Wednesday 23 May 2012

स्वातंत्र्य आणि स्त्री - एक चिकित्सा

स्त्रियांवर होणारे अनन्वित अत्याचार पाहता आज या कलियुगातही पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व पावलोपावली जाणवते. अत्याचार शारीरिक असो वा मानसिक, त्याचे व्रण आजन्म पुसले जात नाहीत. लहान कोवळ्या मुलींवर शारीरिक जबरदस्ती करणे, त्यांच्याकडून त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त कामे करून घेणे, आहार आणि शिक्षणाच्या बाबतीत मुलामुलीत भेदभाव करणे, मुलींच्या मर्जीविरुद्ध त्यांची लग्ने लावणे वा त्यांना विकणे, हुंड्यासाठी मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, प्रसंगी तिचा जीव घेणे अथवा तिला आत्महत्त्या करावयास भाग पाडणे हे प्रकार प्रगतीपथावर असलेल्या भारत देशात आजही सर्रास घडत असतात याचा खेद वाटतो. 
आज भारताला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्षे लोटली तरीही स्त्रियांना मिळणारे स्वातंत्र्य अतिशय संकुचित आहे. अनेक स्त्रिया अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. जिथे दोन वेळेच्या खाण्यापिण्याची भ्रांत आहे तिथे शिक्षणाची गोष्ट तर चार हात लांबच आहे. या देशातील अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याने आर्थिक दृष्ट्या परावलंबी असणाऱ्या स्त्रियाच संख्येने जास्त आहेत. अजूनही 'चूल आणि मूल' या चाकोरीतून बाहेर पडून स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्या स्त्रिया मोजक्याच आहेत. शिक्षण नाही. नोकरी नाही. कमाई नाही. अशा परिस्थितीत पडतील ती कामे करून दोन घास कसेबसे गिळणाऱ्या आणि नवऱ्याचे अत्याचार निमुटपणे सहन करणाऱ्या स्त्रिया संखेने खूप आहेत. 
एका गोष्टीचे मात्र खरोखर आश्चर्य वाटते की शहरी भागातील स्त्री ग्रामीण भागातील स्त्रीपेक्षा सुशिक्षित, कमावती असूनही तिच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत. बऱ्याच सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांच्या घरात स्त्रीला मात्र समान दर्जा दिला जात नाही, अधिकार दिले जात नाहीत. घरातील लहानसहान गोष्टींसाठीही तिला घरातील कर्त्या म्हणवणारया पुरुषावर अवलंबून राहावे लागते. घरखरेदी, फर्निचर, विद्युत उपकरणे, बँक व्यवहार आदींच्या बाबतीत तिचे मत ग्राह्य धरले जात नाही. एखादी वस्तू आवडली तरी ती खरेदी करण्यासाठी तिला तिच्या अहोंची परवानगी घ्यावी लागते.कामावरून थकूनभागून आलेल्या पुरुषाला घरी आल्यानंतर विसावण्याची, पेपर वाचनाची, टी.व्ही. बघण्याची मुभा असते पण कामावरून आलेली स्त्री मात्र घरी आल्या आल्या स्वयंपाकघरात शिरते. चहा करते, खाण्याचा पदार्थ करते आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागते. मुलांचा अभ्यास घेण्याची जबाबदारीही तिलाच पार पाडावी लागते. रात्री बिछाने घालून तिचे दमलेले शरीर झोपेच्या आधीन होण्याआधी पतीच्या स्वाधीनही करावेच लागते. दुसऱ्या दिवशी सकाळची कामाची लगबगही तिच्या माथी लिहिलेली असते. कुठे आहे स्त्री-पुरुष समानता? स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळत नसते तर ते प्राप्त करून घ्यावे लागते हा धडा आपण इतिहासातून शिकलोच आहोत. तेव्हा स्त्रियांना स्वातंत्र्य, अधिकार, दर्जा, समानता ह्या गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी प्रयत्नही त्यांनीच करायला हवेत. 
इथे स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असा अभिप्रेत नाही. मी सोदाहरण सांगते. घरातील कोणती कामे मी करणार हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीला हवा. ती जरी एखाद्याची पत्नी आहे, सून आहे, मुलगी आहे किंवा आई आहे तरीही ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचा विसर इतरांना पडता कामा नये. तिच्या स्वत:च्या इच्छांना, आकांक्षांना तिलांजली देत तिने इतरांची मर्जी सांभाळणे अजिबात बंधनकारक नाही. तिला सदासदैव गृहीत धरणे हे अतिशय चुकीचे आहे. तिच्यावर मालकी हक्क गाजवणे हा अक्षम्य गुन्हा आहे. 
स्त्रियांनीही त्यांची मुळमुळीत, कचखाऊ वृत्ती सोडायला हवी. सर्वप्रथम तिचा आर्थिक पाया भक्कम हवा. नवरा कितीही पगार घेत असू दे, तिने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. साड्या नेसायच्या की ड्रेसेस घालायचे, कोणते दागिने अंगावर घालायचे याचा निर्णय तिनेच घ्यायला हवा. आपल्या पगारातील किती हिस्सा घरखर्चासाठी द्यायचा हा ही निर्णय सर्वस्वी तिचाच असायला हवा. काही कामांच्या समान वाटण्या होणे गरजेचे आहे आणि स्त्रीच्या स्वास्थ्यासाठी ते हितकरही आहे. तिला काही नवीन शिकवायचे असल्यास त्यासाठी इतरांच्या परवानगीची तिच्यावर सक्ती असता कामा नये. लग्न झालेल्या स्त्रीचे सगळे आयुष्य फक्त नवऱ्यासाठी, मुलांसाठी आणि सासरच्यांसाठी असते ही व्याख्या बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तिचे आयुष्य तिच्या स्वत:साठीही तितकेच महत्वपूर्ण असते हे इतरांनी समजायला हवे. तिच्या वैयक्तिक आवडीनिवडी, छंद तिने जपायला आणि जोपासायला हवेत. घर आणि ऑफिस याभोवती एकवटलेले तिचे विश्व तिने स्वत:हूनच व्यापक करायला हवे. मित्र-मैत्रिणींबरोबर  संवाद, सहली घडायला हव्यात. घराच्या जबाबदाऱ्यांची योग्य वाटणी झाल्यानंतर तिच्या वाटणीला पुरेसा वेळ यायला हवा.   
तिच्या मतांचा घरच्यांनी आदर करणे गरजेचे आहे. काही बाबतीत मतभेद असू शकतील पण तिच्या विचारांची कदर करता यायला हवी. लहान मुले ही सर्वसाधारण मोठ्यांचे अनुकरण करत असतात. आपले आजी-आजोबा, काका-आत्या, बाबा आईला मान देत नाहीत, तिला वाट्टेल ते बोलतात हे मुले पाहतात. आई असल्याने मुले तिच्याविषयी हळवी होऊ शकतात पण ही मुले पुढे स्वत:च्या पत्नीशी अशीच कशावरून वागणार नाहीत? काही मुले तर आईचा सदैव अपमान करत असतात. तिला, तिच्या मतांना, विचारांना तुच्छ लेखतात. त्यांच्या वडिलांच्या आचरणाने ती प्रभावित झालेली असतात. किंबहुना असे वागणे म्हणजेच योग्य वागणे अशी त्यांची धारणा होते. 
बऱ्याच वेळा स्त्रीच्या गुणांचा उल्लेख फक्त तिच्या पाककलेसंदर्भातच होत असतो. म्हणजे माझी बायको स्वयंपाक छान करते, तिला वेगवेगळ्या डिशेश बनवता येतात, ती नॉन-व्हेज जेवण उत्तम करते इत्यादी. ह्या स्तुतीसुमनांमागे तिचा सीमित परिघही अधोरेखित होत असतो. त्यामुळे तिचे इतर क्षेत्रातील गुण सहसा इतरांसमोर प्रदर्शित होत नाहीत. विवाह इच्छुक स्त्रीने गृहकृत्यदक्ष असावे असा मुलाकडच्यांचा आग्रह असतो. पण आपल्या मुलानेही घरी येणाऱ्या सुनेच्या गृहकृत्यांचा काही भार उचलावा असे किती जणांना मनापासून वाटते? त्याच्या व्यावसायिक कर्तृत्वाचे कौतुक जळी-स्थळी होत असते पण तिला मिळालेल्या प्रमोशनमुळे किती नवरे खरोखरीच सुखावतात? ही संशोधनाची बाब आहे. 
घरचे काम संपवून ती जरा टेकते. तिला टी.व्ही. बघावासा वाटतो पण तिच्या हातात रिमोट कंट्रोल देणे हे बऱ्याच नवरोबांना कमीपणाचे वाटते. मी जे बघतो आहे ते तिनेही निमूटपणे बघावे असे त्यांना वाटते. तिच्या हातात शेवटपर्यंत रिमोट येत नाही आणि ती कंटाळून आत निघून जाते. बिछाने घालून पुस्तक वाचत पडते. टी.व्ही. बघून नवऱ्याचे मन भरले की तोही आत येतो. तिच्या पुस्तक वाचनाची पर्वा न करता दिवा मालवतो आणि तिला जवळ ओढतो एखादी हक्काची वस्तू ओढावी तशी. ती आतल्या आत स्फुंदत राहते. धगधगत राहते. घुसमटत राहते. 
ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे. स्त्रियांनीच. आपले महत्व इतरांच्या लक्षात येत नसेल तर ते त्यांच्या सोयीस्कर बुद्धीला जाणवून देता आले पाहिजे. आपल्यासाठी आदराचे स्थान आपल्यालाच निर्माण करता यायला हवे. आपल्या स्वातंत्र्याची, आपल्या अधिकारांची जपणूकही आपल्यालाच करता यायला हवी. तरच उद्याचे अमर्याद आकाश एका सन्मान्य स्त्रीचे असेल! 

No comments:

Post a Comment