Saturday 22 October 2011

आली दिवाळी दिवाळी..............


२०११ सालची दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. घराभोवती काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, घरगुती फराळ, आप्तांच्या भेटीगाठी, पाडवा-भाऊबीज सगळं काही  साजरं होईलच पण तरीही काहीतरी हातातून निसटल्याची हुरहूर लागून राहिली आहे. 

आमच्या लहानपणी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरकचतुर्दशीला आम्ही पहाटे चार वाजता उठायचो.  आई आम्हा भावंडांना पाटावर बसवून सुगंघी तेल लावायची. नंतर एकेकाची उटणे लावून आंघोळ व्हायची. आंघोळ चालू असताना आम्हाला पेटत्या फुलबाज्या दाखवल्या जायच्या. मग घराच्या देवाला,वडीलधाऱ्यांना नमस्कार! दिवाळीची पाकिटे मिळायची. नवीन कपडे  अंगावर चढवण्याची कोण घाई व्हायची. मग मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळून आम्ही फटके उडवायला सज्ज व्हायचो. मनसोक्त फटके उडवल्यानंतर घरच्यांबरोबर  घरी तयार झालेला  खमंग फराळ खाताना खूप मज्जा यायची. 
लक्ष्मीपूजनाला घरातील दागिन्यांची, पैशांची पूजा व्हायची. पाडव्याला आई बाबांना ओवाळायची. पाडव्याची ओवाळणी म्हणून आईला बहुधा साडीच मिळायची. भाऊबिजेला आम्ही आमच्या भावाला ओवाळायचो. ओवाळणी म्हणून अर्थातच पाकीट असायचं. त्यात लपलेल्या अकरा किंवा एकवीस रुपयांचं आम्हाला कोण अप्रूप वाटायचं . घरातील मोठ्यांकडून मिळालेल्या एक्कावन्न रुपयात सगळी बाजारपेठ खरेदी करता येईल असं वाटायचं. या चार दिवसांत अख्ख्या वर्षाचा आनंद उपभोगायला मिळायचा. फराळाची देवाणघेवाण, शेजाऱ्यांचे,नातेवाईकांचे येणेजाणे सुखद वाटायचे. 
इतक्या वर्षांनंतरही  दिवाळी साजरी होतेच पण फक्त वेगळ्या पद्धतीने! बहुतेक लोक दिवाळीत फटाक्यांपासून वाचण्यासाठी   आऊटिन्गला जातात. दिवाळीची खरेदी मॉलमध्ये होते. फराळ आयता आणला जातो. पाडवा-भाऊबिजेला एकमेकांना मोठमोठ्या  महागड्या गिफ्ट्स देणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. बहिणीही याबाबतीत आता माघार घेत नाहीत. बाह्य सजावटीला अवास्तव महत्त्व दिलं जातं. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या चीजवस्तू  आप्तांना भेट म्हणून दिल्या जातात. काही ठिकाणी पाकीटातून चेक्सची  देवाणघेवाण होते. दिवाळीचे उपचार शिताफीने पाळले जातात पण अंत:करणातली ज्योत काही केल्या पेट घेत नाही. आईच्या हाताने लावलेल्या तेलाची,उटण्याची कसर भरून काढता येत नाही. ज्येष्ठांनी मायेने दिलेल्या अकरा,एकवीस,एक्कावन्न रुपयांची सर पाकिटातील हजारांच्या आकड्यांना येत नाही. घरात सगळ्यांनी मिळून केलेल्या  फराळाचा आनंद बाजारातून आणलेला फराळ देऊ शकत नाही. दिवाळीला मुलांना चांगले-चुंगले कपडे घेण्यासाठी आई-वडिलांनी वर्षभर केलेल्या काटकसरीची कहाणी  कपाटातील  अनावश्यक ओसंडणारे कपडे  सांगू शकत नाहीत. रांगोळ्यांची स्पर्धा होते पण एकमेकांकडून उसने मागून आणलेले ठिपक्यांचे कागद, गेरू,रंग, रांगोळ्यांची पुस्तके यातील उत्साहाची आणि आनंदाची स्पर्धा नाही होऊ शकत. पूर्वी दिवाळीच्या नुसत्या चाहुलीने मन आनंदित व्हायचं, उल्हसित व्हायचं आणि आता मात्र  कोणत्याही सणांच्या आगमनाची सूचना पहिल्यांदा वर्तमानपत्रातील जाहिरातींमधून, घरात टाकलेल्या पत्रकांतून, सजविलेल्या, रोषणाई केलेल्या दुकानांतून मिळते. पूर्वी घराघरांतून दिवाळीसाठी एक निश्चित बजेट आखलं जायचं पण आता दिवाळीत जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची जणू अहमहमिकाच लागलेली दिसते.   
दिवाळीचे चार दिवस येतात तसेच सरतात. फराळ,
फटाके,शुभेच्छा कार्डे, गिफ्ट्स सारे काही यथासांग पार पडते. पण औपचारिकतेचे उटणे लावून आलेली आणि कृत्रिमतेचे रंग घेऊन सजलेली दिवाळी अंतर्मनातील आनंदाची फुलबाजी काही पेटवू शकत नाही.   


No comments:

Post a Comment