Thursday 5 January 2012

रोल मॉडेल्स

पूर्वीच्या काळी प्रामुख्याने आई किंवा वडील हे बहुतेक मुलांचे आदर्श असायचे. वडिलांचे कर्तृत्व पाहत मुलगा मोठा व्हायचा. वडील डॉक्टर असतील तर आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन डॉक्टरच व्हायचे असा विचार त्याच्या  मनात पक्का व्हायचा. इंजिनिअर असतील तर त्याप्रमाणे इंजिनिअर होण्याची त्याचीही मनीषा असायची. आईचे घरातील स्थान आणि तिची कर्तबगारी पाहत मुलगी मोठी व्हायची आणि आपल्यालाही आईसारखेच व्हायचे आहे हा निश्चय ती मनोमन करायची. घरातील वडीलधारयांच्या संस्कारांचा,विचारांचा पगडा तरुणांवर असायचा. त्या त्या वेळेच्या राजकीय,सामाजिक वातावरणाचाही प्रभाव युवा पिढीवर जाणवायचा. तोच व्यवसाय पुढे चालवणाऱ्या किमान तीन-चार पिढ्या तरी असायच्या. सराफांची मुले सराफ, पुरोहितांची मुले पुरोहित, वाड-वडिलांचे स्टेशनरीचे, कपड्यांचे दुकान चालवणारे युवक, वडिलांचा फोटो स्टुडीओ  सांभाळणारे तरुण, प्रकाशक वडिलांची मुलेही प्रकाशनाच्या कामात लक्ष घालायची, वाड-वडिलांनी चालवलेले हॉटेल मुले नावारूपाला आणायची. थोडक्यात आपल्याला पुढे आयुष्यात नक्की काय करायचे आहे याचा वस्तुपाठ मुलांना घरीच मिळायचा. 
आता मात्र कालप्रवाहाप्रमाणे जीवनाच्या कक्षा रुंदावल्या. आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलला. घराच्या उंबरठ्या पलीकडचे जग जास्त खुणावू लागले. मनावरील संस्काराचा पगडा कमी कमी होत गेला. वडीलधारयांच्या  मतापेक्षाही मित्र-मैत्रिणींची मते कालानुरूप अधिक ग्राह्य वाटू लागली. नोकरी करणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा बिझनेसमन होण्याची स्वप्ने पाहू लागला. वकिलाच्या मुलाला डॉक्टरकी करावीशी वाटू लागली. ज्या घराशी सूर-तालाचा दुरान्वयानेही संबंध नाही अशा घरात सूर-तालाशी लीलया खेळणारी रत्ने निपजू लागली. वैज्ञानिकांची मुले सर्जन होऊ लागली. खरं सांगायचं तर स्वत:च्या मुलभूत स्त्रोतांकडे डोळसपणे पाहणारी पिढी जन्माला आली.
तरीसुद्धा आजची युवा पिढी काही बाबतीत भरकटलेली वाटते. अनुकरण आणि अंधानुकरण यांतील फरक चाणाक्षपणे ओळखण्याची आज खरी गरज आहे. मला अमुक एक व्यावसायिक व्हावेसे वाटते ते माझ्यावरील सोशल प्रेशरमुळे की खरोखरच माझ्यात ती क्षमता आहे म्हणून याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. सचिन तेंडूलकर मला आवडतो, तो माझे दैवत आहे पण म्हणून मीही क्रिकेटीअर होणार हा आंधळा हट्ट की डोळस निग्रह हे ज्याचे त्याने ओळखले पाहिजे. माझे सगळे मित्र एमबीए  करणार आहेत म्हणून मलाही तसेच केले पाहिजे नाहीतर मी त्यांच्यातून बहिष्कृत होईन या भीतीपोटी एमबीए करण्यात कितपत अर्थ आहे? मला धीरुबाई अंबानी सारखे उद्योगपती व्हायचे आहे, जयंत नारळीकरांसारखे वैज्ञानिक व्हायचे आहे, मला गझलसम्राट म्हणून लौकिक मिळवायचा आहे, मला एक नटी म्हणून नावारूपाला यायचे आहे या इच्छा म्हणून रास्त आहेत परंतु आपल्या घरचे वातावरण,आर्थिक परिस्थिती,आपली काम करण्याची क्षमता,आपले इप्सित साध्य होण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट,कराव्या लागणाऱ्या तडजोडी या गोष्टी दुर्लक्षून कशा चालतील?  
एखादा झोपडपट्टीत राहणारा मंगेश म्हसकर रात्रीचा दिवस करून अभ्यास करतो आणि ९६ टक्के गुण मिळवून स्वबळावर पुढे येतो पण साऱ्या सुखसुविधा मिळून सुद्धा एखादा उच्चभ्रू वस्तीतील मुलगा अभ्यास न केल्यामुळे परीक्षेत नापास होतो आणि पुढे वाममार्गाला लागतो. एखादा डॉक्टर केवळ पैशांच्या हव्यासापायी रोग्यांना नाडतो,त्यांच्या औषधोपचारात हलगर्जीपणा करतो पण एखादा बाबा आमटे यांच्यासारखा योगी स्वत:चा  वकिली पेशा आणि जन्मजात लाभलेली श्रीमंती स्वेच्छेने झुगारून आपले बहुमोल आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेत घालवतो. कोणी रंग-रेषांना सजीव करणारा एम एफ हुसेन म्हणून ख्यातकीर्त होतो तर कुणी गड-किल्ल्यांच्या सानिध्यात आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानतो. कुणी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात स्वार्थी आणि घाणेरडे राजकीय डावपेच खेळतो तर कुणी दीन-दुबळ्यांची,पीडितांची,शोषितांची निरलस सेवा करणारी मदर तेरेसा होते.   
आपल्या नजरेसमोर अनेक घटना घडत असतात. अनेक नामवंत व्यक्ती आपल्याला दृक-श्राव्य माध्यमातून भेटत असतात. यांतील काही व्यक्ती समाजासमोर चांगला आदर्श ठेवत असतात तर काही वाईट! एखाद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून जाणे हा मानवी स्वभाव आहे. एखाद्या ख्यातनाम व्यक्तीची मते आपल्याला पटणे हेही उचित आहे. एखाद्या व्यक्तीचे समाजातील स्थान,त्याच्या कर्तृत्वाची भरारी पाहून स्तिमित होणे,मोहित होणे हेही स्वाभाविकच आहे. पण अशी असंख्य रोल मॉडेल्स आपल्या सभोवती असताना त्यातील नेमका आदर्श समोर ठेवणे हे खूपच कठीण काम आहे. आपल्या घरातील संस्काराची नाळ तुटू न देणे त्याचप्रमाणे बाह्य गोष्टींना भुलून अविचाराने कोणताही निर्णय न घेणे यात शहाणपणा असतो. 
आपल्या आतली हाक ऐकणे खूप महत्वाचे असते. आपली कुवत,क्षमता,एखाद्या कामात झोकून देण्याची प्रवृत्ती,चिकाटी,समोर आलेल्या अडचणींशी दोन हात करण्याचे धैर्य, शिखर सर करण्यासाठी करावा लागणारा खटाटोप,प्रसंगी पदरी अपयश आल्यास खचून न जाता पुढे जाण्याची हिम्मत आणि आपला अस्सल पिंड वेळीच ओळखून त्याला दिला गेलेला सुयोग्य आकार हेच खरं तर यशाचं गमक असतं.   
आकाशात उत्तुंग भरारी मारणारा गरुड हा सुद्धा आपला रोल मॉडेल असू शकतो पण तसे होण्यापूर्वी आपले पंख तितके मजबूत आहेत की नाहीत हे तपासून घेण्याची जबाबदारीही आपलीच असते. 

No comments:

Post a Comment