Monday 3 November 2014

अल्पमतातील सरकार, अंतर्गत दुही, समस्यांचा डोंगर आणि बरेच काही ………….


नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात वानखेडेच्या प्रांगणात संपन्न झाला. अनेक रथी -महारथींची वर्णी या सोहळ्यात लागली. महाराष्ट्राला अनंत आर्थिक समस्यांनी घेरले असता हा एवढा अनाठायी खर्च करण्याची काय आवश्यकता होती अशा अर्थाच्या अनेक  प्रतिक्रिया  समाजमनातून उठल्या. हौसेला मोल नसते हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.   
यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींचा सपाटा सगळ्याच प्रसारमाध्यमांनी लावला. या मुलाखतींतून फडणवीस यांचा एक  सच्चा, प्रांजळ, कामावर निष्ठा असलेला चेहरा प्रत्ययास आला. 'मी धूर्त किंवा कपटी राजकारणी नाही' हे त्यांनी पुन्हा पुन्हा ठासून सांगितले. जनहिताचे निर्णय घेण्यास मी कधीही मागेपुढे पाहणार नाही हेही त्यांनी सांगून महाराष्ट्राला आश्वासित केले. त्यामुळे पुढील काही वर्षे सरकारी पातळीवरील स्वच्छ राज्यकारभार लोकांना अनुभवता येईल असे वाटते आहे.      
परंतु भाजप मध्ये मंत्रीपदासाठी चाललेली रस्सीखेच सगळ्यांनाच माहित आहे. ब्राम्हण, बहुजन, ओबीसी, मराठा हा जातीयवाद उफाळून आला आहे. माझ्या जातीने हा एवढा घसघशीत विजय मिळवून दिला हे सांगण्याची नव्हे तर हाय कमांड च्या गळी उतरवण्याची चढाओढ लागली आहे. भाजप मधील अंतर्गत दुही 'असा आमच्यात कोणताही अंतर्गत कलह नाही'  असे वारंवार सांगून लपविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.      
जनतेने निवडून दिलेले पण अल्पमतातील सरकार 'आम्ही निश्चितपणे स्थिर सरकार तुम्हाला देऊ' अशी ग्वाही जनतेला देते आहे. सुशासन आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारला प्रथम विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना आणि भाजप यांचे संबंध नको तितके ताणले गेले आहेत. दोन्ही पक्ष अहंकाराचे फुत्कार टाकण्यात मग्न आहेत. राष्ट्रवादी पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याच्या विचारांचा खडा टाकून या दोन पक्षांची गम्मत बघतो आहे. त्यात आपली अनेक राजकीय लफडी-कुलंगडी झाकता आली तर असा धूर्त पवित्राही आहे. काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्यासाठी फिल्डिंग लावून बसली आहे. अपक्षांच्या मागण्या जोर धरताहेत. आम्हाला मंत्रिपदे मिळाली नाहीत तर बघून घेऊ असेही काही पक्षाचे नेते उघड उघड धमकावत आहेत.          
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे राजकीय कर्तृत्व पणाला लागणार यात शंका नाही. त्यांच्या समोर अनेक चांगल्या योजना असू शकतील परंतु या चांगल्या योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरवताना त्यांना प्रयत्नांचे पहाड फोडावे लागणार आहेत. सर्वप्रथम आपली 'विकेट' त्यांना वाचवावी लागणार आहे. त्यांची विकेट काढण्यासाठी टपून बसलेल्या अनेक राजकीय बोलर्सना त्यांना सफाईने टोलवावे लागणार आहे. जनहिताची कामे करण्याची फडणवीस यांची इच्छा आहे हे ऐकून जनता जरी सुखावली असली तरी राजकारणात राहून फक्त स्व-हिताचीच कामे करणाऱ्यांना त्यांचा हा मानस नक्कीच बोचत असणार. ते फडणवीस यांना आपल्या परीने जेरीस आणतील यात शंकाच नाही.      
मतदान करून जनतेनेच ही परिस्थिती निर्माण केली आहे.  त्यामुळे येत्या पाच वर्षात कोणाकोणाच्या खेळी रंगतील, कोणाचे उच्चाटन होईल, कोणाची सरशी होईल, महाराष्ट्रातील जनतेच्या पदरात कोणती सुखे वा दु:खे पडतील, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त होईल काय, शोषित,दुर्बल घटकांना न्याय मिळेल काय, आर्थिक व सामाजिक विषमता अरुंद होईल काय या किंवा अशा अनेक प्रश्नांचे भवितव्य केवळ सिंहासनावर आरूढ झालेल्या सरकारच्या हाती नाही तर त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या इतर राजकीय सोबत्यांच्या हातीही आहे हे कटू सत्य आहे.        

No comments:

Post a Comment