Tuesday 13 December 2011

हरवत चाललेला आकाशाचा तुकडा


पूर्वी माझ्या  घरातून सूर्य,चंद्र,तारे ही नभांगणातील संपदा व्यवस्थित दिसत असे. सूर्य उगवतानाचे आकाश ,चंद्र उगवतानाचे आकाश मी अनुभवत असे. आजकाल आकाशापर्यंत दृष्टी पोहोचण्यासाठी मान वर करावी तर बिल्डींगांचे  अवाढव्य राक्षसी सांगाडे दृष्टीपथात येतात. दोन उंच इमारतींच्या मधून  छोट्याशा आकाशाच्या तुकड्याचे दर्शन होते हेही भाग्यच म्हणायचे! 
आता खरोखरीच मुलांना पुस्तकातून आकाश, सूर्य,चंद्र,तारे दाखवण्याची वेळ आली आहे. आकाश निळसर असते हे समजायला आधी आकाश तर दिसले पाहिजे ना? इमारतींची गच्ची, समुद्र, रस्ता ही आकाश नीट दिसण्याची सध्यातरी हमखास ठिकाणे आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी बालपणी ज्या चंद्रासाठी हट्ट केला होता तो हा चंद्र असे म्हणत घरातून बोट दाखवावे तर अजस्त्र इमारतींनी चंद्राला गिळंकृत केलेले! सूर्य वर येताना सोनेरी लालसर होत जाणारे क्षितीज, सूर्य मावळताना क्षितिजावर पसरत जाणारे संध्या-रंग आता चित्रातून मनात सजीव करायचे दिवस आलेत. आता कवींनाही चंद्र-सूर्यावर कविता करताना मोकळ्या ठिकाणाची निवड करावी लागेल. आकाशातून विहार करणारे पक्षी बघण्यासाठी  आता काय मुला-बाळांना घेऊन रस्त्यावर उतरायचे? ढगांतून जाणारं विमान पाहण्यासाठी गच्चीवर धाव घेण्याशिवाय पर्याय नाही. आपण राहतो तो मजला खालचा असेल तर रस्ता,वरचा असेल तर गच्ची आणि मधला असेल तर पुस्तक अशी निवड करायची आता पाळी आली आहे. 
अजूनपर्यंत तरी बिल्डर लोकांनी गच्च्या,समुद्र,रस्ते,बगीचे, खेळांची मैदाने,विमानांच्या धावपट्ट्या मोकळ्या सोडल्या आहेत हे आपलं सुदैव! घराच्या बाल्कनीत बसून,हातात गरमागरम वाफाळत्या चहाचा कप घेऊन आकाशातून पाऊस पडताना बघण्याची मजा  अनुभवायला आता थेट लोणावळा-खंडाळ्याला जायचं का; की आता 'कितना बारीश हो रहा है' हे बम्बैय्या हिंदी समोरच्या बाल्कनीतील लोकांकडून ऐकण्यात धन्यता मानायची? 'हे विमान फिरते अधांतरी,किती मौज दिसे ही पहातरी' असे ती मजा अनुभवत लिहिणारे तेव्हाचे कवी परत तोच अनुभव घेण्याच्या फंदात कसे पडणार? निरभ्र आकाश कसं दिसतं,ढगाळलेलं आकाश कसं दिसतं हे दृश्य मुलांना कसं दिसणार? 
मला तर वाटतं की पुढची पिढी ही घर सोडून एकतर मॉल मध्ये किंवाएसी गाड्यांमध्ये राहील.. आकाश, ग्रहगोल, ढग, ऋतू,जलाशय,तरुवर या निसर्गनिर्मित गोष्टींपेक्षाही अनेक कृत्रिम प्रलोभने यांना गुंगवून टाकतील. कदाचित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम आकाशही ग्रहगोलांच्या सकट त्यांच्या भेटीस येईल. काय सांगावे,दोन इमारतींच्या मधून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आमच्या पिढीची कहाणी त्यांना उद्या पाठ्य-पुस्तकातून वाचायला मिळेलही!

No comments:

Post a Comment