Thursday 17 May 2012

प्रश्न - एक सामाजिक सवय

माणसांना प्रश्न विचारायची नको तेवढी खोड असते. त्यांचं त्या प्रश्नांशी प्रत्यक्ष देणं असो वा नसो प्रश्न विचारल्याशिवाय त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  अगदी नवजात अर्भकाच्या संदर्भातही, मुलगा की मुलगी? किती पौंडाचा किंवा पौंडाची?काळा की गोरा?  दिसायला आईसारखा की बापासारखा? असे कितीतरी प्रश्न पडत असतात.
मूल जन्माला आल्यानंतर आईशी जोडलेली त्याची नाळ तुटते आणि लोकांनी उपस्थित केलेल्या असंख्य प्रश्नांशी त्याची नाळ जोडली जाते. मूल शाळेत जायच्या वयाचं झालं की कोणत्या शाळेत प्रवेश मिळाला? किती डोनेशन द्यावं लागलं? शाळेचं टायमिंग  काय? शाळा घरापासून लांब आहे की जवळ? एस.एस.सी बोर्ड की आय.सी.एस.ई? असे एक ना दोन, हज्जार प्रश्न इतर माणसांना पडतात. मूल पाठीवर दप्तरांची आणि लोकांना पडलेल्या प्रश्नांची ओझी वाहून दमलेलं असतं. काय रे परीक्षा झाली का ? पेपर कसे गेले? रिझल्ट कधी? प्रश्नांच्या  तोफा धडाधड सुटत असतात. मूल दहावीत गेले की पालकांच्या अपेक्षांप्रमाणे लोकांचे प्रश्नही मोठे होत जातात. कोणत्या क्लासला जातोस रे? मग काय किती मार्क मिळवणार? जोरात अभ्यास करतोयस ना? आम्ही पेढ्यांचे बुकिंग आधीच करून ठेवले आहे तुझ्या बाबांकडे. पुढे काय करायची इच्छा आहे? या सर्व प्रश्नांवर त्या मुलाचे अथवा मुलीचे मनोगत असे असू शकेल. मला माझ्या कानात कापसाचे बोळे कोंबायची इच्छा आहे. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला मला उत्तर देण्याची अजिबात इच्छा नाही. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. आधीच क्लाससाठी बाबांनी खूपच जास्त पैसा खर्च केला आहे. कॉलेजचा खर्चही उद्या आ वासणार आहे. तेव्हा कमीच मार्क मिळालेले बरे. पेढ्यांचा खर्च तरी वाचेल.  
शालेय अभ्यासक्रम संपून कॉलेज पर्व सुरु होते. पदव्युत्तर अभ्यासक्रम कोणता निवडावा याविषयी तो किंवा ती साशंक असतात. अनेक अनाहूत सल्ले, मतांच्या अर्थहीन पिचकाऱ्या त्यांच्या कानांवर आदळत असतात. पुढे एम.बी.ए करणार आहेस का? परदेशात जायची इच्छा आहे का? फायनान्स ह्या विषयात कितपत रुची आहे? मेडिकलला जाण्यासाठी अभ्यास खूप करायची तयारी आहे का? आर्ट्स घेऊन तू काय साध्य करणार आहेस? तुला फॉरेन लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे काय? अरे किती प्रश्न विचाराल रे त्याला? आणि काय करायचं आहे तुम्हाला? त्याचं तो बघून घेईल की! त्याने कोणताही अ ब क अभ्यासक्रम निवडला  तरी अभ्यास त्याचा त्यालाच करायचा आहे. तो परदेशात जाईल अथवा इथेच राहून अभ्यास पूर्ण करेल, तुमचा या साऱ्याशी संबंध काय व कसा येतो?  तो आर्ट्स घेईल, कॉमर्स घेईल नाहीतर सायन्स घेईल, how does it matters to you?  त्याच्या भविष्याचा तो विचार करेल, तुझी सकाळची ९.४४ ठाणा-सी एस टी कशी चुकणार नाही याचा तू विचार कर.  
मुलगी वा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला किंवा झाली की आई-बापाच्या डोक्याला काय कटकट असते ते त्यांनाच ठाऊक! कटकट विवाह जमवताना होत नाही इतकी लोकांच्या फालतू प्रश्नांना उत्तरे देताना होते. नोकरी करते का? कुठे करते? तो व्यवसाय करतो का? कोणता? विवाह नोंदणी केली का? मुलीची पत्रिका आहे ना? वधू-वरांचे गुण नीट जमताहेत ना? एकनाड नाही ना? गोत्र कोणते हो तुमचे? कुलदैवत कोणते? एखादी मुलगी वयाने थोडी जास्त असता काहो हिच्या लग्नाचे जमत नाही का कुठे? मुलीला मंगळ आहे का? अपेक्षा काय आहेत तिच्या? विवाहयोग पत्रिकेत नक्की केव्हा आहे हे ज्योतिषाला विचारले आहे का? उपरोक्त प्रश्नांची माहिती पृच्छा करणाऱ्याला नाही मिळाली तरी त्याचे काहीच बिघडणार नसते. पण आपले इतरांविषयीचे नॉलेज अपडेट करण्याचा हा एक प्रयत्न असतो. 
तिचा विवाह जमतो. यथासांग पार पडतो. आई -वडील मोकळा श्वास घेतात. पण लोकांच्या डोळ्यांत अजूनही अनेक प्रश्न साचलेले असतातच. नवरामुलगा काय करतो? घराणे कोणते? राहायला कुठे? हनिमूनला कोठे जाणार? लग्नानंतर मुलगी नोकरी करणार का? इत्यादी इत्यादी. लग्नाला एक-दोन वर्षे होतात ना होतात यांना पुढचा प्रश्न डाचू लागतो. मग काय गोssssड बातमी कधी देणार? प्लानिंग वगैरे चालू आहे का? इतर काही प्रॉब्लेम आहे का? रस्त्यात भेटल्यानंतरही हे प्रश्न पुढे रेटता येतात.  
अगदी माणूस गेल्यानंतरही कसे गेले हो ते? काय झाले होते? हॉस्पिटलमध्ये होते का? सकाळी गेले की संध्याकाळी? गेले तेव्हा आजूबाजूस कोण होते? ऑफिसमध्ये कळवले ना? दिवस वगैरे करणार ना? पिंडाला कावळा शिवला का चटकन? काही इच्छा राहिली होती का मागे? आता राहते घर कोणाच्या नावावर होणार? हे प्रश्न माणसाचा पिच्छा सोडत नाहीत. 
प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण विचारतो त्यातले अनेक प्रश्न अनावश्यक असतात, बाळबोध असतात, अर्थहीन असतात. इतरांना आपल्याला पडलेल्या त्यांच्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भरीस पाडण्यापेक्षा आपल्याला स्वत:च्या संदर्भातील प्रश्न उत्तम रीतीने सोडवता यायला हवेत. आयुष्याचे गणित दोन अधिक दोन चार या समीकरणाने नेहमीच सुटू शकत नाही. सुखाच्या बेरजेचे गणित आणि दु:खाची वजाबाकी यांचा चांगला ताळमेळ बसला तर किचकट प्रश्नही चांगल्या पद्धतीने हाताळता येतील. प्रश्नहीन आयुष्य जगणं माणसाला जरी शक्य नसलं तरी प्रश्नांच्या डोंगरात स्वत:चा आणि इतरांचा जीव घुसमटू देणं गरजेचं नाही. प्रश्नार्थकता माणसाला बऱ्याचदा साशंकतेप्रत घेऊन जाते. अचूक उत्तरे मिळवण्यासाठी माणसाला अनेक वेळा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 
या मर्त्यलोकात आपल्याला पडणाऱ्या असंख्य अनाकलनीय, गूढ, अगम्य प्रश्नांच्या अचूक उत्तरांची फाईल मात्र वरूनच अप्रूव्ह होऊन येत असते. शेवटी आपण केवळ प्रश्नांचे धनी असतो, उत्तराचा अधिकारी तो सर्वसाक्षी असतो. 

No comments:

Post a Comment