Tuesday 3 January 2012

व्होट फॉर.........

महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. आता प्रचाराची राळ उडेल. आश्वासनांची खैरात होईल. महापालिकेच्या सत्तांतरासाठी उत्सुक असलेले उमेदवार आपली सगळी कौशल्ये पणाला लावतील. स्थानिक सुखसोयींचा वर्षाव होईल. शहरांच्या भिंती उमेदवाराच्या आजपर्यंतच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणाऱ्या फलकांचे स्वागत करतील. सगळे पक्ष एकमेकांची लंगडी बाजू जनतेसमोर आणण्याचा आटापिटा करतील. दुसऱ्या पक्षाला असमर्थ,दुर्बल,नाकाम ठरवत आपापल्या पक्षाची पताका जनमनात फडकवण्याचे प्रयत्न करत राहतील.   
वास्तविक पाहता मुलभूत स्थानिक सुखसुविधा मिळणे हा प्रत्येकाचाच नागरी हक्क असतो. उत्तम रस्ते, पिण्याचे पाणी,वीज, कचरा व मलनि:स्सारणाची सुयोग्य व्यवस्था, वाहतूक-दळणवळण, वेळोवेळी जन्तुनाशकांची फवारणी, सामान्य जनतेची सुरक्षितता, मुलांना खेळण्यासाठी उद्याने, ज्येष्ठ नागरिकांना आधार घेण्यासाठी रेलिंग्ज, विसावण्यासाठी बाके, समाजकंटकांचे  उच्चाटन, अस्वच्छतेचे निर्मूलन, सुलभ शौचालयांची बांधणी या व अशा अनेक बाबी महापालिकेच्या अखत्यारीत येतात. महापालिकेवर कोणाचीही सत्ता असो, या गोष्टी लोकांना पुरवण्यास महापालिकेचे पदाधिकारी बांधील असतात.   
सध्या अनेकानेक शहरांचे दृश्य बकाल झालेले दिसते. जिकडेतिकडे उखडलेले रस्ते, अर्धवट बांधकामे, बिल्डरांची अनधिकृत बांधकामे, मोकळ्या जागेचा अभाव, नाक्यानाक्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग व त्यातून दूरवर पसरलेली दुर्गंधी, अरुंद रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी आणि त्यातून होणारा वाहतुकीचा खोळंबा, अस्वछच पदार्थ व पेये विकणारे विक्रेते, कधीही न होणारी नालेसफाई, उघडी गटारे, गटारांतून उपसून पदपथावर ठेवेलेला गाळ, डीडीटी न फवारल्यामुळे होणारा डासांचा उपद्रव, रस्त्यावर उघडपणे विधी करणारी माणसे, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा उडालेला बोजवारा, मुलांची आयुष्ये टांगणीला लावणाऱ्या स्कूल बसेस,रिक्षा आणि इतर प्रायव्हेट गाड्या, बिल्डर लोकांच्या सततच्या बांधकामांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, बस व रिक्षा चालकांचा मुजोरपणा, रहदारीची कोंडी,वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण,मधूनच लोप पावणारी वीज आणि पाणी अशा अनेक गोष्टींमुळे लोक पुरते पिडले गेले आहेत. जागोजागी मोठमोठ्ठाली होर्डींग्ज लावून हे राजकारणी, नगरसेवक सार्वजनिक भिंती अशोभित करण्याचे कामही निष्ठेने करत असतात. पानांच्या पिचकाऱ्या व थुंकी रस्ते,गाड्या,शौचालये,उद्याने,भिंती रंगवत असतात. दरवर्षीच्या पावसाळ्यात न चुकता ठिकठिकाणी पाणी साचतेच! या पाण्यातून घरापर्यंत पोहोचताना लोकांना नाकीनऊ येतात. सिग्नलला वाहने थांबताच भिकारी,तृतीयपंथी उच्छाद आणतात. 

एकविसाव्या शतकात आपण नक्की नांदत आहोत का असा प्रश्न स्वत:ला विचारावासा वाटत राहतो. निवडणुका तोंडावर येतात आणि मग इतकी वर्षे सुस्तावलेले नगरसेवक जागृत होतात. उखडलेल्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर केली जातात. जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला जातो, किमान त्याबाबत आश्वासने दिली जातात. झोपडपट्टीतील गोर-गरिबांना अन्न-धान्याचे मोफत वाटप केले जाते,घोंगडी-कांबळी देऊन त्यांची फाटकी लाज झाकायचा तात्पुरता प्रयत्न केला जातो. नवीन पाईप लाईन्स टाकल्या जातात, रस्त्यावरचा कचरा काही काळापुरता दृष्टीआड होतो. 
आपल्या पक्षाने केलेली (पण लोकांना न दिसलेली) कामे जाहीररीत्या फलकावर लिहिली जातात. सह्यांची मोहीम राबवली जाते. आपणच फक्त जनतेच्या विश्वासास कसे पात्र आहोत हे अनेक मार्गांनी सांगण्याचा खटाटोप केला जातो. तुम्ही आम्हाला पुनश्च निवडून दिल्यास आम्ही या शहराचा विकास साधण्यासाठी काय काय करणार आहोत याचे पाढे वाचले जातात. आम्ही सोडून इतर कोणताही पक्ष सत्तेवर येण्यास कसा लायक नाही हे ही जनमनावर ठसवण्याचा प्रयास केला जातो. 
निवडणुकांच्या प्रचाराची धुमश्चक्री चालू होते. आता मतदारराजाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. त्याच्या डोळ्यासमोर सुंदर शहराचे,शहरी विकासाचे गोंडस स्वप्न उभे करण्यासाठी स्थानिक राजकारणी धडपडतात. आपण आशेच्या रथावर आरूढ होतो. सुशोभित व साफ शहराचे, कड्या सुरक्षिततेचे, प्रदूषण विरहित व्यवस्थेचे स्वप्न पहावयास प्रवृत्त होतो. आता सगळ्या शंका-कुशंकांना पूर्णविराम मिळणार असतो. आपल्या कुटुंबाला सुरक्षिततेची हमी मिळणार असते, आपण निर्लेप रस्त्यावरून चालणार असतो. वाहतुकीची समस्या चुटकीसरशी दूर होणार असते. पाणी आणि वीज आता आपल्या तोंडचे पाणी पळवणार नसतात. फक्त हे सगळे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आपल्याला कुणाला तरी निवडून देणे भाग असते. कुणावर तरी विश्वास दाखवणे गरजेचे असते. आपली पावले मतदान केंद्राच्या दिशेने चालू लागतात.

निवडणूक होते. निकाल लागतो. ढोल-ताशांच्या गजरात नवे नगरसेवक विराजमान होतात. रुटीन चालू होते. समस्या तशाच राहतात. आश्वासनांच्या हिंदोळ्यावर झुलत असलेला सामान्य माणूस उखडलेले रस्ते,उघडी गटारे,साचलेला केरकचरा,रंगलेल्या भिंती,वाढते प्रदूषण,वाहनांची कोंडी,अस्वच्छतेमुळे पसरलेली रोगराई असहायपणे पाहत राहतो. आता त्याला कुणी वाली नसतो. त्याच्या समस्या त्यालाच सोडवायच्या असतात. तो मूक-बधीरतेची,अंधपणाची शाल मनावर पांघरतो. आता पुढील निवडणुका घोषित होईपर्यंत त्याच्या मताला काडीचीही किंमत नसते.





   <a href="http://phpweby.com/hostgator_coupon.php">best hostgator coupon</a>

No comments:

Post a Comment