Thursday 2 August 2012

आम्ही बुवा............

'आम्ही बुवा' या संस्कृतीत बसणारे, या पठडीतले माझ्या परिचयाचे काहीजण आहेत.  त्यापैकीच हे अमुक कुटुंब. 'आमच्याकडे', 'आम्ही बुवा', 'आम्ही किनई', 'आमच्या घरात' अशा आदरार्थी बहुवचनाने सुरवात करून ही माणसे आगंतुकपणे काही स्टेटमेंट्स करत असतात. घरातले कर्ते पुरुष, स्त्रिया, मुले सर्वजण मोठ्या उत्साहाने या 'आम्ही बुवा' संस्कृतीत सामील झालेले असतात.    
कधी आपली आणि ह्यांची भेटगाठ झालीच तर आपली चहाची वेळ यांच्या भलतीच अंगावर येते. आपले वेळी-अवेळी झोपणे-उठणे यांच्या पचनी पडत नाही. रात्री उशिरापर्यंत आपला टी.व्ही. चालू असल्याचा यांना मानसिक त्रास होतो. कधी चुकून आपल्या दैनंदिनीतील काही तपशील यांना कळताच ' आम्ही बुवा अमक्या वेळी हे कधीही करत नाही' किंवा 'आमच्यात अशी रीत नाही'  अशी प्रतीवाक्ये न चुकता प्रतीपक्षाकडून  येतातच!     
एकदा  मी सायंकाळी आरामात बसून छानसे पुस्तक वाचत असताना त्या 'आम्ही बुवा' कुटुंबातले गृहस्थ दत्त म्हणून हजर झाले. माझे तसे संध्याकाळच्या वेळी आरामात बसून वाचणे त्यांना खटकले असावे. काय वाहिनी स्वयंपाक झाला वाटतं? त्यांनी न राहवून विचारलं. छे हो. अजून सुरवात कुठे केली आहे स्वयंपाकाला? माझे यजमान साडेनऊ शिवाय जेवत नाहीत . तीच वेळ मुलांच्या जेवणाची. मग करायचं काय लवकर जेवण करून? मी उत्तरले. बसा ना. चहा घ्या थोडा. मी पटकन करून आणते. आत्ता? या वेळी? एखादं महान, घोर पातक झाल्यासारखं ते गृहस्थ ओरडले. आमच्याकडे चहा फक्त एकदा. दुपारी तीन वाजता.  त्यानंतर आजतागायत दुसऱ्या वेळेस चहा घेतल्याचे मला स्मरत नाही. भलत्यासलत्या वेळेस चहा घेणे प्रकृतीला चांगले नसते  बरं का वाहिनी! भूक मरते त्यामुळे शिवाय रात्री झोपही चांगली लागत नाही. आमच्या घरी सात वाजता आम्ही जेवतो. आमच्याकडे पहिल्यापासून हीच पद्धत आहे . त्यांनी अकारण स्वत:च्या मतांची पिंक टाकली. ते वृद्ध गृहस्थ बाटलीभर उपदेशाचा रतीब घालून आणि  वाचायला कसलेसे पुस्तक देऊन गेले.     
मला हा सगळाच प्रकार हास्यास्पद वाटला. आम्ही असं करतो , आम्ही तसं करतो अशी विधाने येता जाता  करून ही माणसे  नक्की काय साध्य करतात कोण जाणे?  प्रत्येकाच्या घरातली रीतभात वेगळी, विचारांची बैठक वेगळी, आचरणाचे नियम वेगळे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन वेगळा ! तो चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार इतरांचा नसतो. आपली जीवनपद्धती ज्याने त्याने आखावी, अमलात आणावी त्यासाठी अमुक एक निकष लावण्याची गरजच काय? पण नाही. या 'आम्ही बुवा' प्रकृतीआड लपलेली विकृती  दुसऱ्यांना जाणूनबुजून दाखवण्याचा यांना कोण अट्टाहास असतो. यांच्या संपूर्ण कुटुंबालाच या 'आम्ही बुवा' ची विलक्षण बाधा झालेली असते.  या बाधेचा उपद्रव आमच्यासारख्या अनेकांना अनेकदा होत असतो. तुम्ही अमुक अमुक वेळी नक्की काय करता हे बघायला कोण रिकामे आहे? जो तो आपणहून मांडलेल्या जीवनसिद्धांतावर आयुष्याची गाडी चालवतो, काही हाकतात, काही रेटतात. पण दुसऱ्यांनी अंगिकारलेल्या जीवनपद्धतीचे निकष लावून स्वत:चे संसार सुकर होत नसतात हे यांना कोण आणि कसे समजावणार?   
एक दिवस मी काही कामानिमित्त दुपारी यांच्याकडे गेले. दार त्रासिक चेहऱ्याने उघडले गेले. घरात अंधार होता. या कुटुंबातील सदस्यांची झोपमोड करण्याचे पाप मी केले होते. आमची ही झोपण्याची वेळ आहे. हे स्वागताचे वाक्य ऐकून मी माघारी फिरले. या घरातील नव्या सुनेने विळीऐवजी हातात सुरी घेतली तेव्हा 'आपल्याकडे सुरीने चिरण्याची पद्धत नाही, विळीच वापर' अशी सासूने शिकवण व समाज दिल्यापासून सून नम्रतेने विळी वापरू लागली आणि सुरीपेक्षा विळीच कशी चांगली हे तिच्या  मैत्रीणीना 'आम्ही बुवा' संस्कृतीतून पटवून देऊ लागली.         
आमच्या वरण-भात संस्कृतीवर हे कुटुंब असेच विलक्षण नाराज. आमच्याकडे वरण कुणालाच आवडत नाही. वाटलेल्या आमट्या, भजी, तळलेली कापं  यांच्याशिवाय आमचे पान हलत नाही. मस्याहाराचे आम्ही भोक्ते. शाकाहार कसा काय तुम्हाला आवडतो बुवा अशा अर्थाचा प्रश्न सदैव या 'आम्ही बुवा ' कुटुंबाच्या डोळ्यांत. म्हणजे वरण-भात खाऊन तृप्तीने ढेकर देणारे आम्ही आणि सगळे साग्रसंगीत जेवूनही यांच्या घशात कायम ढेकर अडकलेला. ज्याला जे रुचेल, पचेल तेच तो खातो आणि मानवेल तसेच वागतो हे यांना मान्य नाही.      सुनेने कष्टाने शिजवलेले अन्न बरे झाले नाही म्हणून कटकट करत खाण्याची यांची पद्धत. रात्री नऊ नंतर विरंगुळा म्हणून श्रमपरिहार म्हणून लावलेला टी.व्ही. शिस्त या बोजड नावाखाली बंद करायची यांची पद्धत. स्वत:च्या जीवनमूल्यांचा उदोउदो करून त्यापायी इतरांचे जीवनरस शोषून घेण्याची यांची पद्धत. आपणच नियम लागू करायचे आणि इतरांनी ते कसोशीने पाळण्याचा आग्रह धरायचा. कोणत्याही परिस्थितीत 'आम्ही बुवा' ही पठडी सोडायची नाही. इतरांचे आयुष्य आनंदी नाही असा उगीचच पोकळ भ्रम निर्माण करून  त्यात आपल्या आनंदाची किरणे शोधायची .            
एका रविवारी सकाळी मी सोफ्यावर बसून चहाचा आनंद लुटत होते. समोर टी.व्ही.चालू होता. दारावरची बेल वाजली. दारात 'आम्ही बुवा' होते. माझ्या अवताराकडे एक दृष्टीक्षेप टाकत त्यांनी विचारले, साहेब उठले नाहीत का ? आमच्याकडे रविवारी लवकर उठण्याची पद्धत नाही. माझ्या या उत्तराने सणसणीत चपराक बसल्यासारखे ते वृद्ध गृहस्थ चपापले. 'आम्ही बुवा'......... माझं पुढलं वाक्य पूर्ण होईपर्यंत त्या सदगृहस्थांनी तेथून केव्हाच पोबारा केला होता.    

No comments:

Post a Comment