Sunday 11 November 2012

आली दिवाळी दिवाळी ............

घराघरांतून साफसफाई सुरु झाली, बेसनाचे खमंग वास दरवळू लागले की दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. वेगवेगळ्या तऱ्हेचे कंदील, पणत्या यांनी रस्त्यावरील दुकाने सजू लागतात. वर्षभरात या देशात कितीही अप्रिय घटना घडल्या असू देत, दिवाळीची चाहूल लागताच घरी-दारी उत्साहाला उधाण येते. माणूस गरीब असो वा श्रीमंत, दिवाळीची खरेदी करण्यासाठी तो बाहेर पडतोच पडतो. 
पूर्वी दिवाळी आली की घराघरातून ठिपक्याच्या कागदाची, रांगोळीची, गेरूची देवाणघेवाण सुरु व्हायची. घरातील पोरसोरांपासून ते वयस्कर मंडळी कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असायची. चकलीचे सोरे, चकत्या, शंकरपाळ्याचे कातणे घरोघरी फिरवले जायचे. आज कोणाकडे कोणता फराळ केला जाणार आहे याची माहिती इतरांना असायची. रंगीबेरंगी आकाशकंदील, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या तसेच ग्लासातील दिवे यांनी चाळी, बिल्डिंगा  सुशोभित व्हायच्या. पाहुणे  येणार म्हणून खास पदार्थ केले जायचे, भेटवस्तू  तयार ठेवल्या जायच्या. नरक चतुर्दशीला घरोघरी दुष्ट शक्तींचा नाश करणारी प्रतीकात्मक चिबुडे फोडली जायची. त्यानंतर लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज सारे काही यथासांग पार पडायचे.       
आजचे दिवाळीचे स्वरूप बरेच बदलले आहे. आज दिवाळीला बरीच घरे अंधारात असतात. कुटुंबेच्या कुटुंबे सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी बाहेरगावी जातात. घरोघरी फराळ होतोच असे नाही. विकतचा फराळ आणला जातो. ठिपक्यांच्या रांगोळी ऐवजी साच्याची रांगोळी काढण्याकडे बायकांचा कल असतो. कंदिलाविना,  पणत्यांशिवाय  घरे भकास वाटतात. घरातील वर्दळ, पै -पाहुणे, बायकांची लगबग, पोरांचे फटाके लावणे यापासून आपण लांब जातो आहे असे वाटू लागते. ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून आंघोळ करणे, नवे कोरे कपडे घालणे, देव-दर्शन घेणे, वडीलधारयांच्या  पाया पडणे, फटाके आणि फराळ यांचा आस्वाद घेणे कालबाह्य होत चालले आहे की काय असे वाटू लागते.  
आता दिवाळी आली की भव्य मॉल सजू लागतात. लोकही खरेदी करण्यासाठी मॉल अधिक प्रिफर करतात. मॉलमधील ऑफरनुसार स्वस्तातील गोष्टी मिळवण्यासाठी लोकांची एकच झुंबडगर्दी उडते. आयता फराळ, आयत्या भेटवस्तू, आकर्षक कपडे  यांनी मॉल फुलतात. ओवाळणीची ताटेसुद्धा रेडीमेड मिळतात. काही वेळेस आपापल्या सोयीनुसार पुढे-मागे  भाऊबीज साजरी केली जाते.  आजकाल बहिणींकडून भावांनाही महागड्या भेटी दिल्या जातात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना बड्या हॉटेलमध्ये दिवाळी निमित्ताने खास मेजवान्या दिल्या जातात. 
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांवर गदा आली ही चांगलीच गोष्ट आहे  पूर्वी फटाके भरपूर वाजायचे तेव्हा प्रदूषणाची कोणी पर्वा केली नाही पण आजकाल प्रदूषणाच्या नावाखाली काही घरात मुलांना फटाके वाजवू देत नाहीत. शोभेचे फटाकेही उडवू देत नाहीत. काही मुलांना फराळ घरी करता येतो हेही ठाऊक नसते. आपली संस्कृती टिकवणे आपल्याच हातात असते. ज्या गोष्टी वाईट किंवा हानिकारक आहेत त्या जरूर त्याज्य ठरवाव्यात परंतु चांगल्या गोष्टींचे जतनही जरूर करावे. माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या गोष्टी आज दुर्मिळ होत चालल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने जर माणसे एकत्र येत असतील, आनंदाची,सौख्याची देवाणघेवाण करत असतील तर तो धागा तरी घट्ट पकडून तरी माणसाला एकमेकांच्या साथीने पुढची वाटचाल नक्कीच सुकर करता येईल अन्यथा रोज झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगात कोणत्याही आनंदाचे निमित्त माणसाला एकमेकाच्या जवळ आणू शकणार नाही अगदी दिवाळीही!  

No comments:

Post a Comment