Sunday 16 November 2014

विनोदाचे आणि माणुसकीचे आगर- पुलं

शालेय पुस्तकातून पुलं डोकावले आणि कायमचे मनामध्ये शिरले. माझ्या बाबांचे ते गुरु. माझे बाबा हरी भोपटकर orient हायस्कूलचे विद्यार्थी. तिथे पुलं आणि सुनिताताई सारखे प्रतिभावान शिक्षक बाबांना लाभले. माझे बाबा उत्तम पेटी वाजवायचे. बाबांकडून पुलं विषयी खूप ऐकले होते त्यामुळे माझे बालसुलभ कुतूहलही जागे झाले होते. पुलं खूप हसवतात ही गोष्ट सगळ्याच परिचितांकडून मनावर कोरली गेली होती.          
पुढे मी कविता करायला लागले. तसा लिखाणाचा वारसा बऱ्यापैकी घरातूनच मिळाला होता. माझी आत्या शरयू भोपटकर ही लेखिका होती तसेच ऑफिस सांभाळून इतर वेळ आधी रंगायतन व नंतर आविष्कार या संस्थेच्या नाटकांसाठी ती देत होती.
तू असाच यावास आणि अशा काही निवडक कविता मी पुलंच्या अभिप्रायार्थ पोस्टाने पाठवल्या.  आधी मी बाबांनाच म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी त्यांना पत्र  टाका. पण त्यांनी सरळ नकार दिला. मला त्यांचं वागणं पटलं नाही पण काय करणार?  मग बाबांचाच संदर्भ देऊन मी माझं पहिलंवहिलं पत्र पाठवलं. मी खूपच excited होते. त्यांच्या उत्तराची चातकासारखी वात पाहत होते. पण बरेच दिवस गेले आणि माझी आशा मावळत चालली. वाटायचं ते कुठे मी कुठे? आणि बाबा तरी त्यांना कसे आठवणार? कारण त्या गोष्टीला बरीच वर्षे लोटली होती. एव्हाना माझे लग्नही झाले होते. १९८१ सालची गोष्ट.         
आणि एके दिवशी अचानक माझ्या नावचं अंतर्देशीय पत्र आलं.  त्यावरील पुलंचं नाव आणि पत्ता मी बघितला आणि मला अक्षरश: आकाश ठेंगणं झालं. मी पत्र उघडलं आणि कमालीच्या आतुरतेने वाचू लागले. आश्चर्य म्हणजे माझे बाबा त्यांना अगदी व्यवस्थित आठवत होते. बाबांनी बसवलेल्या संगीतिका आणि त्यांच्या पेटीवादनाचं पुलंनी कौतुक केलं होतं एवढंच नव्हे तर हरीमुळे तुला जो वारसा मिळाला आहे जो चांगल्या प्रकारे जोपास असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. माझ्या कवितांविषयी पुलंनी सविस्तर लिहिलं होतं. कविता कशी लिहावी व कशी लिहू नये याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं. ज्या कविता वृत्तात चुकल्या होत्या त्या लिहिताना काय खबरदारी घेतली पाहिजे हेही सांगितलं आणि तू असाच यावास ही माझी कविता त्यांना मनापासून आवडली हे सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. (त्यामुळे १९९५ साली प्रकाशित झालेल्या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचं नाव मी 'तू असाच यावास ' हेच ठेवलं.) माझा तर कितीतरी वेळ पुलंनी  आपल्याला पत्र लिहिलं आहे आणि तेही एवढं सविस्तर यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्या पत्राची आणि त्यातील मजकुराची पारायणे झाली. त्या दिवसांत माझे पाय जमिनीपासून थोडे वर उचलले गेले होते.           
त्यानंतर कवितेचं नक्की स्वरूप काय अशा आशयाचं पत्र मी त्यांना टाकलं. पहिलं पत्र येउन सुद्धा या पत्राच्या उत्तराबद्दल मी जर साशंकच होते. मनात म्हणतही होते, त्यांना दिवसाकाठी अशा लाखो वाचकांची पत्रे येत असणार. ते कुणाकुणाला लिहित बसतील? मला एकदा लिहिलं त्यांनी पत्र म्हणजे परत थोडेच लिहितील? त्यांना काय तेवढंच काम आहे का? पण मग असं वाटायचं की नक्की उत्तर येईल. आणि यथावकाश उत्तर आलं कवितेचं स्वरूप अतिशय उत्कृष्ट रीतीने उलगडून दाखवणारं. मी खूप आनंदले. प्रोत्साहित झाले.  
नंतर काही निमित्ताने अशा पाच-सहा पत्रांची आमची देवाणघेवाण झाली. मध्यंतरी घरात वाचनालय सुरु करावे असे मनात आले होते परंतु त्यासाठी समर्पक असे नाव सुचत नव्हते. तेव्हा पुलंना पत्र टाकले आणि त्यांनी 'पसाय' हे नाव द्यावे असे सुचवले. पुढे मात्र तो वाचनालयाचा माझा बेत बारगळला. पुढे काही वर्षांनी पुण्याच्या स. ह. देशपांडे यांचे मला पत्र आले. पुलंचा  पत्रव्यवहार चाळत असताना त्यांना माझी काही पत्रे त्यात सापडली. त्यातील कवितेचं नक्की स्वरूप काय हे माझं पत्र त्यांना मिळालं परंतु त्यावरील पुलंच्या उत्तराचं पत्र त्यांना हवं होतं. मी ते पाठवून दिलं आणि पुलंच्या  ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या अमृतसिद्धी ग्रंथात ते समाविष्ट झालं. ही माझ्यासाठी नि:संशय गौरवाची गोष्ट आहे.            
त्यांना भेटावेसे खूप वाटायचे पण तशी संधी कधी मिळाली नाही. मी ठाण्याला राहायला आल्यानंतर श्रीमती विजया जोशी यांचेकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यासाठी काही वेळेस जायचे. त्यांचा एन सी पी ए ला गायनाचा कार्यक्रम होता. आम्ही शिष्यमंडळीही ऐकायला जाणार होतो. तेथील हॉलमध्ये आम्ही  प्रवेश करते झालो. कार्यक्रमाला थोडा वेळ होता. माझी नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. एवढ्यात मला पुलं आणि सुनीताताई मागील खुर्च्यांवर बसलेले दिसले. मी पुढचामागचा विचार न करता धावले आणि प्रथम त्या उभयतांच्या पाया पडले. नंतर मी त्यांना माझे नाव आणि त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल सांगितले. दोघे खूप छान बोलले. लगेचच announcement झाली आणि मी पुढे जाउन खुर्चीवर स्थानापन्न झाले. गाणे संपल्यावर मी मागे वळून बघितले पण ते दिसले नाहीत. मागाहून कळले की पुलंची तब्येत ठीक नव्हती. अनपेक्षितपणे  आपले आराध्यदैवत असे भेटल्याने माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर मात्र मी पुढे कधीच त्यांना भेटू शकले नाही. त्यांच्या दुखण्याची, आजाराची बातमी ऐकली की मन खिन्न व्हायचे.    
आज पुलं नाहीत आणि सुनीताताई सुद्धा नाहीत. त्यांच्या विनोदाइतकाच त्यांच्यातील माणुसकीचा झरा खूप निर्मळ आणि सच्चा होता. अहंगंड त्यांना कधी शिवला नाही. त्यांच्या पत्रातून मला सदैव त्यांच्यातील एक प्रेमळ,स्नेहपूर्ण,प्रोत्साहन देणारा मार्गदर्शकच जाणवला. हा माझा २०० वा ब्लॉग आहे. माझ्या कवितेला ज्यांनी पहिलंवहिलं मार्गदर्शन केलं आणि लेखनाचा व गाण्याचा वारसा जपण्याचा ज्यांनी मला मोलाचा सल्ला दिला त्या पुलंना माझा हा ब्लॉग मी कृतज्ञ भावनेने समर्पित करते आहे.              
       
  

No comments:

Post a Comment