Tuesday 15 May 2012

नमस्कार वर्तनाला करायचा असतो, वयाला नव्हे !

आपल्याला लहानपणापासून घरातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा असे शिकवले जाते. यात गैर असे काहीच नाही परंतु माणसातील चांगुलपणाची, सभ्यतेची, वडिलकीची फुटपट्टी हे  त्याचे वय नसून त्याची वागणूक असते. वडीलधारयांपुढे नतमस्तक होण्याऐवजी अनेकदा त्यांच्या विचित्र वर्तनामुळे कोपरापासून हात टेकायची पाळी येते.  काही घटना घडतात आणि मग प्रश्न पडतो, यांना आपण वडीलधारे म्हणायचे? यांचा आपण का म्हणून आदर करायचा? यांच्या कोणत्या वर्तनाबद्दल यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे? 
माझी आत्या व माझे बाबा दोघेही लहान असतानाची एक गोष्ट. आत्यानेच सांगितलेली. आमच्या घरी अनेक पाहुण्यांचा सतत राबता असायचा. माझ्या बाबांचे मामा आणि मामी काही कामानिमित्त बऱ्याचदा घरी येत असत. बाबा आणि आत्या खेळण्याच्या वयातले. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मामा-मामी याला त्याला द्यायला अनेकदा मिठाईचे पुडे आणत. लहान मुलांना खाऊचे आणि भेटवस्तूंचे किती आकर्षण असते हे कुणाला सांगायची गरज नाही. त्या मिठाईच्या पुढ्यातील थोडीशी मिठाई आत्या आणि बाबांच्या हातावर त्यांनी कधीच ठेवली नाही. ना ती आमच्या घरी कधी आली. माझ्या आत्याला आणि बाबांना या गोष्टीचे आश्चर्यही वाटायचे आणि वाईटही वाटायचे. मला जेव्हा हे तिने सांगितले तेव्हा खूपच विचित्र आणि वाईट वाटले. ज्यांच्या घरी आपण राहण्यासाठी उतरतो त्या घरच्या आपल्याच छोट्या भाचरांना थोडा खाऊ द्यावासा वाटू नये?  हे कसले वर्तन? आणि अशी माणसे मात्र इतरांनी त्यांना यथोचित मान द्यायला हवा यासाठी आग्रही असतात. 
ज्येष्ठ नागरिक म्हणून एखाद्याला मान द्यायला जावा तर त्याची नजर गिधाडाची असते. मला एकदा एका ओळखीच्या आणि चांगल्या कुटुंबातील ज्येष्ठाने धीटपणे विचारले, काय हो तुमचे यजमान घरी कधी नसतात ते सांगा. त्यावेळेस मी तुमच्याशी गप्पा मारायला येईन. त्यावर मी ताबडतोब म्हणाले, तुमच्याशी गप्पा मारण्याकरता माझ्याकडे अजिबात फावला वेळ नाही त्यामुळे कधी गप्पा मारायच्या असतील तर शनिवार-रविवार जरूर या आणि यांच्याशी मारा. माझ्या सुदैवाने तो शनिवार आणि रविवार कधी उजाडलाच नाही. अशा लोकांना वडीलधारे मुळातच का म्हणायचे? 
माझ्या परिचयातील एक वयस्कर बाई कधीही भेटल्या की नुसत्या नजरेने मापत राहतात. आकारमान बरंच वाढलंय असा त्यांचा शेरा ऐकण्याचे भाग्य माझ्या वाट्याला अनेक वेळा आले आहे. वास्तविक पाहता कोण जाडे, कोण बारीक, कोण पोटाकडून किती सुटलेले, कोणाची कंबर कशी या डीटेल्समधून पृच्छा करणाऱ्यांना काय साधता येतं?  आपण कधीतरी रस्त्यात घटका-दोन घटका भेटतो त्याचे प्रयोजन काय शारीरिक मूल्यमापन असावे?  आपल्या जाड-बारीक होण्याने दुसऱ्याच्या आयुष्यात काही उलथापालथ खासच होणार नसते. पण काही ज्येष्ठ बायका अशा पृच्छकाची भूमिका  मोठ्या इमाने-इतबारे पार पाडत असतात.  
सून लग्न करून घरात आली रे आली की सासूचा वॉचमन होतो. सुनेवर सतत पहारा करणे हेच आद्यकर्तव्य होऊन बसते. तिची हालचाल, बोलाचाल, तिचे नवऱ्याशी गुलुगुलू बोलणे, जवळीक साधणे, घरात वावरणे डोळ्यांत प्राण आणून सासू बघू लागते. नवविवाहितेला कसे वागवू नये याचा वस्तुपाठ म्हणजे ह्या सासूचे वर्तन असते. तिला घालूनपाडून बोलणे, तिच्या माहेरच्यांचा उद्धार करणे, ती नोकरी करत नसेल तर तिच्याकडे रद्दीच्या भावाने बघणे, तिच्यावर गृहकृत्याच्या सूचनांचा भडीमार करणे ह्या गोष्टींना मग उत येतो. बहुतेक वेळेस सासरा चांगला असला तरी त्याच्या बायको विरुद्ध जायची त्याची हिम्मत नसते आणि जर तो बेरकी निघाला तर मग आगीत तेल घालण्याचे सत्कार्य तो नित्यनेमाने करत राहतो. अशा महाभागांना कोणत्या कारणास्तव आदरणीय लोकांच्या यादीत गणायचे? त्यांना नमस्कार का करायचा? जगात अशाही काही सासवा आहेत की ज्या सुनेला तिच्या नावाने हाक न मारता अर्वाच्य शब्दाने तिला संबोधतात. 

वय आणि परिपक्वता, प्रगल्भता याचा यत्किंचितही संबंध नाही. एखादे मूल लहान वयातच विचाराने प्रगल्भ होते, समंजस होते. इतरांशी कशा पद्धतीने वागावे हे त्याला अथवा तिला नीट कळते. पण साठी-सत्तरी पार केलेल्या बायका आणि पुरुष त्यांच्या वयाला अशोभनीय असे वर्तन करतात. त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नात मुलीच्या आई-वडिलांकडून अवास्तव मागण्या करतात. ऐन लग्नात, मंडपात रुसून बसतात. मानपानासाठी अडवणूक करतात. मुलगा-सुनेच्या नात्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अशा वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल याची त्यांना जराही पर्वा नसते.
सगळेच वडीलधारे असे वागत नाहीत. काही अनिष्ट घटनांमुळे, आयुष्यातील विचित्र, तापदायक अनुभवांमुळे त्यांचे मन कडवट झालेले असते हे मान्य. पण आपल्या अनुभवांच्या शिदोरीतून ते शिकत मात्र काहीच नाहीत. समंजसतेने नात्यातील तिढा सोडवण्याऐवजी ते नात्यांतील गुंतागुंतच अधिक वाढवतात. यातील किती वडीलधारे खरोखर वयाने लहानांना आशीर्वाद देण्यास योग्य असतात ही एक संशोधनाचीच बाब आहे. 
कोण चांगले, कोण वाईट हा उहापोह इथे मला करायचा नाही. पण वयाने मोठा असलेलाच जर आपली पायरी विसरला, आपल्या अनुभवाने शहाणा झाला नाही, परिपक्व झाला नाही तर वयाने लहान असलेल्याला कोणताही उपदेश करायला, सल्ला द्यायला लायक कसा ठरणार? सभ्यतेच्या, सुसंस्कृततेच्या मर्यादांचे उल्लंघन करणारा ज्येष्ठ नागरिक नमस्कारास कसा पात्र ठरणार? 
रामायणातील दाखला देताना मी असे म्हणेन, रामापेक्षा रावण वयाने ज्येष्ठ होता पण त्याने सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्याने तो वर्तनाने रामापेक्षा खुजा झाला. रामाने स्वकर्तृत्वाने रावणातील असुर प्रवृत्तीचा नाश केला पण मरणोत्तर रावणाच्या शरीराला, त्याच्या वयाला , त्याच्या ज्येष्ठत्वाला त्याने नमन केले. आपल्याकडून ब्राह्मणहत्येचे पातक घडले म्हणून त्याने प्रायश्चित्तही घेतले. रामाच्या या सुशील वर्तणुकीमुळे तो वंदनीय ठरतो. 
सभ्य,सुसंस्कृत, परिपक्व वर्तन करणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीस माझा नमस्कार आणि  नीच, असंस्कृत, अशोभनीय, अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीचा माझ्याकडून धि:कार! 
 शेवटी हे म्हणावेसे वाटते,  'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती' , मग ते लहान मूल असेना का!

No comments:

Post a Comment