Friday 15 June 2012

The Laws of Spirit World - अर्थात आत्म्याच्या जगाचे नियम

दिवंगत खुर्शीद भावनगरी यांचे हे पुस्तक आहे. शामक दावर या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकाची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. माणसाच्या बुद्धीच्या परीघाबाहेरील अनुभव या पुस्तकात कथन केलेले आहेत. मानवाची दृष्टी जिथपर्यंत पोहोचते तेवढेच हे जग सीमित नसून सामान्य माणसाच्या दृष्टीपथात न आलेले सर्वस्वी भिन्न असे जग अस्तित्वात आहे हे सांगण्याचा प्रयास या पुस्तकाद्वारे केला आहे. या अनुभवांवर विश्वास ठेवणे अगर न ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हे पुस्तक लिहिलेले नाही तर माणसाच्या बौद्धिक कक्षेत न येणारे विश्व या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न खुर्शीद भावनगरी या लेखिकेने प्रामाणिकपणे केला आहे. 
दिवंगत रुमी आणि खुर्शीद या दाम्पत्याला विस्पी आणि राटो ही दोन अपत्ये होती. अगदी तरुण वयातच एका दुर्घटनेत त्यांचे निधन झाले आणि रुमी व खुर्शीद यांचे जगच उध्वस्त झाले. मानसिक दृष्ट्या हे दोघे पुरते खचून गेले. सैरभैर झाले. यापुढील आयुष्य जगत राहणे हे त्या दोघांना अशक्यप्राय झाले. जगण्याची उमेदच नष्ट झाली. विस्पी आणि राटोच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी एका सर्वस्वी अनभिज्ञ अशा दूताकरवी या दाम्पत्याला काही संदेश पाठवले गेले. सुरवातीस एखाद्या सर्व सामान्य माणसाची जशी प्रतिक्रिया असते तशीच प्रतिक्रिया रुमी आणि खुर्शिदची होती. ज्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या आवाक्यात येत नाहीत त्या गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवायची कुणाचीच तयारी नसते. परंतु या दूताकरवी सांगितल्या गेलेल्या काही गोष्टी इतक्या आश्चर्यकारक आणि अचूक होत्या की रुमी आणि खुर्शीद या दाम्पत्याला त्यावर विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. त्यांची मुले विस्पी आणि राटो रुमी आणि खुर्शीद यांच्याशी संपर्क करू पाहत होती. आम्ही या जगात खूप सुखी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करू पाहत होती. रुमी आणि खुर्शीदच्या खचलेल्या मनाला उभारी आणू पाहत होती. त्यांच्या इहलोकातील जगण्याचे प्रयोजन अजून संपलेले नाही हे त्यांना पटवून देऊ पाहत होती. 
मर्त्यलोकातील तसेच देहापलीकडील अवस्थेतील जग नियंत्रित करणारी एक वैश्विक शक्ती आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे शरीराला मृत्यू असतो पण शरीरातील चैतन्याचा स्त्रोत मात्र अक्षय असतो. नियोजित वेळी हे चैतन्य मानवी शरीराची साथ सोडते आणि या चैतन्याचा म्हणा किंवा आत्म्याचा पुढील प्रवास सुरु होतो. अनेक जन्मांनी संस्कारित झालेला हा आत्मा असतो. काही विशिष्ट प्रयोजनाकरिता पुनश्च हा आत्मा शरीर धारण करत असतो. सुखदु:खाचे अनेक भोग भोगत असतो. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे पुण्याचा तसाच पापाचा संचय होत असतो. सतकृत्य केल्याचे पुण्य जसे पदरी जमा होते तसे दुष्कृत्य केल्याचे वाईट कर्मही ज्याच्या त्याच्या खात्यात जमा होते. इहलोकात आर्थिक प्रगतीनुसार माणसाची पत ठरते तर मृत्युपलीकडील लोकात पारमार्थिक प्रगतीनुसार आत्म्याची पत ठरत असते. प्रपंचात राहून ज्याला त्या महावैश्विक शक्तीशी आपल्या कर्माने, वर्तनाने, आचरणाने जवळीक साधता आली ती व्यक्ती मृत्यूपश्चात चांगल्या स्तरावर ( लेव्हलवर )  पोहोचू शकते. 
एकूण सात स्तर असतात. परंतु स्पिरीट सोल हा स्तर प्राप्त होण्यासाठी मानवी आचरणही तसेच लागते. इहालोकापासून या स्तरापर्यंत काही इतर स्तरही असतात. आत्मा जितका सुसंस्कारित तितके उन्नत स्तर या आत्म्याला लाभतात.  सहाव्या आणि सातव्या स्तरातील सोल्स पुन्हा मानवी शरीर कधीही धारण करत नाहीत. त्यांची वाटचाल मोक्षाकडे असते. पहिल्या स्तरातील सोल्सचे जिणे अत्यंत हलाखीचे,भीषण आणि कष्टप्रद असते. आपापल्या कर्माप्रमाणे मृत्यूपश्चात माणसाला हे स्तर मिळत असतात. 
या जगातील अनेक थोर संतांनी माणसाला प्रपंचात राहूनही पारमार्थिक प्रगतीची कास धरायला सांगितली. माणुसकी हा धर्म प्रामाणिकपणे आचरण्यास सांगितला. अभिमान, अहंकार, क्रोध, द्वेष, सूडबुद्धी, लोभ, वासना या रिपूंचा त्याग करायला सांगितला. स्व-स्वरूपाला, स्वत:त वसलेल्या चैतन्याला ओळखण्यास सांगितले. माणसातील प्रेमाचा झरा वाहता ठेवण्यास सांगितले. कारण ते केवळ संत नसून द्रष्टे होते. मानवजातीच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी या थोर संतांनी जन्म घेतला होता. सर्वधर्मसमभाव हाच या संतांचा पिंड होता. संत कबीर गेल्यानंतर ते हिंदू होते की मुसलमान यावरून गदारोळ झाला आणि त्यांच्या देहाच्या जागी फुले आढळून आली यापेक्षा धर्मनिरपेक्षतेचा अधिक सबळ पुरावा कोणता? 
या आत्म्याच्या विश्वात कोणत्याही विशिष्ट धर्माला स्थान नाही. इहलोकात धारण केलेल्या शरीराने जो पाप-पुण्याचा संचय केला असेल त्यानुसार त्या आत्म्याची गती ठरत असते. दुसऱ्याला दिलेल्या दु:खानुसार, क्लेशानुसार त्या आत्म्याचे अध:पतनही  ठरलेले असते. आत्मा हा सर्वसंचारी असतो पण शरीर मात्र जडतेने बद्ध असते. आचार-विचार, सभोवतालची परिस्थिती यातून माणूस घडत असतो हे खरे परंतु अशी विशिष्ट अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती लाभण्यामागे माणसाची पूर्वकर्मे असतात. 
विस्पी आणि राटो या दोघांनी सुरवातीस एका माध्यमामार्फत आणि नंतर थेट खुर्शीदशी संपर्क साधून या आत्मांच्या जगातील अनेक रहस्ये कथन केली. खुर्शिदच्या हातातील लेखणीद्वारे हे दोघे आत्म्याचे अनोखे जग विशद करत गेले आणि वरील पुस्तकाचा जन्म झाला. हे बरोबर आहे की चूक, खोटे की खरे, विश्वसनीय की अविश्वसनीय हा उहापोह इथे अप्रस्तुत आहे. पण त्या दोघांनी जे कथन केले आहे ते खचितच समस्त मानवजातीस उपकारक आहे यात शंका नसावी. जिज्ञासूंनी वरील पुस्तक  जरूर वाचून प्रत्यक्ष पडताळा घ्यावा एवढीच इच्छा आहे. 

1 comment: