Wednesday 4 January 2012

हाडाचा डॉक्टर कुणा म्हणू मी?

'Family Doctor' ही संकल्पना काही वर्षांपासून जवळजवळ हद्दपार होत चालली आहे. आपली मूळ ठिकाणे सोडून लोक नव्या ठिकाणी वसतात आणि मग त्या विशिष्ट परिसरातील डॉक्टरकडून त्यांना उपचार करून घेणे प्राप्त होते. या नव्याने जोडलेल्या डॉक्टरला कुटुंबाचा इतिहास वगैरे ठाऊक असायचे काहीच कारण नसते. इथे आपुलकी,आस्था,जिव्हाळा या भावनांना थारा नसतो कारण ही ओळख फक्त व्यावसायिक स्तरावरील असते. 
पूर्वी डॉक्टर हा समाजाचा सन्माननीय,आदरणीय असा घटक होता. डॉक्टर म्हणजे जणू प्रती देवच अशी कल्पना समाजमनात होती. डॉक्टरही आपल्या इमानी वर्तनाने, उपचारांतील निपुणतेने हा विश्वास जास्तीत जास्त दृढ करण्यासाठी झटायचे. डॉक्टरांना रुग्णाच्या कुटुंबातील सगळ्यांची दुखणीखुपणी  माहित असायची. कठीण काळात घरच्यांना धीर देणे, त्यांचे मनोबल न खचू देणे यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असायचे. कुटुंबाच्या अनेक सोहळ्यातही डॉक्टरांची त्यांच्या कुटुंबासकट वर्णी लागायची. 
आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जितकी मुले तितकी घरांची संख्या दुणावली आहे. आई-वडिलांचे वास्तव्य एका ठिकाणी तर मुलांचे दुसरीकडे अशी परिस्थिती असल्याने आपल्या घराजवळचा डॉक्टर ज्याचा त्याचा वेगळा असतो. होमिओपथि आणि आयुर्वेद ह्या वैद्यकशास्त्रातील शाखांच्या पायऱ्या चढणारे आजतरी संख्येने कमी आहेत. Allopathy ची कास धरणारेच बहुतांश आहेत. लवकर गुण हवा तर मग या शाखेशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही असे सार्वजनिक मानणे असते. 
आजकाल कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या शर्यतीत जे मानवरूपी घोडे धावत असतात त्यात डॉक्टरांचा सहभागही दखलपात्र असतो. लवकरात लवकर आर्थिक उन्नतीचे शिखर सर करण्याची मनीषा डॉक्टर नामक प्राण्याच्या मनातही असते. पेशंटची संख्या,प्रोफेशनल कट्स,सर्वसाधारण लौकिक यावर यावरून डॉक्टरांची या व्यवसायातील उंची मापली जाते. डॉक्टर M.B.B.S असो, M.S असो, M.D असो वा इतर काही त्यांच्या रथाला व्यावसायिक हुशारीची चाकं असायला लागतात. पेशंटचा विश्वास संपादन करणे, त्याच्या कुटुंबातील आजारांबद्दल माहिती मिळवणे यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि संयम बहुतेक डॉक्टरांकडे नसतो. पुढचा नंबर डॉक्टरांची वाट अधिरतेने पाहत असतो. वेळ घालवणे म्हणजे फी घालवणे डॉक्टरांना परवडण्यासारखे नसते. पेशंटच्या कुटुंबाच्या इतिहासाचा मागोवा घेत डॉक्टरांना इतिहासजमा व्हायचे नसते.  
शिवाय आजकाल डॉक्टर कुठल्याही प्रकारची रिस्क घ्याला बिलकुल तयार नसतात. ताप-सर्दी-खोकला आला ही टेस्ट करा, छातीत दुखते आहे ती टेस्ट करा,पोटात वेदना होताहेत अमकी टेस्ट करा,गुडघे-पाठ दुखते आहे तमकी टेस्ट करा. थोडक्यात जे काही दुखते आहे त्यावर टेस्ट हा पहिला तोडगा असतो. रिपोर्टमध्ये  काहीच निष्पन्न न झाल्यास मग व्हायरल म्हणून शिक्कामोर्तब  करायला डॉक्टर असतातच की! लोकांना ज्या प्रमाणात लवकर बरे व्हायचे असते त्यावर औषधोपचार अवलंबून असतात. जो डॉक्टर जालीम औषध देऊन रुग्णाला ताबडतोब बरा करतो त्या डॉक्टरांकडे पेशंटचा ओघ वाढतो. भले त्या औषधांचे साईड  इफेक्ट्स काही का असेनात! 
निष्णात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ कै.बा.नी.पुरंदरे यांच्यासारखे डॉक्टर केवळ शरीराच्या दुखऱ्या भागावर हात ठेऊन अचूक निदान करायचे. काही निष्णात डॉक्टर पेशंटच्या निव्वळ फेशल एक्स्प्रेशन्स वरून त्रास ओळखायचे. काही डॉक्टर नाडीच्या अनियमिततेवरून रुग्णाच्या आजाराचे मूळ जाणायचे. हाडांचा डॉक्टर आपण त्यालाच मानतो जो केवळ काही लक्षणांवरून पेशंटचा आजार तात्काळ ओळखू शकतो. उत्तम आहार,औषधोपचार,व्यायाम आणि विश्रांती यांचे महत्व आपल्या पेशंटला पटवून देत त्याला पुन्हा पुन्हा डॉक्टरांची पायरी चढण्यापासून परावृत्त करतो. 
जितका प्रतिष्टित डॉक्टर तितका तो महागही असतो. त्यांचे वातानुकुलीत दवाखाने, महागडे इंटीरिअर, हाताखालची माणसे डॉक्टरांच्या प्रगतीचे इंडिकेटर्स असतात. अशा डॉक्टरांचे दर्शनही त्यांच्या औषधोपचारा इतकेच महागडे असते. तो किती सच्चा,प्रवीण आहे यापेक्षा त्याची प्रक्टिस कशी व किती चालते यावर त्याचा सामाजिक दर्जा अवलंबून असतो. मेडिकलचे अत्यंत महागडे शिक्षण घेऊन बाहेर पडलेला होतकरू डॉक्टरही स्वत:ला सिद्ध करायला योग्य वेळ न देता लवकरात लवकर आपला जम कसा बसवता येईल या विचारात असतो. पेशंटला वारंवार टेस्ट करण्यासाठी पाठवून कट्स घेणे, त्याला आवश्यक नसताना ऑपरेशन करायला लावून स्वत:चे कमिशन घेणे, महागडी औषधे प्रिस्क्राइब करणे अशा अनेक मार्गांनी त्याची वैद्यकीय पत वाढत राहते आणि मग तो नामांकित डॉक्टर म्हणून मान्यता पावतो. पेशंटच्या जीवावर घरे,गाड्या यांची संख्या वाढत राहते. वैद्यकीय वर्तुळात अशा डॉक्टरांची चर्चा होत राहते.   
पण एखादा प्रसंग असा घडतो ज्यामुळे अशा डॉक्टरांची कारकीर्द गोत्यात येऊ शकते. पेशंटच्या बाबतीत दाखवलेला हलगर्जीपणा,निष्काळजीपणा डॉक्टरला नडतो. ऑपरेशन करतेवेळी पेशंटच्या पोटात एखादे धारदार हत्यार राहून जाते आणि पेशंट दगावतो, चुकीची औषधयोजना केली जाते आणि त्याचे पर्यवसान पेशंटच्या मृत्यूत होते. अशा वेळी बऱ्याचदा रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाला तो डॉक्टर पात्र होतो. डॉक्टरला मारहाण होते. काही वेळा त्याच्या जीवावर बेतते. त्याचे प्रक्टिस लायसेन्स जप्त होऊ शकते. त्याची वैद्यकीय प्रतिष्ठा पणाला लागते.
वैद्यकीय सेवेत रुजू होण्याआधी घेतलेली शपथ बहुतेक डॉक्टर विसरून गेलेले असतात. आपल्या वैद्यकीय हुशारीचा उपयोग केवळ आर्थिक लाभापोटीच करताना अनेक डॉक्टर दिसतात. या व्यवसायात फायदा या आर्थिक आयुधाव्यतिरिक्त लोकांचा आपल्यावरील विश्वास ही देखील एक अतिशय महत्वाची गोष्ट असते हेच बरेच डॉक्टर विसरतात. पैसा काय येतो जातो पण आपल्या पेशंटचा आपल्यावरील विश्वास अढळ राहण्यासाठी जे डॉक्टर अविरत प्रयत्न करतात तेच खरे हाडाचे डॉक्टर असतात.

No comments:

Post a Comment