Tuesday 16 December 2014

देवाला भेटताना ……


देवाला भेटायची तुमची तयारी पक्की असेल तर मंदिरात प्रवेश करायला हरकत नाही. परंतु या मंदिरात प्रवेश करताना अहंभावाच्या, द्वेषाच्या,वैमनस्याच्या, सूडाच्या चपला मात्र बाहेर काढाव्या लागतील. फक्त परोपकार, कल्याणाची दक्षिणा स्वीकारणारा हा देव आहे. असा हा देव कोणत्याही तथाकथित सोन्या-चांदीने मढवलेल्या  देव्हाऱ्यात वसत नाही तर आनंद,शांती,वात्सल्य,दया,विवेक अशा सदगुणांचा संतत अभिषेक होत असलेल्या मनाच्या पवित्र गाभाऱ्यात वसतो.     
शरीराला जखम झाली तर डॉक्टरांकडून मलमपट्टी करायची आणि मनाला जखम झाली की मादिरातल्या त्या वत्सलमूर्ती समोर झोळी पसरायची असा सरळ साधा हिशोब असतो माणसाचा! आपण सगळे रस्त्यावर उभारलेल्या मंदिरातल्या देवाचे दर्शन अनेकदा घेतो. शेंदराचे टिळे लावतो. प्रदक्षिणा घालतो. दानपेटीत भरघोस दक्षिणा घालतो. माझी सगळी कामे पार पडू देत म्हणून त्याच्या मिनतवाऱ्या करतो. लोटांगणे घालतो. यावेळी झालेल्या चुका पदरात घे पुढल्या वेळेस दक्षिणा वाढवीन असा करार ही करतो आणि तीर्थ घेऊन बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावरचे सात्विक भाव पुसून लोकांत वावरतानाचा मुखवटा सराईतपणे धारण करतो.  
लहानपणी आपण देवदेवतांच्या अनेक कथा-कहाण्या ऐकलेल्या असतात.  त्यातूनच आपली देव नामक संकल्पना दृढ झालेली असते. मारणारा तो राक्षस आणि तारणारा तो देव हे समीकरण मनात घट्ट झालेलं असतं. पण हे देव आणि दानव मानवी प्रवृत्तीतच दडलेले असतात ह्याचा उलगडा झाला तरी आपण ते स्वीकारत नाही. कारण आपण चुकलो तर बाहेरील मंदिरातल्या देवाला नोटांची लाच देणे सोपे असते पण मनातील देवाला चांगल्या वर्तणुकीची ग्वाही देणे कठीण असते. वाहत्या पवित्र गंगेत आपली वर्षभराची पापे धुवायची आणि बाहेर येताच पुन्हा पापे करायला मोकळे व्हायचे असा हा सारा मामला असतो.     
संत-महात्म्यांना निराकार निर्गुण देव दिसत होता. त्यांनी त्यांच्या सत्कर्मात तो शोधला होता पण सर्व सामान्यांना तो दिसत नसल्याने त्यांनी सगुण रूपातील देवाची स्थापना केली. त्याला वेगवेगळी नावे,रूपे आणि ठिकाणे दिली. त्या देव देवतांच्या भोवती अनेक रंजक कहाण्या गुंफल्या गेल्या. पुढे देवस्थाने हा एक व्यापाराचा अड्डा झाला.अमका देव नवसाला पावतो म्हटल्यावर तिथे भाविकांचे लोंढे येउन धडकू लागले. बजबजपुरी माजली. देवापेक्षा सेलिब्रिटीमुळे देवस्थान पॉप्युलर होऊ लागले. देवाभोवती कोट्याधिपतींचा विळखा पडला. देवाला आणि देवस्थानाला glamour आले. देवाने आपले काम करावे यासाठी देवाला लाच देण्याचीही सोय झाली. पुजारी,बडवे,महंत यांचे महत्व एकाएकी प्रचंड वाढले. आधी त्यांची गुजराण यावर होत होती पण आता त्यांच्या इस्टेटी, खाजगी गाड्या आणि तिजोऱ्या शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे विस्तारू लागल्या.  
देव पावावा यासाठी लोक उपवास करतात, होमहवन करतात. उपवासात तमोगुण असलेले अन्न वर्ज्य केले जाते पण मनातील तमोगुणी विचारांना तिलांजली दिली जात नाही. होमहवनात सामिधांची आहुती दिली जाते पण मनातील क्रोध,द्वेष,मत्सर,मोह ,लोभ सूड,इर्षा आदी भावनांच्या सामिधांची आहुती दिली जात नाही. म्हणजेच वरील विधी हे वरकरणी केले जातात. त्यात मनाचा सहभाग नसतो.         
जेव्हा तृषार्त गाढवाच्या मुखात पाण्याची गंगा संत एकनाथ वाहती करतात तेव्हा देवत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही.  बाबा आमटे जेव्हा कुष्ठरोग्यांच्या जखमांवर सहृदयतेची मलमपट्टी करतात तिथे देवत्व प्रत्ययाला येतं. जेव्हा मदर तेरेसा, सिंधुताई सकपाळ अनाथ मुलांच्या मनावर मायेची फुंकर घालतात तेव्हा तिथे देवत्वाची प्रचीती येते. अनाथ प्राण्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून जेव्हा  डॉ.प्रकाश आमटे पुढे सरसावतात तेव्हा देव आहे याची खात्री पटते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत; अनेक हालअपेष्टा सोसून जेव्हा सीमेवरील सैनिक देशबांधवांचे  प्राणपणाने रक्षण करतात तेव्हा त्यांच्यातील देवत्व आश्वासक वाटतं.  आज कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई या दोघांनी त्यांच्यातील दिव्यत्वाची लखलखती ज्योत जगाला दाखवली आहे.  
देवत्वाची प्रचीती येण्यासाठी कोणत्याही देवालयात डोकावण्याची गरज नाही. ते चैतन्य, ते दिव्यत्व, ती वैश्विकता, ती अनुभूती आपल्या प्रत्येकाच्या मनात सदैव नांदत असते. फक्त तिचे दर्शन घेण्यासाठी तिच्यावर साचलेले अज्ञानाचे मळभ दूर करण्याची आवश्यकता असते.            

No comments:

Post a Comment