Wednesday 22 February 2012

ऋण (negative) विचारांचा कचरा ........

ज्याप्रमाणे थेंबाथेंबातून समुद्र निर्माण होतो आणि मातीच्या कणाकणातून जमीन तयार होते तद्वत विचारांच्या आवर्तनांच्या प्रक्रियेतून माणूस घडत असतो. विचारांचे वर्गीकरण मूलत: धन(positive) व ऋण(negative) असे होते. प्रत्येक माणसाची विचारप्रक्रिया ( thinking process) ही निराळी व स्वतंत्र अशीच असते. एखाद्याची विचार करण्याची पद्धत ही रक्तातून आलेली (inherited) किंवा परिस्थितीजन्य (circumstantial) असू शकते. शाळेत जरी फलकांवर सु-विचार लिहिलेले असले तरी फारच कमी शाळा मुलांना विचार कसा करावा याबद्दल योग्य मार्गदर्शन करतात असे खेदाने म्हणावे लागते. मानवी मनाची ग्रहणक्षमता ही टीपकागदाची असते. 'हुशार' असे लेबल लागलेल्या मुलांची विचारसरणी ही 'ढ' असे लेबल लागलेल्या मुलांच्या विचारसरणीपेक्षा निश्चित भिन्न असते. 'बावळट' असा शिक्का बसलेल्या मुलाची देहबोली (body language) तशीच असते. 'रडूबाई' असे बिरूद मिळालेल्या मुलीचा चेहरा तीच प्रतिमा प्रोजेक्ट करतो.  'बिनधास्त' असा लौकिक मिळवणारी मुलगी तिच्या देहबोलीतून जाणवत राहते. याचे कारण इतर लोकांनी त्यांच्याबद्दल केलेले विशिष्ट विचार त्यांनी तसेच्या तसे स्वीकारलेले असतात. 
ऋण विचार मानवी मन झटकन स्वीकारते. एखाद्या परीक्षेत 'नापास' झालेला मुलगा मित्र-मैत्रिणींना आपल्याबद्दल काय वाटेल, बाबांच्या पुढे प्रगतीपुस्तक ठेवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होईल या विचारांनी खचून जातो. तो आत्मपरीक्षणाची मुभाही स्वत:ला देत नाही. एखाद-दुसरं गणित सोडवता आलं नाही म्हणून काही एखादा मुलगा 'टाकाऊ' या सदरात मोडत नाही. दोन्ही हात नसलेला मुलगा पायाच्या बोटांच्या साहाय्याने लिहिण्याची उणीव भरून काढू शकतो, चित्रे रेखाटू शकतो, रांगोळ्या काढू शकतो. एखादा उंचीने खुजा म्हणून हिणवला गेलेला मुलगा आपल्या आत्म-विश्वासाच्या बळावर एव्हरेस्ट सर करू शकतो. तू काय आयुष्यात स्वयंपाक करू शकणार असा शेरा मिळालेली एखादी स्त्री त्या प्रतिमेत न अडकता आपल्या कमतरतेवर मात करून एखादे हॉटेल चालवू शकते. घरोघरी पेपर टाकणारा एखादा मुलगा स्वत:ला तेवढ्याच वर्तुळात सिमित न ठेवता स्वप्रयत्नाने राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचू शकतो. 'व्यवहारशून्य' असा शिक्का बसलेला एखादा आपल्या या कमजोरीला अभ्यासू वृत्तीने आपले बलस्थान करू शकतो. 'काकूबाई' असे उपहासपूर्ण बोल आपल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून नित्यनेमाने सहन करणारी एखादी स्त्री आपल्या विचारांचा 'मेक-ओव्हर' करून त्यांना आश्चर्यचकित करू शकते. 
पण सर्वसाधारण माणसे ही ऋण विचारांचे कार्बन मनात साठवत स्वत:च्या प्रतिमेला त्यावर गिरवत जातात. आपण आळशी आहोत, अशक्त आहोत, अभ्यासात सुमार आहोत, अरसिक आहोत, दिसायला बावळट आहोत, गबाळे आहोत अशी ऋण-विशेषणे आपल्या मनावर आदळतात आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. मित्रांशी क्रिकेट खेळताना फिल्डिंग मध्ये झालेली आपली छोटीशी चूक आपल्याला गुन्हा वाटू लागते, प्रगतीपुस्तक हातात घेताना शिक्षक आपल्याला हसताहेत असे वाटू लागते, मुली आपल्याशी बोलत नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे आपण आकर्षक नाही हे मनात बिंबले जाते. ऋण विचारांचा कचरा मनात साठत राहतो आणि विचार बिघडण्याची प्रक्रिया सुरु होते.
होम-मेकर' असलेली स्त्री दिवस-रात्र सासरच्यांच्या दिमतीला असते. ती कमावती नाही हे सासरच्यांच्या वागणुकीतून अनेकवेळा अधोरेखित होत असते. दिवसभर तर तू घरीच असतेस, काय करतेस काय? हे नवरोबांचे खोचक वाक्य तिच्या कानावर कैकवेळा पडलेले असते. तिचे आर्थिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून असणे तिच्या प्रतिमेला अपकारक ठरते. आपण घरी आहोत म्हणजे आपण काही कामाच्या नाही असे समीकरण ती इतरांकडून तिच्याही नकळत स्वीकारते. तिची विचारसरणी, तिची मानसिकता तिला या दुष्टचक्रातून बाहेर काढू शकत नाही आणि तिने साठवलेला हा ऋण विचारांचा कचरा एखाद्या शारीरिक दुखण्यातून आपले डोके वर काढतो.    
कचरा हा टाकाऊ,त्याज्य भाग असतो. तो योग्य वेळेस विसर्जित केला नाही अथवा त्याची विल्हेवाट लावली नाही तर इतस्तत: रोगराई पसरू शकते त्याचप्रमाणे हा नैराश्यपूर्ण, ऋण विचारांचा मनातील कचरा वेळीच बाहेर टाकला गेला नाही तर त्याचे भेसूर रूप आपले आयुष्य नासवून टाकते. मी काय करू शकत नाही यापेक्षा मी काय करू शकतो यावर विचारमंथन होणे गरजेचे असते. आपल्या कमतरतेला विचारांच्या सहाणेवर पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा आपल्या बलस्थानांकडे लक्ष पुरवणे जास्त गरजेचे आणि श्रेयस्कर असते. इतरांच्या गुणांची टक्केवारी पाहून खट्टू होण्यापेक्षा आपल्या गुणांची टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असते. मी अमकीसारखी का नाही असे वाटून निराश होण्यापेक्षा आपली ओळख आपण स्वत:ला पटवून देण्यात यशस्वी झालो पाहिजे. विचारांच्या उंचीने मानसिक खुजेपणावर आपल्याला मात करता आली पाहिजे. आपल्या मनाच्या आरशात आपल्याला आपले रूप उजवे वाटले पाहिजे. कोणतेही वर्गीकरण, भेदाभेद, गंड, स्पर्धा यांपलीकडे जाऊन आपल्याला स्वत:ला पाहता आले पाहिजे. 
 बुद्धी ही एक अशी गोष्ट निसर्गाने मानवाला बहाल केली आहे की जिच्या सुयोग्य वापराने त्याला स्वत:च्या आयुष्यात नंदनवन फुलवता येईल. सुबुद्धी ही मानवाला धन विचारांप्रत नेईल तर कुबुद्धी किंवा दुर्बुद्धी त्याला ऋण विचारांप्रत नेईल. आपल्या मनातील विचारांचे पुस्तक उघडून ऋण विचारांची पाने ज्याक्षणी माणसाला सहजगत्या उलटता येतील त्याक्षणी पानापानागणिक धन विचारांचे संचित त्याच्या आयुष्यात वसंत आणेल.   




 

No comments:

Post a Comment