Tuesday 4 October 2011

दाढदुखीचे महाभारत

वर्गात प्रश्नोत्तराचा तास चालला होता. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव युद्धासाठी उभे ठाकले इथपासून ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या गीतोपदेशाचे वर्णन वाघमारे बाईंनी केले. आता प्रश्नांची वेळ झाली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता कोणी सांगितली? असा साधा प्रश्न बाईंनी विचारला. वर्गातील एका  अत्यंत टारगट  व व्रात्य मुलाने हात वर केला. अर्जुनाला भीमाने गीता सांगितली असे उत्तर त्याने दिल्यानंतर आता टेबलावरील खडू,डस्टर,पट्टी या अस्त्रांचा यथोचित उपयोग होईल असे वर्गातील इतर मुलांना वाटले. परंतु या उत्तरावर, "ठीक आहे. खाली बस." अशी सर्वस्वी अनपेक्षित प्रतिक्रिया वाघमारे बाईंकडून आल्याने सगळा वर्ग कमालीचा अचंबित झाला. एव्हाना वाघमारे बाईंनी स्वत:चा चेहरा दोन्ही  हातांनी झाकून घेतला होता. याचे विद्यार्थ्यांना कळलेले एकमेव कारण होते - दाढदुखी. कुरुक्षेत्रावरील लढाई केव्हाच इतिहासजमा झाली होती पण तोंडाच्या आतील लढाई हातघाईवर आली होती. त्यामुळे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली या तपशीलापेक्षाही आपल्या दातांचे सारथ्य कुठल्या निष्णात दंतवैद्याच्या हाती सोपवावे या विवंचनेत वाघमारे बाई गढल्या होत्या. एकंदर दाढदुखीपुढे  कुरुक्षेत्र-अर्जुन-श्रीकृष्ण संवाद-गीता यांनी तूर्तास माघार घेतली होती.
हा किस्सा सांगण्यामागचा उद्देश एवढाच की एकदा का ती अक्कलदाढ ठणकायला लागली की धडधाकट माणूसही सपशेल नांगी टाकतो. सगळ्या सुखद जाणीवा बोथटतात. बाजूने चाललेली सुंदर स्त्री किंवा पुरुषही ही दाढदुखीची वेदना विसरायला लावू शकत नाही. दाढदुखी हे जीवनातील शाश्वत सत्य आहे असे वाटू लागते. चांगलेचुंगले पदार्थही नकोसे वाटायला लागतात. कुरकुरीत गोष्टींची भीती वाटू लागते. फुटाणे, चिक्की, ऊस,शेवकांडीचे किंवा कडक बुंदीचे लाडू आपले जन्मोजन्मीचे वैरी वाटू लागतात. दाढेची ही वेदना सर्वव्यापी असते. खून,बलात्कार,दरोडे,राजकीय लपंडाव,बॉलीवूडच्या ताऱ्यांचा नंगानाच या आत्ताआत्तापर्यंत हादरवणाऱ्या बातम्या मुळापासून हादरवणाऱ्या दाढदुखीपुढे मिळमिळीत वाटायला लागतात.   
अक्कलदाढेची एक गम्मतच असते. ती अक्कल असलेल्यांना येते आणि नसलेल्यांनाही येते. बरं येते म्हणावं तर ती चक्क घुसते. आपलं तोंड हे लोकलचा सेकण्ड क्लासचा डबा समजून आजूबाजूच्या दाढा ढकलत फोर्थ सीट बळकावू पाहते. या तिचे खेळीमेळीच्या वृत्तीने आपला गाल आतून फाडला जातो. जखम होते. दाढदुखीच्या कारणास्तव रजा घेता येत नाही कारण  तिचे दुखणे हा 'दृक एव्हिडन्स'  म्हणून वापरता येत नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांवर तोंडसुख  घेता येत नाही. शेजारच्या पर्शिणीने आणलेले 'क्रिस्पी चिकन' दातांखाली रगडता येत नाही. आपण निद्रिस्त व्हायचा प्रयत्न केला तरी आपल्या तोंडाच्या आतील यंत्रणा भलत्याच जागृत झाल्याने आपण पुरते नामोहरम होतो. कुठलेही 'पेनकिलर' आपले आत्ताचे मरण केवळ तीन-चार तासांपर्यंतच लांबवू शकते. थोडक्यात दाढ हा एकच दुखरा अवयव आपल्या शरीरात उरला आहे असे पदोपदी वाटायला लागते.   
सरतेशेवटी दंतवैद्याकडे जाण्यावाचून आपल्याला पर्याय उरत नाही. दंतवैद्याचा अद्ययावत आणि महागडा दवाखाना पाहून आपली दाढ अधिकच ठणकायला लागते. तोंडात क्षणोक्षणी होणाऱ्या वेदनेच्या स्फोटापुढे बॉम्बस्फोटही  किरकोळ वाटायला लागतात. आपण दंतवैद्याच्या अत्याधुनिक आरामखुर्चीत साशंक मनाने विसावतो. तो आपल्या दातांना हात घालतो. दुखऱ्या दाढेची चर्चा होते. ती अशा जागी नेमकी उगवलेली असते की तिचा थांगपत्ता प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही लागणे कठीण असते. त्यामुळे ती काढणे हा एक महाभारताइतकाच अवघड पेचप्रसंग असतो. ती न काढली तर वेदनाशामकांच्या मदतीने तिला केवळ काही वेळापुरतेच  निष्प्रभ करण्यात यश येणार असते. निवड आपण करायची असते.
दाढ आपलीच असते. आपली आप्त असते. पण वेळीच न काढली तर आपल्याच मुळावर येणार असते. आपलं तोंड हे कुरुक्षेत्र झालेलं असतं. आपल्या दातांच्या आरोग्याचा रथ दंतवैद्याच्या हाती असतो. आपण अर्जुनासारखे अजूनही दाढ काढावी की नाही या संभ्रमावस्थेत वावरत असतो.  दंतवैद्य आपल्याला ज्ञानोपदेश करून मिश्कील हसत असतो आणि आपण ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याच दाढेवर वार झेलायला महत्प्रयासाने तयार होतो.

No comments:

Post a Comment