Thursday 19 July 2012

आमचे विशेष बातमीपत्र ( Animal Planet च्या सौजन्याने)

आज संध्याकाळी नागवे वस्त्रोद्योग समूहाचे उदघाटन आघाडीच्या उद्योजिका श्रीमती मुंगीताई चावरे-आगओके यांच्या हस्ते करण्यात आले. वस्त्रांमागून वस्त्रांचे तागे उलगडताना एका वस्त्राच्या विळख्यात घुसमटून मुंगीताईंचे देहावसान झाले याबद्दल सर्वत्र खंत व्यक्त करण्यात येत आहे. 
काही डाकू मधमाशांनी अनपेक्षित हल्ला करून मधाचा बराच ऐवज लंपास केल्यामुळे समस्त कीटकवर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वत: मध तयार करायचे सोडून ऐदीपणे दुसऱ्याचा मध पळवल्याबद्दल  या डाकू मधमाशांवर कडक कारवाई केली जाण्याचा संभव आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी एक खास लढाऊ मधमाशांचे पथक तैनात करण्यात आले असल्याचे समजते. 
'जागतिक बिळसुंदरी' स्पर्धेसाठी एकवीस चिचुन्द्र्या उद्या अमेरिकेला रवाना होत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्षपद जगद्विख्यात बॉडीबिल्डर श्रीयुत बोकोबा चाटमिशे यांनी स्वीकारले असून त्यांच्या हस्ते विजेत्या चीचुन्द्रीला एक मोठ्ठा लोण्याचा गोळा बक्षीस देण्यात येणार आहे.  
विख्यात गायिका 'पंचमा' अर्थात कोकिळाताई यांना आज त्यांच्या अजोड कारकिर्दीबद्दल 'गोल्ड डिस्क' देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी त्यांचे जानी दोस्त 'कावळोबा कावरे' यांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली परंतु गाणे म्हणण्यासाठी त्यांनी आ करताच माईक बंद पडला याबद्दल कोकिळाताईंनी  देवाचे मनोमन आभार मानले.    
सुप्रसिद्ध 'शेष' आणि 'शेफ' श्रीयुत नागराज विषे यांना लंडनच्या पाककलास्पर्धेत  'गांडूळाच्या नूडल्स' हा विशेष लज्जतदार पदार्थ सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्यांच्या या पाककला नैपुण्याबद्दल त्यांना 'पाकसिद्ध' हा किताब तसेच पाच किलो 'गांडूळांची थैली' बहाल करण्यात आली. 


ढूशे गावातील पाच बैल एकदम गरोदर राहिल्याने निसर्गाच्या या विचित्र किमयेबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाचे हे उलटे चक्र माणसांपर्यंत  येऊन पोहोचेल की काय या भीतीने अनेक 'मर्द' 'गर्भगळीत' झाले आहेत. नाक्यानाक्यावर तंबू ठोकून पुरुषांच्या गर्भसंभव चाचण्या केल्या जात आहेत. या सर्व गरोदर बैलांची प्रसूती विनासायास व्हावी यासाठी गायी देवळांच्या पायऱ्या झिजवत आहेत असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका कोल्ह्याने आपल्या बायकोच्या चारित्र्याचा एका लांडग्यावरून संशय घेतल्यामुळे तिने स्वत:ला एका वाघोबाच्या तोंडी देऊन आपले आयुष्य संपविले. आपण केलेल्या कृत्याचा कोल्हयाला आता विलक्षण पश्चात्ताप होत असून दु:ख असह्य झाल्याने तो शेजारच्या गावातील दारूच्या गुत्त्यात शिरल्याची खात्रीलायक बातमी आहे.



आजचे विशेष बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी अशाच प्राणीविश्वातील खमंग बातम्या घेऊन. नमस्कार.  

No comments:

Post a Comment