Friday 6 January 2012

असेही हृदयद्रावक क्राईम पेट्रोल

एक अठ्ठेचाळीस-एकोणपन्नास वर्षाचा मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहस्थ, अविवाहित. घरी म्हातारी आजारी आई आणि मानसिक संतुलन हरवलेला भाऊ. रोज सकाळी उठून सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा,म्हाताऱ्या आईची शुश्रुषा करायची आणि ऑफिसला जायचे तसेच संध्याकाळी कामावरून घरी परतताना घरासाठी आवश्यक गोष्टी आणायच्या आणि घरी आल्यावर पुनश्च कामाला लागायचे हा त्या गृहस्थाचा नित्यपाठ होता. त्याला स्वत:चे असे स्वतंत्र आयुष्य जगण्याची मुभा नियतीनेच  दिलेली नव्हती. भाऊ सदानकदा देवपूजेत मग्न त्यामुळे घरकामात किंवा आईसाठी त्याची काहीच मदत व्हायची नाही. आई जरी बिछान्यावर असली तरीही तिच्या तोंडाचा पट्टा सतत चालूच असायचा. मला संडासला घेऊन चल, बाथरुमला घेऊन चल,मला आंघोळ घाल,मला खायला दे असे ती सकाळपासून ओरडत रहायची. मग हातातली कामे बाजूला टाकून हा आईच्या मागणीला प्राधान्य द्यायचा. परिस्थितीने गांजलेला,थकलेला,हतबल,असहाय,अगतिक अशी त्याची अवस्था होती. आला दिवस पार पाडायचा या एकाच भावनेने तो गृहस्थ दिवस ढकलत होता. 
एका विधवा बाईवर त्याचे मन जडले. तिलाही त्याचा आधार वाटू लागला. दोघे एकत्र येण्याची स्वप्ने बघू लागले. तिच्या पदरी दोन मुले होती. मी त्यांचा सांभाळ करीन, त्यांना काही कमी पडू देणार नाही, मी त्यांचा चांगला बाप होईन असे तो तिला वारंवार सांगायचा. तिलाही ते पटायचे पण त्याची आई आणि भाऊ यांचीही जबाबदारी होतीच. तू काळजी करू नकोस, मला जबाबदारी घेण्याची सवय आहे, मी सगळे निभावून नेईन असे सांगून तो तिची समजूत काढायचा. त्यालाही आपल्या स्वत:साठी  जगायची इच्छा निर्माण झाली. वर्षानुवर्षे जगलेले एकसुरी आणि खडतर आयुष्य आता थोडे का होईना सुसह्य वाटू लागले. मनाला नवी उभारी आल्यासारखी वाटू लागली. इतकी वर्षे आपण आई-भावासाठी अविवाहित राहिलो आणि त्यांच्या सेवेला स्वत:ला वाहून घेतले, आपले मन,आपल्या आवडीनिवडी,भावना बाजूला ठेवल्या या गोष्टींचे शल्य थोडे बोथटल्यासारखे झाले.  
तथापि त्या दोघांच्या विशेषत: आईच्या वागण्याचा त्याला मनोमन त्रास होत होता. घरातील हातावेगळी करावयाची कामे आणि सारखे तिला बाथरूम-संडासला घेऊन जाणे,तिला खाऊ-पिऊ घालणे ही तारेवरची कसरत करताना तो मेटाकुटीला यायचा, रडवेला व्हायचा. भावाला काही छोटे-मोठे काम सांगितले की आई ओरडायची, त्याला भावाच्या मानसिक स्थितीची सतत जाणीव करून द्यायची. आईची इतकी सेवा करूनही ती त्याच्यावर असंतुष्टच असायची. त्याला टोचून बोलायची. त्यामुळे या कुटुंबाचा आणि घरात नव्याने येऊ पाहणाऱ्या कुटुंबाचा मेळ कसा घालायचा या विचाराने तो मनोमन त्रस्त झाला होता. आपले आयुष्य या दोघांची सेवा-शुश्रुषा करता करता सडते आहे, आपल्याला आयुष्यातला कोणताही आनंद उपभोगता येत नाही, कुठेही मौज-मजेसाठी जाता येत नाही, आपल्याला जीवाभावाचे असे कुणी नाही, वयाची पन्नाशी आली तरी आपण अजून स्वत:च्या आयुष्याला काहीच आकार देऊ शकलेलो नाही या आणि अशा विचारांनी तो सैरभर व्हायचा. त्याची असहायता तिलाही जाणवायची. मूकपणे अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त ते दोघे काहीच करू शकत नव्हते. 
आता चरफड करत करत तो कामे करू लागला. मनातला राग स्वयंपाक करताना व्यक्त होऊ लागला. या जीवघेण्या कोंडीतून सुटण्यासाठी तो तडफडू लागला. तशातच एक दिवस सकाळी आईच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. तिला बाथरुमला जायचे होते म्हणून ती त्याच्या नावाने ओरडू लागली. भाऊ नेहमीसारखाच देवपूजेत तल्लीन होता. तो कणीक मळत होता त्यामुळे आईला बाथरुमला घेऊन जा असे त्याने भावाला सांगितले तर आई त्याच्यावरच खेकसली. त्याला नाही नाही ते बोलायला लागली. आता मात्र त्याची उरलीसुरली सहनशक्तीही संपली.त्याने त्या रागाच्या भरात आई आणि भावाचे आयुष्य संपविले. त्या दोघांना मारल्यानंतर त्याला मानसिक दृष्ट्या त्यांच्या कचाट्यातून सुटल्याचे समाधान वाटले. आता त्याला खूप हलके हलके वाटू लागले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने बेत योजला. रोकड आणि दागिने यांच्या आशेने कुणीतरी त्या दोघांचा खून केला असे त्याने भासविले. आता तो त्याचे पुढील आयुष्य त्याच्या आवडत्या व्यक्तीच्या सोबतीने विनासायास जगू शकणार होता. आता तो मोकळेपणाने स्वत:साठी श्वास घेऊ शकणार होता.  
ती या सर्व घटनांच्या बाबतीत अनभिज्ञ होती. तो जे सांगेल त्यावर विश्वास ठेवत होती. काही काळ त्याने पोलिसांना चकवण्यात यश मिळवले परंतु अखेरीस त्याचा गुह्ना उघडकीस आला. त्याने कबुलीजबाब दिला. स्वत:साठी एक लढाई  लढायचा त्याने प्रयत्न केला पण तो त्याच्या अंगाशी आला. पोलिसांनी त्याला गजाआड केले पण त्यांचेही मन कुठेतरी त्याच्याविषयी सहानुभूती दाखवत होते. ती त्याला तिथे भेटायला आली. त्यांची सगळी स्वप्ने एव्हाना भंग झाली होती. तू त्यांना का मारलेस असे ती त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती. त्याच्याकडे समर्पक उत्तर नव्हते. तो उध्वस्त झाला होता.   

कुणाचाही जीव घेणे हे कोणत्याही समस्येवर उत्तर ठरू शकत नाही. स्वत:च्या जगण्यासाठीही  दुसऱ्याची  केलेली हत्त्या हा अपराधच ठरतो. हे ठाऊक असूनही अनेक माणसे ही गुन्ह्याची पायरी चढतातच! 
परिस्थितीने दिलेली शिक्षा भोगण्यावाचून दुसरा काही पर्याय त्याच्यासमोर नव्हता. त्याला आनंदाने,मोकळेपणाने,सहचरीच्या सोबतीने त्याचे आयुष्य कंठायचे होते पण परिस्थितीला ते मंजूर नव्हते. त्याला स्वत:साठी आयुष्यातील मौल्यवान क्षण वेचायचे होते परंतु त्याच्यातल्या चांगुलपणाची परीक्षा क्षणाक्षणाला होत राहिली. समोरचे आभाळ स्वछ्च करण्याच्या नादात तो स्वत:च डागाळला. इतकी वर्षे इमानेइतबारे केलेली घरच्यांची सेवा फरशीवर बोळा फिरवावा तशी पुसून गेली. 
काय बरोबर काय चूक याचा उहापोह कितीही केला तरी काही प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहतात. कुणाचा जन्म आनंद उपभोगण्यासाठी तर कुणाचा केवळ दु:ख भोगण्यासाठीच असतो ही जीवनातली सत्यता मनाला विषण्ण करत राहते.

No comments:

Post a Comment