Tuesday 22 May 2012

सूडाचा प्रवास

भारत हा तरुणांची संख्या सर्वात अधिक असलेला देश आहे. हा तरुण वर्ग वेगवेगळ्या आर्थिक तसेच सामाजिक स्तरातील आहे. प्रत्येक तरुणाची जडण-घडण, शारीरिक क्षमता, वैचारिक क्षमता वेगळी आहे. या समस्त तरुणाईने स्वत:ची उर्जा विधायक कामासाठी खर्च करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. कारण ही उर्जा, ही शक्ती जर चांगल्या कामांकडे योग्य वेळीच वळवली गेली नाही तर ह्या उर्जेचा दुरुपयोग समाजविघातक कृत्यांसाठी होण्याची शक्यता जास्त बळावणार आहे. 
मुलगा किंवा मुलगी वयात येते आणि त्यांचा सामाजिक परीघ विस्तारतो. नवनवे मित्र-मैत्रिणी त्यांच्या दैनंदिन जीवनात सामील होत असतात. संगतीचा सु-परिणाम वा दुष्परिणाम होत राहतो. अनेक मुलांचे आई-वडील नोकरीनिमित्ताने संपूर्ण दिवस बाहेर असतात. प्रत्येकाच्या घरी आजी-आजोबा किंवा इतर जबाबदार नातेवाईक असतातच असे नाही. त्यामुळे आपला मुलगा वा मुलगी शाळेव्यतिरिक्त काय करतात, कोठे जातात, त्यांचे मित्र-मैत्रिणी नक्की कोण आहेत याविषयी आई-वडील पूर्णपणे अनभिज्ञ असतात. आपण मुलाकडे आपल्या नोकरीमुळे जातीने लक्ष देऊ शकत नाही या  अपराधी भावनेमुळे हे पालक त्याची भरपाई म्हणून मूल मागेल ते देतात जराही पुढचा-मागचा  विचार न करता! महागड्या वस्तू मुलांच्या झोळीत सहजगत्या पडत राहतात. वयाप्रमाणे मुलांच्या गरजाही रुंदावतात. चैनीचे, सुखासीन आयुष्य जगण्याची सवय होते. उंची हॉटेले, सिगारेट्स, दारू, गर्लफ्रेंड्स, पब्ज, वाहने या गोष्टी त्यांचे आयुष्य व्यापून टाकतात. केवळ हेच सुखाचे समीकरण आहे असे वाटायला लागते. विस्तारणाऱ्या सामाजिक वर्तुळात उच्चभ्रू समकालीनांची ओळख वाढत जाते. संदर्भ बदलतात, दृष्टीकोन बदलतात. ड्रग्जसेवनाविषयी विषयी औत्सुक्य वाटू लागते. आपणही असे एखादे थ्रील करावे म्हणून एखादा झुरका मारला जातो जो आपल्या संपूर्ण भविष्याला ग्रासायला पुरेसा ठरतो.   
मुलामुलींचे ग्रुप्स तयार होतात. बऱ्याचवेळा वैयक्तिक आवडीनिवडी, जातीय अथवा आर्थिक निकषांवर हे ग्रुप्स निर्माण होतात. शाळा, कोचिंग क्लासेस इथेही हेच ग्रुप्स वावरत असतात. आज बहुतेक शाळांमध्ये 'मार्क' हेच एकमेव उद्दिष्ट असल्या कारणाने शाळा, क्लास मधील शिक्षक मुलांच्या वा मुलींच्या ह्या इतर, अवांतर गुणांकडे दुर्लक्ष करतात. पालक अर्थार्जनात गुंतलेले, शिक्षक मार्कांच्या शर्यतीत गुंतलेले त्यामुळे शाळा आणि क्लास अटेंड केल्यानंतर ही मुले काय करतात, कुठे जातात या गोष्टीचे त्यांना सुतरामही ज्ञान असण्याची शक्यता नसते. 
एखाद्या सुंदर मुलीवरून मुलांच्या ग्रुप्समध्ये सातत्याने भांडणे होत राहतात. ह्या मुलीला प्राप्त करण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका लागते. प्रश्न प्रतिष्ठेचा होतो. त्या मुलीच्या मनातील विचार जाणून घेण्याचा मूर्खपणा कोणी करत नाही. आपल्याला ती मुलगी हवी या एकाच विचाराने या दोन्ही ग्रुप्सचे म्होरके झपाटून जातात. मग एकमेकांचा पाणउतारा करणे, अर्वाच्य बोलणे, घरच्यांचा उद्धार करणे रीतसर सुरु होते. त्या मुलीवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते. दोन्ही ग्रुप्समध्ये द्वेषभावना जागृत होऊ लागते. कुरघोड्यांना अंत राहत नाही. अखेरीस एका ग्रुपलीडरला दुसऱ्याकडून चारचौघांसमोर थोबाडीत बसते. त्याची सगळ्यांसमोर बदनामी होते. छी थू होते. अपमानाचा घाव वर्मी बसतो आणि दुसऱ्या ग्रुपलीडरला संपवण्याचे प्लानिंग सुरु होते. रात्रीच्या वेळी समेटाच्या गोष्टी बोलण्यासाठी म्हणून दुसऱ्या ग्रुपला पाचारण केले जाते. ऐन वेळी बाईकमध्ये लपवलेल्या हॉकी स्टिक्स बाहेर येतात आणि अतिशय निघृणपणे त्यांची टाळकी फोडली जातात. ग्रुपलीडर जागीच गतप्राण होतो आणि बाकीचे गंभीर जखमी होतात. हिंसक प्रवृत्तींचा विजय होतो.
आजच्या तरुण पिढीच्या विचारांचे इतके भयंकर चित्र बघून अंगावर शहारा उभा राहतो. ही काही कुणा कथाकाराची कल्पना नाही तर एक ज्वलंत वास्तव आहे. अशा पद्धतीची सुडाची भावना विकसित होण्यास काही माध्यमेही अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत. खंडणी मिळवण्यासाठी मित्राला किंवा मैत्रिणीला पळवणे व नंतर त्याची वा तिची हत्या करणे, मुलीवर सामुहिक बलात्कार करणे, मुलीने नकार दिला असता तिला विद्रूप करणे, पैशांसाठी, मालमत्तेसाठी जिवलग नातलगाचा खून करणे ह्या घटना गेल्या काही वर्षात जास्त प्रमाणात वाढीस लागल्या आहेत. टी.व्हीवर नको ती दृश्ये पाहून मनाच्या कप्प्यात बंदिस्त करणे, संगणकावर हिंस्त्र खेळ खेळणे, बोलण्यात, वागण्यात अवाजवी आक्रमकता दाखवणे, पालकांनी, शिक्षकांनी केलेल्या शिक्षेचा राग मनात धरणे आणि सूडबुद्धीने वागणे दिवसेंदिवस बोकाळत चालले आहे.     
आम्ही शाळेत असताना 'मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती' अशा घोषणा देत असू. याच संपत्तीला आता आर्थिक आणि वैषयिक कीड पोखरू लागली आहे. मुलांकडे होणारे पालकांचे दुर्लक्ष, एकटेपणा, हातात नको तेवढा खूळखूळणारा पैसा, चुकीची संगत, शिक्षकांचे मूल्याधिष्ठीत नाही तर मार्काधिष्ठीत शिकवणे यामुळे या राष्ट्रीय संपत्तीचे यथायोग्य जतन केले जात नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नितीमत्ता, शील, चारित्र्य हे शब्द कालबाह्य झाले आहेत. ज्याला त्याला लवकरात लवकर करोडपती व्हायचे आहे. कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा, मालमत्ता आणि छोकरी हासील करायची आहे. त्यासाठी आप्तांचे रक्त सांडायचीही त्यांची तयारी आहे. मित्र-मैत्रिणींची शकले करायचीही त्यांची तयारी आहे. सूडभावनेची रुजवात तरुणाईच्या मनात कधीचीच झाली आहे. आपल्याला मिळालेल्या संस्कारांची नाळ त्यांनी स्वहस्ते तोडली आहे. 
प्रत्येक देशाच्या विकासाची भिस्त तरुण पिढीवर असते. ह्या तरुणाईतूनच उद्या राष्ट्राला सक्षम नेतृत्व मिळणार असते. त्यांच्या सु-संस्कृत आचार -विचारांतूनच अनेक भावी पिढ्या उदयाला येणार असतात. देशाचे आर्थिक, वैचारिक, नैतिक स्तर उन्नत होणार असतात. गरिबी, विषमता, बेरोजगारी, निरक्षरता, जातीयवाद ह्या गोष्टी हद्दपार होणार असतात. उत्तम मूल्यांची कास धरून देश प्रगतीपथावर वाटचाल करणार असतो. पण उत्तम आचार-विचारहीन, चारित्र्यहीन, संस्कारशून्य, भोगवाद-चंगळवाद याला चटावलेली ही तरुणाई या देशापुढे कोणता आदर्श निर्माण करणार याचा विचार करण्याची आज गरज आहे.     
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जनोद्धारासाठी, समाजकल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून अरुपाचे रूप दाखवले. आज मानवी रूपातील भेसूरता अधोरेखित करणाऱ्या तरुणांनी ज्ञानेश्वरीतील विचारांचा सहस्त्रांश तरी स्वत:त रुजवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 

2 comments:

  1. हे वास्तव सर्वांना माहित असूनही अपवाद वगळता इतर सर्व जणांनी शहामृगा प्रमाणे वाळू मध्ये आप-आपली डोकी पुरून घेतली आहेत त्याला कोण काय करणार? कोणत्याही मार्गाने, लौकरात लौकर आणि भरपूर - (शक्य असल्यास, संधी मिळाल्यास, अगणित) संपत्ती मिळविणे म्हणजेच यशस्वी होणे हि मानसिकता बदलण्यासाठी जो पर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत तो पर्यंत कठीण आहे!

    ReplyDelete