Wednesday 4 July 2012

गैरसोयींचा पाउस

उकाडा भयंकर जाचत असतो. अंगाची लाही लाही होत असते. घामाच्या धारा असह्य झालेल्या असतात. कधी एकदाचा पाऊस येईल असे सारखे वाटत असते. आबालवृद्धांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात. पाऊस येईल आणि जिथे तिथे हिरवेगार होईल आणि पावसाच्या सरींत उन्हाळा विरून जाईल अशी रम्य स्वप्ने पाहण्यात आपण गुंतलेले असतो. केरळात पाऊस त्याच्या आगमनाची वर्दी देतो आणि आठवड्याभरात पाऊस मुम्बई आणि आसपासच्या शहरांची दारे ठोठावेल अशी मनाला निश्चिंती होते. पर्जन्यखात्याचे अंदाज नेहमीप्रमाणे चुकवीत स्वत:च्या मर्जीनुसार पाऊस येतो आणि उन्हाने कासावीस झालेला जीव सुखावतो.
पाऊस प्रत्यक्ष सुरु होण्याआधी महानगरपालिकेच्या यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत असे आपण ऐकतो. गटारे, नाले सफाई झाली असल्याचे आपल्या कानांवर आलेले असते. आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत असेही ऐकिवात येते. वास्तवात रस्त्यावरून रोज चालताना दिसणारे खड्डे, उघडी गटारे आपल्याला सतावत असतात, चिंतीत करत असतात. गटारांतून उपसलेला गाळ तिथेच पडून असतो. आजूबाजूची तिवरे नवनवीन बिल्डीन्गांच्या गराड्यात अदृश्य झालेली असतात. ठिकठिकाणी साचलेला कचरा वाहनांतून येत जाता आपल्याला नाक पकडायला भाग पडत असतो. पालिकेच्या दृष्टीकोनातून  त्यांची साफसफाई झालेली असते. आपल्याला सभोवताली दिसणारी घाण, कचरा, खड्डे आणि उघडी गटारे हा आपला दृष्टीदोष असतो. 
पाऊस येतो आणि काही तासांतच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसू लागते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल्स ठप्प होतात. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. वाहनांमध्ये अडकलेली जनता सरकारच्या नावाने बोटे मोडते. ठिकठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होते. मोटारी वाहून जातात. मुले-माणसे वाहून जातात. उघडी गटारे, खड्डे न दिसल्याने अपघात होत राहतात. भिजलेल्या कचऱ्यातून, पावसामुळे झालेल्या चिखलातून माणसे वाट काढत इच्छित स्थळी पोहोचायचा आटापिटा करत राहतात. ऑफिसला पोहोचायला उशीर, घरी यायला उशीर असा अनेक कटकटींचा मामला हा पाऊस घेऊन येतो. प्रसारमाध्यमे याच बातम्या अधिकाधिक रंगवून सांगत लोकांच्या नजरा त्या पावसातल्या दृश्यांवर खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. वाहनांचे आणि माणसांचे वेळापत्रक साफ बिघडून जाते. भरती आणि पाऊस यांच्या संयोगाने नदीचे पाणी शहरांत घुसते आणि पूरसदृश स्थिती निर्माण होते. ऑफिसला गेलेला माणूस घरी कसा येईल या आपत्तीचे चिंतन घरचा माणूस करत राहतो. सखल भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसते आणि माणसे आणि घरातील समान सुरक्षित स्थळी हलवावे लागते. 
 दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. पावसाबरोबर अनारोग्याच्या साथीही येतात. प्रशासनाच्या सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असूनही वाहतुकीचा बोजवारा, पादचाऱ्यांचा खोळंबा, खड्डे व गटारे न बुजवल्यामुळे होणारे अपघात, ठिकठिकाणी तुंबलेले पाणी, ओल्या कचऱ्याची दुर्गंधी या समस्या उद्भवतातच !  प्रशासनातर्फे या पावसाआधीच्या साफसफाईत करोडोंनी पैसा खर्च झालेला असतो. पण या सफाईची पाऊस येताक्षणी पुरती सफाई होते. हा अमाप पैसा गटार आणि नालेसफाईत निष्फळ खर्च झालेला असतो. गाळाचा उपसा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याने तोच गाळ पाऊस येताक्षणी परत त्याच नाल्यात मिसळून गेलेला असतो. डास, उंदीर, घुशी, झुरळे, माश्या, गोम हे पावसाळ्यातील खास पाहुणे  त्यांचे बस्तान नगरपालिकेला न जुमानता बसवतात. परिणामी मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस , सर्दी-खोकला-ताप अशा अनेक देणग्या जनतेला मिळतात. अस्वच्छ पाण्यामुळे कावीळ, डायरिया डोके वर काढतात.    
महानगरपालिकेचा पैसा अक्षरश: पावसाच्या पाण्यात वाहून जातो. समस्या तशाच वाढत राहतात. हवाहवासा वाटणारा पाऊस नकोनकोसा वाटू लागतो. आजूबाजूला हिरवेगार दिसण्यासाठी वृक्षवल्लींची आवश्यकता असते हेच माणसे विसरून गेलेली असतात. सिमेंटच्या भिंतीवर साचलेल्या शेवाळ्याशिवाय हिरवेगार काहीच दिसत नाही. दुतर्फा ओलीचिंब झालेली भरगच्च झाडे आता फक्त काही खेड्यांतच किंवा काही चित्रपटांतच बघण्यापुरती राहिलेली असतात. तिवरे नष्ट झाल्याने पाणी शोषून न घेतले जाता जमिनीवरच साचून राहते. जमीनही मातीची नव्हे तर सिमेंटची असते. 
आपल्या लहानपणी आपण कधीतरी ती पावसातली मजा अनुभवलेली असते. पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडलेल्या असतात. पावसाची कारंजी अंगावर घेतलेली असतात. बेडकाचे डराव डराव असे ओरडणे ऐकलेले असते. भाजलेला मका आणि कीटलीतील वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतलेला असतो. मित्रांबरोबर गप्पांचे फड रंगलेले असतात. मोराचे आणि पावसाचे नाते घट्ट करणारी गाणी मनसोक्त ऐकलेली असतात. पण हे सगळे आता इतिहासजमा झालेले असते. आताचा पाऊस त्याच्याबरोबर समस्यांचा पूर आणतो. आपत्तींचा सुकाळ आणतो. अवेळी आणि अनियमित पावसाने पेरण्या लांबतात, पिके वाहून जातात, खराब होतात. शेतकऱ्याच्या माथ्यावरचा कंगालपणाचा शिक्का ठळक होतो.  आपणच झाडे तोडल्याने, नद्या-खाड्या बुजवल्याने, तिवरे नष्ट केल्याने, प्राणिमात्रांची कत्तल केल्याने निसर्गाचा समतोल ढळू  लागलेला असतो.    
टोलेजंग इमारती बांधून, अत्याधुनिक राहणीमानाची साधने उपलब्ध करून आपण प्रगतीपथावर आहोत हे दाखवण्याचा आपण खटाटोप करतो व त्या पायी निसर्गावर कुरहाड चालवतो. नैसर्गिक आपत्तीपुढे माणसाचे काही चालत नाही हे माहित असूनही हा जो निसर्गाला वेठीस धरण्याचा घाट माणसाने घातला आहे तो माणसाला आणि त्याने उभारलेल्या साम्राज्याला भविष्यात महाग पडल्यावाचून राहणार नाही. माणसाने चालवलेली निसर्गाची निर्घृण कत्तल दोषास्पद, आक्षेपार्ह आहे. रासायनिक कारखाने, यंत्रे, वाहने यांच्यामुळे उत्पन्न होणारे प्रदूषण अत्यंत घातक आहे. 
 शेवटी पाऊस हवाच आहे, तो अपरिहार्य आहे . पण माणसाने निर्माण केलेला गैरसोयींचा हा जो पाऊस आहे त्याचे उच्चाटन होणे अतिआवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment