याने चेहऱ्यावर मरगळ येते, ग्लानी आल्यासारखे वाटते. सतत थंड वातावरणात वावरल्याने सर्दी-खोकला होत राहतो. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रक्तदाबाची पातळी खाली-वर होऊ लागते, stress Diabetes उद्भवू शकतो.  
पैसे भरपूर मिळतात म्हणून खूप जण ओव्हरटाईम करतात. स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून असा भरपूर कमावलेला पैसा मग डॉक्टरांच्या औषधांवर रिता करावा लागतो. अव्यवस्थित खाणे-पिणे, अपुरी झोप, अनियमित शेड्युल, व्यायामाचा अभाव आणि कामाचे प्रेशर यामुळे शारीरिक आणि मानसिक तक्रारी वाढू लागतात. स्वभाव चिडचिडा होऊ लागतो. नवरा-बायको दोघे याच पद्धतीने काम करत असल्यास मुला-बाळांकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यांना वेळ अजिबात देता येत नाही. मग याची भरपाई म्हणून एखादी मोठी सुट्टी घेऊन परदेशवारी केली जाते. मुले तात्पुरती खुश होतात. परंतु घरी आल्यानंतर पुन्हा तेच कंटाळवाणे रुटीन सुरु होते. मुलांना महागडे कपडे, खेळ, खाणे देऊन त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न आई-वडील करत असतात. अधिक पैसे = अधिक सुख हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेले असते. 
मुले शिकतात, मोठी होतात. स्वत:च्या पायावर उभी राहतात आणि बघता बघता  परदेशात भुरकन उडून जातात. कारण तिथे त्यांना बक्कळ पैसा मिळणार असतो. पैसा हेच सर्वस्व हे त्यांच्या पालकांचेच ब्रीदवाक्य असते. उतरत्या वयाचे पालक वरकरणी परदेशी गेलेल्या मुलाच्या कौतुकात रमल्याचे दाखवत असले तरी आपली मुले म्हातारपणी आपल्या जवळ राहणार नाहीत याची खंत त्यांना मनोमन सतावत असते. जेव्हा मुलांना पालकांची खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा पालक उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि जेव्हा वयस्कर मात्या-पित्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज भासते तेव्हा मुले उपलब्ध होऊ शकत नाहीत. अर्थात याला अपवादही काही कुटुंबे असतातच! परंतु आई-वडील आणि मुले यांना एकमेकांचा पुरेसा सहवास न लाभणे, त्यांना एकमेकांशी संवाद साधता न येणे, आनंदात आणि दु:खात एकमेकांचा आधार न मिळणे ही स्थिती खचितच गौरवास्पद नाही.  
माणसाच्या गरजांना अंत नाही. माणसाच्या आकांक्षांना अंत नाही. माणसाच्या अभिलाषांना अंत नाही. पण निव्वळ जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी आपण कौटुंबिक सौख्याचा, जिव्हाळ्याचा,आपल्या स्वास्थ्याचा आणि कोमल नात्यांचा अंत तर करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवणे नितांत गरजेचे आहे.