Friday 13 April 2012

मीनाकुमारी- पडद्यामागची शोकांतिका

१९३२ ते १९७२ असा उणापुरा चाळीस वर्षांचा मृत्यूलोकातील प्रवास तिने केला. तिच्या जन्मापासूनच दुर्दैवाने तिची सोबत केली. ती जन्माला आली खरी पण आई-वडिलांच्या गाठी पैसेच नसल्याकारणाने तिला एका मुस्लीम अनाथाश्रमात सोडून यावे लागले. नंतर त्यांनी तिला घरी आणले. ज्या वयात मुले शाळेत जातात त्या वयात लहानगी मीना वडिलांबरोबर अनिच्छेने चित्रपट स्टूडीओच्या पायऱ्या चढू लागली. तिला शाळेत जाऊन इतर मुलांसारखे शिकायचे होते. त्यासाठी ती तळमळत असायची. पण नियतीचे बेत काही वेगळेच होते. वयाच्या सातव्या वर्षापासून बेबी मीना चित्रपटांत बाल-कलाकार म्हणून दाखल झाली.  
ती एकटीच तिच्या कुटुंबाची पोषणकर्ती होती. तिचे वडील उर्दू कविता करायचे, हार्मोनियम वाजवायचे, चित्रपटांत क्षुल्लक भूमिकाही करायचे पण त्यांची  निश्चित स्वरुपाची आवक नसल्याने मीनाच्या लहानशा खांद्यांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. तिला दोन बहिणीही होत्या. आज जशा मुला-मुलींना त्यांच्या नोकरदार आई-वडिलांकडून वेगवेगळ्या आर्थिक सुविधा उपलब्ध होतात, तशा मीनाकडून मीनाच्या कुटुंबियांना मिळत होत्या.
बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांतून मीनाकुमारीचे लोभस दर्शन प्रेक्षकांना घडले. छोट्याच्या चणीची, निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली. काही निखळ विनोदी भूमिकाही तिच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर तिने साकारलेल्या 'शोक'नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. डोक्यावरून पदर घेतलेली, कपाळावर मोठं कुंकू लावलेली 'भाभी की चूडिया' मधील तिची शालीनता पाहून ही मुस्लीम आहे हे मानायला मन तयार होतंच नव्हतं. ती तिने साकारलेल्या जवळजवळ प्रत्येक भूमिकेत चपखल बसायची. 'दिल एक मंदिर' मध्ये तिने साकारलेली विवाहितेची भूमिका सहजसुंदर, मन हेलावून टाकणारी होती. पतीच्या मृत्युच्या चाहूलीने अंतर्बाह्य व्यथित झालेली आणि पतीवर उपचार करणारा तिचा लग्नाआधीचा प्रियकर असल्याने जुन्या आठवणींनी व्याकूळ झालेली तसेच आपल्या पतीवर आपल्या प्रियकराकडून योग्य ते उपचार होतील ना या साशंकतेने सैरभैर झालेली व्यक्तिरेखा तिने उत्कृष्टपणे साकार केली. तिची पाकीजामधील साहिबजानही काळजात घट्ट रुतून बसली. साहब बीबी गुलाम हा तर तिच्या अभिनयसंपन्नतेचा परमोच्चबिंदू होता. तिने पडद्यावर साकारलेली छोटी बहु ही एकमेवाव्दितीय आहे. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून मीनाकुमारी ने दर्जेदार अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अनेक परितोषकांनी  ती सन्मानित झाली.       
 तिचे स्वत:चे शिक्षण झाले नसले तरीही ती कवीमनाची होती. उर्दू शेरो-शायरी उत्कृष्ट पद्धतीने करत होती. अनेक नझ्म तिने गायल्याही! पण तिच्या अतिसंवेदनशील कविमनाला वास्तवातील आघात पेलवले नाहीत. ती उन्मळून पडली. मदिरेच्या आहारी गेली. तिला जगाची शुद्ध राहिली नाही. 
१९५३ साली वयाने पंधरा वर्षे वडील असलेल्या आणि विवाहित असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोहीशी ती विवाहबद्ध झाली. सुरवातीची काही मोजकी वर्षे जरा बरी गेली पण नंतर दोघांमधील वैचारिक अंतर वाढू लागले. त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी म्हणजे १९६० साली त्यांची वैवाहिक कारकीर्द घटस्फोटापर्यंत पोहोचली. अनेक तरुण प्रलोभनांना ती बळी पडली. तिच्या आयुष्याचे तारू येणाऱ्या वेड्यावाकड्या लाटांवर हेलकावत दिशाहीन भरकटत चालले. १९६४ साली घटस्फोटावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आणि मीनाकुमारी नैराश्याच्या गर्तेत खोल बुडाली. ती वारेमाप पिऊ लागली. तिच्या वागण्याला कोणताही घरबंध राहिला नाही. मानसिक तसेच शारीरिक अध:पतन सुरु झाले. 
१९६४ च्या दरम्यान ती गंभीररित्या आजारी झाली. पिण्याचा तिच्या लिव्हरवर अतिशय वाईट परिणाम झाला होता. तिला उपचारांसाठी लंडनला नेण्यात आले.त्यातून ती कशीबशी सावरली आणि चित्रपटांतून चरित्र अभिनेत्री साकारू लागली. 'मेरे अपने' या चित्रपटातून तिने लक्षणीय भूमिका साकारली. १९५६ साली सुरु केलेल्या पाकीजाचे चित्रीकरण पूर्ण झाले नव्हते. स्व.सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पाकिजा चित्रपटाची काही रिळे पहिली आणि कमाल अमरोहींना हा चित्रपट पूर्ण करण्याची विनंती केली. मीनाकुमारीची अवस्था त्यावेळेस बिकट होती परंतु त्याही अवस्थेत तिने जिद्दीने उरलेले, रखडलेले चित्रीकरण पूर्ण केले आणि अखेर तब्बल सोळा वर्षांनी, १९७२ साली हा चित्रपट रसिकांसाठी खुला झाला.  ३१ मार्च १९७२ साली मीनाकुमारीने जगाचा निरोप घेतला. ज्या निर्धन अवस्थेत ती जन्मली त्याच निर्धन अवस्थेत ती गेली. ती गेल्यानंतर हा चित्रपट बघायला प्रेक्षकांची अमाप गर्दी लोटली. 
लोकांनी तिला व्यभिचारी, चरित्रहीन अशी अनेक लेबले लावली. तिच्या पिण्यावरही भरपूर टीका झाली पण जे आयुष्य तिच्या वाट्याला आलं त्या तिच्या आयुष्याबद्दल किती जणांना समानुभूती वाटली? तिची शिकण्याची इच्छा मारली गेली. संपूर्ण कुटुंबासाठी तिने तिचं आयुष्य पणाला लावलं. चेहऱ्याला रंग फासून ती उभी राहिली म्हणून तिचे आई-वडील, भावंडे यांना जगता आले, वावरता आले. ती व्यसनाधीन म्हणून लोक तिचा तिरस्कार करत होते पण तिने सोसलेल्या दु:खाचा, असहायतेचा, कष्टाचा, मानहानीचा अन्वय लावायचा कुणी साधा प्रयत्नही केला नाही. वयाने एवढ्या वडील असलेल्या माणसाशी तिने लग्न का केलं हे जरी इतरांच्या दृष्टीने अनाकलनीय असले तरी तिला प्रापंचिक सुख हवे होते, मुलेबाळे हवी होती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक जिव्हाळा हवा होता. तिने अपेक्षिलेल्या बहुतांश गोष्टी तिला मिळाल्या नाहीत आणि मग त्या मिळवण्यासाठी तिची केविलवाणी धडपड, तगमग सुरु झाली. प्रेम हवं म्हणून ती प्रलोभनांना शरण गेली. ते मिळालं नाही तेव्हा तिने दारूला आपली जिवाभावाची सखी मानली.  
आज मीनाकुमारीला जाऊन चाळीस वर्षे लोटली. तिच्या समकालिनांनी तसेच अनेक नवनव्या तारकांनी चित्रपटसृष्टी आपापल्या वकुबाप्रमाणे गाजवली. पण 'रुक जा रात ठहर जा रे चंदा' हे गीत जेव्हा कानाचा कब्जा घेतं तेव्हा वाटतं ती अजून जरा थांबली असती तर! 'पिया ऐसो जिया में' म्हणत तिच्या डोळ्यांनी रसिकांची आणखी नजरबंदी करायला  हवी होती.  विरहव्याकुळता, सोशिकता, शालीनता या भावांची ती मूर्तिमंत स्वामिनी होती. तिने अजून राहायला हवं होतं.  


       

2 comments:

  1. एकदम सुंदर आणि विलक्षण लेख.सुरुवातीला माझी पसंद वेगळ्या नट्यांना असे, पण जेव्हा मी भाभी की चुडिया १९६१ पहिला तेव्हा च मला समजले की मीनाकुमारी ची अभिनयक्षमता विलक्षण आहे. तिने अभिनय केलेल्या भूमिका कुणीच करू शकत नाही पण इतर कुणीही केलेल्या चित्रपटात ती नायिका म्हणून सहज काम करू शकली असती. मीनाकुमारी कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेत इतकी मिळून-मिसळून जात असे की आपण त्या भूमिकेसाठी अन्य कुणाही नटीचा विचार करू शकत नाही.सगळ्याच भूमिका जगली मीनाकुमारी.बेनझीर,साहिब बीवी और गुलाम,मै भी लडकी हू, आरती, भाभी की चुडियाँ सारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी विलक्षण आणि शक्तिशाली, तरीही शालीन, सभ्य,सुसंस्कृत अभिनयसंपन्नता सिद्ध केली.

    ReplyDelete
  2. 'लोकांनी तिला व्यभिचारी, चरित्रहीन अशी अनेक लेबले लावली. तिच्या पिण्यावरही भरपूर टीका झाली पण जे आयुष्य तिच्या वाट्याला आलं त्या तिच्या आयुष्याबद्दल किती जणांना समानुभूती वाटली? तिची शिकण्याची इच्छा मारली गेली. संपूर्ण कुटुंबासाठी तिने तिचं आयुष्य पणाला लावलं. चेहऱ्याला रंग फासून ती उभी राहिली म्हणून तिचे आई-वडील, भावंडे यांना जगता आले, वावरता आले. ती व्यसनाधीन म्हणून लोक तिचा तिरस्कार करत होते पण तिने सोसलेल्या दु:खाचा, असहायतेचा, कष्टाचा, मानहानीचा अन्वय लावायचा कुणी साधा प्रयत्नही केला नाही. वयाने एवढ्या वडील असलेल्या माणसाशी तिने लग्न का केलं हे जरी इतरांच्या दृष्टीने अनाकलनीय असले तरी तिला प्रापंचिक सुख हवे होते, मुलेबाळे हवी होती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक जिव्हाळा हवा होता. तिने अपेक्षिलेल्या बहुतांश गोष्टी तिला मिळाल्या नाहीत आणि मग त्या मिळवण्यासाठी तिची केविलवाणी धडपड, तगमग सुरु झाली. प्रेम हवं म्हणून ती प्रलोभनांना शरण गेली. ते मिळालं नाही तेव्हा तिने दारूला आपली जिवाभावाची सखी मानली.' शतशः खरे,निर्विवाद सत्य आहे. मीनाकुमारी चे व्यक्तिगत जीवन निव्वळ अपेक्षाभंग, नैराश्य,विरह,सुखाची कमी,मानहानी,प्रेमभंग,जवळच्या माणसांकडून मिळणारी वाईट वागणूक यांनी भरलेले होते.पण लोकांकडे काय लक्ष द्यायचंय? लोकं सगळ्या बाजूनी बोलतात. शेवटी मीनाकुमारी कितीही वर्षातून एकदाच होते.

    ReplyDelete