Saturday 24 December 2011

आपलं मत


हे फक्त निवडणुकीत ग्राह्य धरलं जातं एरवी याला कुत्र्याच्या भूंकण्याइतकही महत्त्व नाही. आपण मारे घरी-दरी यंव नी त्यंव मतांच्या पिंका टाकत असतो पण त्याला काडीइतकीही किंमत असते का याचा विचार आपण करतच नाही. 
सकाळच्या घाई-गर्दीच्या वेळेला जरा जादा गाड्या सोडा असे कितीही सौजन्यपूर्वक आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले तरी आपल्या आणि आपल्यासारख्या इतरांच्या मताचा त्यांच्यावर का म्हणून परिणाम होईल? आपण म्हणजे कोण? सकाळच्या वेळी रेल्वेच्या प्रवाशांना कोंडीत पकडून घायकुतीला आणण्याची त्यांचीही काही ठाम मतं आहेत. ऐन वेळेस ओव्हरहेड वायर तुटायला हवी, पेंटोग्राफ जळायला हवा, गाडी डिरेल व्हायला हवी अशी त्यांची काही वर्षानुवर्षांची घट्ट साचलेली मते आहेत ती कोणी विचारात घ्यायची? आपणच ना? 
आयबीएन आणि झी २४ तास या दोन्ही वाहिन्यांवर रात्रीच्या वेळेस अनेक पक्षांच्या लोकांची आपापल्या पक्षाच्या मतांवरून झोंबाझोंबी चालू असते. प्रत्येकजण आपल्या मतावर ठाम राहून आपल्या पक्षाच्या वागणुकीचे समर्थन करत असतो. एकमेकांवर यथेछ्च आगपाखड करून झाल्यावर हा करमणुकीचा कार्यक्रम संपतो. या मतामतांच्या गल्बल्यातून काहीच साध्य होत नाही. एकमेकांची निन्दानालस्ती आणि प्रेक्षकांचे मनोरंजन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन हा कार्यक्रम आखलेला असतो.    
आपापली गाडी पार्क करण्यावरून सोसायटीतील रहिवाश्यांची प्रचंड भांडणे होतात. याचे एकमेव कारण म्हणजे माझी गाडी मी इथेच पार्क करणार या मतावर प्रत्येकजण ठाम असतो. आपले मत इतरांनी मनावर घ्यायचे काही कारणच नसते कारण त्यांचीही मते आपल्या इतकीच पक्की असतात. त्यामुळे भांडणे होत राहतात, तोडगा निघत नाही. आपली गाडीच्या टायर मधली हवा जोपर्यंत कुणी काढत नाही तोपर्यंत ही भांडणे फक्त तोंडातोंडी चालतात त्यानंतर आपापल्या हाताची मते आजमावायला कुणी मागेपुढे पाहत नाही.
आज आयटेम साँगच्या नावाखाली स्त्रीदेहाचे जे उत्तान प्रदर्शन मांडले जाते, ज्या बीभत्स हावभावांचा, अश्लील शब्दांचा वापर केला जातो त्याच्या विरुद्ध कितीही जनमताचा पाऊस पाडा, काहीही उपयोग होत नाही. तुम्ही टी.व्ही.ऑफ करा, अशा चित्रपटांवर बहिष्कार टाका,फार काय रस्त्यात अश्लील चित्रे दिसली तर डोळे मिटून घ्या की. तुम्हाला कोणी मनाई केलीय? राखी सावंतला तुम्ही बेंबीच्या  देठापासून कितीही ओरडून सांगितलेत की बाई गं  तुझ्या आणि तुझ्यासारख्या अनेकींच्या अशा नाचण्याने युवा पिढी बिघडत चाललीय,बहकत चाललीय, निलाजरी होत चाललीय तरी त्या तुमचं काय म्हणून ऐकतील? तुम्ही कोण? त्या अशा नाचतात म्हणून तरुणांचं मनोरंजन होतं, त्यांना बऱ्याच गोष्टी शिकता येतात. तुम्ही आक्षेप घेणारे कोण?  
शाहरुख खानला, 'अरे बाबा आता तू म्हातारा दिसायला लागला आहेस तेव्हा पिक्चर मध्ये काम करणे थांबव' असे कितीही कंठशोष करून आपण सांगितले तरी त्याने का ऐकावे? तो पैशांच्या राशीत लोळतो म्हणून तुम्ही जळताय. बॉक्स ऑफिसवर त्याचे पिक्चर भले फार दिवस न टिकू देत पण खर्च केलेला पैसा जोपर्यंत वसूल होतो आहे तोपर्यंत असे शाहरुख खान येतंच राहणार. तुम्ही बघा दिलीप-देव-राज यांना घरातल्या छोट्या पडद्यावर! फुकटची मते मांडू नका.       
नवीन लोकलवर,बसवर, मोटारींवर, उपाहार आणि सिनेमागृहांमध्ये आणि रस्त्यांवर कृपया थुंकू नका हे मत जाहीररीत्या प्रदर्शित करायचं कुणालाच काय कारण? थुंकदाणी शिवाय इतर ठिकाणी थुंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे भारतात जन्माला आलेल्या बहुतांश लोकांचे मत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे हाही आपल्या लोकांचा अत्यंत आवडता छंद आहे तेव्हा तुमच्या फुसक्या मतांनी त्यांना विचलित होण्याचं काही कारणच नाही.  
कसाब सारख्या अनेकांचा निर्घृणपणे जीव घेणाऱ्या अपराध्यावर इतके कोट्यावधी पैसे खर्च करू नका,तो सरकारचा जावई नाही, त्याला लवकरात लवकर फाशी द्या आणि न्यायदेवतेची विटंबना थांबवा असे अनेकजण घसे कोरडे पडेपर्यंत ओरडले, तज्ञांच्या मतांचा कीस पडला, जनसामान्यांत चर्चा घडवून आणल्या गेल्या, या भयानक दुर्घटनेत ज्यांचे बळी गेले त्यांच्या निकटवर्तीयांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न झाला, आले का यश? कोणाची मते विचारात घेतली गेली? उलट कसाबला बिर्याणी आवडते ह्याचीच बातमी झाली.     
या सगळ्याचे तात्पर्य काय तर तुमची मते ही फक्त तुमच्याजवळच असली पाहिजेत, इतरांवर ती लादायचा जरा जरी प्रयत्न केलात तर त्यांची मते तुमच्यावर बरसलीच म्हणून समजा. आता ते उडणारे शिंतोडे गंगाजलाचे असतील किंवा सांडपाण्याचेही असू शकतील. तेव्हा मते व्यक्त करण्याआधी स्वत:चा विचार जरूर करा.

No comments:

Post a Comment