Sunday 27 May 2012

स्पर्धा

'पळा पळा कोण पुढे पळे तो' नावाचे एक नाटक होते. आजच्या जीवनशैलीला अगदी अनुरूप असे हे शीर्षक आहे. मूल शाळेत जाऊ लागते आणि या स्पर्धात्मक युगाला सुरवात होते. मुलांना शाळेत पोहोचवायला आलेल्या आया किंवा मुलांना स्कूल बसपर्यंत पोहोचवून घरी जाणाऱ्या आया यांच्यामधील चर्चेचा विषय असतो मुलांचे मार्क्स. दुसऱ्या मुलाच्या मार्कांच्या तुलनेत आपल्या मुलाला मार्क जास्त आहेत का कमी हे पाहणे हा बऱ्याच आयांचा छंद असतो. मग आपल्या मुलाला त्या मुलापेक्षा कमी मार्क  आहेत हे समजताच खट्टू होणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळाल्यास आनंदित होणे असे बालिश प्रकार या आया करत असतात.
हे बघ या परीक्षेत तुला त्या अनुपपेक्षा थोडे कमी मार्क आहेत पण पुढच्या परीक्षेत हे चालणार नाही हं. तुला त्याच्यापेक्षा एक मार्क जरी जास्त असेल तरी मला आनंदच होईल हे स्पर्धेचे विचित्र बाळकडू आईच मुलाला पाजत असते. माझी मुलगी शाळेत असतानाची ही गोष्ट आहे. तिच्या वर्गात एक दाक्षिणात्य मुलगा होता. हुशार होता पण त्याच्या आईची अशी अपेक्षा होती की त्याने सर्व परीक्षांत पहिला नंबर पटकवावा. जेव्हा जेव्हा त्याचा दुसरा अथवा त्याहून मागे नंबर यायचा तेव्हा ती त्याला बडवत असे. इतर मुलांबरोबर खेळायला सोडत नसे. इयत्ता फक्त पाचवी. दुसऱ्या एका मुलीची आई तिच्या मुलीला अमक्या अमक्या प्रश्नाला त्याच्यापेक्षा किंवा तिच्यापेक्षा अर्धा मार्क कमी का मिळाला यावरून तिच्या वर्गशिक्षिकेशी अकारण हुज्जत घालत असे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. मुळात ही अशा प्रकारची स्पर्धा कशासाठी? याचा कुणालाही विचार करावासा वाटत नाही हीच खेदजनक गोष्ट आहे.  
आठवी, नववी, दहावी या इयत्ता तर अशा स्पर्धांसाठी जणू काही राखूनच ठेवलेल्या असतात. आपल्या मुलाचे शाळेतील आणि क्लासमधील परीक्षेत मिळालेले मार्क हा चर्चा करण्यासाठी एक चविष्ट विषय असतो. मूल हुशार असेल तर ही स्पर्धा अधिक तीव्र होते. ज्यांची मुले पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमात हुशार नाहीत (म्हणजेच मार्कांनी मागे आहेत) त्या मुलांचे पालक या स्पर्धात्मक चर्चेतून आपोआपच बहिष्कृत होतात. आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळालेले मार्क हा ज्याच्या त्याच्या प्रतिष्ठेचा, इभ्रतीचा विषय होऊन बसतो. 
दहाव्वी उत्तीर्ण झाल्यानंतर याच मार्कांच्या तुलनेनुसार विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो. अव्वल येण्यासाठी ही मुले आणि विशेषकरून त्यांचे पालक जीवाचा आटापिटा करत राहतात. माझी मुलगी दहाव्वीला बसली होती. रिझल्टचा दिवस होता. शाळेत मार्कशीट्स दिल्या जात होत्या. तिच्या एका मैत्रिणीला ऐशी टक्के मिळाले. त्या कुटुंबाचा एका कुटुंबाशी घरोबा होता. त्या कुटुंबातील मुलाला तिच्यापेक्षा चार टक्के अधिक मिळाले. झाले. तिच्या आईला हा प्रश्न पडला की दोघेही एकाच क्लासला जाऊन त्या मुलाला हिच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेच कसे? त्या बाई पुन्हा पुन्हा अविश्वासाने दोघांच्या मार्कशीट्स डोळ्यांखालून घालत होत्या. ह्या त्यांच्या मनातील सततच्या स्पर्धेने मुलीच्या रिझल्टचा आनंदही नासवून टाकला. 
का आपण सतत करत राहतो ही स्पर्धा? प्रत्येक मूल वेगळे असते हे आपल्या मनाला समजत नाही की ते आपल्याला समजून घ्यायचे नसते? प्रत्येक मुलासाठी एक वेगळे क्षितीज असते. त्या क्षितिजापर्यंत आत्मविश्वासाने पोहोचण्यासाठी त्याला आप्तांची साथ हवी असते. त्यांचा भक्कम पाठिंबा, त्यांचे प्रोत्साहन हवे असते. आपण इतरांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याला किंवा तिला घरच्यांचे पाठबळ हवे असते. त्याचे किंवा तिचे मनोबल खच्ची न होऊ देणे ही जबाबदारी सर्वस्वी मातापित्यांची असते. इतरांच्या मुलांबद्दल सतत असूया बाळगून, त्यांचा हेवा करून, द्वेष करून आपल्याला आपल्या मुलाला मोठे करता येत नाही. परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आपले मूल इतर मुलांच्या योग्यतेचे नाही असे समजणे हा तर एक गुन्हाच आहे. अनेक पालक सातत्याने आपल्या मुलांचा पाणउतारा करण्यात धन्यता मानतात. आपण कळत नकळत आपल्या मुलाच्या मनात न्यूनगंडाचे बीज पेरतो आहोत हे त्या आई-वडिलांच्या ध्यानीमनीही नसते. अशा अपमानास्पद अनुभवांनंतर ' I am fit for nothing' अशी अनेक मुला-मुलींची धारणा होते. 
हीच मुले पुढे नोकरी-व्यवसायात पदार्पण करतात. आपापल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी धडपडतात. काहींचा  मार्ग सुकर असतो तर काहींचा खडतर. काहींची भरारी गगनाला गवसणी घालते तर काहींची उडी थोडी थिटी पडते. प्रयत्नांनाही दैवाची, नियतीची जोड लागते हे मान्य करण्यास अनेकजण कचरतात. जी मुले अल्पावधीतच यशाची शिखरे सहज गाठतात त्यांना दैव, नियती नावाची गोष्ट मान्य नसते. आपण लाथ मारू तिथे पाणी काढू हा फाजील विश्वास त्यांच्या ठायी निर्माण झालेला असतो. यालाही अपवाद मुले, माणसे असतात , नाही असे नाही पण बोटावर मोजण्या इतकीच! या सो कॉल्ड हुशार म्हणून गणल्या जाणाऱ्या मुलांचा अहंगंड त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी, नात्यातल्यांनी चांगलाच पोसलेला असतो. ही मुले खूप शिकतात, उच्चपदस्थ होतात, परदेशी जातात, गडगंज पैसा कमावतात पण माणुसकी, सहृदयता नावांच्या गोष्टींपासून अस्पर्श राहतात, अलिप्त राहतात. 'मी म्हणेन तीच पूर्व दिशा' हा त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र होतो.  
अशा माणसांची मग इतरांना, त्यांच्या नोकरी-व्यवसायाला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती बळावते. अशा एखाद्या कमी शिकलेल्या किंवा कमी कमावणाऱ्या मित्राची यांना लाज वाटू लागते. त्याच्यासमवेत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण त्याच्या स्मृतीतून आता कायमचे हद्दपार झालेले असतात. आपला हा मित्र सर्वस्वी निकम्मा आहे किंवा त्याच्या अभ्यासातील बिन-हुशारीमुळे त्याचे आयुष्य फुकट गेले असा एक सोयीस्कर समज ही माणसे आपल्या आपणच करून घेतात.  वास्तविक पाहता हा मित्र ज्या क्षेत्रात काम करतो त्याची यांना सुतराम माहिती नसते आणि ती करून घ्यायची यांना गरजही वाटत नाही. तो जे काही कमावतो त्यात तो आनंदात असतो पण ही माणसे मात्र आपण या वयात इतरांपेक्षा खूप जास्त कमावतो या आसुरी आनंदात त्यांचे आयुष्य व्यतीत करत असतात.  
एक पाठ्यपुस्तकीय गोष्ट मला आठवते. दोन जिवलग मित्र असतात. एक शहरात जाऊन शिकून मोठ्ठा अधिकारी होतो आणि एक त्याच गावात राहून नावाड्याचे काम करतो. या दोघांच्या कर्तबगारीत जमीन-अस्मानाचे अंतर असते. एकदा हा शिकलेला मित्र त्याच्या गावी येतो. पण त्याचे घर पैलतीरावर असते. तो मित्राच्या नावेतून घरी जाण्यास निघतो. त्याला स्वत:च्या शिक्षणाचा कोण अभिमान असतो. तो त्याला पाठ्यपुस्तकीय अभ्यासाचे दाखले देऊन, तुला हे येत नाही ना मग तुझा पाव जन्म फुकट, अर्धा जन्म फुकट , पाउण जन्म फुकट असे सारखे हिणवत राहतो. मित्र शांत राहतो. एवढ्यात जोराचे वादळ येते. नाव डुगडूगायला लागते. काय रे तुला पोहता येते का? हा प्रश्न तो त्याच्या उच्चशिक्षित मित्राला विचारतो. मित्र नाही असे म्हणतो. यावर मग तर तुझा सगळाच जन्म फुकट असे तो नावाडी मित्र म्हणतो. नाव बुडू लागते. मित्र गटांगळ्या खाऊ लागतो. अखेरीस त्याला आपल्या फोल विचारसरणीची प्रचीती येते. नावाडी मित्र त्याला आपल्या पाठीवर घेऊन सुखरूपपणे त्याच्या घरी पोहोचवतो आणि तो उच्चविद्याविभूषित मित्र जीवनदान दिल्याबद्दल त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानतो.   
आयुष्यात प्रत्येकाने आपापल्या वकुबाप्रमाणे प्राप्त केलेली विद्या ही कनिष्ठ श्रेणीची कधीच नसते ही साधी गोष्ट पाठ्यपुस्तकातील हा धडा वाचूनही ज्यांच्या अंगवळणी पडत नाही त्यांचा जन्म सार्थकी लागला असे तरी कसे म्हणायचे? 

No comments:

Post a Comment