Tuesday 5 March 2013

महिला दिना निमित्त -मांडते मी कैफियत ...............

महिला दिना निमित्त 
झाकते स्वत:च्या आत 
देवापुढती मांडते 
स्त्रीमनाची कैफियत .........
बालपणा पासूनच 
स्त्री-देहाची परवड 
वासनेने ओथंबून 
विटंबिती आधारवड ........
गिधाडे वरी फिरती 
कुठे घरी, कुठे दारी 
कळ्या निष्पाप, नाजूक 
खुडती कसे अघोरी........
कसे संस्कार संस्कार 
तोंडाचीच वाफ होते 
शौर्य हेच पिसाटांचे 
भक्ष्य समोर आयते.........
शिक्षित वा अशिक्षित 
 देह नराचा मिळता 
सामर्थ्याचा आविष्कार 
जळी -स्थळी, येता-जाता .......... 
मुले-मुली भेदभाव 
सनातन परंपरा 
त्याने झेपावे आभाळी 
तिला सक्तीचा उंबरा.............
बाप तापट, हेकट 
भाऊ उद्धट, उर्मट 
मानायचा ईश्वर पतीला 
जरी वर्तन नतद्रष्ट.............  
तारुण्याची उर्मी स्त्रीची 
जरा खुलते, फुलते 
डोईपासून  पायाशी 
नजर तिला विटाळते...........

दिसामाशी अत्याचार 
होई मुश्किल जगणे 
लांडग्यांच्या या देशात 
स्वातंत्र्य ही लाजिरवाणे........
 भोवताली जनावरे 
माणूस कुठे दिसेना 
शोषितांच्या दु:खालाही 
पारावार हा राहिना.............
काय करावे देवा रे 
स्त्रीत्वाचे झाले ओझे 
जरी शिक्षित, स्वतंत्र 
शील कसे सांभाळावे?...............
काय म्हणावी ही भूक?
की भस्म्या बळावला?
वयाचा न मुलाहिजा 
घाला कुणीही घातला............ 
वस्त्रहरण हे स्त्रीत्वाचे 
थांबव हे जगन्नाथा 
दुष्टांचे हनन करण्या 
सुदर्शन सोड आता .............
 

Friday 1 March 2013

प्रेम आणि भाषा .........



मुक्ताने जयेशशी लग्न केलं. ती मराठी, तो गुजराती. त्यांचा प्रेमविवाह होता. कॉलेजमधली चार वर्षांची मैत्री प्रेमात परिवर्तित झाली आणि घरच्यांच्या संमतीने त्याचं शुभमंगल झालं. लग्नानंतरचे नव- नवलाईचे एक वर्ष भुर्रकन उडून गेले. सणवार, शॉपिंग,हॉटेलिंग यात दिवसांचा हिशोब हरवला. सासर-माहेर या हिंदोळ्यावर मुक्ता नुसती झुलत होती. मित्र-मैत्रिणी, गप्पाटप्पा सगळ्याला दिवसरात्र उत येत होता. आपल्यासारखे सुखी आपणच, आपल्या सुखाचा सगळे हेवा करत असतील अशा काहीशा कल्पनेत मुक्ता रममाण झाली होती. जयेशही तिचे सारे लाडकोड पुरवत होता.   
यथावकाश मुक्ताला पोटातल्या बाळाची गोड चाहूल लागली आणि तिच्या सासरचे-माहेरचे नातलग नव्या आगमनाच्या प्रतीक्षेत सुखावून गेले. तिची ओटी, डोहाळजेवण यथासांग पार पडले आणि नववा महिना संपता संपता तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला  हेतल, सेजल वगैरे गुजराथी नावांना तिने मोडता घातला आणि आकांक्षा असे मुलीचे नामकरण केले. नाही म्हटले तरी तिच्या सासरच्यांचा थोडाफार हिरमोड झालाच! तिचे मित्र-मैत्रिणी तिला ढोकळाखाऊ असे चिडवत ते आता तिला रुचेनासे झाले. मी सकाळी शिरा, उपमा, पोहे असे महाराष्ट्रीयन पदार्थ खाणेच प्रिफर करते असे ती इतरांना सांगू लागली. हळूहळू तिची आकांक्षा मोठी होत होती. नवे नवे शब्द उच्चारायला शिकत होती. तिच्या कानावर गुजराथी शब्द पडू नयेत याकरता मुक्ता भलतीच सावधानी बाळगत होती. पण एकत्र कुटुंबात ते सर्वस्वी अशक्य होते. 
जयेश तिच्याशी गुजराथीत बोलू लागला की ती तू तिच्याशी इंग्रजीत बोल असे त्याला सांगायची. तू तिच्याशी तुझ्या मातृभाषेत बोलतेस तेव्हा मी कुठे हरकत घेतो असे तो तिला विचारायचा आणि मग पुढचा तास सहज दोघांच्या वादावादीत खर्च व्हायचा. मग अबोला दोन एक दिवस. तिच्या सासरच्या नातेवाईकांनी 'केम छो?' असा प्रश्न तिला विचारला कि ती त्याचे उत्तर मराठीतून द्यायची.आता आकांक्षाचा गुजराथी नाश्ताही तिला पटेनासा झाला होता. गुजराथी घरात राहून ती तिच्या मुलीवर मराठी घरातील संस्कार करू पाहत होती. त्यासाठी स्वतच्या जीवाचे रान करत होती. वेळ मिळेल तेव्हा माहेरी पळत होती.तिच्या समोर मराठी पुस्तकांचा ढीग आणून टाकत होती. पण हा सगळा आटापिटा तिला मराठी विषयी खास प्रेम होते म्हणून नव्हता. एरवी कॉलेज मध्ये तिच्या मराठी मैत्रिणींशी तिने कधीही मराठीतून संवाद साधला नव्हता. ती महाराष्ट्रीयन पदार्थांना नाके मुरडायची. तिला इतर प्रांतातील पदार्थच अधिक प्रिय होते. जयेशशी तोडक्या-मोडक्या गुजराथीत बोलून ती त्याच्यावर इम्प्रेशन पाडायची. तिच्या हातात कधी कोणतेही मराठी पुस्तक ना तिच्या घरच्यांनी पहिले होते तर कधी तिच्या मैत्रिणींनी! 
मग एकाएकी हे मातृभाषा प्रेम कुठून आले? गुजराथी भाषा, पदार्थ, रितीरिवाज का बरे रुचेनासे झाले? सासरच्या घरातील माणसे शत्रुवत वाटू लागली. ती गुजराथीत संवाद साधून आपल्या मुलीला फितवत आहेत असे प्रकर्षाने तिला का बरे वाटू लागले? मराठीचा, मराठी सणांचा,संस्कारांचा,माणसांचा पुळका का बरे तिला येऊ लागला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुक्ता ही एक शिकली-सवरलेली, काहीशा आधुनिक विचारांची मुलगी. आपला प्रेमविवाह आहे तोही एका गुजराथी माणसाशी झाला आहे.याचे पुरेपूर भान तिला होते. आपल्या होणाऱ्या अपत्यावर दोन्ही कुळांचे संस्कार होणार हेही तिला माहित होते. दोन्ही घरांतील चालीरीतींचा प्रभाव आपल्या मुलीवर पडणार हे ती जाणून होती. मग मुलीला वाढवण्यात हे असे आढमुठे धोरण का बरे मुक्ताने स्वीकारावे? 
प्रत्येकालाच आपापल्या मातृभाषेचा अभिमान असतो तसा तो असायलाच हवा. लग्न हा दोन कुटुंबांचा घरोबा, वेगळ्या भाषांचा, विचारांचा घरोबा, रीतीभातींचा मेळ असतो. जर तुम्ही प्रेमविवाह केलात तर याही गोष्टी आनंदाने स्वीकारायलाच हव्यात. अन्यथा यातील एक कुटुंब निश्चितच दुखावले जाऊ शकते. मुक्ताने ही चूक केली. मुलीने फक्त मराठीच शिकावे, बोलावे, मराठी पदार्थच खावेत असा विचित्र हेका धरला आणि सासर-माहेर यांच्यात एक तिढा अकारण उत्पन्न केला. सासरची माणसे तिच्याशी बोलेनाशी झाली. जयेश आणि तिच्यातील वाद शिगेला पोहोचले आणि हे दाम्पत्य घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत आले. मधल्या मध्ये तिच्या मुलीची होरपळ झाली. आकांक्षाच्या आनंदाला खीळ बसली. पुढे त्यांनी मुलीच्या सुखाखातर समेट केला खरा पण घराच्या चार भिंतीमधले औदासिन्य किती कमी झाले हे सांगणे खूप कठीण आहे. 
असो. प्रेमविवाह करताना या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या प्रांतातील भाषेचा, खाण्याचा,रीतींचा यथोचित सन्मान करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. मग प्रेम करा वा करू नका!