Friday 20 January 2012

श्लील आणि अश्लील

उत्तम दर्जेदार विनोद हा कोळशाच्या खाणीतून हिरा शोधण्याइतकाच दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललाय. केवळ विनोदच नाही तर अगदी साधंसुध बोलणंही आजकाल कानावर पडणं कठीण झालंय. प्रत्येक वाक्यागणिक एखाद-दुसरा अर्वाच्च्य शब्द जर आला नाही तर नरजन्माचं सार्थक झाल्यासारखं अनेकांना वाटत नाही. 
बीभत्स, अश्लील अंगविक्षेप, हातवारे करून लोकांना हसवणं, येत जाता माणसांची त्यांच्या विशिष्ट लकबीवरून टिंगल-टवाळी करणं हे पुढारलेल्या माणसाचं लक्षण समजलं जातं हे आमचं दुर्दैव आहे. अगदी शाळेतील लहान लहान मुलेही अत्यंत घाणेरड्या आणि सामान्य माणसाला लाजवेल अशा भाषेत एकमेकांशी संवाद साधत असतात.  लोकलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी बायकांमधली भांडणे ज्यांनी अनुभवली आहेत त्यांना हा भयंकर प्रत्यय नक्की आला असेल. इतक्या खालच्या थराला जाऊन या बायका एकमेकांवर दोषारोप करतात की सभ्य माणसाला घाणीची आंघोळ झाल्यासारखी वाटावी. 
रिक्षा सिग्नलला थांबताच दबा धरून बसलेले तृतीयपंथी येतात आणि अंगाला हात लावत भिक मागतात. आपण दुर्लक्ष केले किंवा अंगाला हात लावू नका असे कितीही सौम्य भाषेत सांगितले की त्यांची खास भाषा सुरु होते आणि सिग्नल संपेपर्यंत  ती भाषा आपल्याला ऐकावी लागते. 
आजकाल अनेक वाहिन्यांवर बाष्कळ विनोदाची शेते उगवलेली आपल्याला दिसतात. त्यांची एकमेकांशी व्यावसायिक स्पर्धा असल्या कारणाने आपल्या शोचा  टीआरपी वाढवण्यासाठी त्यांना नाना युक्त्या लढवाव्या लागतात. एका हिंदी कॉमेडी शो मध्ये अतिशय हीन दर्जाचे विनोद करून प्रेक्षकांना हसवण्याचा खटाटोप केला जातो. अचकट-विचकट हातवारे करणे आणि डबल मीनिंग असलेले विनोद करणे हा तर बहुतांश कॉमेडी शोजचा स्थायीभावच झाला आहे. आपल्या या शोचा यंग जनरेशनवर  काय परिणाम होतो आहे याची तमा त्यांना कुठे आहे? अशा या विनोदवीरांचे थर्ड ग्रेड विनोद ऐकण्यासाठी यांना अनेक 'Award function' मध्ये बोलावले जाते. यांना मान-सन्मान, लौकिक प्राप्त होतो. कुणी आपल्या जाडेपणाचं तर कुणी आपल्या सुकडेपणाचं भांडवल करताना आपल्याला दिसतं. दुसऱ्याच्या व्यंगावरही या अश्लील विनोदांची फवारणी पदोपदी होत असते. प्रेक्षक हे विनोदी चाळे बघतात आणि टाळ्या वाजवतात. लहान मुले या कार्यक्रमातून त्यांना हवी ती दीक्षा घेतात. हे विनोद जरी कालांतराने विसरले गेले तरी त्यांनी दिलेली संथा अनेक रुपात पुढे येतंच राहते.  
कुटुंबाचा कर्ता असलेला कुटुंबप्रमुख आपल्या बायको-मुलांना बिनदिक्कत शिवीगाळ करतो आणि त्याच्या असल्या संस्कारांच्या छत्राखाली मुले लहानाची मोठी होतात. कित्येकजण मदिरेच्या आहारी गेल्यानंतर इतकी घाणेरडी भाषा वापरतात की आपण चांगल्या सभ्य,सुसंस्कृत घरातले आहोत याचाही त्यांना विसर पडतो. नाक्यावरचे टपोरी समोरून चाललेल्या आय-बहिणींचा अनेकदा अर्वाच्च्य शब्दांनी उद्धार करत असतात.
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, सोसायटीत अनेक तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळतात. ते आपल्याच प्रणयलीलांत  मग्न असल्याने आपल्या आजूबाजूला अनेकजण वावरत आहेत, आपल्या या कृत्यांकडे बघत आहेत याचा त्यांना पत्ताच नसतो. अनेक शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी म्हणून खाली उतरतात आणि ही प्रणयदृश्ये बघत शाळेची वाट धरतात. नको त्या वयात नको त्या गोष्टींची प्रचीती त्यांना येत असते. त्यांना कोणी हटकण्याचे पुण्य केले तरी हे प्रणयवीर निर्ढावल्यासारखे दुसरी एखादी जागा निवडतात. समाजाच्या हिताचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनाही या गोष्टी आक्षेपार्ह वाटत नाहीत काय असे विचारण्याची वेळ आता आली आहे.  
व्यवसायातील संघर्षामुळे, बाजारीकरणामुळे, प्रसारमाध्यमांमुळे आणि सामाजिक,कौटुंबिक भान हरवल्यामुळे  श्लील आणि अश्लील यांतील सीमारेषा आता पुसली जाण्याच्या मार्गावर आहे.

No comments:

Post a Comment