Wednesday 1 February 2012

कथा चौघींची.........


मीरा, कांचन, प्रणाली आणि दीप्ती कल्याणकडून सी.एस.टीकडे असा नोकरीच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्या! चौघीही विवाहित. प्रवासाच्या निमित्ताने रोज एकमेकींशी भेट होत राहिली आणि त्याचे गाढ मैत्रीत रुपांतर झाले. आचार-विचारांची नाळ जुळली आणि मैत्रीचे धागे घट्ट होत गेले. सार्वजनिक सुट्ट्या नकोशा वाटायला लागल्या. लोकलचे वेळापत्रक अनेक वेळा बिघडले पण एकमेकांशी भेटण्याचे वेळापत्रक त्यांनी बिघडू दिले नाही.  
आज मीराचा वाढदिवस होता. लोकलमध्ये जागा पटकावल्यानंतर कांचन, प्रणाली आणि दीप्ती यांनी मीराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही वेळाने डबे उघडले गेले. पुलाव, थालीपीठ आणि गोड शिऱ्याचा वास सगळ्या डब्यात दरवळला. मीराच्या आवडीचे पदार्थ आवर्जून केले गेले होते. मीराची वाचनाची आवड लक्षात ठेऊन तिच्यासाठी छान पुस्तके आणली होती. मीराला भरून आले. तिच्या सासरी तिच्या वाढदिवसाला काडीइतकेही महत्व नव्हते किंबहुना तिचा वाढदिवस कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. घर नवरा, सासू-सासरे, दीर-नणंद यांनी भरलेले असूनही ती एकटीच होती. नवऱ्याची हुकुमशाही, सासूच्या तोंडाचा दांडपट्टा, नणंदेचे कुजकट शेरे ती निमुटपणे लग्न झाल्यापासून सहन करत होती. दीर त्यामानाने वागायला जरी बरा असला तरी कौटुंबिक गोष्टींत अजिबात लक्ष घालणारा नव्हता. तो जास्तीत जास्त वेळ घराच्या बाहेरच असायचा.  आई-वडील हयात नसल्याने तिला भावनिक आधार द्यायलाही कुणी नव्हते. तशातच कांचन, प्रणाली आणि दिप्तीशी ओळख झाली आणि एकाकीपणाच्या भावनेचा लवलेशही राहिला नाही. प्रासंगिक सुख-दु:खांची, विचारांची देवघेव होत राहिली आणि मनाला उभारी आली. मीराच्या पाणावलेल्या डोळ्यांनीच तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणींचे अनौपचारिक आभार मानले. 
कांचनच्या माहेरी तिचे फक्त आई -वडील. तिला भावंड नव्हते. त्यात कांचनची आई हृद्रोगाने आजारी. घरी तिची शुश्रुषा करायला, काळजी घ्यायला, जेवण करायला कुणी नाही. वडलांना झेपेल इतपत ते कामं करायचे. पण आईच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे, तिचं पथ्यपाणी सांभाळणे, वेळेवर औषधे देणे याची व्यवस्था तिलाच करायला लागायची. आईचा आणि  वडिलांचा स्वयंपाक करणे आणि आईचे  औषधांचे, खाण्याचे, विश्रांतीचे वेळापत्रक लिहून ते वडिलांजवळ देणे हे तिला नित्यनेमाने करायला लागायचे. तिचं सुदैव एवढंच होतं की सासर आणि माहेर हाकेच्या अंतरावर होतं. नवरा बऱ्यापैकी समंजस होता पण तिच्या सासूला मात्र ती आईची सेवा करायला सारखी माहेरी जाते याचा खूप राग यायचा. त्या तिला बोलायची एकही संधी सोडायच्या नाहीत. ती मात्र खालमानेने त्यांची बोलणी ऐकत घरातील कामे हातावेगळी करत रहायची. सासरची आणि माहेरची अशी दुहेरी कसरत तिला सतत करायला लागत होती आणि त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत होता. पण मैत्रिणी भेटल्या की तिला होणारा मानसिक त्रास कुठल्या कुठे पळून जात असे. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर , आपलं मन मोकळं केल्यावर तिला खूपच हलकं वाटायचं आणि त्या क्षणी तरी ती आपल्या सुखाचा हेवा करायची. 
प्रणालीचे लग्न होऊन चार वर्षे लोटली होती. तिला मूल होत नव्हते. वैद्यकीय प्रयत्न चालूच होते पण प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नव्हते. घरी रोज एकदा तरी या विषयावर चर्चा व्हायची. जणू यात आपलाच दोष आहे अशा प्रकारची अपराधी भावना तिला वाटू लागायची. सण-समारंभांना गेल्यावरही कोणाकडून तरी या विषयाची तार छेडली जायची. विशेषकरून  डोहाळजेवणाचे किंवा बारशाचे बोलावणे आले की ती मनोमन घाबरून जायची. तिला कुठेच जाणे नकोसे वाटायचे. माहेरी गेली की हाच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून तिला आई बेजार करायची. नातेवाईक मंडळींच्या नजराही आताशा तिला खटकायला लागल्या होत्या. तिचं आई होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात केव्हा उतरणार याचं समाधानकारक उत्तर कुणाकडेही नव्हतं. तिचं नैराश्य, तिचं वैफल्य मैत्रिणी समजून घेऊन तिला वेळोवेळी धीर देत होत्या. तिच्यासाठी आपापल्या कुलदैवतेकडे प्रार्थना करत होत्या. ती सदैव प्रसन्न, आनंदी राहावी म्हणून प्रयत्न करत होत्या. त्यामुळे मैत्रिणींचा आधार तिला सगळ्यात जवळचा वाटत होता. 
दीप्तीची कहाणी वेगळीच होती. तिच्या सासरी ती, नवरा आणि सासरे एवढीच माणसे. नवऱ्याला कामानिमित्त बऱ्याचदा टुरिंग असायचे. नवरा घरात असताना ती खुशीत असायची पण तो बाहेरगावी गेल्यानंतर तिला एकदम असुरक्षित वाटायचे. तिच्या सासऱ्याची नजर चांगली नव्हती. त्यामुळे ती स्वयंपाकघरात असताना ते आले की एकदम सावध व्हायची. मोबाईल ती सतत जवळ बाळगायची. त्यांचा घरातला वावर तिला विलक्षण अस्वस्थ करत होता. ती कामापुरतं जुजबीच त्यांच्याशी बोलायची आणि काम होताच आपल्या बेडरूममध्ये शिरून दाराला आतून कडी लावून घ्यायची. अशा अनेक रात्री तिने इच्छेविरुद्ध जागत काढल्या होत्या. आई-बाबांना या वयात चिंता नको म्हणून ती त्यांना काही सागत नसे आणि नवऱ्याला सांगितले तरी तो यावर कितपत विश्वास ठेवेल याबद्दल ती साशंक होती. शिवाय आपल्या नवऱ्याचे आणि आपले संबंध यामुळे बिघडू नयेत म्हणून ती अनेकदा बऱ्याच गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवायची. मीरा, कांचन, प्रणालीशी बोलल्यानंतर तिला एकदम मोकळे वाटायचे. शिवाय घरी असते तसे मानसिक दडपण मैत्रिणींच्या सान्निध्यात जाणवायचे नाही. तिला लोकल आणि ऑफिस हीच सुरक्षित ठिकाणे वाटायची.  
सभोवतालच्या त्रासांना, संकटांना, समस्यांना तोंड देत या चौघींनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्यांची मैत्रीवरची श्रद्धा अतूट होती. एकमेकींच्या आधाराने त्यांना भेडसावत असलेले प्रश्न थोडे सुसह्य झाले होते. एकमेकींचा हात हातात घेऊनच त्यांना आयुष्यातील कोडी सोडवायची होती. सुंदर भविष्याची स्वप्ने रेखाटायची होती अन त्यासाठी त्या मैत्रीबद्ध होत्या.
सगळ्यांच्याच पायाखालची वाट मखमली नसते. वाटेवरील दगड-धोंड्यांतून,काट्यांतून अनेकांना मार्गक्रमणा करावी लागते. अशावेळी गरज भासते ती सोबतीची. डोईवरील दाहकता सुसह्य करणाऱ्या क्षणांची. मनाला सुखावणाऱ्या शितलतेची. जखमेवर अलगदपणे पसरत जाणाऱ्या एखाद्या मलमाची. चित्तवृत्ती उल्हासित करणाऱ्या एखाद्या लकेरीची. अशावेळी प्राजक्ताच्या सड्याची सौंदर्यानुभूती अशी निखळ मैत्री देते आणि चिखलातून स्वत:चे अस्तित्व टिकवत इतरांना निर्मळ आनंद देणाऱ्या कमळाचे रहस्य आपल्याला उमगून जाते. 

No comments:

Post a Comment