Monday 18 June 2012

प्रतिमा उरी धरोनी ............

मानवी मन हे संवेदनशील असतं. त्यांचं स्वरूप हे एखाद्या टीपकागदासारखं असतं. बाह्य जगाकडून ज्या काही प्रतिमा त्याला बहाल केल्या जातात त्या त्याच्याकडून जशाच्या तशा स्वीकारल्या जातात. स्वत:चं प्रतिबिंब जोवर आपण मनाच्या स्वच्छ आणि पारदर्शक आरशात निरखून पाहत नाही तोवर त्यात दडलेल्या सौंदर्याची अनुभूती आपल्याला घेता येत नाही. 
मन आपलं असतं, पण त्यात समाविष्ट होणाऱ्या विचारांमागील प्रयोजन लक्षात न घेता आपण त्यांना आपल्या मनात थारा देत असतो. उदा. तू रंगाने काळी आहेस हा दुसऱ्याचा विचार आपण स्वीकारतो. त्यामागील दुसऱ्याची आपल्याला कमी लेखणारी, हिणवणारी भावनाही आपण स्वीकारतो. त्याचा हेतू आपल्याला दुखावण्याचा, आपली मानहानी करण्याचा असू शकतो. ज्या क्षणी आपण त्याने आपल्याकडे प्रवाहित केलेला हा विचार मनाने स्वीकारतो त्या क्षणी आपल्या मनातील आपल्या प्रतिमेचे पतन होते.    आपला काळा वर्ण आपल्याला अधिकच जाचू लागतो. आपले रेखीव नाक-डोळे, आपले निर्व्यंग, सुदृढ शरीर, आपली तीक्ष्ण बुद्धी या धन प्रतिमांचा आपल्याला विसर पडतो. काळ्या या एकाच रंगात आपण आपले चित्र चितारतो. या एका ऋण प्रतिमेने आपल्या मनाचे खच्चीकरण होते आणि आपण जगाच्या दृष्टीने स्वत:ला न्यूनपूर्ण, कमनशिबी, अयोग्य ठरवतो. 
आपल्या घरातच रंग-रूपावरून, बौद्धिक क्षमतेवरून, शारीरिक उंचीवरून, शक्तीवरून केले जाणारे संमिश्र विचार आपल्या कानावर आदळत असतात. यातील काही विचार आपल्याकरिता धन असतात तर काही ऋण असतात. मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात आपल्याला विशिष्ट अशी लेबले लावली जातात. शिक्षकांनी त्यांच्या डोळ्यांवर चढवलेल्या वेगवेगळ्या प्रतीच्या चष्म्यानुसार त्यांना विद्यार्थी प्रतीत होतात. हे सर्व धन वा ऋण विचार संवेदनशील मनात प्रवाहित होण्यास अजिबात वेळ लागत नाही. पैकी ऋण विचार मनात लवकर आणि खोलवर रुजतात. ह्या इतरांच्या विचारांच्या आधारे आपण आपले व्यक्तिमत्व पारखू लागतो. शालेय अभ्यासात इतरांच्या दृष्टीने स्कॉलर असलेला मुलगा अहंगंडात्मक विचार मनात रुजवतो तर इतरांच्या दृष्टीने ढ असलेला मुलगा न्यूनगंडात्मक विचार मनात रुजवतो. 
या प्रतिमांचा आपल्या पुढील आयुष्यात आपल्याला किती सकारात्मक उपयोग होतो हे कोणी प्रांजळपणे सांगू शकते का? आपण जी विद्या ग्रहण करतो किंवा जी विद्या आपल्याला परीक्षेपुरती शिकवली जाते ती त्या त्या वेळेपुरती महत्वाची असते. विद्या ग्रहण केली जाते अर्थार्जन हेतूने परंतु विचार ग्रहण केले जातात व्यक्तिमत्व घडण्याच्या हेतूने. आपला काळा रंग आपल्याला बौद्धिक अथवा शारीरिक दृष्ट्या विकल करू शकत नाही. आपला बुटकेपणा एव्हरेस्ट चढण्याच्या आड येऊ शकत नाही. हे आपल्याला माहित असूनही आपण असे दुसऱ्यांचे आपल्याबद्दलचे विचार मनात शोषून घेतो, या ऋण प्रतिमा स्वत:च्याच असल्यागत त्यांना आपल्यावर अधिराज्य गाजवू देतो.  
आपल्या मनात ठसलेली आपल्याबद्दलची ऋण प्रतिमा हळूहळू फोफावत जाते. आपण कोणत्याही योग्यतेचे, लायकीचे नाही,आपल्यातील कमतरतेमुळेच आपण सगळीकडे नाकारले जातो, आपल्याकडे कोणतीही क्षमता नाही असे वारंवार वाटू लागते. परिणामी आपला आत्मविश्वास लयाला जातो आणि आपण म्हणजे या विश्वाच्या पसाऱ्यातील अडगळ आहोत ही भावना वाढीस लागते. जी प्रतिमा आपल्याला नैराश्याच्या खाईत लोटते ती प्रतिमा आपल्याला उपकारक कशी होऊ शकेल असा साधा विचारही आपण त्या क्षणी करण्यास असमर्थ ठरतो. 
आपल्या मनातील आपली प्रतिमा ही आशावादी, प्रकाशदायी, उन्नत व दृढ असायला हवी. ती अढळ हवी. येणाऱ्या- जाणाऱ्याने आपल्याला वाट्टेल ती लेबले लावावीत आणि आपण अंतर्मनाची कवाडे उघडून त्यात ती वर्षानुवर्षे साठवून ठेवावीत असे होता कामा नये. आपल्याला न पटणारे दुसऱ्याचे विचार ऐकणे व स्वीकारणे ह्यात मुळात फरक आहे. आपण एखाद्या गोष्टीसाठी योग्य आहोत की अयोग्य याची निवड आपणच करायची असते. जशा दुसऱ्याच्या आवडी-निवडी आपल्या होऊ शकत नाहीत तसेच दुसऱ्याचे विचारही आपले असू शकत नाहीत. इतरांनी त्यांच्या प्रज्ञेद्वारे लादलेल्या आपल्याबद्दलच्या प्रतिमा स्वीकारणे आपल्याला खचितच बंधनकारक नसते. आपले व्यक्तित्व, आपले मन, आपले विचार यांच्याशी आपण परिचित असतो, इतर नव्हेत. 
इतरांनी दिलेल्या ऋण प्रतिमा स्वीकारून आपले अवघे आयुष्य त्या प्रतिमांच्या सोबतीत व्यतीत करणे हा आत्मघात आहे. हा आत्मक्लेशाचा व्रण उरी घेऊन जगत राहणे ही स्व-प्रतिमेची अवहेलना आहे. कारण ही प्रतिमा वांझ आहे. ह्यात कोणतीही आनंददायी निर्मिती नाही, सृजन नाही. ह्यात आशेचा अंकुर नाही. ह्यात प्रतिभेला फुटणारा धुमारा नाही. ह्यात स्व-प्रकाशक किरणे नाहीत की चैतन्याची कारंजी नाहीत.  
निजस्वरूपाला ओळखणे म्हणजेच परमेश्वराला ओळखणे हे ज्ञात असलेल्यांनी ह्या परकीय प्रतिमांना चातुर्याने चार हात लांब ठेवणे सर्वार्थाने हितकर आहे. 



No comments:

Post a Comment