Sunday 22 November 2015

माझे दादा आजोबा …

'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' असे समजण्याचा तो काळ होता. समस्त वडीलधारयांचे या विषयी एकमत होते. आपण खाल्लेल्या माराचा आणि प्राप्त होणाऱ्या विद्येचा अर्थाअर्थी काहीही  संबंध नाही हे कळेपर्यंत आमचे शालेय जीवन संपुष्टात आले होते. मी दादा आजोबांच्या म्हणजेच शिवराम त्रिंबक तळवलकरांच्या मार्गदर्शनाखाली कमी आणि धाकाखाली जास्त मुळाक्षरे गिरवली. माझे हस्ताक्षर  जास्तीत जास्त चांगले करण्याचा आजोबांनी जणू विडाच उचलला होता. त्यामुळे मी जे काही उत्तम हस्ताक्षर काढू शकले त्याचे संपूर्ण श्रेय दादा आजोबांना जाते. आपले हस्ताक्षर सुधारले म्हणून आपली डॉक्टर व्हायची दारे बंद झाली असे मला उगाचच वाटायचे. डॉक्टरांचे ते अगम्य भाषेत व गिचमिड अक्षरात लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन जर आजोबांनी कधी वाचलं असतं (वाचलं असेलही ) तर त्या डॉक्टरची धपाट्याने पूजा करून त्यांना बाराखडी पुन्हा पुन्हा गिरवायला लावली असती.                 
त्या काळी बालमोहन शाळेत आम्हाला दिवाळीचा व नाताळचा असा स्वतंत्र अभ्यास असायचा. नेहमीच्या गृहपाठा व्यतिरिक्त वेगवेगळ्या माहितीचे संकलन आणि त्यानुसार चित्रे काढणे अथवा चिकटवणे हे अपेक्षित असायचे. संपूर्ण वहीची सजावट जितकी उत्तम तितकी बक्षीस मिळण्याची शक्यता जास्त! या कामात माझी भिस्त पूर्णपणे दादा आजोबांवर असायची. वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिली वापरून गोळा केलेली माहिती माझ्याकडून सुवाच्य अक्षरात लिहून घेणे, चित्रे काढणे आणि चिकटवणे व वहीची सजावट करणे हे काम आजोबा आवडीने करायचे. आजोबांनी माझ्या वह्यांवर घेतलेल्या परिश्रमांमुळे माझी बक्षिसे कधी फारशी चुकली नाहीत.          
दादा आजोबांचे प्रत्येक काम सुबक असायचे. अत्यंत नीटनेटके. शिस्तीचे. 'मुलांना कधी मारू नये' असा प्रेमळ सल्ला देणारे हितचिंतक तेव्हा समाजात निर्माण झाले नसावेत बहुधा. शिस्तीचा बडगा दाखवण्याबाबत सर्व वडीलधारी मंडळींचे जणू ऐक्य असायचे. मुलांना वठणीवर आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खरपूस मार याबद्दल दुमत असायचं घरीदारी कारणच नव्हतं. त्यात आजोबा शीघ्रकोपी. त्यामुळे हस्ताक्षर नीट आले नाही, खा मार. बेरीज चुकली, खा धपाटा असा 'खाऊ' सातत्याने मिळायचा. पण हेच आजोबा आजीने दिलेला खाऊचा डबा घेऊन रोज माझ्या शाळेत यायचे. मधल्या सुट्टीतील खाऊचा डबा भोपटकरांचा आणि शाळा संपल्यावरचा तळवलकरांचा. मग मी आजोबांबरोबर आजीने दिलेला खाऊ खात रमत गमत लक्ष्मीनारायण बाग येथे माझ्या आजोळी जायचे. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आजोळीच जास्त असायचे.        
 पानात टाकलेले आजोबांना अजिबात चालायचे नाही. ते स्वत: अतिशय सुंदर जेवायचे. पानावर बसले की प्रथम चित्राहुती व नंतर प्रोक्षण करून जेवण सुरु. पहिला भात, मध्ये पोळी वा भाकरी आणि नंतर दही किंवा ताक भात. भाकरीचा पापुद्रा अलगद उचलून त्याला तूप-मीठ लावणे, ताटातील प्रत्येक पदार्थाला योग्य तो न्याय देत त्यांचे जे जेवण चालायचे ते खरोखरीच प्रेक्षणीय असायचे. आजोबांची पूजाही साग्रसंगीत. देवांना आंघोळ घालणे, मलमलच्या तलम कापडाने देव पुसणे, गंध उगाळणे, फुलांना गंधाक्षता लावून ते देवांना अर्पण करणे, दुध-साखरेचा नैवेद्य दाखवणे, स्तोत्र-आरती अशी त्यांची सुमारे एक-दिड तास विधिवत पूजा चालायची.               
स्वत:चे धोतर स्वच्छ धुवून वाळत घालण्याचा त्यांचा सोहळा देखणा असायचा. एकही सुरकुती न पाडता, चोख निरी करत ज्या पद्धतीने ते धोतर वाळत घालायचे ते बघत रहावसं वाटायचं. आजीला तांदूळ निवडण्यात आजोबा मदत करायचे. तांदळातील प्रत्येक भातकण अंगठ्याच्या नखाने अलगद सोलून त्यातून तांदळाचा अख्खा दाणा ते वेगळा काढायचे. लसूण सोलण्यातले त्यांचे कसब सुद्धा वाखाणण्यासारखे होते. पालेभाज्याही ते उत्तम निवडायचे.           
पत्त्याचा डाव लावणे हा आजोबांचा विरंगुळा होता. पण त्यांना पेशन्स कमी असल्याने मनासारखा डाव लागला नाही की पत्ते फेकून द्यायला ते मागेपुढे बघत नसत. माझे बरेचसे बालपण दादा आजोबांच्या सान्निध्यात गेले. त्यांनी माझ्या अक्षराला लावलेले सुबक वळण, माझा घेतलेला अभ्यास, मला बक्षीस मिळावे म्हणून दिवाळी-नाताळच्या वहीच्या सजावटीवर घेतलेली मेहनत ह्या गोष्टी माझ्या लेखी आनंदाचा ठेवा आहेत. माझ्याकडून श्लोक म्हणून घेणे, पाढे म्हणून घेणे, पाठांतर करवणे ही कामेही ते नित्यनेमाने पार पाडीत. कालांतराने माझ्या अभ्यासाची जबाबदारी माझ्या मामाने त्याच्या अंगावर घेतली खरी पण आजोबांबरोबर गिरवलेली मुळाक्षरे, त्यांच्याबरोबर शाळेतून येताना खाल्लेला खाऊ, पाठ केलेले पाढे आणि श्लोक, निजताना त्यांचा डोक्यावर जाणवणारा हळुवार हात  ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे.              
 आजही अनेक वेळा कच्चं लिखाण करताना अक्षर वेडंवाकडं आलं, जे येतंच की वाटतं, दादा आजोबा हळूच मागून येतील आणि पाठीत धपाटा घालत म्हणतील, काय हे अक्षर! असं शिकवलं मी? गधडे किती वेळा सांगायचं तुला? पण आता ते दादा आजोबांचे रागाने किंवा कौतुकाने बघणारे डोळे नाहीत, चांगल्यासाठी उगारला जाणारा हात नाही की बघत राहावे असे त्यांचे नेटके हस्तकौशल्यही नाही. उरल्या आहेत त्या फक्त पिठीसाखर आणि साजूक तुपात घोळवलेल्या त्यांच्या सायीसारख्या तलम आठवणी!                   

No comments:

Post a Comment