Sunday 26 February 2012

'ब' बोले तो ...........


अ : घड्याळात किती वाजले? 
ब : माझ्या मनगटावरील घड्याळात तासकाटा आणि मिनिटकाटा रोमान्स करत आहेत.
अ : खानमंडळींची पडद्यावरील कहाणी कधी संपणार?
ब : कोलकत्याची 'कहानी' सुरु झाल्यावर. ( आमी शोत्ती बोलची )
अ : वरण कसं झालंय?
ब : युतीसारखं. दिसतंय तर एकत्र पण डाळीचा आणि वरच्या पाण्याचा काडीमोड झालाय असं बघणाऱ्याला वाटावं.
अ : हे हॉटेल कसं वाटतंय?
ब : इथे हाताच्या बोटांचा थर्मामीटर पाण्यात न रुतवणारे वेटर्स असतील असं वाटतंय.   
अ : राजकारण्यांच सामान्यांवर एवढं वजन का पडतं?
ब : खाऊन खाऊन वजन वाढणारच की!
अ : सगळ्यात उत्तम खेळ कोणता?
ब : धोबीपछाड .
अ : कुठल्याही एका पाळीव प्राण्याचे नाव सांग.
ब : पोलीस.
अ : रस्त्यावरचे खड्डे कधी भरले जाणार?
ब : नगरसेवकांचे  खिसे भरले की.
अ : सगळ्यात स्वस्त काय?
ब :  मरण.
अ : देशाला स्वातंत्य्र मिळून उपयोग काय झाला?
ब : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची सोय झाली.
अ : काय गहाण टाकणं सगळ्यात सोपं?
ब : बुद्धी.
अ : लग्नसमारंभातील आवडती गोष्ट कोणती?
ब : 'Presents in blessings only' हा लग्नपत्रिकेवरील संदेश.
अ : रेल्वेचे 'मेगाब्लॉक' प्रकरण कधी संपणार?
ब : सरकारने 'एन्जिओप्लास्टी' केली की.
अ : 'राग' हा शब्द ठाऊक नसलेला माणूस.
ब : मनमोहन सिंग 
अ : माणसातील परमेश्वर कोण?
ब : परमेश्वर गोदरेज
अ : 'स्थितप्रज्ञ' कोणाला म्हणावे?
ब : जो इतरांच्या समस्यांकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतो त्याला.
अ : दवाखान्याला पर्यायी शब्द कोणता?
ब : कत्तलखाना 
अ : सत्तेसाठी काय करावे लागते?
ब : मेतकुट 
अ : आंधळा कोणाला म्हणावे ?
ब : ज्याला रस्त्यावर चालताना खड्डे दिसत नाहीत, ज्याला रेल्वेची बंद पडलेली CVM कूपन्सची मशीन्स दिसत नाहीत, ज्याला महागाईशी झुंजताना आम पब्लिक दिसत नाही, ज्याला रिक्षावाल्यांचा मुजोरपणा दिसत नाही, ज्याला पाण्यासाठी मैलोनमैल अनवाणी पायांनी चालणाऱ्या ग्रामीण महिला दिसत नाहीत, ज्याला शेतकरी, विद्यार्थी, वैफल्यग्रस्त लोकांनी केलेल्या आत्महत्या दिसत नाहीत, ज्याला स्वजनांचे त्रस्त दैनंदिन जीवन दिसत नाही त्या प्रत्येकाला.  
अ : हुशार कोणाला म्हणावे?
ब : ज्याला आपला 'ढ' पणा 'en-cash' करता येतो त्याला . 
अ : खरा भक्त कोणाला म्हणावे?
ब : ज्याची भक्ती खोटी असून भक्तीचा देखावा खरा असतो त्याला.
अ : अर्जुनाइतके एकाग्र कोण?
ब : सगळेच राजकारणी. कारण त्यांना खुर्ची सोडून इतर काहीही दिसत नाही.
अ : पुणेरी बोली कशी तयार होते?
ब : अंबाडीच्या भाजीचा आंबट-हिरवटपणा अधिक आवळ्याचा तुरटपणा अधिक खोबऱ्याचा खवटपणा आणि मिऱ्याचा मिरमिरीतपणा मिळून. 
अ : गंगा नदीचे वैशिष्ट्य काय?
ब : ( खेदाने ) तिथे आंघोळ करून आलेल्या लोकांना 'त्वचारोगतज्ञाची' गरज भासते.
अ : पंजाबी आणि मद्रासी लोकांमध्ये काय फरक आहे?
ब : जो करीना कपूर आणि विद्या बालन मध्ये आहे तो. 
अ : साहित्य संमेलनांत काय बघायला मिळते?
ब : जे सर्कसमध्ये बघायला मिळते तेच.
अ : देवाला सोन्या-चांदीने लोक का मढवतात?
ब : कारण भक्तीची माणके हृदयात नसतात म्हणून.
अ : साडेसाती कोणकोणत्या प्रकारची असते?
ब :  विद्यार्थ्यांना परीक्षांची, सत्ताधाऱ्यांना विरोधकांची, प्रवाशांना वाहनांची, ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची,  आजाऱ्यांना डॉक्टरांची, पादचाऱ्यांना रस्त्यांची,  कंपनीचालकांना संपाची, सरकारला करबुडव्यांची, घटस्फोटीतांना कोर्टाची आणि देशाला देशद्रोह्यांची.
 

No comments:

Post a Comment