Thursday, 29 March 2012

मांसाहार आणि प्रतिष्ठा

तसं बघायला गेलं तर माणूस हा एक मिश्राहारी प्राणीच आहे पण ज्यांच्या खाण्यात शाकाहारापेक्षा मांसाहाराचे प्रमाण जास्त असते अशी माणसे स्वत:ला उगाचच प्रतिष्ठित समजत असतात. त्यांचं 'नॉन-व्हेज' प्रेम बऱ्याच ठिकाणी उतू जात असतं. आता व्हेज म्हणजे वरण-भात-बटाट्याच्या भाजीला परब्रम्ह समजणारे आणि नॉन-व्हेज म्हणजे अंड्यापासून  ते मगरीची भजी खाणारे सगळे!  
माझ्या लहानपणाची एक गोष्ट मला आठवतेय. त्या वेळी आम्ही मुंबईत 'अमीन मंझील' या सिटीलाईट भागातील चाळीत राहत होतो. दुसऱ्या मजल्यावरील आमचं कुटुंब वगळता सगळे मांसाहारी. सबंध चाळीत आम्ही धरून फक्त दोन ब्राह्मण कुटुंबे. एकदा दसऱ्याचे दिवशी आमच्या घरी माझ्या आजी-आजोबांना सोने द्यायला चाळीतील काही व्रात्य मंडळी आली होती. जाता जाता आमच्या घराच्या व्हरांड्यात अंडे फोडून टाकण्याचे सत्कर्म ती करून गेली. त्यानंतर त्या बदमाशांना माझ्या आजीकरवी सज्जड शिक्षाही मिळाली. मुद्दा असा की ब्राह्मणांच्या घरात असे अंडे टाकणे यात त्यांना काही थ्रीलिंग वाटले असणार. 
मांसाहारी लोकांच्या घरात बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे सर्वसामान्यत: मांसाहारासाठी राखून ठेवलेले वार असतात. त्यामुळे इतर वारी जणू आपल्यावर आता काय संकट गुदरलय अशा अविर्भावात ही माणसे शाकाहार खात असतात. त्यात पण मग मांसाहाराचा 'फिल' यायला हवा म्हणून कुठे आले-लसूण लावून तळण कर, कुठे कांदा-खोबरे घालून वाटून कालवण कर असा शाकाहार 'modify' केला जातो. वरण-भात-भाजी खाणे म्हणजे जणू यांना काळ्या पाण्याची शिक्षा वाटते. मुगाच्या डाळीची वाफाळलेली खिचडी केली तर ह्यांना आपल्याविरुद्ध कुणी कट केल्यासारखा वाटतो. कोबी-पडवळ-कारली-तोंडली-दुधी खाण्यापेक्षा विहीर जवळ करावी असे ह्यांना वाटू लागते. ताकाची कढी, टोमाटोचे सार, तूरडाळीची आमटी यांतून  क्रेझ निर्माण होत नाही.  वांगी, भोपळा, मुळा यांच्या भरितापासून काडीमोड घ्यावासा वाटू लागतो.  भेंडी-गवारी-शिराळी या भाज्या पूर्वजन्मीच्या वैरिणी वाटू लागतात. थोडक्यात साधे, सात्विक अन्न यांना गोड लागत नाही. 
हॉटेलात जायचे तर फक्त 'नॉन-व्हेजच' खायचे असा ह्यांचा मांसाहारी बाणा असतो. म्हणजे ह्यांच्या खास भाषेत 'घासफूस' घरी खायचे आणि हॉटेलमध्ये मात्र  तंगडी-बिर्याणी आणि फिश फ्राय याला पर्याय नाही. आपण आलू मटर, पालक पनीर, व्हेज मख्खनवाला, दाल फ्राय, व्हेज पुलाव ही नावे मेनूकार्डवर नुसती बघितली तरी  हे आपल्याला 'डाऊनमार्केट' आहोत अशा पद्धतीने बघणार! काय तुम्ही, एवढे हॉटेलात येऊन खाऊन खाऊन काय खाणार तर पालक पनीर आणि दाल फ्राय. मग घरीच बसायचं की! अरे मस्त चिकन-मटण हाणा की! म्हणजे शाकाहार खाऊन आपण तृप्तीने ढेकर देणार आणि इथे ह्यांच्या पोटात दुखणार. फिश-चिकन-मटण म्हणजेच फक्त स्वर्गसुख बाकी  इतर कोणत्याच पदार्थात दम नाही अशी ह्यांचीच ह्यांनी गोड समजूत करून घेतलेली असते. 
मांसाहार आणि प्रतिष्ठा हातात हात घालून चालतात. शाकाहाराला प्रतिष्ठा नाही. नामांकित हॉटेलात जाऊन आपण व्हेज जेवण जेवलो तर आपल्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे यांना वाटत असावे. यांच्या मते बोंबील फ्रायला जो दर्जा आहे तो कांदाभज्यांना नाही. तंदुरी चिकनला जे ग्लामर आहे ते पनीर टिक्क्याला नाही. मुर्ग मसल्लम म्हटल्याने जे सेन्सेशन निर्माण होते ते व्हेज कुर्म्याने होऊ शकत नाही. In short, शाकाहार घरी नाईलाजास्तव जोपासावा आणि समारंभात, पार्ट्यांत, हॉटेलांत आणि चारचौघांत मांसाहार हाच धर्म पाळावा असे यांचे म्हणणे असते. 
पूर्णत: शाकाहारी असलेले त्याच आवडीने इडली-सांबार खाऊ शकतात ज्या आवडीने इतर लोक चिकन-मटण खात असतात. आपल्या बरोबरीचे नॉन-व्हेज खात आहेत म्हणजे सत्कारास पात्र आहेत असे त्यांना कधीच वाटत नसते. आपले साधेसुधे खाणे अभक्षभक्षणाच्या प्रतिष्ठेच्या आड येते आहे असे यांना मुळीसुद्धा वाटत नाही. व्हेज खाऊन आपला लौकिक डगमगतोय आणि नॉन-व्हेज खाऊन त्यांची मान उंच होतेय अशी काल्पनिक चित्रे रंगवण्यात शाकाहारींना स्वारस्य वाटायचे काही कारण नाही. ज्याला जे पचते, जे रुचते ते त्याने खावे, आनंदाने खावे आणि तृप्त व्हावे एवढी सुज्ञता प्रत्येकाने मनी बाळगली तरी त्याच्या खाण्याची आनंदयात्रा  होईल. 
( विशेष टीप : मी मूळची ब्राम्हण परंतु काणकोणकरांशी लग्न झाल्यावर मात्र मी नॉन-व्हेज नुसतं खायला शिकले नाही तर करायलाही शिकले. माझ्या सासूबाई गोव्याकडच्या असल्याने तेथील खास पदार्थ उत्तम रांधायच्या. त्याच्या हाताखाली मी सर्व शिकले. पण माझ्या यजमानांना मात्र मांसाहाराची खास आवड नव्हती. त्यांना ब्राह्मणी पदार्थ जास्त आवडायचे. मलाही माफक नॉन-व्हेज आवडते पण मी शाकाहाराचीही तितकीच भोक्ती आहे. खाण्यात डावे-उजवे करायला मला व्यक्तिश: आवडत नाही. पण आजवरच्या आयुष्यात यासंदर्भात जे काही मजेशीर अनुभवायला मिळाले त्यावरील माझे विचार मी वरील ब्लॉगमध्ये  मांडले आहेत. जे आवडत ते खावं आणि आनंदाने जगावं हेच खरं. पण स्वत: मांसाहार करून इतर शाकाहारींना जे क:पदार्थ लेखतात किंवा शाकाहारी खाण्याला जे नाके मुरडतात त्यांना योग्य तो जाणीव करून द्यावी यासाठी हा खटाटोप आहे. )   

1 comment:

  1. काही वर्षापूर्वी प्रवासा मधे असताना सह-प्रवाश्याच्या जवळील एक पुस्तक चाळायला घेतले होतेंअक्कि नाव आता आठवत नाही. त्यातील ह्याच विषयाला धरून एक लेख वाचनात आला होता. त्यात उत्क्रांती द्वारे निसर्गाने मानव प्राणी कसा शाकाहारास योग्य बनवीला आहे ह्याचे अतीशय सुंदर विश्लेशण केलेले होते. सर्व मांसाहारी प्राणयांना त्या आहारास अनूकूल अशी शरीर रचना दिली आहे- जसे तीक्षण नखे, धारदार आणि मोठे सुळे, प्रभावी पाचन संस्था वग़ैरे वग़ैरे. मनुष्या जवळ प्रारंभिक अवस्थेत असणारी ही सर्व रचना बदलत गेली आणि आज केवळ शाकाहारास योग्य अशीच शरीर रचना आहे.
    धर्म शास्त्रानुसार विचार केल्यास मनुष्यावर- ( त्याच्या शारीरिक आणि मानसिक जड़न घड़नी वर) आहाराचा निश्चीत परिणाम होतो. राजस, तामस आणि सात्वीक वृती ह्या आहारा वर बर्याच अंशी निर्भर असतात.
    आपणास काय हितकर आहे हे समजण्या साठी आवश्यक ती बुद्धि देवानी म्हणा वा ईश्वरानी म्हणा माणसाला दिली असुनही त्यास ती वापरायची नसेल तर कोण काय करणार?

    ReplyDelete