Friday 6 July 2012

शोध ईश्वराचा ...........

ईश्वराची संकल्पना मानवनिर्मित असली तरी चैतन्याचा मूलस्त्रोत हा ईशस्वरूपच  आहे. त्या विश्वचैतन्याची किंवा निराकारतेची केवळ कल्पनाच करणे मानवाच्या बौद्धिक मर्यादेत आहे.  हे ईशस्वरूप म्हणजे मानवी दृष्टीक्षेपात मावणारा एखादा प्रकाशाचा ठिपका नव्हे किंवा हात उंचावून गवसलेली एखादी दुर्मिळ वस्तू नव्हे. अंत:चक्षुंना जाणवणारी ही एक उच्च प्रतीची जाणीव आहे.  हे ईश्वराचे सर्वव्याप्त रूप भौतिक ज्ञानाच्या कक्षेत सामावणारे नाही. परंतु अशा अवघ्या चराचरात वसणाऱ्या ईश्वराचे स्वरूप जाणून घेणे म्हणजे निजस्वरुपाची प्रचीती येणे होय.
ज्ञानाच्या सर्व सीमा उल्लंघून काळावर आरूढ होणारे असे हे ईशतत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्वे या ईशस्वरुपात अंतर्भूत आहेत. या पाच तत्वांपासून बनलेले आपले शरीर आणि ह्या शरीरात अव्याहत स्रवणारे चैतन्य आपल्या या पृथ्वीवरील अस्तित्वाचे कारण आहे. या तेजपुंज विश्वशाक्तीचा एक अंश या समस्त पृथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्रात आहे.  या चैतन्यामुळे जागृती, चेतना, हालचाल, चलनवलन आहे. हा मनुष्य जन्म म्हणजे या अंशरुपी चैतन्याला मिळालेला मानवी आकार आहे. 
चौऱ्याऐशी सहस्र योनी फिरून या चैतन्याने मानवी देह धारण केला आहे. अनेक चांगल्या-वाईट कर्मांचे फलित म्हणून विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट आई-वडिलांच्या पोटी या मानवी चैतन्याचा उगम झाला आहे. पृथ्वीवरील या जन्माआधीच या मानवरूपी चैतन्याचे प्रयोजन निश्चित आहे. पंचेन्द्रीयांबरोबर मन, भावना, बुद्धी,  प्रेरणा या मानवाला आत्मिक संवर्धनासाठी मिळालेल्या अनमोल देणग्या आहेत. आपल्या हृदयस्थ असलेल्या त्या वैश्विक चैतन्याला जाणून घेणे, जन्म-मृत्यू ह्या शाश्वत रहस्यांचे ज्ञान होणे आणि ह्या सृष्टीच्या प्रगतीसाठी आपण साहाय्यभूत होणे  हे वास्तविक पाहता मानवी अस्तित्वाचे खरे प्रयोजन असते पण वाढत्या वयाबरोबर फक्त जड बुद्धीची कास धरून माणूस या ईशतत्वापासून कैक योजने लांब जातो, स्व-स्वरूपापासून भरकटत जातो, आपल्या जगण्याचे प्रयोजन हरवून बसतो. 
आपले सरासरी सत्तर-ऐशी वर्षाचे सीमित आयुष्य त्या प्रचंड कालपटावरील एखाद्या क्षणासारखे असते. मुळात या पृथ्वीवरील आपले अस्तित्व एखाद्या कणाइतके असते. शाळेत विद्यार्थ्यांना प्रार्थना शिकवल्या जातात. पण या प्रार्थनेतील विचार मुलांच्या कोवळ्या मनात बिंबवले जात नाहीत. भगवतगीतेचे पठण करवून घेतले जाते पण गीतेचे सार समजावून सांगितले जात नाही. अनेक श्लोकांचे, प्रार्थनांचे अर्थ मुलांना आणि मोठ्यांनाही माहित नसतात. मानवी ज्ञानाच्या कक्षाही पुस्तकांत बंदिस्त होतात. अंत:चक्षुंना आकलन होणारे ज्ञान भौतिक सुखाच्या हव्यासापायी भ्रष्ट होते अथवा नष्ट होते.   
'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हा गीतेतील संदेश आचरणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेही नसतात. कर्म करण्यासाठी जन्म असतो. माणसाच्या हातून सत्कर्म वा दुष्कर्म घडताच त्या योगे मिळणाऱ्या फलाची निश्चिती झालेली असते परंतु हे फळ  केव्हा माणसाच्या पदरात टाकायचे या विषयीचा अंतिम निर्णय त्या वैश्विक शक्तीचाच असतो. फलाची लालसा मनात धरून केलेले कोणतेही कर्म हे त्या सर्वव्याप्त  ईश्वराप्रत पोहोचत नाही.    
कोणत्याही धर्माचे, कर्मकांडाचे, रुढींचे अवडंबर माजवल्याने ईश्वरप्राप्ती होत नसते. ईश्वरप्राप्ती होण्यासाठी प्रथम वासना, लोभ, मोह, अहंकार आदी क्षुद्र रिपुंवर विजय मिळवावा लागतो. देवळांच्या वाऱ्या करून ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होत नसतो. भीतीपोटी, लोभापोटी देवळातील देवासमोर हात जोडणारे चिक्कार असतात पण कसलीही मनीषा न बाळगता निस्सीम प्रेमापोटी देवावर भक्तीचा अभिषेक करणारे अभावानेच आढळतात. पण असे ब्रम्हानंदात तल्लीन झालेले, समाजमनाची क्षिती नसलेले भक्त लौकिकार्थाने वेडे ठरतात.  
ज्यांना या हृदयातील ईशस्वरुपाची प्रचीती आली त्या थोर संतांनी, महात्म्यांनी समाजकल्याणासाठी त्यांचे आयुष्य वेचले. स्वत:च्या चरितार्थाची, तहान-भुकेची पर्वा न करता ते त्या ईशस्वरुपात रममाण झाले. सर्वांभूती एकाच तत्व नांदते आहे याची अनुभूती त्यांना झाली आणि म्हणूनच रेड्याच्या मुखातून वेद वदवले जाऊ शकले. या संतांचे, महात्म्यांचे धडे पाठ्यपुस्तकातून लावलेले असतात. या धड्यांचे पाठांतर करवून घेऊन , परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलांच्या बुद्धीचे मूल्यमापन होत असते. संतांनी घेतेलेले अनुभव समजून घेणे, त्यांच्या चरित्राद्वारे त्या विभूतींचे आकलन होणे आणि त्यांनी जो ईश्वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाचे आचरण करणे या गोष्टींशी मुलांचे, शिक्षकांचे अथवा पालकांचे काहीही देणे घेणे नसते. संतांवरचे चित्रपट पाहायचे आणि त्यांनी समाजाला, मानवजातीला त्यांच्याच उद्धारासाठी केलेला उपदेश विसरून जायचा हे वर्षानुवर्षे असेच चालू आहे. 
'कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी' ह्या गीतातील ओळींचा अर्थ आमच्या आधुनिकतेची कास धरलेल्या मनाला कधी समजणार? 





No comments:

Post a Comment