Friday 20 July 2012

मेरे सपनों की रानी कब आएगी तू............

आराधना चित्रपटात उघड्या जीपमध्ये बसून सुजीतकुमारच्या सोबतीने राजेश त्याच्या स्वप्नातील राणीची आळवणी करत होता आणि प्रत्येक तरुणीला आपणच त्याच्या स्वप्नातील ती राणी आहोत असं मनोमन वाटत होतं. राजेशचा करिश्माच तसा होता. मान तिरकी करून पतंग उडवल्यासारखे हातवारे करून नाचणे हे जरी चाकोरीबद्ध नृत्याच्या व्याख्येत कुठेही बसत नव्हते तरीही त्या तशा नृत्याचा शिल्पकार राजेश होता. वास्तव आणि स्वप्न यांच्या सीमारेषेवरचा त्याचा अभिनयाविष्कार होता.  त्याच्या स्वप्नाळू डोळ्यांमध्ये बुडून जाण्यात अनेकींना धन्यता वाटायची. 'न भूतो न भविष्यति' अशा प्रकारची लोकप्रियता राजेशला लाभली.    
आपल्यावर प्रेम करणारा राजेशसारखाच असला पाहिजे असं अनेक युवतींना वाटायचं. चित्रपटातील प्रेमात अपयश आल्यानंतरचे त्याचे ते खिन्न हसणे अनेकींना घायाळ करून जायचे. त्याचा आराधनातील हळुवार प्रियकर तरुणींच्या हृदयातच थेट ठाण मांडून बसला. आनंद हा तसा एक नितांतसुंदर ज्याला आपण क्लासिक म्हणू असा चित्रपट. परंतु या चित्रपटातील व्याधीग्रस्त राजेशला बघणे अनेकींना नको वाटायचे. कर्करोगाने अंतर्बाह्य पोखरलेला पण तरीही आपल्या वागण्याने दुसऱ्याला सतत आनंद देणारा राजेश पावसाच्या अलवार सरीसारखा प्रत्येकाच्या मनात झिरपत गेला. 'आनंद' आणि 'राजेश' ही या चित्रपटात जणू द्विरुक्ती झाली. 'आदमी सुरण को मटण बना सकता ही और मटण को सुरण' असे म्हणत बावर्ची मध्ये राजेशने विस्कटणारे घर सावरले. यात जो 'jack of all' होता.'थोडीसी बेवफाई',  'अवतार' आणि 'अमृत' मध्ये एक वेगळाच राजेश अवतरला.  संशयपिशाच्च झालेला राजेश 'आप की कसम' मध्ये प्रेक्षकांनी अनुभवला. 'कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम है कहना' असे म्हणत प्रेमभावनेची एक श्रेष्ठतम पातळी 'अमरप्रेम' या चित्रपटात राजेशने साकारली. 'डाकिया डाक लाया' असे म्हणत राजेश पोस्टमनच्या वेशातही अवतरला. 'सफर' मधील रोगग्रस्त राजेशने अनेकांची मने हेलावून टाकली. पण त्याने जरी गंभीर भूमिका साकारल्या तरी तो तरुण पिढीसाठी एक 'romantic idol' होता. त्याची हसण्याची, बोलण्याची, बघण्याची लकब अनेकांच्या मनावर गारूड करायची. त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसलेल्या तरुणींची संख्या प्रचंड होती. रक्ताने त्याचे नाव कोरणे, त्याच्या फोटोला हार घालून त्याला मनाने वरणे ह्या गोष्टी करण्यातही अनेकजणी आघाडीवर होत्या.   
शर्मिला टागोर आणि मुमताज बरोबर त्याची विशेष जोडी जमली म्हणा किंवा लोकांनी त्यांना एकमेकांबरोबर बघणे अधिक पसंत केले. शबाना आझमी, स्मिता पाटील, आशा पारेख, राखी, वहिदा यांच्याबरोबरही राजेशने काम केले. 'खामोशी' या चित्रपटातील राजेशची भूमिका विशेष उल्लेखनीय होती. 'आखिर क्यूँ' चित्रपटातील त्याची भूमिकाही लक्षवेधी होती. त्याचे लागोपाठ पंधरा चित्रपट 'सुपरहिट' ठरले. यशाची कमान चढत गेली. अपरिमित यशाने हुरळून जाणाऱ्या अनेकांमधलाच तो एक ठरला. आपल्याशिवाय या दुनियेत कोणाचेच पान हलणार नाही अशा पोकळ भ्रमात तो वावरू लागला. आपल्या वागण्याने त्याने अनेकांचा रोष ओढवून घेतला. सेटवर उशिरा जाणे नित्याचेच होऊन बसले. अहंकार, ताठा, गुर्मी अशा नातलगांना बरोबर घेऊन तो चालू लागला. त्याचे नंतरचे चित्रपट धडाधड कोसळले. अपयशाचे कडवट प्याले रिचवणे त्याच्या पचनी पडले नाही. यशाच्या शिखरावरून त्याचा एकदम कडेलोट झाला. 'राजेश खन्ना' हे नाव अनेकांच्या ओठांवरून विरून गेले. कालांतराने राजकीय क्षेत्रातील त्याच्या पदार्पणाने राजेश खन्ना हे नाव एका वेगळ्या रुपात लोकांसमोर आले. वैयक्तिक आयुष्यातही त्याची रुपेरी पडद्यावरील आदर्श प्रेमवीराची प्रतिमा त्याला तारू शकली नाही. सुखदु:खाचे अनेक चढउतार राजेशला अनुभवावे लागले. जे दु:ख त्याने इतरांना कळत-नकळत दिले ते त्याला नंतरच्या काळात सव्याज परत मिळाले. काही महिन्यांपूर्वी एका पारितोषिक समारंभात पूर्णत: रया गेलेला राजेश दिसला आणि आतमध्ये कुठेतरी कालवाकालव झाली. हाच का तो स्वत:च्या दिलखेच अदांनी लाखो तरुणींच्या मनावर आरूढ झालेला राजेश? अशा संभ्रमात माझ्याप्रमाणेच अनेकजण निश्चित पडले असतील. 
हा राजेश डोळ्यांना त्रास देत होता. सहन होत नव्हता. मनात बंदिस्त करून ठेवलेला राजेश या वास्तवातील राजेशला नाकारत होता. राजेश आजारी असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याच्या लीलावतीतील वाऱ्यांच्या बातम्याही अधेमध्ये प्रसृत होत होत्या. त्याला नक्की काय झाले असावे याविषयीच्या शंकाकुशंका मनात घोंघावत होत्या. तशातच काही दिवसांपूर्वी एक दिवस राजेश 'come back' करतो आहे अशी बातमी आली आणि त्या बातमीबरोबर एका जाहिरातीत तो प्रत्यक्ष दिसलाही. त्याचा खप्पड झालेला, दाढी वाढलेला, भग्न, विदीर्ण चेहरा बघवत नव्हता. त्याचे हातपाय लटपटत होते. चालताना त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज भासत होती. अशा अवस्थेत हा पुन्हा पदार्पण का करू पाहतोय असा प्रश्न मनात सारखा रुंजी घालत होता.  
पण या वास्तवातील राजेशने त्याची विस्कटलेली प्रतिमा जास्त काळ लोकांना बघू दिली नाही. लोक त्याच्या या स्थितीबद्दल हळहळत असतानाच त्याने एक्झिट घेतली. कायमची. आपली या जगाच्या रंगभूमीवरील भूमिका आता संपली असून 'pack up' ची वेळ झाली आहे हे त्याने जाणले. त्याच्या अनेक चाहत्यांनी साश्रूनयनांनी त्याचे अखेरचे दर्शन घेतले. 
आता काही दिवस तरी मनात दडलेला तो 'आनंदमय' राजेश उचंबळून येईल. त्याची ती अदा, त्या विशिष्ट लकबी, त्याचे डोळे मिचकावत हसणे आठवणींच्या रुपात वाहत राहील. 'शेवटी आपण सर्वजण त्याच्या हातातील कठपुतळ्या आहोत' या वास्तवाची जाणीव करून देणारा स्वप्नाळू राजेशचा हा डायलॉग आपल्याला विसरता येणे सर्वथैव अशक्य आहे  हे सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल.  

No comments:

Post a Comment