Sunday 23 September 2012

रेल्वे स्टेशन आणि मी ........

आज माझा दादरला कवितांचा कार्यक्रम होता तोही दोन ठिकाणी. मी लगबगीने घरातील सारी कामे आवरली आणि निघण्याची तयारी करू लागले. जरा लवकरच निघायला हवे, मी मनाशी म्हटले. इथून बस किंवा रिक्षा जी काही आधी मिळेल ती पकडायला हवी. रिकामी रिक्षा अडवण्यासाठी लोक रस्ताभर पसरलेले असणार. आपल्या भाग्यात रिक्षा येण्यासाठी आपल्याला घरापासून किमान दहा-पंधरा मिनिटे चालावे लागणार. त्यापेक्षा बसचा ऑप्शन बरा. तिथे जाऊन भल्या मोठ्या रांगेत उभे राहायचे. समोर तीन-चार रिकाम्या बसेस दृष्टीला दिसणार. पण त्यापैकी आपल्याला हव्या त्या बसला गतिमान करणारा बसचालक चहा पीत सहकाऱ्यांशी गप्पा मारत असणार. माझ्यासारखेच अनेक उतारू या दृश्याला विलक्षण असहायतेने डोळ्यांत साठवत बसणार. मग काही वेळाने त्याच्या शेड्युलप्रमाणे तो रमत गमत बसच्या दिशेने जाणार. आपण रांगेत अगदी शेवटी असल्याने बसणे सोडून द्या पण उभ्याने तरी जाता येईल काय याची चिंता करत राहणार. या सगळ्या सव्य-पसव्व्याचा हिशेब करत बऱ्याच अगोदर मी घरातून निघाले.  
मी घरापासून बस stop च्या दिशेने चालू लागले. पण अहोभाग्य ! एका उतारूला पोहोचवून एक रिक्षा परत येत होती. मी हावऱ्यासारखी रिक्षा झडप घालून पकडली आणि ती रिक्षा पकडायला आलेल्या काही लोकांकडे विजयी मुद्रेने पाहत मी ठाणे स्टेशनाच्या दिशेने निघाले. मी भलतीच खूष होते. गाडीही अशीच पटकन मिळावी अशी मनोमन प्रार्थना करत होते. मी रिक्षातून उतरले. रिक्षावाल्याकडे चक्क सुटे पैसे होते जे त्याने मला अजिबात न कुरकुरता दिले. रिक्षाचा पल्ला मी आज सर केला होता. मी स्टेशनात शिरले. पर्समध्ये CVM कुपन्स होती. स्टेशनवरील यंत्राने साथ दिली तर त्यांच्यावर शिक्क्याचे संस्कार होणार होते. मी साशंक मनाने त्या यंत्राशेजारी गेले आणि माझी कुपन्स पंच झाली. मला गहिवरून आल्यासारखे वाटले. मी एकवार सभोवार नजर फिरवली  आणि माझ्या लक्षात आले की स्टेशन आमुलाग्र बदलले आहे. मी माझ्याच नादात असल्याने माझे लक्ष इतर कुठे गेलेच नव्हते. तिकीटाची रांग भराभर पुढे सरकत होती. आजूबाजूला भिकारी औषधालाही दिसत नव्हते. पान खाऊन पचापच थुंकण्याच्या अमूल्य खुणा जमिनीवर कुठेच दिसत नव्हत्या. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तिकीट देणारेही शांत आणि समाधानी चेहऱ्याने तिकिटांचे वाटप करत होते. आरडाओरड नाही, गोंधळ नाही, शिवीगाळ नाही सारे कसे शांत, निवांत, सुरळीत चालले होते. कोणीही तिकिटांच्या रांगेत घुसत नव्हते. तिकीट काउंटर वरील कर्मचारी चहा पिण्यासाठी म्हणूनही गायब होत नव्हते. उखडलेल्या फरश्या, पाण्याची थारोळी, कचरापट्टी काही काही म्हणून दृष्टीपथात येत नव्हते. फेरीवाले, भाजीवाले अदृश्य झाले होते. या अनोळखी वातावरणामुळे मी विलक्षण भांबावले. सुन्न झाले. इतक्यात काही हवंय का आपल्याला? अशी गोड आवाजात पृच्छा झाली. मी झटकन वळून पहिले तरं एक महिला कर्मचारी मला मदत करण्यासाठी म्हणून तत्परतेने उभी होती. दादरला जाणारी गाडी कोणत्या फलाटावर लागेल? मुळात एकामागोमाग एक अशा अविश्वसनीय गोष्टी घडल्याने हे रेल्वे स्टेशन आहे यावरील माझा विश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती रेल्वेच्या मालकीची आहे की नाही किंवा या ठिकाणाला नक्की काय म्हणतात हेच लक्षात येत नव्हते. अहो एक, तीन अथवा चार नंबरच्या फलाटावर जा तिथे तुम्हाला इच्छित गाडी मिळेल, फास्ट लोकल हवी असेल तरं सहा नंबरवर जा. गुड डे. ती सुहासिनी, मधुरभाषिणी  इतर भगिनींना मदत करण्यासाठी पुढे गेली. 
रेल्वे प्रशासन एकाएकी इतके पराकोटीचे कसे सुधारले हे मी ह्याची देही, ह्याची डोळा अचंबित होऊन पाहत होते. फलाटावर कोणतीही अनावश्यक गडबड नव्हती. चाकरमानी समाधानी, चिंतामुक्त दिसत होते. कॉलेजकुमारांच्या आणि कुमारींच्या घोळक्यातून वार्तालाप होत होते, हास्याचे फवारे उडत होते. फलाट विलक्षण स्वच्छ दिसत होते. चकचकीत पोलिश केलेल्या बुटासारखे! येणाऱ्या गाडीची अनाउन्समेंट वेळेवर होत होती. ती गाडी नेमकी कोणत्या फलाटावर येणार आहे ही पूर्वसूचना मिळाल्याने प्रवाशांची धावपळ वाचत होती. मी सी.एस.टी कडे जाणारी गाडी पकडली. गाडीत चढताना जराही धक्काबुक्की झाली नाही. मुळात गाड्या वेळेवर असल्याने चढण्यासाठी फारशी गर्दी नव्हतीच. मला सकाळच्या गाडीत विनासायास विंडो सीट मिळाली. मी आनंदाने रडण्याच्या बेतात होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीत बसल्यानंतर एकदाही नाक धरायला लागले नाही. भाजी, मासळी, कचरा किंवा विष्ठा यांचा मागमूसही नसल्या कारणाने 'क्षण आला भाग्याचा' असे मोठ्याने म्हणावेसे वाटत होते. गाडीच्या पृष्ठभागावर पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याची भारतीय संस्कृतीला साजेशी अभिमानास्पद चिन्हे नव्हती. आज रेल्वे स्टेशनात आल्यापासून नुसता सुखाचा वर्षाव होत होता. प्रत्येक स्टेशनावर चढता-उतरताना करावी लागणारी जीवघेणी कसरत आज दिसतच नव्हती. जेमतेम काही प्रवासी चढत होते तरं काही उतरत होते. तेही एकमेकांना दाक्षिण्य दाखवून. या सुखाच्या परमावधीचा अनुभव डोळ्यांत साठवत आणि  गाणे गुणगुणत मी दादरला सुखनैव उतरले. माझी न सुटलेली साडी, न विस्कटलेले केस आणि न घामेजलेला चेहरा हे माझ्या सुखाचे भांडवल होते. 
इतक्यात आई ऊठ , आई ऊठ अशा परिचित हाका मला ऐकू आल्या. आज तुझा दादरला कार्यक्रम आहे ना ? मग लवकर निघायला हवं तुला. माझी लेक मला जागं करित होती.    

No comments:

Post a Comment