Sunday 15 January 2012

एक बाजू हरवलेले नाणे

आपण खरेच सुसंस्कृत आहोत काय? आपल्या संवेदना गोठल्या आहेत काय? आधुनिकतेची कास धरता धरता आपण माणुसकीची कास सोडली आहे काय? समानुभूती, सहानुभूती कधी आपल्या अंत:करणाला स्पर्शून जाते  काय? हे आणि अशांसारखे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. 
काही महिन्यांपूर्वी मी रस्त्यावरून जात असताना घडलेली ही घटना आहे. एक आजोबा रस्त्यावर काठी घेऊन चालत होते. त्यांचा एक पायही बहुतेक अधू असावा. हातही थरथरत होते. तशात ते अचानक तोल जाऊन पडले. मी त्यांच्या समोरून येत होते. मी त्यांना लगेचच आधार देऊन उचलायचा प्रयत्न केला खरा पण मला त्यांना उचलता येईना. आजूबाजूचे लोक फक्त उघड्या डोळ्यांनी हे दृश्य बघत होते. शेजारी एक चहाची टपरी होती आणि एक मोच्याचे छोटे दुकान होते.शेवटी न राहवून मी ओरडले. अरे कुणीतरी या आजोबांना मदत करा प्लीज. मग बाजूचा टपरीवाला,मोची आणि इतर एक-दोन माणसे मदतीसाठी आली. आम्ही त्या आजोबांना उचलून चहाच्या टपरीपाशी नेले. त्यांना खूप लागलं आहे का ते विचारलं आणि काही मिनिटातच ते आजोबा कसेबसे उठून चालायला लागले. त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवावेसेही तेथील कुणाला वाटले नाही. त्यांच्या घरी त्यांची काळजी घेणारं कोण असेल? असेल का नाही? त्यांना घरापर्यंत तरी नीट जाता येईल काय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रेंगाळू लागले. त्यांनी आमच्याकडून मदतीची अपेक्षा केली नव्हती तरी सुद्धा माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या वयाकडे बघून त्यांना घरापर्यंत कुणीतरी सोडायला हवे होते असे सारखे वाटत राहिले. 
जसजसा आर्थिक,बौद्धिक विकास होतो आहे तसतसे माणसातील सामाजिक भान लोपू पाहत आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गंभीर घटनांकडेही माणूस हेतूपुरस्सर कानाडोळा करू पाहत आहे. कुणी दिवसाढवळ्या हातात चाकू-सुरे घेऊन दुसऱ्यावर वार करो, मुलींची-महिलांची छेडछाड करो किंवा त्यांच्याशी अतिप्रसंग करो आपली भूमिका सदैव बघ्याचीच असते. एकटादुकटा माणूस एखादेवेळी घाबरेल पण माणसांचा जमावही या गुन्हेगारांना धडा शिकवू शकत नाही काय? मध्यंतरी मुंबईच्या लोकलमध्येही एका अपंग मुलीवर रात्री अतिप्रसंग झाला होता. शेजारच्या डब्यात इतर माणसे असूनही ती फक्त हतबल होऊन पाहत राहिली. वास्तविक पाहता तो एकटा होता आणि इतर संख्येने जास्त होते. पण त्या असहाय मुलीला वाचवायची आत्यंतिक इच्छा म्हणा किंवा गरज म्हणा त्यातील कुणालाच वाटली नाही. त्या माणसाचा कार्यभाग साधला आणि इतर माणसांमधील षंढपणाचीही खातरजमा झाली. काही गावांमध्ये काही कारणास्तव महिलांना विवस्त्र करून झाडांना बांधले जाते पण त्यांना सोडवायला कोणी येत नाही. जो तो घडल्या प्रसंगाची मीठ-मिरची लावून चर्चा करतो पण त्याला याबद्दल बंड पुकारावेसे कोणाला वाटत नाही. चालत्या रेल्वेतून एक मुलगी खाली पडते. हाहा:कार माजतो. पण तिला वाचवण्याकरता प्रत्यक्ष कोणतीही कृती केली जात नाही. पोलीस योग्य वेळी येत नाहीत,पोलीस कामचुकार असतात, पोलीस लाचखाऊ असतात, पोलीस ऐन वेळेस गायब होतात  यांपैकी अनेक लांछने आपण पोलिसांना वेळोवेळी लावत असतो परंतु एका उत्तम नागरिकाचे कर्तव्य आपल्यापैकी कितीजण बजावतात? पोलिसांची कुमक येण्याआधीची मदत ही नेहमीच तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या माणसांचीच असते. मग मदतीची ही संधी मिळून सुद्धा आपल्यापैकी कितीजण ह्या संधीचा लाभ घेण्यास पुढे सरसावतात? 
जातीय दंगली माजवणारे,एखाद्या पक्षाच्या झेंड्याखाली राहून राडे करणारे, दुकाने फोडणारे, आगी लावणारे, पोस्टर्स जाळणारे, मोठमोठ्याने पक्षाचा उदोउदो करणारे अशा ऐन मोक्याच्या वेळी कुठे लुप्त होतात? जमावाचं राजकारण खेळणारे या जमावाच्या साहाय्याने या राजरोस घडणाऱ्या गुन्ह्यांचे बालेकिल्ले,त्यांचे सूत्रधार यांना का नेस्तनाबूत करत नाहीत?  मुलींची छेडछाड करणारे,महिलांवर अतिप्रसंग करणारे,हत्यारांनी निरपराध्याचा जीव घेणारे अपराधी यांना सोयीस्कररित्या दिसत नाहीत काय?  
मध्यंतरी दुपारच्या निवांत वेळी एक वृद्ध महिला तिच्या इमारतीचा जिना चढताना जिन्यात लपून आणि टपून बसलेल्या एका  चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले आणि तिचा कोणताही प्रतिकार व्हायला नको म्हणून तिला जोराने जिन्यावरून खाली ढकलले. तिच्या डोक्याला गंभीर जखम होऊन टाके पडले. एक तर त्याने चोरी केली ती केली आणि तिच्या वयाचा मुलाहिजाही न बाळगता तिला कठोरपणे जिन्यावरून ढकलून दिले. लोकलमध्येही रोज चढता उतरताना जी जीवघेणी स्पर्धा चाललेली असते ती बघून अंगावर काटा उभा राहतो. वृद्ध महिला, गरोदर स्त्रिया, लहान मुले, आजारी माणसे, अपंग माणसे यांनाही वाट्टेल तसे धक्के मारून जागा बळकावण्याचा काही स्त्रियांचा, काही पुरुषांचा आटापिटा पहिला की त्यांच्या आपमतलबी,स्वार्थी वृत्तीची घृणा वाटते. जणू माणुसकीशी आपले दुरदूरचेही नाते नाही असे ठसवणारी  यांची कृत्ये असतात. 
 दुसऱ्याच्या प्रेयसीवर नजर ठेवल्याने चिडून त्याने त्याला या कृत्याबाबतचा जाब  विचारताच त्याचा फाजील अहंकार दुखावल्यामुळे तो त्याच्या चार मित्रांना तिथे घेऊन येतो आणि त्याचा कोथळा बाहेर येईस्तोवर त्याला मारहाण करतो. आपल्यातील माणसाचे आणि माणुसकीचे हे केवढे घृणास्पद हनन? 
आताशा चांगल्या घरांतील माणसेही ही लज्जास्पद कृत्ये सर्रास करत असतात. बऱ्याच घरांतील मोलकरणी या अशा निलाजाऱ्या लोकांची 'टार्गेट्स' असतात. आपली सहृदयता,आपली माणुसकी गहाण ठेवून अशी कृत्ये करणारी माणसे पहिली की विलक्षण चीड येते. अशा माणसांपेक्षा पशूच केव्हाही चांगले. भूक शमल्यानंतर पुढ्यात आलेल्या शिकारीकडे ढुंकूनही  न बघणारे जनावर कुठे आणि आपली भूक ही मुळी न शमण्याचीच गोष्ट आहे असे समजून अनेकांवर अनन्वित अत्याचार करणारे हे माणसांमधले लांडगे कुठे? 

घरी बायको-मुलांना शिवीगाळ-मारहाण करणारे, ऑफिसमधील सहकाऱ्यांचा सतत अर्वाच्च्य शब्दांनी पाणउतारा करणारे,वृद्धांचा अवमान करणारे, व्यवहारी वृत्तीपायी लोकांच्या मनातील भावनांचं निर्माल्य करणारे फक्त शिक्षित असतात पण सुसंस्कृत कधीच नसतात. 
शिकून आपण फक्त साक्षर होतो, सुशिक्षित होतो पण सुसंस्कृतपणाचे बाळकडू पाजणाऱ्या शाळा कुठेही नसतात. आपण या देशाचे एक जबाबदार,सुजाण नागरिक आहोत असे आपल्याला वाटत असते. पण आपल्या भोवती एखादी घटना घडते,आपण इतर अनेकांप्रमाणे फक्त बघ्याची भूमिका घेतो आणि आपल्यातील माणुसकीचा, सुसंस्कृततेचा फुगा फुटतो. 
सुशिक्षितता आणि सुसंस्कृतता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोहोंच्या सरमिसळीतून माणसातील माणूसपणा दृग्गोचर होत असतो. सुसंस्कृतातेविना माणूस म्हणजे एक बाजू हरवलेलं नाणं! जे फक्त दिसतं पण चालत नाही. 

No comments:

Post a Comment