Tuesday 17 November 2015

मुग्ध करणारी सूरमयी मुग्धा


व्यासपीठावर वयाने ज्येष्ठ आणि सांगितिक अनुभवाने संमृद्ध अशा गायकांची मांदियाळी दाटली आहे. या गायकांमध्ये अवघी १०-१२ वर्षांची एक छोटी गायिका बसली आहे. गोरी गोरी पान, नाच रे मोरा किंवा जास्तीत जास्त एका तळ्यात होती अशी काही गीते तिच्या वयाला आणि गळ्याला साजेशी अशी ऐकू येतील असे वाटते न वाटते तोच  तिचा खणखणीत आवाज अवघ्या श्रोतृवर्गाचा कब्जा घेतो आणि पुढील दहा एक मिनिटे 'पद्मनाभा नारायणा'च्या सुरावटीत समस्त रसिकांना अक्षरश: न्हाऊ घालतो. तिच्या सांगितिक जाणीवेने स्तिमित व्हावे असा हा क्षण! 
आपल्या डोळ्यांसमोर असते ती 'सारेगमप' मधील छोटीशी, खळखळून हसणारी, बालगीतांत रमणारी मुग्धा! 'सारेगमप' मधील तिचा प्रवास संपल्यावर तिने कमावलेलं सुरांचं ऐश्वर्य जसजसं कानावर पडत जातं तसतसं चकित व्हायला होतं. तिशी-चाळीशी-पन्नाशीला आल्यानंतर अथक रियाजातून जी परिपक्वता गळ्यातील सुरांना येते आणि त्यातून मग जे गाणे श्रोत्यांसमोर साकारते ते गाणे आणि सुरांची ती परिपक्वता षोडशी पूर्वीच ज्या मुग्धाने संपादन केली आहे ती ऐकताना आपण शब्दहीन होतो.   
तोडी रागातील 'सो हम हर डमरू बाजे' असो वा चारुकेशी तील 'हे सुरांनो चंद्र व्हा' असो वा भटियार मधील 'एक सूर चरचर छायो' हे निर्गुणी भजन असो, मुग्धाच्या गळ्यातून एकेक गाणे एकेका  रत्नासारखे बाहेर पडते आणि रसिकांच्या कानांवर गारुड करते. जोहार मायबाप, श्रीरंगा कमलाकांता, अमृताहुनी गोड किंवा अगदी अलीकडचे उगवली शुक्राची चांदणी असो, तिच्या गळ्याला काही अटकावच नाही. खणखणीत आवाज,सुस्पष्ट शब्दोच्चार, कसदार ताना आणि सुरलयीशी खेळण्याची प्रभावी हुकमत या भांडवलावर मुग्धा मैफिलीला लीलया आपलंसं करते. आवाजात कमालीचं माधुर्य. तिचा आवाज नाट्यसंगीतासाठी अतिअनुकुल असाच आहे. डोळ्यांत आत्मविश्वासाबरोबर एकवटून येणारं गाणं ठायीठायी जाणवत राहतं. हल्लीच्या मोबाईल हेच जगणे मानून चालणाऱ्या तरुणाईला तिच्या 'बोलावा विठ्ठल करावा विठठल' या गाण्याचा रिंगटोन करण्याचा मोह पडावा इतकं देखणं गाणं मुग्धापाशी आहे.नेमक्या जागा, गाण्याचं मर्म नेमकं हेरून ते सहीनसही व्यक्त करण्याचं तिचं कसब खचितच वाखाणण्यासारखं आहे. सायन्स शाखा तिच्या आवडीची आहे पण गाणं हा ध्यास आहे. त्यामुळे अभ्यासक्रम hectic वाटल्यास शाखा बदलण्याची तिची तयारी आहे. 'पियरवा घर आवो, घर आवो, ही तिची बागेश्रीतील बंदिशही लाजवाब!    
इतक्या लहान वयातच इतकी सांगितिक तयारी आणि प्रगल्भता पाहून अशी शंका येऊ लागते की गेल्या जन्मीच्या तिच्या सूरसंचिताचे तर हे 'carry forward' नाही ना? असो. तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि तिच्या गळ्यातून स्त्रवणाऱ्या मधुर स्वरांनी सगळ्या श्रोतृवर्गाची तृषा पुन्हा पुन्हा शांत होवो हीच सदिच्छा!             

No comments:

Post a Comment