Wednesday 31 December 2014

नाना -एक विलक्षण रसायन

नाना हे एक अजब रसायन आहे. त्याला प्रेम करणारा रागीट माणूस म्हणावा की रागावणारा प्रेमळ माणूस हे समजत नाही. त्याच्याविषयी खूप कुतुहल वाटतं. इतर कलाकारांचा यथायोग्य आदर राखून असे म्हणता येईल की तो पडद्यावर असता त्याच्या इतकी दुसरी कोणतीही व्यक्ती प्रेक्षणीय वाटू शकत नाही. वास्तविक पाहता तो हिरोच्या कोणत्याच व्याख्येत चपखल बसत नाही. एक उंची सोडली तर त्याचे दिसणे हे सो-कॉल्ड सौंदर्याच्या कक्षेबाहेरचे असूनही त्याचे अस्तित्व हेच बघणाऱ्याला मुग्ध करणारे असते. आज साठी ओलांडून चार वर्षे उलटल्यानंतरही तो अनेक तरुणांना त्यांचा 'रोल मॉडेल' वाटतो.   
छबिलदास शाळेत तेव्हा 'पाहिजे जातीचे' या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग चालू होता. विहंग नायक, नाना पाटेकर आणि इतर काही पात्रे हा प्रयोग सादर करत होती. त्यात माझी आत्या शरयू भोपटकर ही सुद्धा होती. तेव्हा प्रथम नाना पाटेकर ह्यांना मी स्टेजवर बघितलं. एक वर्णाने सावळा शिडशिडीत तरुण एवढीच त्यांची त्यावेळेस ओळख होती. या नाटकात शेवटी चुकीच्या व्यक्तीला म्हणजेच माझ्या आत्याला घोंगड लपेटून पळवून आणतात असा काहीसा प्रसंग होता. हे नाटक मी बऱ्याचदा पाहायला जायचे.  नाना तेव्हा माझ्या आत्याला म्हणायचा, अगं बाई तुझं वजन कमी कर. तुला उचलताना माझा हात दुखून येतो. नानाच्या प्रहार या चित्रपटातही एक छोटीशी भूमिका आत्याने केली होती. त्यामुळे एक कलाकार म्हणून नानाला अगदी जवळून बघण्याची संधी त्यावेळेस मला मिळाली होती. अर्थात त्या वेळेस मी हे सगळे बालसुलभ दृष्टीकोनातून अनुभवले होते.      
नानाचे घर माहीमला असल्याने आणि आम्ही सुद्धा माहीमलाच राहत असल्याने नानाच्या घरच्या गणपतीला मला आत्या घेऊन जात असे. नाना कमर्शिअल आर्टीस्ट आहे. तो रोज फुलांची वेगवेगळी सजावट करतो. ती बघण्यासाठी खूप गर्दी असते वगैरे माहिती आत्याकडून कळली होती. काही वेळेस नानाचे दर्शन व्हायचे. आलीस का बाई, ये ये बस असे स्वागत व्हायचे. नानाकडे कोणतीही औपचारिकता नसायची. आत्याला तो बाई असेच म्हणायचा.          
नानाचा लहरी,विक्षिप्त स्वभाव, त्याचे रागावणे,तिरकस बोलणे, कसलाही विधिनिषेध न बाळगणे या विषयी नाट्य-चित्रपट वर्तुळात बोलले जायचे. त्याला भिणारेच जास्त असावेत. तो सेटवर असला की इतर कलाकारांची धाबी दणाणतात हेही ऐकले होते. इतका दबदबा असूनही त्याच्या विषयीचे कुतूहल कधी शमले नाही. त्याचे अनेक चित्रपट बघितले. माफीचा साक्षीदार या चित्रपटात दुसऱ्याच्या गळ्याभोवती फास आवळताना त्याच्या चेहऱ्यावर होणारे विकृत बदल मनाचा थरकाप उडवून गेले. परिंदा मधील त्याची खलनायकी भूमिका बघताना अंगावर शहारे येत होते. क्रांतिवीर मधला क्रांतीची मशाल प्रत्येकाच्या मनात पेटवू पाहणारा नाना मनाला एकदम भावून गेला. त्याची संवादफेक , त्याची सारखी डोक्याला हात लावून बडबड करण्याची लकब, त्याचे उपहासपूर्ण विकट हास्य ज्याच्या त्याच्या मनात ठाण मांडून बसलं. नाना जसा चित्रपटात दिसतो तसाच प्रत्यक्षातही असावा ही कल्पना दृढ व्हायला नानाचे रांगडे व काहीसे राकट वाटणारे व्यक्तिमत्वसुद्धा कारणीभूत होतेच की ! 
पण मग कालांतराने ग्रेट भेट मध्ये नानाला पहिले ते थेट शेतकऱ्याच्या वेशात. बैलाच्या अवतीभवती वावरणारा नाना, विहिरीचे पाणी काढणारा नाना बघताना एक वेगळीच अनुभूती येत होती. बऱ्याच कालखंडानंतर पडद्याबाहेर घडलेले नानाचे हे दर्शन त्याच्यातील संवेदनशील माणसाची साक्ष देत होते. हिरोंना आपली इमेज टिकवण्यासाठी  विशेषत: उतारवय झाल्यावर जो काही आटापिटा करावा लागतो त्याची पुसटशी जाणीवही नानाच्या चेहऱ्यावर नव्हती. त्यावेळचा नाना काही वेगळाच भासला. आपला धर्म चार भिंतीतच राहू द्यावा हे ठासून सांगणारा नाना सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारा वाटला.       
अगदी अलीकडे 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर अवतरलेला नाना पुन्हा एकदा मनातील जाणीवा समृद्ध करून गेला. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या उभयतांचे अजोड कर्तृत्व समृद्धी पोरे ह्यांनी पडद्यावर नाना आणि सोनाली ह्या कलाकार द्वयीला घेऊन साकारलं आणि एक सर्वस्वी वेगळा असा नाना सगळ्यांना पाहायला मिळाला. अत्यंत मृदू, हळवे, वात्सल्याचे आगर असलेले डॉ.प्रकाश बाबा आमटे नानाने तितक्याच सहज सुदरतेने साकारले. नानाच्या मूळच्या स्वभावाशी म्हणा किंवा नानाने आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांशी फारकत घेणारी ही भूमिका होती. एका बाईच्या प्रसूतीसमयी  अडचण उद्भवल्याने बाळाचा तोडायला लागलेला हात आणि यामुळे कमालीचे व्यथित झालेले डॉक्टर ही जाणीव नाना प्रत्यक्ष जगला. नेगल गेल्यानंतरचा नानाचा शोक सुद्धा असाच अनेकांच्या काळजाला घरे पडून गेला. इतके संयत,संतुलित आणि स्वीकारलेलं आयुष्य सुंदर करून जगणारे आणि इतरांच्या जगण्याला निमित्त ठरणारे डॉ.प्रकाश आमटे नानाच्या अभिनयातून आणखी जास्त उमगले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.            
बोटे नुसती मतदान करून शाई लावून घेण्यापुरतीच पुढे करायची नाहीत तर वेळप्रसंगी बोटांचे खंजीरही करता यायला हवेत अशी एक जाज्वल्य जाणीव उरात घेऊन फिरणारा नाना उद्या १ जानेवारी रोजी अजून एका वर्षाने मोठा  होणार आहे. त्याची ही वाटचाल आणखी अनेक सुंदर टप्पे गाठू दे आणि समाजाला प्रेरणा देत राहूदे हीच सदिच्छा!   

No comments:

Post a Comment