Monday 24 October 2011

मोठे कुणा म्हणू मी?

काही वर्षांपूर्वी दादरच्या किंग जॉर्ज शाळेत एका कार्यक्रमाला गेले होते. एका नामवंत सतारियांच्या सतारवादनाचा  कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम संपला. ते सतारिया व्यासपीठावरून खाली उतरले आणि श्रोत्यांमध्ये मिसळले. आम्हीही त्यांना अभिप्राय देण्यास उत्सुक होतो. "मेरा बजाना आपको अच्छा लगा?" त्यांच्या या विनम्रतेने मला बुचकळ्यात टाकले. नावलौकिक प्राप्त झाल्यानंतर इतक्या अदबीने, इतक्या नम्रतेने वागणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतात. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात. काही माणसे तर आपण त्यांच्यापेक्षा कुठेतरी कमी आहोत ही न्युनतेची  भावना आपल्यावर ठसवण्यासाठी कायम तत्पर असतात. 

अशाच एका नामवंत कवी-साहित्यिकाला मी माझ्या काही कविता वाचण्यासाठी  दिल्या व त्यावर त्यांचा अभिप्रायही मागितला. हेतू हा की त्यांच्यासारख्या साहित्याचं शिखर गाठणाऱ्याकडून माझ्यासारख्या होतकरू कवयित्रीला बहुमुल्य मार्गदर्शन मिळावं. आपण या क्षेत्रात योग्य मार्गाने जात आहोत ना याचीही खातरजमा करता यावी. परतू अभिप्राय तर सोडाच पुढल्या वेळी भेटल्यानंतर मी असा काही काव्यसंग्रह त्यांना दिला होता हे त्यांच्या खिजगणतीतही  नव्हतं. मला फार वाईट वाटलं. पण काही वेगळं वाटलं नाही. याउलट माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला लाभलेले  कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट,शिरीष पै  या काव्याच्या प्रांतातील ज्येष्ठांचे अभिप्राय मला खूप बोलके वाटले. १९८४ साली माझ्या काही निवडक कवितांबद्दलचे विश्लेषण माझ्या पत्राच्या उत्तरादाखल म्हणून पु.लंनी अंतर्देशीय पत्रातून केले तेव्हा तर मला अस्मान ठेंगणे झाले. सुरेश भटांनी तर गझल कशी लिहावी व कशी लिहू नये याबद्दल  पत्रातून आपुलकीने सविस्तर माहिती दिली. वर आणखी तुमचा पिंड गझल लिहिण्याचाच आहे हेही ठामपणे सांगितले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनीही त्यांना काव्यमय पत्र पाठविल्यानंतर तितक्याच तत्परतेने आणि आस्थेने पत्र पाठविले. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या काव्यसंग्रहाची शीर्षके निवडून त्यावर कविता करून मी पाठवली होती. ती त्यांना पोहोचताक्षणी त्यांनी आवर्जून माझ्या घरी फोन केला होता. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. अशा काही चांगल्या घटनांमुळे माझ्या मनातील या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची एक माणूस म्हणूनही प्रतिमा उंचावली गेली.     
   साहित्याप्रमाणे संगीत क्षेत्रातही मी माझ्या कुवतीप्रमाणे मला थोडे आजमावले. काही प्रतिभावंताच्या रचनांना स्वरबद्ध करून ती गाणी रसिकांसमोर प्रस्तुत करून कानसेनांची तसेच संगीत क्षेत्रातील नामवंतांची दाद मिळवली. तबलावादनात ज्यांचे नाव अभिमानाने आणि अग्रणी घेतले जाते त्या पं.भाई गायतोंड्यांमुळे मराठी भावगीताचे जनक गजाननराव वाटवे यांना भेटण्याचा योग आला. पुढे आर्थिक अडचणींमुळे या कार्यक्रमांना खीळ बसली. या निमित्ताने कलावंताच्या आत वसलेल्या मानवरूपाचे मला बरे-वाईट दर्शन झाले. 
मुळातच आपण एखाद्या कलावंताला हा मोठा, हा ग्रेट, हा लोकप्रिय अशी लेबले लावतो खरी परंतु ते केवळ त्याच्या कलेच्या संदर्भात! अशा एखाद्या कलावंताला माणूस म्हणून बघावे तर कधी कधी तो अतिसामान्य निघतो. कळसावर पोहोचलेल्याने कळसाच्या पायापाशी असलेल्याला मार्गदर्शन करण्यात कमीपणा का वाटावा? की उद्या याला हात दिल्यानंतर हा आपल्या पर्यंतचे अंतर लवकर कापेल अशी भीती त्यांना आतून खात असावी? "मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो" या कविवर्य बोरकरांच्या काव्यपंक्ती  इथे सार्थ ठरतात. लोकप्रियता, कीर्ती, पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा ,मानसन्मान या मुखवट्याआड दडलेला माणूस खरोखरीच मोठा आहे की खुजा आहे , सामान्य आहे की असामान्य आहे , अहंकारी आहे की निरहंकारी ही एक संशोधनाची बाब आहे.     

Saturday 22 October 2011

आली दिवाळी दिवाळी..............


२०११ सालची दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. घराभोवती काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, घरगुती फराळ, आप्तांच्या भेटीगाठी, पाडवा-भाऊबीज सगळं काही  साजरं होईलच पण तरीही काहीतरी हातातून निसटल्याची हुरहूर लागून राहिली आहे. 

आमच्या लहानपणी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरकचतुर्दशीला आम्ही पहाटे चार वाजता उठायचो.  आई आम्हा भावंडांना पाटावर बसवून सुगंघी तेल लावायची. नंतर एकेकाची उटणे लावून आंघोळ व्हायची. आंघोळ चालू असताना आम्हाला पेटत्या फुलबाज्या दाखवल्या जायच्या. मग घराच्या देवाला,वडीलधाऱ्यांना नमस्कार! दिवाळीची पाकिटे मिळायची. नवीन कपडे  अंगावर चढवण्याची कोण घाई व्हायची. मग मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळून आम्ही फटके उडवायला सज्ज व्हायचो. मनसोक्त फटके उडवल्यानंतर घरच्यांबरोबर  घरी तयार झालेला  खमंग फराळ खाताना खूप मज्जा यायची. 
लक्ष्मीपूजनाला घरातील दागिन्यांची, पैशांची पूजा व्हायची. पाडव्याला आई बाबांना ओवाळायची. पाडव्याची ओवाळणी म्हणून आईला बहुधा साडीच मिळायची. भाऊबिजेला आम्ही आमच्या भावाला ओवाळायचो. ओवाळणी म्हणून अर्थातच पाकीट असायचं. त्यात लपलेल्या अकरा किंवा एकवीस रुपयांचं आम्हाला कोण अप्रूप वाटायचं . घरातील मोठ्यांकडून मिळालेल्या एक्कावन्न रुपयात सगळी बाजारपेठ खरेदी करता येईल असं वाटायचं. या चार दिवसांत अख्ख्या वर्षाचा आनंद उपभोगायला मिळायचा. फराळाची देवाणघेवाण, शेजाऱ्यांचे,नातेवाईकांचे येणेजाणे सुखद वाटायचे. 
इतक्या वर्षांनंतरही  दिवाळी साजरी होतेच पण फक्त वेगळ्या पद्धतीने! बहुतेक लोक दिवाळीत फटाक्यांपासून वाचण्यासाठी   आऊटिन्गला जातात. दिवाळीची खरेदी मॉलमध्ये होते. फराळ आयता आणला जातो. पाडवा-भाऊबिजेला एकमेकांना मोठमोठ्या  महागड्या गिफ्ट्स देणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. बहिणीही याबाबतीत आता माघार घेत नाहीत. बाह्य सजावटीला अवास्तव महत्त्व दिलं जातं. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या चीजवस्तू  आप्तांना भेट म्हणून दिल्या जातात. काही ठिकाणी पाकीटातून चेक्सची  देवाणघेवाण होते. दिवाळीचे उपचार शिताफीने पाळले जातात पण अंत:करणातली ज्योत काही केल्या पेट घेत नाही. आईच्या हाताने लावलेल्या तेलाची,उटण्याची कसर भरून काढता येत नाही. ज्येष्ठांनी मायेने दिलेल्या अकरा,एकवीस,एक्कावन्न रुपयांची सर पाकिटातील हजारांच्या आकड्यांना येत नाही. घरात सगळ्यांनी मिळून केलेल्या  फराळाचा आनंद बाजारातून आणलेला फराळ देऊ शकत नाही. दिवाळीला मुलांना चांगले-चुंगले कपडे घेण्यासाठी आई-वडिलांनी वर्षभर केलेल्या काटकसरीची कहाणी  कपाटातील  अनावश्यक ओसंडणारे कपडे  सांगू शकत नाहीत. रांगोळ्यांची स्पर्धा होते पण एकमेकांकडून उसने मागून आणलेले ठिपक्यांचे कागद, गेरू,रंग, रांगोळ्यांची पुस्तके यातील उत्साहाची आणि आनंदाची स्पर्धा नाही होऊ शकत. पूर्वी दिवाळीच्या नुसत्या चाहुलीने मन आनंदित व्हायचं, उल्हसित व्हायचं आणि आता मात्र  कोणत्याही सणांच्या आगमनाची सूचना पहिल्यांदा वर्तमानपत्रातील जाहिरातींमधून, घरात टाकलेल्या पत्रकांतून, सजविलेल्या, रोषणाई केलेल्या दुकानांतून मिळते. पूर्वी घराघरांतून दिवाळीसाठी एक निश्चित बजेट आखलं जायचं पण आता दिवाळीत जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची जणू अहमहमिकाच लागलेली दिसते.   
दिवाळीचे चार दिवस येतात तसेच सरतात. फराळ,
फटाके,शुभेच्छा कार्डे, गिफ्ट्स सारे काही यथासांग पार पडते. पण औपचारिकतेचे उटणे लावून आलेली आणि कृत्रिमतेचे रंग घेऊन सजलेली दिवाळी अंतर्मनातील आनंदाची फुलबाजी काही पेटवू शकत नाही.   


Tuesday 18 October 2011

डोअरबेल आणि राशी


डोअरबेल वाजविण्याच्या विशिष्ट वैयक्तिक पद्धतीवरून राशी ओळखल्या जाऊ शकतात का? एकदा शरद उपाध्यांना विचारले पाहिजे. डोअरबेल हे  घरातील लोकांना दचकविण्याचे, घाबरवण्याचे  हत्यार आहे अशी मानसिक धारणा असणाऱ्याची रास कोणती? डोअरबेल हे घरातील लोकांशी लपाछपी खेळायचे साधन आहे अशी मनोभूमिका असणाऱ्यांची रास कोणती? या आणि अशासारख्या प्रश्नांची उत्तरे मेष ते मीन या बारा राशींमध्ये दडली आहेत का ते पडताळून बघूया.
 मेष राशीचे उतावळे नवरे दारावरची बेल इतक्या कर्कश रीतीने वाजवित असतील की घरातल्या आबाल-वृद्धांचे कान किटावेत.थांबणे हा मेष राशीचा स्थायीभाव नसल्याने जोपर्यंत दार उघडले जात नाही तोपर्यंत यांचा बेलवरचा हात निघत नसावा.राशीस्वामी मंगळाचा आक्रमकपणा डोअरबेल वाजवण्याच्या पद्धतीतून प्रत्ययास येत असावा.
वृषभ राशीच्या लोकांचे डोअरबेल वाजविणे काहीसे याप्रमाणे असावे असे वाटते. एकतर हे लोक जास्तीत जास्त मंजुळ आवाजाची डोअरबेल बसवून घेत असावेत. तीही अतिशय अलवारपणे वाजवून आपली रसिकता घरच्या जिवाभावाच्या माणसांना दाखवून देण्याचा यांचा प्रयत्न असतो. या रसिक शुक्राच्या प्रयत्नांवर बोळा फिरवणाऱ्या घरातल्यांच्या राशी असतील तर मात्र यांची अवस्था कठीण होऊ शकते.

मिथुन राशीचे लोक बेल वाजवून हळूच जिन्यात लपत असतील, पळून जात असतील असे वाटते. यात काही लोकांचा बुध नको तेवढा खेळकर असतो. खेळ केव्हा खेळावा आणि कोणत्या राशींच्या माणसांशी खेळावा हे तारतम्य यांनी राखले नाही तर दार उघडता क्षणी यांच्या चेहऱ्यावरील खट्याळ हास्य विरून जाऊ शकतं. 
कर्क राशीचे लोक डोअरबेलही भावनेने ओथंबून वाजवित असावेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भावव्याकुळता डोअरबेलच्या माध्यमातून घरातील लोकांना कळावी असे त्यांना मनोमन वाटत असणार. त्यांच्या डोअरबेलचा आवाजही रडण्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा असावा असे वाटते. घरात कोणत्या राशीच्या वल्ली नांदत आहेत यावरून त्यांच्या डोअरबेलला मिळणारा प्रतिसाद कसा असेल हे कळू शकते. 

सिंह राशीचे लोक राजेशाही थाटाची डोअरबेल घराला लावत असावेत. ही बेल ते अशा विशिष्ट पद्धतीने वाजवत असावेत की घराबाहेर राजकुमार आल्याची वर्दी त्या बेलने द्यावी. घरातील लोकांनी दार उघडताच आपल्याला मुजरा करावा, घरातील सिंहासनावर आपण विराजमान व्हावे, थंड, सुगंधी सरबताचा पेला आपल्या ओठांना लागावा अशी स्वप्ने ही माणसे बेल वाजविताक्षणी पाहत असावीत. शनीच्या राशीची उदासीन माणसे घरात असल्यास यांच्या स्वप्नांना खीळ बसू शकते.
कन्या राशीचे लोक डोअरबेल पुन्हा पुन्हा वाजवित असावेत. एकतर आपण बेल नीट वाजवली आहे की नाही याबद्दल ते नेहमीच साशंक असतात. घरातील माणसांना बेल ऐकू गेली असेल का? दुपारच्या वेळी ढाराढूर झोपलेल्या घरातल्यांना आपल्या बेल वाजवण्याने नक्की जाग येईल का? एखादा सेल्समन समजून त्यांनी आपण आल्याची दखलच घेतली नाही तर ? हे आणि अशासारखे कैक प्रश्न यांच्या मनात हलवायाच्या मिठायांवरील माश्यांसारखे घोंघावत असतात. बेल पुन्हा पुह्ना वाजवल्याने घरात कावलेल्या, चिडलेल्या माणसांकडून यांना चांगलीच तंबी मिळू शकते. 
तूळ राशीची माणसे आपण सकाळी घरातून निघताना घरातल्या माणसांचा मूड कसा होता हे calculate करून डोअरबेल वाजवतात. घरातल्यांचा मूड बरा होता हे आठवून बेल थोडी जलद वाजते, मूड बिघडला होता हे आठवल्यावर बेल जरा हळू वाजते, मूड फारच चांगला होता हे आठवल्यानंतर बेल तीन-चारदा वाजवली जाऊ शकते. थोडक्यात घरातल्यांचा मूड आणि बेलचा स्पीड यांचा ताळमेळ जमला पाहिजे हा यांचा कटाक्ष असतो. 

वृश्चिक राशीचे लोक एखाद्यावर जन्मोजन्मीचा सूड उगवल्यासारखी डोअरबेल वाजवतात. दार लवकर उघडले गेले नाही तर आतल्या माणसांची खैर नसते. पदोपदी भांडणे, निराश होणे, एककल्ली वागणे, विक्षिप्त असणे या रसायनातून वृश्चिक मन तयार झालेले असते. त्यांच्या विखारी नांग्या समोरच्याला दंश करायला तत्पर असतात. त्यामुळे बेल वाजवण्याच्या पद्धतीवरून घरातील अनुभवी लोकांनी दार पटकन उघडावे आणि स्वत:चे रक्षण करावे.    
धनु राशीचे लोक मूड चांगला असल्यास डोअरबेल सुसह्य वाजवतात पण मूडचे खोबरे झाले असल्यास डोअरबेल भयानक प्रकारे वाजवू शकतात. ते त्यावेळी माणूस आहेत की घोडा यावर बरेच काही अवलंबून असते. घरातील माणसांना  योग्य ट्रेनिंग मिळाल्यास दारावर माणूस आला आहे की घोडा हे त्यांना लगेचच कळू शकते. 
मकर राशीचे लोक डोअरबेल वाजवतानाही उत्साह दाखवीत नाहीत. आता घरापर्यंत आलो आहोत तर घरातल्यांना आल्याची वर्दी देणे भाग आहे अशा कंटाळवाण्या भूमिकेतून यांच्या हातनं बेल एकदाची वाजते. आत दुसरी मकर रास असेल तर दार बऱ्याच वेळाने , उदासीन चेहऱ्याने उघडले जाते. पण त्यावर यांचे काहीच म्हणणे नसते. काही म्हणण्यापुरतेही तोंड उघडायचा यांना विलक्षण कंटाळा असतो. जीवावर येऊन बेल वाजवणे म्हणजे काय हे फक्त मकर राशीच्या माणसांनाच कळू शकते.
कुंभ राशीची माणसे डोअरबेल वाजवताना एखाद्या गहन विचारात गढली असण्याची शक्यता असते. कदाचित त्यामुळे दुसऱ्याच घराची बेल वाजवली जाऊ शकते. यांच्या स्वभावाप्रमाणे दारावरची बेलही धीर-गंभीरपणे वाजते. दार उघडल्यानंतर समोरच्याची साधी दखलही न घेता आत येत ही माणसे आपल्याच विचारात हरवतात. हसण्याचे यांना वावडे असते. विनोद यांचा शत्रू असतो. खेळीमिळीच्या वातावरणाचा यांनी धसका घेतलेला असतो. " मेरी तनहाई और मै" हे यांचे ब्रीदवाक्य असते. 

मीन राशीचे लोक आपण डोअरबेल वाजवली आहे की नाही हेच विसरून जातात. त्याचवेळी शेजाऱ्याशी बोलणे चालू असते किंवा मोबाईल चालू असतो त्यामुळे आपण बेल वाजवण्याची कृती नक्की केली आहे की नाही हे परत एकदा बेल वाजवून पारखले जाते. घरात हिंस्त्र राशी वावरत असतील तर बिकट प्रसंगाला यांना सामोरे जावे लागते. पण अनुभवातून ही माणसे काहीही न शिकता परत परत त्याच चुका करत राहतात आणि इतरांचा रोष ओढवून घेतात. 
यापुढे ज्योतिषाची डोअरबेल विशिष्ट पद्धतीने वाजल्यास बाहेर कुठल्या राशीची व्यक्ती अथवा वल्ली आली आहे हे ओळखण्याचा प्रस्तुत लेखावरून त्याने किंवा तिने रीतसर अभ्यास करावा आणि या शास्त्राच्या कक्षा अधिक रुंद कराव्यात ही विनंती!

Wednesday 5 October 2011

भोंडला आउट दांडिया इन


पाटावर गजराजांच सुरेख चित्र काढलेलं आहे. त्यावर हळदी-कुंकू-फुलं वाहून सुवासिनी पूजा करताहेत. नऊवारी साडी,नाकात नथ या पेहरावात सगळ्या माहेरवाशिणींनी पाटाभोवती फेर धरला आहे. ऐलमा पैलमा गणेश देवा, झिपर कुत्र सोडा ग बाई सोडा, सासूबाई सासूबाई मला आलं मूळ, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने, यादवराया राणी रुसुनी बसली कैसी अशी भोंडल्यातील परिचित गाणी कानी पडताहेत. रोज एक याप्रमाणे नवव्या रात्री नऊ गाणी म्हणून या भोंडल्याची सांगता होते आहे. रोज वेगवेगळी खिरापत होते आहे. सासवा, सुना, लेकी, त्यांच्या मुली सगळ्या मिळून भोंडल्याचा आनंद लुटत आहेत हे दृश्य आता शहरांतून हद्दपार झाले आहे. 'डिस्को-दांडिया' नावाच्या आधुनिक नृत्यप्रकाराची जिथेतिथे चलती  आहे.  
पूर्वीच्या काळी बायका घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त असायच्या. त्यांची विरंगुळ्याची साधने फार मोजकी होती. त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने बायका एकत्र यायच्या. स्वत:ची सुखदु:खे गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांबरोबर त्या 'शेअर' करायच्या. साड्या,आभूषणे ही त्यानिमित्ताने नटण्याची पर्वणी ! यजमानीण बाई म्हणजे जिच्या दारात भोंडला व्हायचा ती खिरापत करायची व ती झाकून ठेवायची. भोंडला खेळून झाल्यावर साऱ्या पोरीसोरींनी ती खिरापत ओळखायची. खिरापतीचा आस्वाद घेतल्यानंतर त्या दिवशीचा भोंडला संपायचा. अशी ही महाराष्ट्रीयन भोंडल्याची परंपरा! आता फक्त काही वाहिन्यांवर जी सणांची साथ पसरलेली असते त्या त्या वेळापुरते हे भोंडल्याचे दृश्य कधीतरी बघायला मिळते. नाहीतर आजकाल मराठी मुलीही भोंडल्यापेक्षा  दांडिया 'प्रिफर' करतात. 
नवरात्र सुरु झाली की जिथेतिथे या दांडियाचे भलेमोठ्ठे फलक लागतात. त्यावर राजकारणी,स्पोन्सरर्स यांची नावे असतात. मुली-मुले गुजराथी पेहरावात नटून-थटून, हातात दांडिया घेऊन खेळण्यास सज्ज होतात. व्यासपीठावर स्पीकर्स आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली युवापिढीला मोहून टाकणारी कर्कश्य गाणी फेकत असतात. अभूतपूर्व जल्लोषात दांडिया सुरु होतो. दांडिया ग्रुप्सच्या सामाजिक इभ्रतीप्रमाणे कधी मंचावर दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक अवतरते आणि दांडिया हिट होतो.  स्पर्धा आयोजित केल्या जातात. विजेत्या ग्रुपवर बक्षिसांची खैरात होते. गुजराथी पारंपारिक गरबाही फार कमी ठिकाणी खेळला जातो. 
जागर करून देवदेवतांचा आशीर्वाद घेण्याची सर्वमान्य पद्धत आता मागे पडली आहे. सणांच्या नावाखाली त्या त्या प्रचलित प्रथेचे भांडवल कसे करता येईल यासाठी काही समाजातील घटक खपत असतात. दहीहंडी,गणेशोत्सव,नवरात्र हे देशव्यापी सण 'कमर्शिअलाईज' करण्याची प्रवृत्ती जागोजागी फोफावत चाललेली आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घेणे म्हणजे काय ते ह्या खास लोकांकडून शिकण्यासारखे आहे. शहरातून बहिष्कृत झालेला भोंडला आणि शहराने अंगिकारलेला दांडिया हे आजच्या भारतीय संस्कृतीचे खरे स्वरूप आहे.     


Tuesday 4 October 2011

दाढदुखीचे महाभारत

वर्गात प्रश्नोत्तराचा तास चालला होता. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव युद्धासाठी उभे ठाकले इथपासून ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या गीतोपदेशाचे वर्णन वाघमारे बाईंनी केले. आता प्रश्नांची वेळ झाली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता कोणी सांगितली? असा साधा प्रश्न बाईंनी विचारला. वर्गातील एका  अत्यंत टारगट  व व्रात्य मुलाने हात वर केला. अर्जुनाला भीमाने गीता सांगितली असे उत्तर त्याने दिल्यानंतर आता टेबलावरील खडू,डस्टर,पट्टी या अस्त्रांचा यथोचित उपयोग होईल असे वर्गातील इतर मुलांना वाटले. परंतु या उत्तरावर, "ठीक आहे. खाली बस." अशी सर्वस्वी अनपेक्षित प्रतिक्रिया वाघमारे बाईंकडून आल्याने सगळा वर्ग कमालीचा अचंबित झाला. एव्हाना वाघमारे बाईंनी स्वत:चा चेहरा दोन्ही  हातांनी झाकून घेतला होता. याचे विद्यार्थ्यांना कळलेले एकमेव कारण होते - दाढदुखी. कुरुक्षेत्रावरील लढाई केव्हाच इतिहासजमा झाली होती पण तोंडाच्या आतील लढाई हातघाईवर आली होती. त्यामुळे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली या तपशीलापेक्षाही आपल्या दातांचे सारथ्य कुठल्या निष्णात दंतवैद्याच्या हाती सोपवावे या विवंचनेत वाघमारे बाई गढल्या होत्या. एकंदर दाढदुखीपुढे  कुरुक्षेत्र-अर्जुन-श्रीकृष्ण संवाद-गीता यांनी तूर्तास माघार घेतली होती.
हा किस्सा सांगण्यामागचा उद्देश एवढाच की एकदा का ती अक्कलदाढ ठणकायला लागली की धडधाकट माणूसही सपशेल नांगी टाकतो. सगळ्या सुखद जाणीवा बोथटतात. बाजूने चाललेली सुंदर स्त्री किंवा पुरुषही ही दाढदुखीची वेदना विसरायला लावू शकत नाही. दाढदुखी हे जीवनातील शाश्वत सत्य आहे असे वाटू लागते. चांगलेचुंगले पदार्थही नकोसे वाटायला लागतात. कुरकुरीत गोष्टींची भीती वाटू लागते. फुटाणे, चिक्की, ऊस,शेवकांडीचे किंवा कडक बुंदीचे लाडू आपले जन्मोजन्मीचे वैरी वाटू लागतात. दाढेची ही वेदना सर्वव्यापी असते. खून,बलात्कार,दरोडे,राजकीय लपंडाव,बॉलीवूडच्या ताऱ्यांचा नंगानाच या आत्ताआत्तापर्यंत हादरवणाऱ्या बातम्या मुळापासून हादरवणाऱ्या दाढदुखीपुढे मिळमिळीत वाटायला लागतात.   
अक्कलदाढेची एक गम्मतच असते. ती अक्कल असलेल्यांना येते आणि नसलेल्यांनाही येते. बरं येते म्हणावं तर ती चक्क घुसते. आपलं तोंड हे लोकलचा सेकण्ड क्लासचा डबा समजून आजूबाजूच्या दाढा ढकलत फोर्थ सीट बळकावू पाहते. या तिचे खेळीमेळीच्या वृत्तीने आपला गाल आतून फाडला जातो. जखम होते. दाढदुखीच्या कारणास्तव रजा घेता येत नाही कारण  तिचे दुखणे हा 'दृक एव्हिडन्स'  म्हणून वापरता येत नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांवर तोंडसुख  घेता येत नाही. शेजारच्या पर्शिणीने आणलेले 'क्रिस्पी चिकन' दातांखाली रगडता येत नाही. आपण निद्रिस्त व्हायचा प्रयत्न केला तरी आपल्या तोंडाच्या आतील यंत्रणा भलत्याच जागृत झाल्याने आपण पुरते नामोहरम होतो. कुठलेही 'पेनकिलर' आपले आत्ताचे मरण केवळ तीन-चार तासांपर्यंतच लांबवू शकते. थोडक्यात दाढ हा एकच दुखरा अवयव आपल्या शरीरात उरला आहे असे पदोपदी वाटायला लागते.   
सरतेशेवटी दंतवैद्याकडे जाण्यावाचून आपल्याला पर्याय उरत नाही. दंतवैद्याचा अद्ययावत आणि महागडा दवाखाना पाहून आपली दाढ अधिकच ठणकायला लागते. तोंडात क्षणोक्षणी होणाऱ्या वेदनेच्या स्फोटापुढे बॉम्बस्फोटही  किरकोळ वाटायला लागतात. आपण दंतवैद्याच्या अत्याधुनिक आरामखुर्चीत साशंक मनाने विसावतो. तो आपल्या दातांना हात घालतो. दुखऱ्या दाढेची चर्चा होते. ती अशा जागी नेमकी उगवलेली असते की तिचा थांगपत्ता प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही लागणे कठीण असते. त्यामुळे ती काढणे हा एक महाभारताइतकाच अवघड पेचप्रसंग असतो. ती न काढली तर वेदनाशामकांच्या मदतीने तिला केवळ काही वेळापुरतेच  निष्प्रभ करण्यात यश येणार असते. निवड आपण करायची असते.
दाढ आपलीच असते. आपली आप्त असते. पण वेळीच न काढली तर आपल्याच मुळावर येणार असते. आपलं तोंड हे कुरुक्षेत्र झालेलं असतं. आपल्या दातांच्या आरोग्याचा रथ दंतवैद्याच्या हाती असतो. आपण अर्जुनासारखे अजूनही दाढ काढावी की नाही या संभ्रमावस्थेत वावरत असतो.  दंतवैद्य आपल्याला ज्ञानोपदेश करून मिश्कील हसत असतो आणि आपण ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याच दाढेवर वार झेलायला महत्प्रयासाने तयार होतो.

Monday 3 October 2011

रिक्षा येती दारा,तोचि दिवाळी-दसरा


एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, एक वेळ मुंगी मेरुपर्वत गिळेल, एक वेळ राखी सावंत शालीन वेशभूषेत दिसेल, एक वेळ गायक हरिहरन वेणी न घालता पुरुषी केशभूषा करेल परंतु रिक्षावाले आपल्याला हवी त्या वेळेस रिकामी रिक्षा आपल्या पुढ्यात थांबवतील याची अजिबात शाश्वती देता येत नाही. 
आपल्या नाकासमोरून रिक्कामी रिक्षा भरधाव घेऊन जाणे हा यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यागत हे वागत असतात. संध्याकाळी मुंबईच्या लोकलमधून शरीराचं आणि डोक्याचं भजं करून आलेले लोक रिक्षाच्या शोधार्थ सैरावैरा पळत असतात. चुकूनमाकून एखादी रिक्षा समोर येते आणि आपण अधाशासारखे आतमध्ये उडी मारून बसतो. रिक्षावाला अत्यंत उर्मटपणे आपल्याला कुठे जायचे आहे असे विचारतो. आपण वृंदावन सोसायटी किंवा घोडबंदर रोड किंवा पोखरण किंवा आणखी काही तरी असे सांगून त्याच्या प्रतिक्रियेसाठी श्वास रोखून धरत पाहतो. आता त्याला त्याची रिक्षा लोकमान्य नगर, इंदिरा नगर,वागळे इस्टेट  या परिसरातच हाकायची असते. आपल्याला निमुटपणे रिक्षातून पायउतार व्हावे लागते. आपण ज्याठिकाणी राहत असतो तोच मुळी आपला अपराध असतो. आपल्याला बसच्या जीवघेण्या रांगेत थांबायचे नसते हा आपला दुसरा अपराध असतो. आपल्या का या प्रश्नार्थी शब्दाचे उत्तर द्यायला कोणताही रिक्षावाला बांधील नसतो हा आपला तिसरा अपराध असतो. आपल्याला आपल्या घरापर्यन्तचे  चार-पाच किलोमीटर अंतर पायी तुडवता येत नाही हा सुध्धा आपलाच अपराध असतो. या अशा साऱ्या अपराधांची शिक्षा आपल्याला रिक्षावाला नामक परमेश्वर देतच असतो. 
पावसाळ्यात रानातल गवत कसं माजत त्याप्रमाणे या रिक्षावाल्यांची माजोरडी वृत्ती पण फोफावते. मुसळधार पावसामुळे समोरचं सगळं अस्पष्ट दिसत असतं. रस्त्यावरची उघडी गटारे, खड्डे, उखडलेली जमीन, चिखल-राडा चुकवता चुकवता आपल्या आधीच नाकी नऊ आलेले असतात. समोरून येणाऱ्या रिक्षात कोणी बसलंय की नाही हे सुध्धा नीट दिसत नसते. आपण अंदाजाने हात हलवीत असतो आणि पदोपदी निराश होत असतो. एखादी रिक्षा आपलं भाग्याचं दार किलकिलं करून थांबल्यासारखी वाटते. आपण उत्साहाने पुढे सरसावतो. आपण पत्ता सांगताच वायुवेगाने रिक्षा भर पावसात अदृश्य  होते.  अपमानित,असहाय,हतबल,गलितगात्र झालेले आपण रिक्षावाल्याला मनोमन शिव्यांची लाखोली वाहण्या पलीकडे काहीही करू शकत नाही. पदरी गाडी बाळगणाऱ्या चाकरमान्यांचा आपण विलक्षण हेवा करायला लागतो. सणासुदीच्या दिवसातही फुलांप्रमाणे रिक्षावाल्यांचे भावही भलतेच वधारलेले असतात. आपल्याला ठाण्याच्या अंतर्भागात नक्की कुठे जायचं आहे या गोष्टीवर आपलं नशीब अवलंबून असतं. ती जागा, ते स्थळ जर रिक्षावाल्याला पसंत असेल तरच आपण तिथे पोहोचू शकतो. रिक्षावाल्याच्या मर्जीशिवाय आपल्याला प्रवासाचं दान पडू शकत नाही. काही वेळेस तर आपल्याला कुठे जायचं आहे हे टेलीपथीने  रिक्षावाल्याला कळलेलं असतं म्हणूनच आपण त्याला पत्ता सांगायच्या आधीच ती रिक्षा आपल्यासमोरून नाहीशी होते. आपण मात्र आपल्या नशिबाचा खरा सूत्रधार कोण या न मिळणाऱ्या प्रश्नावर माथेफोड करत राहतो.   
रिक्षावाल्यांचे सुसाट धावणारे मीटर ही एक वेगळीच आपत्ती असते. आपण रिक्षात बसलो की आपले डोळे मीटरला गोंद लावल्यासारखे चिकटतात. मीटर भराभरा बदलतो तसा आपल्या चेहऱ्याचा रंगही पालटायला लागतो. रिक्षावाला कसलं तरी गाणं गुणगुणत असतो आणि त्याची गानसाधना आपण भंग करतो. आपका मीटर फास्ट है, हे वाक्य आवाजातील समतोल साधत आपण उच्चारायचा प्रयत्न करतो. बैठना है तो बैठो नही तो उतर जाव हा त्याचा निगरगट्टपणाचा डोस आपण रिचवू शकलो तर आपले तारू इच्छित किनाऱ्याला लागू शकते अन्यथा आपल्या रागाला रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी राग-क्रोध-संताप-चीड या रिपुंवर विजय मिळवणारे आपण एखाद्या संतासारखे भासू लागतो.  
तात्पर्य,लोकांचा  भर रस्त्यात धडधडीत अपमान करायचा असेल तर रिक्षा चालवायचे प्रशिक्षण घ्यायला हवे.