Monday 12 January 2015

लोकमान्यांस पत्र …….



अहो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे तुमचे बाणेदार उद्गार स्वातंत्र्योत्तर काळात केव्हाच विरून गेले आहेत. स्व-राज्य याचा अर्थ माझे राज्य म्हणजेच माझा आत्मसन्मान अबाधित ठेवणारे आणि माझा मुलभूत हक्क मला प्राप्त करून देणारे राज्य आता राहिलेच आहे कुठे? जगाच्या नकाशावर भले भारताची प्रगती दिसत असेल पण भारतीयाच्या मनाच्या नकाशावर ह्या वैचारिक प्रगतीचे पुसटसे प्रतिबिंब तरी आज दिसते आहे का? कुठे राहिला आहे देशाभिमान? कुठे राहिला आहे अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून लढण्याचा बाणा ? का इंग्रज गेले तसे हे लढाऊपणाचे, कणखरतेचे ओजही संपुष्टात आले? अन्यायाला वाचा फोडण्याचे आत्मबळ नष्ट झाले?
तुमच्या गणेशोत्सव सुरु करण्याच्या उद्दिष्टाला आज एक विकृत स्वरूप येऊ पाहते आहे. लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि समस्त हिंदुबांधवांच्या एकजुटीची भक्कम मोळी ब्रिटीश सरकारविरुद्ध तयार करण्यासाठी तुम्ही गणेशोत्सव सुरु केलात खरा पण आज गल्लोगल्लीतील गणेशभक्त आपापली फौज तयार करून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकत उभे आहेत. अत्यंत बीभत्स आणि हीन दर्जाच्या नाचगाण्यांनी गणेशोत्सव साजरे होत आहेत. गणपती विसर्जित झाल्याझाल्या दारूच्या गुत्त्याकडे 'गणेशभक्त' म्हणवून घेणाऱ्यांचे पाय वळत आहेत. एखाद्या पवित्र उत्सवाला आलेले असे बाजारू स्वरूप म्हणजे तो उत्सव सुरु करण्यामागील भावनेची विटंबना नव्हे काय?
तुम्ही मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलेत. आज या गीतेभोवती अनेक राजकीय रहस्ये फिरू लागली आहेत. त्या गीतेतील भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाशी कोणालाही काही सोयरसुतक नाही पण त्या ग्रंथाचे भांडवल करून आपापली राजकीय कारकीर्द सशक्त करण्याचा प्रयत्न काही महाभागांनी चालविला आहे. 'मा फलेषु कदाचन' या वाक्याशी कोणालाच देणेघेणे नाही उलट जितके फळ मिळण्याची शक्यता आहे त्याच हिशोबात कर्म करायचे अशी बहुतांश लोकांची मनोधारणा होत चालली आहे.      
स्वदेशी गोष्टींचे महत्व तुम्ही त्यावेळेस लोकांना पटवून दिलेत पण आता या स्व-देशातील मातीचा गंधच मुळी अनेकांना नकोसा होत चालला आहे. आपली आर्थिक स्थिती जास्तीत जास्त वृद्धिंगत करण्यासाठी परदेशवारी करणे हा मार्ग आज अनेकजण अवलंबत आहेत. या भारतात राहिलंय काय? असा सवाल ही अनेक मनांतून निनादतो आहे. आपल्या देशातील माहितीचा,ज्ञानाचा,तंत्रज्ञानाचा,विद्वत्तेचा कमाल उपयोग परदेशी कंपन्या करून घेत आहेत. जो तो परदेशात जायला आसुसलेला दिसतो आहे. विदेशी खाणे-पिणे, कपडेलत्ते,वस्तू, त्यांची संस्कृती यांना अंगीकारण्यात अनेक तरुणांना एक प्रकारची धन्यता वाटते आहे. त्यामुळे स्वदेशप्रेमाला घरघर लागल्यासारखी वाटते आहे. महत्वाकांक्षेची सरशी झाली आहे.   
तुमच्या मनात सदैव खदखदत असणारा ब्रिटीश सत्तेविरोधातील असंतोष तुम्ही लाखो-करोडो भारतवासीयांच्या मनात भाषणांतून, लेखनातून पेरलात. त्यातूनच अनेक क्रांतीवीरांचा जन्म झाला. आपल्या मातृभूमीची  विटंबना करणाऱ्यांचे परिपत्य  करण्याकरता हजारो देशभक्त तयार झाले. आपल्या प्राणापेक्षाही त्यांनी या देशाला जपले. आज अनेक माता -भगिनींची विटंबना राजरोसपणे सुरु आहे. अनेक स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत. अनेक कोवळ्या काळ्या कुस्करल्या जात आहेत. पण या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके सुद्धा नाहीत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना जन्माची अद्दल घडवणारे या भूतलावर तरी आहेत काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. सर्वत्र उदासीनता, अंगचोर वृत्ती बोकाळली आहे. कोणतीही न्यायालये अशा विकृतिची शीग गाठणाऱ्या जनावरांना शिक्षा देण्यासाठी खरोखर समर्थ आहेत का असा प्रश्न ओठांवर पुन्हा पुन्हा येतो आहे. असा असंतोषाचा लाव्हा जनमानसात पुनश्च वाहता होण्यासाठी टिळक तुम्ही परत एकदा अवतराल काय असा कळकळीचा प्रश्न विचारावासा वाटतो आहे.            
टिळक, तुमची तत्वे, तुमची मूल्ये,तुमचे संस्कार आजच्या पिढीवर व्हायला हवे आहेत. ती स्पृहा, ते पौरुष, ते स्फुल्लिंग आज समाजातून, देशातून लुप्त झाले आहे. त्या वैचारिक प्रखारतेच्या त्सुनामीत आज अनेक देशद्रोह्यांचे, समाजकंटकांचे इमले वाहून जायला हवे आहेत. अनेक वासनांध वृक्ष आज मुळासकट उन्मळून पडायला हवे आहेत, अनेक भ्रष्टाचारी हातांचे आज दहन व्हायला हवे आहे. देशप्रेमाची, राष्ट्रप्रेमाची ज्योत पुम्हा एकदा पेटती व्हायला हवी आहे. तरच आजच्या काळरात्रीतून उद्याचा उष:काल संभवनीय आहे.
टिळक तुम्ही पुन्हा या भूतलावर आपल्या मातृभूमीची मान आणि शान अबाधित ठेवण्यासाठी जन्म घ्याल का?          


No comments:

Post a Comment