Tuesday 11 November 2014

जनहित म्हणजे काय असतं रे भाऊ ?

राजकारणात अगदी नव्याने दाखल झालेला गंप्या नव्या नवरीच्या नवलाईने मोठमोठ्या नेत्यांकडे विस्मयाने पाहत होता. त्यांचे हातवारे, लकबी, बोलण्याची ढब बारकाईने निरखित होता. त्याला काही गोष्टी समजत होत्या  तर काही गोष्टींचा उलगडा काही केल्या होत नव्हता. त्याने राजकारणाच्या क्षेत्रात त्याच्याहून एक पाउल पुढे असणाऱ्या भाऊ म्हस्केला विचारले, ते मोठे पुढारी लोक त्यांच्या भाषणात सारखे जनहित जनहित म्हणत असतात. हे जनहित म्हणजे नक्की काय रे भाऊ? भाऊ गंप्याला सिनियर असल्याने त्याच्यापुढे जरा टेचात वावरत होता.  तो म्हणाला, अरे आमचे साहेब म्हणतात की एक किलो राजकारणात शंभर ग्रॅम जनहित मिसळावे लागते. गंप्या काहीच न समजल्याने तोंडाचा चंबू करून म्हणाला, ते कशाला? भाऊ उत्तरला, अरे मग जनता कशाला निवडून देईल आपल्याला.         
या उत्तराने गंप्याचे फारसे समाधान झाले नाही. पण इतर अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंघावत होते. आपल्याला कोणी विचारलं की राजकारणात का आलात तर काय सांगायचं भाऊ? अरे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो असं सांगायचं, भाऊने एकदम तयार उत्तर दिलं. कोणते प्रश्न? गंप्याने पुढला बॉल टाकला.  हेच म्हणजे रस्त्यावरील खड्डे, कचऱ्याचे साचलेले ढीग, वाहतुकीचा खोळंबा, परप्रांतीयांचे लोंढे, वीज-पाणी टंचाई, अल्प दरात घरे, भेडसावणारी महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, तृतीयपंथीयांच्या  समस्या, शिक्षणाचे वाढते ओझे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांचे शोषण, रोगराई वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न आपण कसे सोडवायचे रे भाऊ ?  गंप्या प्रश्नांची ही लांबलचक यादी ऐकून अगदी काकुळतीला आला. हे प्रश्न आपण सोडवायचे असे मी म्हटले का? भाऊने  विचारले. अरे पण त्याचा अर्थ तोच होतो ना ? गंप्याचा जीव कासावीस झाला. गंप्याला आईने वैतागून जाउन त्याच्या पेकाटात मारलेली लाथ आठवली. एवढा घोडा झालाय पण काम करायचं नाव घेत नाही. काय रे ए मुडद्या, जन्मभर लोळायचा वसा घेतला आहेस का? आम्ही तुला यापुढे पोसणार नाही. बाहेर जा आणि काम शोध. आईच्या या सारख्या  धोशामुळे गंप्या कंटाळला आणि भाऊसमोर त्याने आपली व्यथा मांडली.   
भाऊ क्षणाचाही विलंब न लावता गंप्याला म्हणाला, अरे तू राजकारणात सक्रिय हो. म्हणजे काय करू? म्हणजे politics मध्ये admission घे. हे वाक्य मात्र गंप्याला कळले आणि त्याने ताबडतोबीने admission घेऊन टाकली. कसलाही फॉर्म आणि पैसे न भरता आपल्याला admission मिळाली याचेच त्याला कौतुक वाटले. पण पुढे काय याचे उत्तर फक्त भाऊवर अवलंबून होते. मी साहेबांकडे तुझ्यासाठी शब्द टाकला आणि ते लगेच हो म्हणाले. आपल्या शब्दाला वजन आहे गंप्या. काय कळलं weight weight, भाऊने पेपरवेट हातात धरून तो पेपरच्या गठ्ठ्यावर ठेवला. गंप्या एखाद्या सिनेमातील हिरोकडे  पाहावं तसं भाऊकडे आदराने पाहू लागला.   
भाऊंची मुलाखत घ्यायला एक पत्रकार आला होता पक्षाच्या ऑफिसमध्ये. काय म्हणतीय राजकारणातील प्रगती? पत्रकाराने ऑफ द रेकॉर्ड विचारले. साहेबांची कृपा आहे, भाऊ उत्तरला.  मुलाखत सुरु झाली. आपल्या पक्षाचं निश्चित धोरण काय आहे ते सांगू शकाल? पक्षाचं धोरण साहेब ठरवतात. आम्ही  पालन करतो. अहो पण आता जो प्रसंग घडला त्या बाबतीतील आपल्या पक्षाची भूमिका जरा स्पष्ट करता का? कालच ह्या प्रसंगा विषयीची आपल्या पक्षाची भूमिका आमच्या साहेबांनी स्पष्ट केली आहे. तीच आमची भूमिका.  आपला पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे असे इतर पक्षाचे लोक आरोप करत आहेत. लाचारी साहेबांच्या रक्तात नाही त्यामुळे ती आमच्याही रक्तात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अखेरीस आपला निर्णय काय झालाय ते सांगता का?  जो निर्णय साहेबांचा तोच आमचा. अहो ते ठीक आहे पण म्हणजे नक्की निर्णय काय? ते योग्य वेळेस आमचे साहेब जाहीर करतील. काळजी नसावी.           
पत्रकार काहीच थांग न लागल्याने खिन्न मनाने परतला.  काय गंप्या कशी झाली माझी मुलाखत? भाउने जिंकल्याच्या अविर्भावात विचारले. एकदम बेस्ट भाऊ. मग तयारीला लाग. तुलाही उद्या अशी उत्तरे देण्याचा सराव करावा लागेल. हो हो नक्की, गंप्या म्हणाला.       
घरी गेल्यावर गंप्याला आईने विचारलं, काय रे इतक्या रात्रीपर्यंत कसलं काम करतोस? गंप्या उत्तरला, साहेब आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही काम करतो.                   

No comments:

Post a Comment