Wednesday 6 June 2012

बॉम्बस्फोट



बॉम्बस्फोट होतात. माणसे मारतात. लुळी-पांगळी होतात. शारीरिक आणि मानसिक आघाताने खचून जातात. आपण टी.व्ही.वरील दृश्ये पाहून अथवा पेपरातील बातम्या वाचून क्षणभर हळहळतो. नंतर कामाच्या व्यापात आणि काळाच्या ओघात या घटना इतिहासजमा होतात. परंतु परिस्थितीची ही टांगती तलवार नेमकी कुणावर, कसा आणि कधी घाला घालेल याचा काही नेम नसतो. यावर भाष्य करणारी प्रस्तुत कविता .......   



पळा पळा सारे बॉम्बस्फोट झाला  
जीव नुसता घाबरून अर्धमेला झाला
अंधार किंकाळ्या सर्वत्र धूर
कानांना दडे , रक्ताचा पूर
कुठेही कसाही दैवाचा घाला |
पळापळ, रडारड, जीवाची तडफड 
काळजाचे पाणी, सुटकेची धडपड
अमानुष वृत्तीचा कडेलोट झाला |
सामन्यांच्या जीवाला क्षणोक्षणी घोर
येईल का सुखरूप घरी माझे पोर?
नाठाळांच्या हाती विध्वंसाचा पेला |
माणुसकीच्या छाताडावर क्रौर्याचे तांडव
पदराआड लपले शासकीय पांडव
पोलिसी खाक्याही हतबल झाला |
रुग्णालयाशी राजकारणी दाटी
खाटेपाशी थांबते सांत्वनाची गुटी 
नोटांची फुंकर हळव्या मनाला |
आरोप-प्रत्यारोपांची नांदी
दृश्यांचे भांडवल, वाहिन्यांची चांदी
घायाळांचे सोयरसुतक कुणाला? 
संघटना स्वीकारतात जबाबदारी
त्यांच्या हाती आपल्या श्वासांची दोरी
निष्पापांचे जीव लागतात पणाला | 
लोकशाही राज्यातील असे हे आयुष्य
जीवनाचे न पेलणारे झाले धनुष्य
तयार व्हा कधीही समर्पणाला |

No comments:

Post a Comment