Sunday 13 May 2012

विजेची चणचण, पाण्यासाठी वणवण.......

देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक गावांत, खेडोपाड्यांत वीज आणि पाण्याचे आत्यंतिक दुर्भिक्ष्य आहे. कळशीभर पाणी मिळवण्यासाठी तेथील लोकांनी, विशेषत: बायकांनी मैलोनमैल केलेली पायपीट बघून मन व्यथित होते. विजेअभावी अनेक यंत्रे, उपकरणे खितपत पडून आहेत, नादुरुस्त झाली आहेत. पुरेशा पाणी-पुरवठ्या अभावी शेते, झाडे, रोपे सुकून गेली आहेत. तेथील जनावरांना खाण्यासाठी ओला, हिरवा चारा उपलब्ध नाही. हे दृश्य आहे एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राचे, भारताचे! 
आज अनेक वाहिन्यांवर कोण मंत्री, उच्चपदस्थ किती विजेचा आणि पाण्याचा वापर करतो याची आकडेवारी प्रसिद्ध होते. सगळेच तथाकथित बडे लोक जरुरीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात विजेचा आणि पाण्याचा गैरवापर करतात. त्याच्या अशा बेजबाबदार आणि बेसुमार वापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने इतर लोकांच्या वीज आणि पाणी वापरावर गदा येते. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. पाणी असले तर वीज नसल्याने पाण्याचा पंप किंवा इतर विजेवर चालणारी यंत्रे ठप्प होतात. परिणामी शेतकऱ्यांचे हाल कुत्रेही खाणार नाही अशी भीषण परिस्थिती जागोजागी निर्माण होते आहे. 
बीड जिल्ह्यातील एक घटना मला या निमित्ताने इथे नमूद करावीशी वाटते. आपल्या लहान मुलाला आंघोळ घालावी म्हणून एक महिला जेमतेम पाण्याचे दोन-तीन तांबे त्याच्यावर उपडे करते आणि तेच आंघोळीचे पाणी एका भांड्यात साठवून ते स्वयंपाकासाठी वापरते. याहून या देशातील गावाची अधिक विदारक अवस्था कोणती असणार? जनावरांसाठी असलेल्या पाणवठ्यांतून महिलांना पिण्याच्या, स्वयंपाकाच्या, नित्यकर्माच्या पाण्याचा उपसा करावा लागतो. याचे भीषण परिमाण मग मुक्या जनावरांनाही अपरिहार्यपणे सोसावे लागतात. अपुरा चारा, आंबोण आणि पाण्या-अभावी जनावरे मरतुकडी होतात, शेतात कामे करण्यास असमर्थ होतात, आजारी पडतात.  
आज शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना पुरवण्यात येणारे पाणी, वीज यांचे प्रमाण निश्चितच जास्त असणार. बहुतेक बिल्डरांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे, स्थानिक नगरसेवकांचे साटेलोटे असल्याने त्या इमारतींतील रहिवाश्यांना वीज आणि पाणी-पुरवठा यथास्थित होणार परंतु यासाठी कोठून तरी, कोणाचे तरी पाणी आणि वीज तोडली जाणार. भारत हा विकसनशील देश, येथील भूमी सुजलाम, सुफलाम अशा कोणीही आणि कितीही गप्पा मारल्या तरी आज अनेक गावांतील आणि खेड्यांतील दारूण परिस्थितीही लपून राहिलेली नाही. 'शेतकरीराजा' या शब्दातील विरोधाभास  आज अधिकाधिक जाणवू लागला आहे. सर्व प्रजेला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी आज सर्वार्थाने कंगाल झाला आहे, देशोधडीस लागला आहे. एकेकाळच्या या राजाचे ऐश्वर्य लुप्त होऊन त्याचा रंक झाला आहे. उन्हाने रापलेला काळाकभिन्न चेहरा, खुरटलेली दाढी, डोळ्यांतील पाण्यात चिंतांचे आगर, त्याचे सुकलेले आणि सुरकुतलेले निस्तेज शरीर, आकाशाकडे टक लावून बसलेले त्याचे व्याकूळ डोळे, झोपडीत गालांच्या वाट्या आणि पोटाची खपाटी घेऊन हिंडणारी त्याची पोरे, पाण्याच्या आशेने हंडा घेऊन निघालेली त्याची बाईल, विझलेली चूल अशी काळजाला घरे पडणारी एकेकाची घरे आणि त्याच्याशी निगडीत एकेकाच्या कर्मकहाण्या!  
आज अनेक सोसायट्या, बंगल्यांतून विजेचा आणि पाण्याचा गैरवापर होत असतो. पाणी आहे म्हणून घराच्या भिंती, दारे, ग्रील्स, आवार,बाल्कनी धू ,गाड्या धू हे चालूच असते. अनेक घरांतून चोवीस तास टी. व्ही. चालू असतो. आमच्या घरांत टी.व्ही. बंद करण्याची पद्धतच नाही असेही ऐकिवात येते. काही भागांत भार-नियमन तर काही भागांत अजिबात नाही. एसी, गिझर, इस्त्री, फ्रीज अशा जास्तीत जास्त वीज खेचणारी उपकरणेही बिनधोक चालू असतात. म्हणजे काही ठिकाणी साधी गरज भागवण्यापुरतेही पाणी आणि वीज नाही आणि काही ठिकाणी वीज आणि पाण्याची नुसती रेलचेल असे परस्परविरोधी चित्र आहे.
हे वर्षानुवषे असेच चालू आहे. हे चित्र बदलण्याची गरज कुणालाच कशी वाटत नाही? ज्यांच्याकडे पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, पाण्याअभावी ज्यांच्याकडे अन्न शिजत नाही, विजेअभावी ज्यांची शेती चालत नाही अशांनी खुशाल उपासमारीचे बळी होऊन मरून जावे, आपले शरीर त्यांनी गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाच्या स्वाधीन करावे अशी इतरांची इच्छा आहे की काय? त्यांचे प्रश्न बासनात गुंडाळलेल्या स्थितीत कैक वर्षे पडून आहेत. त्यावर राजकीय धूळ साचली आहे. स्वार्थांधतेची पुटे चढली आहेत. अवेळी बरसणारा पाऊस आणि योग्यवेळी न येणारा पाऊस ग्रामीण भागांतील लोकांच्या डोळ्यांतील पाऊस सतत  खळाळत ठेवतो. अनेक निष्पाप जीवांची आसवे आज शुष्क झालेल्या जमिनीने गिळंकृत केली आहेत. काळीभोर कसदार जमीन आणि खिल्लारे, धष्टपुष्ट जनावरे ही ज्याची एकेकाळी धन-दौलत समजली जायची त्या शेतकरीराजावर आज वीज-पाण्याविना भुईसपाट व्हायची पाळी आली आहे. अपार काबाडकष्ट करून रयतेच्या तोंडात सुखाचा घास घालणारा हा शेतकरी अन्नाच्या एका घासालाही पारखा झाला आहे. हा काय लोकशाहीचा विजय समजायचा की हा काय भारत प्रगतीपथावर आहे असे सांगून जनतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधणाऱ्या मूठभर स्वार्थी, अप्पलपोट्यांचा विजय समजायचा? शेतकऱ्यांचा कर्दनकाळ होऊ पाहणाऱ्या घृणास्पद राजकीय व्यवस्थेचा विजय समजायचा? त्याच्या कष्टावर, घामावर, रक्तावर गब्बर झालेल्या समाजातील मुर्दाड व्यक्तीमत्वांचा विजय समजायचा? 
माणसामधील देवत्वाचा अंश दिसामाशी कमी होत चालला आहे हा त्याचा सबळ पुरावा आहे. परोपकारासाठी झटणारा माणूस आता दुसऱ्याच्या छाताडावर उभा राहून उन्मत्तपणे गर्जना करू लागला आहे. असहाय, दुर्बल माणसाचे रक्त शोषू लागला आहे. कधीतरी परिस्थितीच्या विखारी नांग्या आपल्यालाही दंश करू शकतील  याचा त्याला पूर्णपणे विसर पडला आहे.
या सगळ्या वाईट, स्वार्थी, निर्लज्ज प्रवृत्तीच्या महासागराला गिळंकृत करण्यासाठी आज एका अगस्तीची गरज आहे.  

No comments:

Post a Comment